Friday, July 19, 2024

 वृत्त क्र. 608

 

जिल्हा उद्योग केंद्राची एमएसएमई क्षेत्रासंदर्भात

सरकारची धोरणे-उपक्रमाबाबत सोमवारी कार्यशाळा 

 

नांदेड, दि. 19 जुलै :- जिल्हा उद्योग केंद्र या कार्यालयाची एमएसएमई क्षेत्रासंदर्भात राज्य व केंद्र सरकारची धोरणे आणि उपक्रम याबाबत एक दिवशीय कार्यशाळा सोमवार 22 जुलै रोजी उद्योग भवन नांदेड येथे सकाळी 9.30 वा. आयोजित करण्यात आली आहे.

 

 ही कार्यशाळा पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली आहे.  या कार्यशाळेस जिल्ह्यातील सर्व औद्योगिक संघटना, नामांकित उद्योजक, उद्योजक व्यवसायाशी संबंधीत सर्व शासकीय विभाग व संस्थांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे.

 

या कार्यशाळेचा उद्देश हा नांदेड जिल्ह्यातील उद्योजकांचे उत्पादन जागतिक बाजारात नेणे हा असून सदर कार्यशाळेत स्थानिक उत्पादनांची गुणवत्ता वाढविणे, निर्यात प्रक्रिया, खरेदीदार आणि विक्रेते शोधणे, निर्यात कर्ज आणि अनुदान योजना, पॅकिंग व ब्रेडींग, आवश्यक चाचण्या या विषयांवर चर्चा होणार आहे. सर्व योजनांची माहिती उद्योजकांना एकाच व्यासपिठावर उपलब्ध होण्याच्या दृष्टीने, जागरुकता वाढविण्यासाठी भागधारकासोबत एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन "IGNITE Maharashtra-2024" या अंतर्गत करण्यात आले आहे. या कार्यशाळेसाठी तज्ज्ञ मान्यवर मार्गदर्शन करतील. जिल्ह्यातील औद्योगिक संघटना, निर्यातदार, नामांकित उद्योजक, उद्योजक व्यवसायाशी संबंधीत सर्व शासकीय विभाग, निर्यातीशी संबंधीत अधिकारी व केंद्र व राज्य शासनाच्या अनुदान योजनेचा लाभ घेतलेल्या यशस्वी उद्योजक यांचा सहभाग राहणार आहे.

 

राज्यासाठी महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या एमएसएमई क्षेत्रावर अधिक भर देऊन त्यांची कार्यक्षमता व उत्पदकता वाढविणे, राज्यात उद्योजकीय वातावरण अधिक व्यापक करून रोजगार, स्वंयरोजगार संधी मोठ्या प्रमाणात निर्माण करणे, एक जिल्हा उत्पादन उपक्रम व निर्यातवद्धीस चालना देण्यासाठी तसेच उद्योगाच्या विकासाकरिता राज्य तसेच केंद्र शासनाचे विविध विभाग त्यांचे उपक्रम व योजना संचालनालयामार्फत राज्यात राबविण्यात येत आहेत, असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी कळविले आहे.

0000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...