उर्ध्व पेनगंगा प्रकल्प (इसापूर धरण)
रब्बी हंगामाच्या सिंचनासाठी पाण्याचे नियोजन
नांदेड (जिमाका), दि. 20 :- प्रतीवर्षी उर्ध्व पेनगंगा प्रकल्पावरील कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये प्रकल्पावरील सिंचनासाठी पाण्याचे नियोजन करण्यात येते. यावर्षी प्रकल्पावरील कालवा सल्लागार समितीची बैठक अद्याप झाली नसल्याने, आगामी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत होणाऱ्या निर्णयाच्या अधीन राहुन 15 ऑक्टोबर 2023 रोजीच्या इसापूर धरणातील (809.38 दलघमी) 83.95 टक्के इतक्या जिवंत पाणीसाठ्यावर आधारीत उपलब्ध पाणीसाठ्यातून पिण्यासाठीचे पाणी राखीव ठेऊन, रब्बी हंगामात चार (4) पाणीपाळ्या देण्याचे नियोजित आहे. प्रकल्प क्षेत्रातील सर्व जनतेस / लाभधारकांनी पाणी मागणी अर्ज विहीत कालावधीत सादर करून, जलसंपदा विभागास सहकार्य करावे, असे आवाहन उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र. 1 चे कार्यकारी अभियंता अ. बा. जगताप यांनी केले.
प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील लाभधारकांना व इसापूर धरण जलाशय, अधिसुचित नदी-नाल्यावरील तसेच मुख्य कालव्यावरील प्रवाही व मंजूर उपसा सिंचन योजना धारकांना कळविण्यात येते की, रब्बी हंगामातील हंगामी, दुहंगामी तसेच दुहंगामातील इतर उभी पिके या पिकांसाठी कालव्याचे प्रवाही/कालव्यावरील उपसा, नदी-नाल्यावरील मंजूर उपसा सिंचन योजनेद्वारे सिंचनासाठी पाणी घ्यायचे असल्यास मागणी अर्ज नमुना 7, 7-अ मध्ये भरून 31 ऑक्टोंबर 2023 पुर्वी संबंधित शाखा कार्यालयात सादर करणे बंधनकारक राहील. हंगामी व दुहंगामी पिकांसाठी स्वतंत्र अर्ज सादर करावेत.
सिंचनासाठी पाण्याची गरज तसेच विहीत नमुन्यात प्राप्त मागणी अर्ज संख्या विचारात घेऊनच प्रत्यक्ष सिंचनासाठी पहिली पाणीपाळी दिनांक 5 नोव्हेंबर 2023 रोजी सुरू करण्याचे अपेक्षित नियोजन आहे.
उर्ध्व पेनगंगा प्रकल्पांतर्गत इसापूर डावा कालवा व इसापूर उजवा कालवा व त्याअंतर्गत असलेल्या वितरण व्यवस्थेद्वारे प्रत्येक पाणीपाळीच्या कालवा संचलनाच्या प्रस्तावीत कार्यक्रमानुसार प्राप्त मागणीनुसार सिंचनासाठी पाणी सोडण्यात येईल.
रब्बी हंगाम सन 2023-24 मधील पाणीपाळीचा प्रस्तावित कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. आवर्तन क्र. 1 दिनांक 5 नोव्हेंबर 2023 पासून 25 नोव्ह्रेंबर 2023 पर्यंत कालावधी 20 दिवस असेल. आवर्तन क्र. 2 दिनांक 5 डिसेंबर 2023 ते 25 डिसेंबर 2023 पर्यंत कालावधी 20 दिवस. आवर्तन क्र. 3 दिनांक 5 जानेवारी 2024 ते 25 जानेवारी 2024 पर्यंत कालावधी 20 दिवस. आवर्तन क्र. 4 दि. 5 फेब्रुवारी 2024 ते 25 फेब्रुवारी 2024 पर्यंत कालाधी 20 दिवस राहील. पाऊस व आकस्मिक कारणांमुळे पाणीपाळी संख्या, कालावधी व तारखांमध्ये बदल होऊ शकतो, असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कार्यकारी अभियंता अ. बा. जगताप यांनी सांगितले.
00000
No comments:
Post a Comment