Wednesday, January 3, 2024

कला व संस्कृतीच्या संवर्धनासाठी नांदेड येथे महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन

 वृत्त क्र. 11

कला व संस्कृतीच्या संवर्धनासाठी

नांदेड येथे महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन

·         जिल्ह्यातील स्थानिक कलावंतासाठी स्वतंत्र वेळ

·         नंदगिरी किल्ल्यावर एक दिवस विशेष कार्यक्रम

·         क्रीडा स्पर्धातून खेळाडूंचा होणार गौरव

नांदेड (जिमाका) दि. 3 :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाला अधोरेखित करुन विविध प्रांतातील संस्कृतीचे जतन, संवर्धन, स्वातंत्र्य लढ्यातील लढवय्याची माहिती जनसामान्यापर्यत पोहचविण्याच्या उद्देशाने नांदेड येथे पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार असून स्थानिक प्रतीथयश कलावंताचा सन्मान त्यांच्या हस्ते होणार आहे.

राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागातर्गंत हा महोत्सव प्रत्येक जिल्ह्यात आयोजित केला जात आहे. शासन निर्णयान्वये या महासंस्कृती महोत्सवाच्या आयोजन व सुयोग्य नियोजनासाठी समन्वय व सनियंत्रण समिती गठीत करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, मनपा आयुक्त, जिल्हा पोलीस अधिक्षक, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरणचे कार्यकारी अभियंता, पर्यटन विभागाचे क्षेत्रिय अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, सांस्कृतिक कार्य विभागाचे  सहाय्यक संचालक, पुरातत्व, पुराभिलेख विभाग, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी आदी या समितीचे सदस्य असून निवासी उपजिल्हाधिकारी हे सदस्य सचिव म्हणून जबाबदारी पार पाडतील.

पाच दिवस चालणाऱ्या या सांस्कृतिक महोत्सवात महाराष्ट्राची संस्कृती दर्शविणारे, शिव चरित्रावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम, लोक कलेतील विविध प्रकार, कवि संमेलन/व्याखाने, जिल्ह्यातील ऐतिहासिक, पुरातत्व, भौगोलिक आणि नैसर्गिक वैभवावर आधारित छायाचित्राचे विशेष प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे. हा पाच दिवशीय महोत्सव लोकसहभागातून यशस्वी करण्याचा मनोदय जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी व्यक्त केला. समितीची पहिली बैठक काल त्यांच्या कक्षात संपन्न झाली. यात नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली.

00000 

जगदज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाची स्थापना

 वृत्त क्र. 10

 

जगदज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ

व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाची स्थापना

 

नांदेड (जिमाका) दि. 3 :- महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाअंतर्गत राज्यातील गुरव व विरशैव लिंगायत समाजाच्या सर्वागिण विकास व आर्थिक उन्नतीसाठी जगदज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाची स्थापना शासनाने केली आहे. या महामंडळाचे कामकाज हे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाअंतर्गत कार्यान्वित करण्यात आले आहे. तरी या महामंडळाच्या योजनेचा लाभ गुरव व विरशैव लिंगायत समाजाच्या लोकांनी घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस.एन. झुंजारे यांनी केले आहे.

 

अधिक माहितीसाठी महामंडळाचे जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ज्ञानमाता शाळेसमोर नांदेड - 413 605 तसेच कार्यालयाचा दूरध्वनी क्र. 02462-220865 यांच्याशी संपर्क साधावा, असे महामंडळाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

0000

नशामुक्‍त भारत अभियान व संविधान जागर कार्यशाळेचे 5 जानेवारी रोजी लातूर येथे आयोजन

 वृत्त क्र. 9

नशामुक्‍त भारत अभियान व संविधान जागर

कार्यशाळेचे 5 जानेवारी रोजी लातूर येथे आयोजन

 

नांदेड (जिमाका) दि. 3 :-विदयार्थ्‍यांमध्‍ये समाजभान निर्माण व्‍हावे म्‍हणुन लातूर विभागातील महाविद्यालयांचे प्राचार्य, माध्‍यमिक शाळांचे मुख्‍याध्‍यापक, वसतिगृहांचे गृहपाल यांचेसाठी शुक्रवार 5 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 वा. दयानंद सभागृह, लातूर येथे नशामुक्‍त भारत अभियान व संविधान जागर कार्यशाळेचे आयोजन करण्‍यात आलेले आहे. या कार्यशाळेस लातूर विभागातील महाविद्यालयांचे प्राचार्य, माध्‍यमिक शाळांचे मुख्‍याध्‍यापक, वसतिगृहांचे गृहपाल यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन लातूर समाज कल्‍याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्‍त अ.र.देवसटवार यांनी केले आहे.

 

काळानुरुप विविध संस्थेमध्‍ये तसेच कुटुंब व्‍यवस्‍थेमध्‍ये बदल झालेले आहेत. दिव्‍यांग व्‍यक्‍ती, तृतियपंथी, ज्‍येष्‍ठ नागरिक यांचे बाबतीत सर्वांनी संवेदनशील होणे गरजेचे आहे. तसेच संविधानाप्रती व देशाप्रती प्रत्‍येकाने जबाबदार होणे गरजेचे आहे. त्‍यादृष्‍टीने समाजामध्‍ये जागृती निर्माण व्‍हावी या दृष्‍टीने या कार्यशाळेमध्‍ये संविधान जागृती, व्‍यसनमुक्‍ती, दिव्‍यांगाच्‍या अडचणी आणि समाजाचे दायित्‍व, ज्‍येष्‍ठ नागरिकांच्‍या व्‍यथा आणि उपचार, तृतीयपंथीयांच्‍या समस्‍या व अंधश्रध्‍दा निर्मुलन या विषयावर तज्ञ मान्‍यवरांचे मार्गदर्शन होणार आहे.

या कार्यशाळेचे उद्घाटन लातूरच्या जिल्‍हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे यांचे हस्‍ते होणार असून कार्यक्रमाचे अध्‍यक्ष जिल्‍हा परिषदेचे अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी अस्‍लम तडवी हे भूषविणार आहेत. या कार्यक्रमात लातूरचे पोलीस अधिक्षक सोमय मुंडे यांचा मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात येणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी स्‍वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र लातूरचे संचालक डॉ.राजेश शिंदे, विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे, शिक्षणाधिकारी (माध्‍यमिक) नागेश मापारी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्रीमती वंदना फुटाणे हे उपस्थित राहणार आहेत.

 

या कार्यशाळेत प्रा. सविता शेटे यांचे अंधश्रध्‍दा निर्मुलन-जागृती प्रा.डॉ.हर्षवर्धन कोल्‍हापुरे यांचे संविधान वाचन-गरज, नंदकुमार फुले यांचे दिव्‍यांग व्‍यक्‍ती-अडचणी आणि समाजाचे दायित्‍व, डॉ.बी.आर.पाटील यांचे ज्‍येष्‍ठ नागरिक व्‍यथा आणि उपचार जागृती डॉ.अनिल जायभाये यांचे तृतियपंथी आणि समाज भान व  डॉ. विजयकुमार यादव यांचे व्‍यसनमुक्‍ती जागृती या विषयावर मार्गदर्शन होणार आहे.

0000

                                       

विद्यार्थ्यांनी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीची उर्वरित रक्कम 7 दिवसाच्या आत महाविद्यालयात जमा करावी - सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे

  वृत्त क्र. 8


विद्यार्थ्यांनी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीची उर्वरित रक्कम

7 दिवसाच्या आत महाविद्यालयात जमा करावी

-         सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे

नांदेड (जिमाका) दि. 3 :-  गेल्या काही दिवसांपासून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती ची सन 2021-22 व सन 2022-23 या शैक्षणिक वर्षातील केंद्र शासनाची 60 टक्के रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर जमा करण्याची कार्यवाही सुरु आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात अशी रक्कम जमा झाली आहे अथवा काही दिवसात जमा होणार आहे. अशा विद्यार्थ्यांनी जमा झालेल्या रकमेमधून त्यांच्या शिष्यवृत्ती अर्जातील मंजूर एकूण निर्वाह भत्ता रकमेच्या 60 टक्के रक्कम वजा करून उर्वरित रक्कम 7 दिवसाच्या आत महाविद्यालयात जमा करावी. याप्रमाणे कार्यवाही न केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विद्यार्थ्याची राहील याची नोंद घ्यावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

 

केंद्र शासनाने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना लागू केली आहे. या योजनेंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दिनांक 17 मार्च 2022 व 7 जुलै 2023 या शासन निर्णयात नमूद केल्यानुसार अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना केंद्र शासनाची 60 टक्के हिश्याची रक्कम महाडीबीटी प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात जमा होणार आहे. ही रक्कम जमा झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांना अनुज्ञेय असलेल्या निर्वाह भत्त्याची रक्कम वजा करून उर्वरित शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क इतर ना परतावा शुल्काची रक्कम संबंधित महाविद्यालयात 7 दिवसांच्या आत जमा करण्याचे निर्देश दिले आहेत.

0000

 

Tuesday, January 2, 2024

 वृत्त क्र. 7 

पेट्रोल व डिझेलचा मुबलक साठा

अफवांवर विश्वास ठेवू नका

- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 

नांदेड (जिमाका), दि. 2 : ट्रक चालकांनी घेतलेली भूमिका लक्षात घेऊन डिझेल व पेट्रोलचा तुटवडा निर्माण होईल या भितीपोटीने काही वाहनचालकात संम्रभ दिसून येत आहे. अनेक वाहनचालक आवश्यकतेपेक्षा जास्त पेट्रोल व डिझेल भरतांना दिसून येत आहे. याबाबत पेट्रोलपंप चालकांकडून आढावा घेतला असून कोणत्याही प्रकारचा तुटवडा जिल्ह्यात नाही, हे स्पष्ट झाले आहे.

 

जिल्ह्यातील सर्व वाहनधारकांनी अफवांवर विश्वास न ठेवता आपल्या गरजेएवढेच नेहमीप्रमाणे पेट्रोल व डिझेल घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.

 

जिल्ह्यात कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यादृष्टिने जिल्हा प्रशासन व पोलीस विभाग दक्ष आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.

0000

वृत्त क्र. 6

वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्या

धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी स्वयंम योजना 

 

नांदेड (जिमाका), दि. 2 : वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी “पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना” अंतर्गत नवीन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत सोमवार 15 जानेवारी 2024 आहे. विहित मुदतीनंतर अर्ज स्विकारले जाणार नाहीत. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

 

महानगरपालिका विभागीय शहरे आणि जिल्हास्तरीय शैक्षणिक संस्थामध्ये शिक्षण घेत असलेल्या धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना सन 2019-20 या शैक्षणिक वर्षांपासुन इयत्ता 12 वीनंतरच्या मान्यताप्राप्त तंत्रशिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयामध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेल्या परंतु शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना “पंडीत दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना” अंतर्गत भोजन, निवास व इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट रक्कम वितरण करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

 

या योजनेच्या अटी व निकष पुढील प्रमाणे आहेत. विद्यार्थी धनगर समाजातील असावा, विद्यार्थ्यांना अर्जासोबत जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील. विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न 2 लाख 50 रुपयापेक्षा जास्त नसावे. विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेल्या शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या ठिकाणी आहे त्या ठिकाणचा विद्यार्थी रहिवासी नसावा. विद्यार्थी इयत्ता 12 वी नंतरचे तंत्र व व्यावसायिक शिक्षण घेणारा असावा. इयत्ता 12 वी मध्ये किमान 60 टक्के गुण मिळालेले विद्यार्थी या योजनेस पात्र राहतील. विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेल्या अभ्यासक्रमाचा कालावधी 2 वर्षापेक्षा कमी नसावा. या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी संबंधीत विद्यार्थ्यांने इयत्ता 12 वी नंतरच्या मान्यताप्राप्त तंत्रशिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयामध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेला असावा.

 

विद्यार्थ्यांची महाविद्यालयातील उपस्थिती किमान 60 टक्के असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांची निवड गुणवत्तेनुसार करण्यात येईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे कमाल वय 28 वर्षापेक्षा जास्त नसावे. विद्यार्थ्यांस आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभागाच्या तसेच शिक्षण घेत असलेल्या शैक्षणिक संस्थेच्या वसतिगृहामध्ये प्रवेश मिळालेला नसावा. धनगर समाजातील दिव्यांग विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ प्राधान्याने देय राहील. विद्यार्थी कोणत्याही प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करत नसावा. संबंधित विद्यार्थ्यांने व शैक्षणिक संस्थेने महाडीबीटी पोर्टलवर भारत सरकार शिष्यवृत्तीचा ऑनलाईन ऑनलाईन पध्दतीने सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांच्याकडे अर्ज करणे अनिवार्य राहील. त्याचप्रमाणे महाडीबीटी पोर्टलवर मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी शिष्यवृत्तीचा योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरलेले विद्यार्थीच या योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरतील.

 

नांदेड महानगरपालिका क्षेत्रामधील मान्यताप्राप्त तंत्रशिक्षण व व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या शासकीय तसेच अनुदानित महाविद्यालयांमध्ये केंद्रीभुत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेऊन शिक्षण घेणाऱ्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांना सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी सन 2023-24 करीता अर्ज करण्याचे आवाहन अध्यक्ष निवड समिती तथा जिल्हाधिकारी नांदेड तसेच सदस्य सचिव निवड समिती तथा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी केले आहे.

 

या योजनेचे अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, सामाजिक न्याय भवन, ग्यानमाता शाळेसमोर, अर्धापुर रोड, नांदेड येथे 15 जानेवारी 2024 पर्यंत (कार्यालयीन सुट्टीचे दिवस वगळुन) संबंधीत विद्यार्थ्यांना वाटप केले जातील. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय नांदेड यांचेशी संपर्क साधावा.

00000

वृत्त क्रमांक 5

 गुरुवारी पंडीत दीनदयाळ उपाध्याय

ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

नांदेड (जिमाका) दि. 2 :- नांदेड जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन  केंद्राच्यावतीने गुरुवार 4 जानेवारी 2024 रोजी पंडीत दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या रोजगार मेळाव्यात नामांकित कंपन्याकडून ऑनलाईन मुलाखती घेण्यात येणार आहेत. बेरोजगार उमेदवारांनी www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नावनोंदणी करुन आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार रोजगार उपलब्ध करुन घ्यावा. या संधीचा जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे. 

0000


वृत्त   निवडणूक तयारीत सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा - विभागीय आयुक्त जी. श्रीकांत नोडल अधिकाऱ्यांच्या बैठकीत निवडणूक तयारीचा आढावा छत्रपती ...