Sunday, October 22, 2023

 इकडे..इकडे...इकडे...

फलंदाज डावखुरा आहे !
▪️अंधांच्या क्रिकेट स्पर्धेत सर्वांनाच जिंकायचे आहे
नांदेड (जिमाका), दि. 22 :- नांदेड येथील श्री गुरूगोविंदसिंघजी स्टेडियम मधील ग्राउंड कमालीचे नम्र झाले आहे. तीन दिवस आता दृष्टिहीन क्रिकेटपटूंना मनसोक्त खेळता यावे यासाठी की काय इथले सारे वातावरण भारावलेले आहे. एकमेकांना आधार देऊन धावपट्टीवरील दोन्ही बाजूच्या यष्ट्या आणि धावपट्टी बॉलमधील छऱ्यांच्या आवाजाने भान हरपून गेली आहेत. एष्टीवर डावखुरा फलंदाज आहे. एष्टी रक्षक “इकडे..इकडे…इकडे…” म्हणून गोलंदाजाला दिशा यावी म्हणून आवाज देत आहे. फलंदाज डावखुरा आहे असा सावध इशारा तो देत आहे. त्याचेही कान सतर्क होऊन तो बॉलच्या दिशेने पाहत आहे !
या वातावरणाला निमित्त ठरले आहे क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड ऑफ महाराष्ट्र यांच्यावतीने आयोजित अंधाच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा. या तीन दिवसीय स्पर्धेसाठी नागपूर, वर्धा, मुंबई, नाशिक, धुळे, जळगाव, सोलापूर, रत्नागिरी, नांदेड, लातूर, छत्रपती संभाजीनगर, यवतमाळ आदी ठिकाणाहून अंध क्रिकेटपटू सहभागी झाले आहे. क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड ऑफ महाराष्ट्र व मराठवाडा स्पोर्ट कॉन्सील फॉर द नांदेड या संस्थेच्यावतीने अंधाच्या या क्रिकेट स्पर्धेद्वारे खेळाडूंची निवड केली जाणार असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष पंकज चौधरी यांनी दिली. या स्पर्धेत शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडू जयदिप सिंग व इतर एशियन स्पर्धा खेळलेले खेळाडू सहभागी झाले आहेत.
भावांनो कठोर परिश्रमाशिवाय मार्ग नाही
- छत्रपती क्रीडा पुरस्कार विजेता जयदिप सिंग
लहानपनापासूनच मला खेळाची आवड होती. मी खेळाकडे जास्त वळलो व मला शाळेनेही विश्वास देऊन खेळाकडे वळविले. माझ्या शिक्षकांनी मला दृष्टी कमी आहे म्हणून कधी मनात उणीव निर्माण होऊ दिली नाही. आपण विश्वासावर उभा राहतो. विश्वासाने चालण्यासाठी, खेळण्यासाठी कठोर परिश्रमाची, कष्ट घेण्याची तयारी असली पाहिजे. भावांनो कठोर परिश्रमाची तयारी ठेवा व शिक्षणासमवेत काही कौशल्य अंगी रुजवून घ्या, असा भावनिक सल्ला छत्रपती क्रीडा पुरस्कार विजेता जयदिप सिंग यांनी दिला. मुंबई येथेच जन्मलेल्या आणि वाढलेल्या जयदिपने अंतरराष्ट्रीय पातळीवर ज्युदो स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले आहे. अनेक राष्ट्रीय, अंतरराष्ट्रीय स्पर्धेतील त्याच्या या चमकदार यशाबद्दल महाराष्ट्र शासनाने त्याचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. क्रिकेड स्पर्धेतील निवड चाचणीसाठी जयदिप ही स्पर्धा खेळत आहे. त्याच्यासमवेत नागेश करंडक राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत 5 वेळा खेळलेल्या नागपूर येथील प्रविण करलोके या क्रीडापटूचाही नांदेड येथील स्पर्धेत सहभाग आहे.
स्पर्धकांची बी-1 ते बी-3 असते वर्गवारी
आपल्या क्रिकेट स्पर्धा सारखेच अंधांच्या क्रिकेट स्पर्धाचे नियम असतात. फक्त फरक एवढाच असतो तो म्हणजे चेंडू जमिनीलाच टाकून फेकायचा. फलंदाजांना दृष्टि नसल्यामुळे त्यांना चेंडू नेमका कुठे आहे याचा अंदाज येण्यासाठी त्यात छर्रे टाकले जातात. प्रत्येक संघात 11 खेळाडू असतात. सर्व अंध. परंतू यात वर्गवारी केली गेली आहे. पूर्णत: दृष्टि नसणारे चार खेळाडू यांना बी-1 म्हटले जाते. तीन मीटर पर्यंत ज्यांना अंधूक दृष्टि आहे त्यांना बी-2 म्हटले जाते. बी-2 वर्गवारीतील तीन खेळाडू असतात तर ज्यांना 6 मीटर पर्यंतच दृष्टि आहे असा खेळाडूंना बी-3 वर्गवारीत गणल्या जाते, असे 4 खेळाडू संघात असतात. बी-1 (पूर्णत: अंध) फलंदाजासाठी धावपटू दिले जातात. एकुण 14 खेळाडूंपैकी प्रत्यक्ष 11 खेळाडूंना खेळविले जाते. या क्रिकेट स्पर्धा यशस्वी होण्यासाठी डॉ माधव गोरे, गणेश काळे, सोमेश मोतेवार, प्रशांत गवंडगावे, गणेश दातावार, दिगंबर लाभसेटवार, राजू मोतेवार, दादाभाऊ खुटे आदी परिश्रम घेत आहेत.
00000













Saturday, October 21, 2023

 वृत्त

 

शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री

दिपक केसरकर यांचा नांदेड दौरा

 

नांदेड, (जिमाका) दि. 21 :- राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

 

शनिवार 21 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री 9.20 वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर येथून मोटारीने रेणुकादेवी माता मंदिर माहूरगड जिल्हा नांदेडकडे प्रयाण. रविवार 22 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री 12 वा. रेणुका देवी माता मंदिर माहूरगड येथे आगमन व रेणुका देवीचे दर्शन. रात्री 12.45 वा. रेणुका देवी माता मंदिर माहूरगड येथून मोटारीने नागपूरकडे प्रयाण करतील.

0000

 नांदेड येथे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे,

निती सरकार यांच्याकडून शहीद पोलिसांना अभिवादन
नांदेड (जिमाका), दि. 21 :- देशभरात कर्तव्य बजावताना धारातीर्थी पडलेल्या पोलीस दलातील शहीद अधिकारी, कर्मचाऱ्यांना पोलीस स्मृतिदिनानिमित्त आज पोलीस कवायत मैदान येथील स्मृतीस्तंभावर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार, सहायक पोलीस अधीक्षक गौहर हसन, विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती निती सरकार, पोलीस अधीक्षक नागरी हक्क संरक्षण योगेशकुमार, मनपा आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. याचबरोबर निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, श्रीमती स्नेहल कोकाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज गुरव, मारोती थोरात, सुशिलकुमार नायर, जगताप, पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, विजय धोंडगे आदींनीही यावेळी पुष्पचक्र अर्पण केले.
दिनांक 21 ऑक्टोबर 1959 रोजी हिमालयातील लडाख जवळ हॉट स्प्रिंग या 16 हजार फूट उंचावर असलेल्या ठिकाणी केंद्रीय राखीव दलाचे जवान गस्त घालत असतांना चिनी सैन्याकडून झालेल्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना शहीद झाले. तेंव्हा पासून 21 ऑक्टोबर हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो. कायदा व सुव्यवस्था राखणे, नागरिकांच्या जीविताचे व मालमत्तेचे रक्षण करणे ही कर्तव्य बाजावत असतांना पोलीस दलातील अनेक अधिकारी व अंमलदार यांना प्रसंगी आपल्याला प्राणाची आहुती द्यावी लागते. यावर्षी संपूर्ण भारतातून 189 पोलीस अधिकारी/अंमलदार हे आपले कर्तव्य बजावत असतांना आपल्या मातृभूमीच्या संरक्षण करतांना शहीद झाले. त्या सर्व शहीदांना आज मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहायक पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल कत्ते यांनी केले.
००००







Friday, October 20, 2023

 सेवा हक्क कायद्याच्या अंमलबजावणी समवेत

सामाजिक बांधिलकी व जबाबदारीचे भान महत्त्वाचे
- राज्य सेवा हक्क आयोगाचे आयुक्त डॉ. किरण जाधव
नांदेड (जिमाका), दि. 20 :- लोककल्याणकारी राज्याच्या भूमिकेतून सर्वसामान्यांना विकासाच्या प्रवाहात येता यावे, त्यांची उन्नती व्हावी यासाठी घटनादत्त तरतुदीतून योजना साकारतात. याचबरोबर प्रशासनात अधिक पारदर्शकता यावी यासाठी माहितीच्या अधिकारासह दप्तर दिरंगाई कायदा, राज्य सेवा हक्क, नागरिकांची सनद आदीद्वारे शासन प्रयत्नशील असते. तथापि जोपर्यंत प्रत्येक अधिकारी या कायदाच्यापलीकडे जाऊन सेवक म्हणून आपले सामाजिक उत्तरदायीत्व व कर्तव्य आहे या भूमिकेतून जबाबदारी पार पाडणार नाही तोपर्यंत अपेक्षीत बदल साध्य होणार नाहीत, असे प्रतिपादन राज्य सेवा हक्क आयोगाचे आयुक्त डॉ. किरण जाधव यांनी केले. नांदेड जिल्ह्यात विविध विभागांनी सेवा हक्क जपणुकीच्यादृष्टिने लक्षवेधी काम केल्याबद्दल त्यांनी कौतुकही केले.
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 कायदाच्या अंमलबजावणी व सेवा महिना कालावधीत केलेल्या कामांची आढावा बैठक आज नियोजन भवन येथे आयुक्त डॉ. किरण जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीस जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सेवाहमी कायदाअंतर्गत जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा मांडला.
कोणतीही नस्ती दहा दिवसापेक्षा जास्त काळ एकाच कक्षाकडे राहणार नाही यासाठी दप्तर दिरंगाई कायदा 2006 मध्ये आणला. याचा अतिशय चांगला परिणाम झाला. यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईही झाली. यात अधिक पारदर्शकता आणण्याबरोबर गतवर्षी सर्व सेवा ऑनलाईन करण्याचा शासनाने निर्णय घेतला. यानुसार महाराष्ट्रातील सेवा अधोरेखीत होऊन त्या ऑनलाईन करण्याच्या प्रक्रिया मोठ्या प्रमाणात होत आहेत. यात ज्या काही त्रुटी आहेत त्या दूर करून लोकाभिमूख प्रशासनाला मूर्तरूप येत असल्याचे आयुक्त डॉ. किरण जाधव यांनी सांगितले.
लोकांच्या सेवाविषयक कार्यालयीन दस्तऐवजांना कायद्याच्यादृष्टिनेही महत्त्व आहे. अनेक दस्तऐवज हे न्यायालयीन प्रक्रियेचाही भाग ठरतात. यात शालेय टिसीच्या उताऱ्यांपासून जन्मनोंदी सारख्या रजिस्टरपर्यंत बाबींचा समावेश होतो. जी दस्तऐवज 50 वर्षांपूर्वीपेक्षा जुनी आहेत, अथवा जी नष्ट व्हायला आली आहेत अशा शासकीय दस्तऐवजांचे डिजीटलायजेशन झाले पाहिजे. विशेषत: शिक्षण विभागाने यात लक्ष घालण्याची गरज आहे. कृषि विभागातही जी सेवाकेंद्र आहेत ती सेवाकेंद्र अधिसुचीत करून सेवाहक्क कायद्यात अंतरर्भूत करण्यास कोणतीच अडचण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
00000
छाया :- पुरुषोत्तम जोशी







 उर्ध्व पेनगंगा प्रकल्प (इसापूर धरण)

रब्बी हंगामाच्या सिंचनासाठी पाण्याचे नियोजन

 

नांदेड (जिमाका), दि. 20 :- प्रतीवर्षी उर्ध्व पेनगंगा प्रकल्पावरील कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये प्रकल्पावरील सिंचनासाठी पाण्याचे नियोजन करण्यात येते. यावर्षी प्रकल्पावरील कालवा सल्लागार समितीची बैठक अद्याप झाली नसल्याने, आगामी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत होणाऱ्या निर्णयाच्या अधीन राहुन 15 ऑक्टोबर 2023 रोजीच्या इसापूर धरणातील (809.38 दलघमी) 83.95 टक्के इतक्या जिवंत पाणीसाठ्यावर आधारीत उपलब्ध पाणीसाठ्यातून पिण्यासाठीचे पाणी राखीव ठेऊन, रब्बी हंगामात चार (4) पाणीपाळ्या देण्याचे नियोजित आहे. प्रकल्प क्षेत्रातील सर्व जनतेस / लाभधारकांनी पाणी मागणी अर्ज विहीत कालावधीत सादर करून, जलसंपदा विभागास सहकार्य करावे, असे आवाहन उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र. 1 चे कार्यकारी अभियंता अ. बा. जगताप यांनी केले.

 

प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील लाभधारकांना व इसापूर धरण जलाशय, अधिसुचित नदी-नाल्यावरील तसेच मुख्य कालव्यावरील प्रवाही व मंजूर उपसा सिंचन योजना धारकांना कळविण्यात येते की, रब्बी हंगामातील हंगामी, दुहंगामी तसेच दुहंगामातील इतर उभी पिके या पिकांसाठी कालव्याचे प्रवाही/कालव्यावरील उपसा, नदी-नाल्यावरील मंजूर उपसा सिंचन योजनेद्वारे सिंचनासाठी पाणी घ्यायचे असल्यास मागणी अर्ज नमुना 7, 7-अ मध्ये भरून 31 ऑक्टोंबर 2023 पुर्वी संबंधित शाखा कार्यालयात सादर करणे बंधनकारक राहील. हंगामी व दुहंगामी पिकांसाठी स्वतंत्र अर्ज सादर करावेत.

 

सिंचनासाठी पाण्याची गरज तसेच विहीत नमुन्यात प्राप्त मागणी अर्ज संख्या विचारात घेऊनच प्रत्यक्ष सिंचनासाठी पहिली पाणीपाळी दिनांक 5 नोव्हेंबर 2023 रोजी सुरू करण्याचे अपेक्षित नियोजन आहे.

उर्ध्व पेनगंगा प्रकल्पांतर्गत इसापूर डावा कालवा व इसापूर उजवा कालवा व त्याअंतर्गत असलेल्या वितरण व्यवस्थेद्वारे प्रत्येक पाणीपाळीच्या कालवा संचलनाच्या प्रस्तावीत कार्यक्रमानुसार प्राप्त मागणीनुसार सिंचनासाठी पाणी सोडण्यात येईल.

 

रब्बी हंगाम सन 2023-24 मधील पाणीपाळीचा प्रस्तावित कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. आवर्तन क्र. 1 दिनांक 5 नोव्हेंबर 2023 पासून 25 नोव्ह्रेंबर 2023 पर्यंत कालावधी 20 दिवस असेल. आवर्तन क्र. 2 दिनांक 5 डिसेंबर 2023 ते 25 डिसेंबर 2023 पर्यंत कालावधी 20 दिवस. आवर्तन क्र. 3 दिनांक 5 जानेवारी 2024 ते 25 जानेवारी 2024 पर्यंत कालावधी 20 दिवस. आवर्तन क्र. 4 दि. 5 फेब्रुवारी 2024 ते 25 फेब्रुवारी 2024 पर्यंत कालाधी 20 दिवस राहील. पाऊस व आकस्मिक कारणांमुळे पाणीपाळी संख्या, कालावधी व तारखांमध्ये बदल होऊ शकतो, असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कार्यकारी अभियंता अ. बा. जगताप यांनी सांगितले.  

00000

 रानभाजी व मराठवाडा खाद्य महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

 ·     रानभाज्यांनी  वेधले सर्वांचे लक्ष

 

नांदेड (जिमाका) दि. 20 : -मराठावाडा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रानभाजी व मराठवाडा खाद्य महोत्सवाचे आयोजन 19 व 20 ऑक्टोबर रोजी जिल्‍हाधिकारी कार्यालय परीसरात करण्यात आले होते. या महोत्सवाचे उदघाटन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते संपन्न झाले. या महोत्सवात शेतकऱ्यांनी दुर्मीळ असलेल्या सर्व रानभाज्या व उत्पादने विक्री व प्रदर्शनासाठी ठेवले होते. या रानभाजी व मराठवाडा खाद्य महोत्सवास शेतकऱ्यांचा व शहरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

 

या रानभाजी महोत्सवात श्रावणात उपलब्ध असणाऱ्या बहुतांश रानभाज्या येथे विक्रीसाठी उपलब्ध होत्या. यात प्रामुख्याने कर्टुली, शेवगा, घोळ, चवळी, बांबूचे कोंब, दिंडा, टाळका, पिंपळ, मायाळ, पाथरी, अळू, कपाळफोडी, कुरडू, उंबर, चिवळ, भुई आवळी इ. कंदभाज्‍या व सेंद्रीय हिरव्‍या भाज्‍या, फळभाज्‍या व फूलभाज्‍या व सीताफळ, ड्रँगन फ्रुट, रानफळांची व शेतकऱ्यांनी विविध उत्‍पादीत केलेली उत्पादने, सेंद्रीय उत्‍पादने, गुळ, हळद, लाकडी घाण्‍याचे तेल, गहू, सर्व प्रकारच्या डाळी व भुईमुगाच्‍या शेंगा, मुगाच्‍या शेंगा व केळीचे वेफर्स प्रदर्शन व विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आले होते. या महोत्सवात  70 स्टॉल धारकांनी सहभाग नोंदविला असून 15 लाख रुपयांची उलाढाल  झाली आहे.

 

या महोत्सवात रानभाजी पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या पाककलेत 9 स्पर्धकांनी सहभाग घेतला. यामध्ये मिक्स लाडू, डोरले टोमॅटो चटणी, कुंदरु भाजी भाकरी, खारे शंकरपाळे, पांढरी वसु मानचुरियन, गोड खाजा, छोटी घोळ भाजी भाकरी, प्रोटीन ढोकळा, उपवासाचा पराठा, शेंगदाणा लाडू, मोड आलेले धान्यपासून पराठे हे पदार्थ बनविण्यात आले होते. या पाककलेसाठी परिक्षक म्हणून प्रज्ञा दुधामल यांची उपस्थिती होती.

 

सहभागी स्पर्धकांमधून प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक निवड करण्यात आले. प्रथम क्रमांक पांढरी वसु मानचुरियन हा पदार्थ बनविणाऱ्या श्रीमती मिना व्यंकटी जाधव, ईजळी ता. मुदखेड यांना तर दुसरा क्रमांक श्रीमती वनिता दिगांबर कदम, ता. मुदखेड यांनी कुंदरु भाजी भाकरीसाठी देण्यात आला,  तिसरा क्रमांक श्रीमती अर्चना प्रदिप कसबे, मुदखेड यांना डोरले टोमॅटोची चटणी पदार्थ बनवली याबाबत देण्यात आला.  या विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक स्वरूपात प्रमाणपत्र व भेटवस्तू देवून गौरविण्यात आले. उर्वरित सहभागी स्पर्धकांना प्रोत्साहन पर प्रमाणपत्र देण्यात आले.

 0000





 मतदार यादीत नाव नोंदणीसाठी

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे आवाहन

·         नाव नोंदविण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन

नांदेड (जिमाका) दि. 20 :- मतदार यादी विशेष संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रम 2024 अंतर्गत दिनांक 4 व 5 नोव्हेंबर, 25 व 26 नोव्हेंबर 2023 या कालावधीत विधानसभा मतदार संघातील सर्व मतदान केंद्रावर विशेष नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी या विशेष शिबिराचा लाभ घेवून आपले नाव मतदार यादीमध्ये नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

 

अधिकाधिक मतदारांना त्यांची नाव नोंदणी करुन घेण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत 27 ऑक्टोबर ते 9 डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये नागरिकांकडून दावे व हरकती म्हणजेच नागरिकांकडून मतदार नोंदणीचे, मतदार यादीतील नोंदीच्या दुरुस्तीचे वा वगळणीचे अर्ज मागविण्यात येत आहेत.

 

या विशेष शिबिरात मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडून नागरिकांचे मतदार नोंदणी, दुरुस्ती वा वगळणीचे अर्ज भरुन घेण्यात येणार आहेत. मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी हे काही विशेष शिबिरांना भेटी देवून तेथील कामकाजाचे पर्यवेक्षण व मार्गदर्शन करतील. तरी नागरिकांनी या शिबिरात आपल्या नावाची मतदार यादीत नाव नोंदणी करावी, असे निवडणूक विभागाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

 

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...