वृत्त क्र. 606
प्रत्येक शाळेत शिक्षण सप्ताह साजरा करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 19 जुलै :- राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त 22 ते 28 जुलै या कालावधीत “शिक्षण सप्ताह” साजरा करण्यात येणार आहे. या शिक्षण सप्ताहात आठवड्याचा प्रत्येक दिवस एका विशिष्ट उपक्रमासाठी नियोजित करण्यात आला आहे. ज्यात शिक्षण व विकासाच्या विविध पैलूंचा समावेश आहे. हा शिक्षण सप्ताह विद्यार्थी, शिक्षक, धोरणकर्ते व भागधारक यांच्यामध्ये सहकार्य वाढविणारा ठरणारा आहे. शिक्षण सप्ताहामध्ये पुढीलप्रमाणे उपक्रम राबविण्याबाबत आयुक्त (शिक्षण) पुणे यांनी सूचित केले आहे. त्यानुसार शिक्षण सप्ताहातील उपक्रम पुढील वेळापत्रकाप्रमाणे शाळेत राबवून व तसा अहवाल शिक्षणाधिकारी (मा.) जिल्हा परिषद कार्यालयास पाठवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेमार्फत करण्यात आले आहे.
सोमवार 22 जुलै रोजी अध्ययन-अध्यापन साहित्य दिवस. मंगळवार 23 जुलै रोजी मुलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस. बुधवार 24 जुलै रोजी क्रीडा दिवस. गुरुवार 25 जुलै रोजी सांस्कृतिक दिवस. शुक्रवार 26 जुलै रोजी कौशल्य व डिजीटल उपक्रम दिवस. शनिवार 27 जुलै रोजी मिशन लाईफच्या दृष्टीक्षेपात एकोक्लब उपक्रम,शालेय पोषण दिवस. रविवार 28 जुलै रोजी समुदाय सहभाग दिवस याप्रमाणे उपक्रमांची नांदेड जिल्ह्यामध्ये शिक्षण सप्ताहाची यशस्वीरित्या अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनांच्या सर्व माध्यमांच्या मुख्याध्यापकांनी जास्तीत जास्त संख्येनी सहभागी व्हावे, असेही आवाहन केले आहे.
000
No comments:
Post a Comment