Friday, July 19, 2024

 विशेष लेख

मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण

महिलांच्या सक्षमीकरणाला मिळेल चालना


महाराष्ट्र हे देशाला दिशा देणारे राज्य. महाराष्ट्राने सुरू केलेल्या अनेक योजना,उपक्रम व अभियानाचे अनुकरण देशातील अनेक राज्यांनी केले आहे. स्त्री आणि पुरुष ही संसाररूपी जीवनाची दोन चाके आहे. कुटुंबाच्या अर्थार्जनात महिलाही आपला सहभाग देत आहे.महिलांच्या विकासाला चालना मिळाली पाहिजे म्हणून महिला धोरण ठरविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. माझी कन्या भाग्यश्री,लेक लाडकी या मुलींसाठी योजना सुरू केल्या.एवढ्यावरच न थांबता आता महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण ही महत्वकांक्षी योजना सुरू केली आहे.या योजनेमुळे महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य,त्यांच्या आरोग्य व पोषणात सुधारणा होण्यासोबतच कुटुंबात त्यांची निर्णायक भूमिका मजबूत होण्यास मदत होणार आहे.

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण " या योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करून त्याची व्याप्ती देखील वाढविली आहे.महानगरपालिका क्षेत्राकरिता वार्ड स्तरीय समित्या गठित करण्यात येत आहे. जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळावा,यासाठी अनेक अटी शिथिल करून प्रक्रिया अधिक सुलभ केली आहे. 21 वर्षे ते 65 वर्षे वयोगटातील विवाहित असलेल्या विधवा,घटस्फोटीत,परितक्त्यानिराधार महिला त्याचप्रमाणे कुटुंबातील एका अविवाहित महिलेला दर महिन्याला पंधराशे रुपये त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात थेट डीबीटी प्रणालीच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे.वर्षाकाठी 18 हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.हा पैसा महिलांच्या अडीअडचणीच्या कामी तसेच त्यांच्या आरोग्यविषयक बाबीसाठी खर्च करण्यात कामी पडणार असून त्यांना आत्मनिर्भर,स्वावलंबी व त्यांच्या सशक्तिकरणाला हातभार लागणार आहे.


 योजनेच्या लाभासाठी लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न लक्ष 50 हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे.एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.ज्या पात्र महिला स्वतः ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात त्यांच्यासाठी नारी शक्ती दूत हे मोबाईल ॲप्लिकेशन कार्यान्वित करण्यात आले आहे.नवविवाहित महिलेचे नाव रेशनकार्डवर लवकर लावणे शक्य होत नाही,त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे.

महिलेचा जन्म परराज्यात झाला असेल आणि ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यास असेल व त्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत विवाह केला असेल तर अशा बाबतीत तिच्या पतीचा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्याशिवाय महिलेच्या पतीचे पंधरा वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड व पंधरा वर्षांपूर्वीचे मतदान कार्ड देखील ग्राह्य धरण्यात येणार आहे.


आता योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेचे पोस्टातील बँक खातेसुद्धा ग्राह्य धरण्यात येणार आहे. तसेच ऑफलाइन अर्जावरील लाभार्थी महिलेचा फोटो काढून तो ऑनलाइन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात येईल.जिल्ह्यात जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळाला पाहिजे यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे कक्ष सुरू करण्यात आले आहे.या कक्षातून महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात त्याची माहिती देऊन त्यांचे अर्ज भरून घेण्यात येत आहे.जिल्हातालुका आणि गाव पातळीवर या योजनेचा जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळावा यासाठी आढावा बैठका देखील घेण्यात येत आहे.समित्या गठित करून समितीची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांचे ग्रामीण व शहरी भागात अर्ज भरून घेण्यासाठी बालवाडी सेविका,अंगणवाडी सेविकानागरी उपजीविका अभियानाचे समूह संघटक,मदत कक्ष प्रमुख,नागरी उपजीविका अभियानाचे समूह संघटकमदत कक्ष प्रमुख,नागरी अभियानाचे व्यवस्थापकआशा सेविका,सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. ज्या महिला लाभार्थी " मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" या योजनेच्या लाभासाठी पात्र असतील त्या लाभार्थी महिलांचे केवळ ऑफलाइन अर्ज भरून घेऊन त्यांनाच या योजनेचा लाभ देण्यात येईल मात्र पात्र लाभार्थी महिलांकडून या योजनेचे अर्ज भरून घ्यावे लागणार आहे.


ग्रामस्तरीय समिती ही गाव पातळीवर स्थापन करण्यात येत आहे.या समितीमध्ये ग्रामसेवक,कृषी सहाय्यक,तलाठी,अंगणवाडी सेविकाआशा सेविका,ग्रामरोजगार सेवक व अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी असतील. या समितीचे संयोजक हे ग्रामसेवक तर सदस्य सचिव अंगणवाडी सेविका असतील. ही समिती गाव पातळीवर जास्तीत जास्त महिलांना लाभ देण्यासाठी शिबिराचे आयोजन करून ऑनलाईन व ऑफलाइन पद्धतीने लाभार्थी महिलांची नोंदणी करणार आहे. ऑफलाइन अर्ज लगेच ॲप/ पोर्टलवर भरावे लागणार आहे. या समितीकडून गावातील अंतिम लाभार्थी महिलांची यादी प्रत्येक शनिवारी आणि आवश्यकतेनुसार गाव चावडीवर वाचन करण्यात येणार आहे.ही यादी गावातील ग्रामपंचायत कार्यालय आणि अंगणवाडी केंद्र येथे प्रसिद्ध करण्यात येणार आहे.या यादीवर कोणी आक्षेप घेतले तर त्याचे निराकरण करण्यात येणार आहे तसेच द्विवृत्ती (डुप्लिकेशन) टाळण्यात येईल.लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे आणि ऑनलाईन पोर्टलवर पात्र लाभार्थ्यांची नोंद झाल्यावर नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविकाअंगणवाडी सेविकाराष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाचे समूह संघटक,मदत कक्ष प्रमुख,शहर अभियानाचे व्यवस्थापक,आशा सेविका,सेतू सुविधा केंद्र,अंगणवाडी  पर्यवेक्षिका,ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र यांना प्रति लाभार्थी 50 रुपये याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे.


मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्र देणे,अर्ज भरून घेणे यासह संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक केल्यास,या प्रक्रियेत दिरंगाई केल्यास किंवा योजनेच्या लाभासाठी महिलांकडून पैशाची मागणी करण्यात येत असल्याचे निदर्शनास आल्यास अशा अधिकारी,कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. या योजनेतील पात्र महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये म्हणजेच वर्षाला 18 हजार रुपये राज्य सरकार देणार आहे.

 

विवेक खडसे

जिल्हा माहिती अधिकारी,

धाराशिव

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...