Friday, December 20, 2019


देगलूर कृषी उत्‍पन्‍न बाजार समिती निवडणूकीच्‍या
अनुषंगाने प्रारूप मतदार यादी प्रसिध्‍द

            नांदेड, दि. 20:- मा.राज्‍य सहकारी निवडणूक प्राधिकरण महाराष्‍ट्र राज्‍य, पुणे यांचे आदेश व मा.सचिव राज्‍य सहकारी निवडणूक प्राधिकरण म.रा. पुणे यांचेकडील पत्र क्र.रासनिप्रा/कक्ष-6/दिवाणी अर्ज क्र.6687/ 2019,कृउबास देगलूर/5363/2019, दि.26 जून, 2019 अन्‍वये दिनांक 31 डिसेंबर, 2017 अखेर मुदत संपणा-या नांदेड जिल्‍ह्यातील देगलूर कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीची निवडणूक प्रक्रीया सुरू करण्‍यात आली असून, त्‍यानुषंगाने दिनांक 10 डिसेंबर, 2019 रोजी जिल्‍हाधिकारी कार्यालय बचत भवन, नांदेड येथे जिल्‍हाधिकारी यांचे अध्‍यक्षतेखाली व संबंधीत कृउबास च्‍या बाजार क्षेत्रातील विविध राजकीय पदाधिकारी यांचे उपस्थितीत गणांचे आरक्षण जाहीर करण्‍यात आले असून, त्‍यानुषंगाने देगलूर कृषि उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या कार्यक्षेत्रातील मतदारांची प्रारूप मतदारयादी प्रसिध्‍द करण्‍यात येणार आहे.
            सदरील प्रारूप शेतकरी, व्‍यापारी व हमाल/मापाडी मतदारसंघाची यादी दि.21 डिसेंबर,2019 रोजी जिल्‍हाधिकारी कार्यालय,नांदेड जिल्‍हा उपनिबंधक सहकारी संस्‍था, नांदेड, तहसिलदार,देगलूर व कृषि उत्‍पन्‍न बाजार समिती, देगलूरच्‍या नोटीस बोर्डावर गण निहाय प्रसिध्‍द करण्‍यात येत असून, त्‍याचा कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र.
तपशील
दिनांक
वेळ
स्‍थळ
1
प्रारुप मतदार यादी प्रसिध्‍द करणे
21.12.2019
सकाळी 11.00 वाजता
जिल्‍हाधिकारी नांदेड, जिल्‍हा उपनिबंधक सहकारी संस्‍था नांदेड, तहसिलदार, देगलूर, कृषि उत्‍पन्‍न बाजार समिती देगलूर यांचे सुचना फलकावर. 
2
प्रारुप मतदार यादीवर हरकती स्विकारणे  
 21.12.2019 ते
 30.12.2019
कार्यालयीन वेळेमध्‍ये
सामान्‍य शाखा-1, जिल्‍हाधिकारी कार्यालय, नांदेड
3
प्राप्‍त हरकतीवर सुनावणी
 03.01.2020 ते
 04.01.2020
सकाळी 11.00 वा.
जिल्‍हाधिकारी नांदेड यांचे कार्यालयात.
4
आलेल्‍या हरकतीवर निर्णय देणे
08.01.2020
दुपारी  4.00 वा
जिल्‍हाधिकारी नांदेड यांचे कार्यालयात.
5
अंतिम मतदार यादी प्रसिध्‍द करणे
13.01.2020
सकाळी 11.00 वा.
जिल्‍हाधिकारी नांदेड, जिल्‍हा उपनिबंधक, सहकारी संस्‍था नांदेड, कृषि उत्‍पन्‍न बाजार समिती देगलूर यांचे कार्यालयातीलसुचना फलकावर. 

            तरी सदरील मतदार यादीवर आक्षेप असल्‍यास मतदार यादी प्रसिध्‍दी कार्यक्रमात नमुद दिनांकानुसार, जिल्‍हा निवडणूक अधिकारी तथा जिल्‍हाधिकारी (कृउबास), नांदेड यांचे कार्यालय          (सामान्‍य शाखा 1) येथे लेखी स्‍वरूपात कार्यालयीन वेळेत (सुट्टीचे दिवस वगळून) नोंदविता येतील. तसेच प्रसिध्‍दी कार्यक्रमातील आक्षेप कालावधी संपल्‍यानंतर प्राप्‍त होणारे आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत, याची नोंद घेण्‍यात यावी. तरी आक्षेप विहीत कालावधीमध्‍ये देण्‍याचे आवाहन जिल्‍हा  निवडणूक अधिकारी (कृउबास) तथा जिल्‍हाधिकारी, नांदेड यांनी केले आहे.
    
0000


जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष
पदांची निवडणूक पुढील आदेशापर्यंत रद्द
नांदेड, दि. 20 :- नांदेड जिल्हा परिषदच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक घेण्यासाठी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी अधिनियमातील कलम 45 (2) प्रमाणे प्राप्त अधिकाराचा वापर करुन अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांची पिठासीन अधिकारी म्हणून करण्यात आलेली नियुक्ती व संपुर्ण निवडणुकीची प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत रद्द केली आहे.
ग्रामविकास विभाग मुंबई यांच्याकडील पत्रात नमुद सन 2019 चा महाराष्ट्र अध्यादेश क्र. 22 दि.23 ऑगस्ट 2019 अन्वये जिल्हा परिषद नांदेडच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची मुदत 20 डिसेंबर 2019 रोजी संपत आहे. त्यामुळे महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961 चे कलम 42 व 45 खाली जिल्हा परिषद नांदेडच्या अध्यक्ष व उपाध्याक्ष पदाची निवडणुक 20 डिसेंबर 2019 रोजी पासुन उर्वरित पुढील कालावधीसाठी घेणे होते. या अधिनियमातील कलम 45 (2) प्रमाणे प्राप्त अधिकाराचा वापर जिल्हा परिषद नांदेडच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुका घेण्यासाठी अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांची पिठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
सुधारित शासनपत्रात या आदेशान्वये 120 दिवसाचा कालावधी हा 20 डिसेंबर 2019 रोजी समाप्त होत आहे. त्यानंतर प्रचलीत कार्यपद्धतीनुसार आवश्यक ती सुचना नोटीस निर्गमीत करुन सदर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व त्यांच्या विषय समित्याचे सभापती आणि पंचायत समित्यांचे सभापती व उपसभापतीच्या‍ निवडणुकीबाबत योग्य ती कार्यवाही करण्यास सुचना नमुद आहेत. त्यामुळे 31 डिसेंबर 2019 रोजीची जिल्हा परिषद नांदेडच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणुक तांत्रिक कारणास्तव रद्द करणे इष्ट आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाकडील प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
00000

Thursday, December 19, 2019


वस्त्रोद्योग सहकारी संस्थांना निवडणूक माहितीबाबत आवाहन
नांदेड, दि. 19 :- मराठवाडा विभागातील सर्व वस्त्रोद्योग सहकारी संस्थांच्या (हातमाग, यंत्रमाग, गारमेंट, निटींग, प्रोसेसींग) पदाधिका-यांना कळविण्यात येते की, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाची डिसेंबर-2019 अखेर निवडणूकीस पात्र असलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणूका माहे 31 जानेवारी 2020 अखेर पुर्ण करण्याबाबत मा. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण म.रा. पुणे यांच्या कडून निर्देश प्राप्त झालेले आहेत.
आपल्या संस्थेची मागील निवडणूक केव्हा झाली या बाबतची माहिती ई-2 मध्ये स्वाक्षरीनीशी आपल्या तालुक्याच्या उप/सहायक निबंधक सहकारी संस्था यांचे कार्यालयास व या कार्यालयास ई-मेल rddtextiles4aurangabad@rediffmail.com व्दारे सादर करावी. ज्या वस्त्रोद्योग सहकारी संस्थेकडून सदरील माहिती 27 डिसेंबर 2019 पर्यंत प्राप्त होणार नाही, अशी वस्त्रोदयोग सहकारी संस्था कार्यरत नसल्याचे गृहीत धरुन सदर संस्थेविरुध्द महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील तरतूदीनुसार वैधानिक कार्यवाही करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. संपर्कसाठी प्रादेशिक उपआयुक्त, वस्त्रोद्योग, बाळासाहेब पवार सहकार भवन, तिसरा मजला, जाफरगेट, औरंगाबाद येथे 0240-2970058 या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग यांनी केले आहे.
000000


पीक विम्यासाठी 31 डिसेंबर अंतिम मुदत
नांदेड, दि. 19 :-  प्रधानमंत्री पीक विमा योजन (PMFBY) रब्बी हंगाम योजनेअंतर्गत गहु (बा), गहु(जि), ज्वारी(बा), ज्वारी (जि), हरभरा, कांदा व उन्हाळी भुईमूग या पीकासाठी  लागू राहणार आहे. विमा प्रस्ताव बॅंकेत भरण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2019 तसेच उन्हाळी भुईमूग या पिकासाठी विमा प्रस्ताव बॅंकेत भरण्याची अंतिम मुदत 1 एप्रिल 2020 आहे.
अधिक माहितीसाठी संबंधित जिल्हा कृषी अधीक्षक, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, राष्ट्रीयकृत बॅंक अथवा ग्रामस्तरावर कृषी सहायक यांच्याशी संपर्क साधावा. विभागातील जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन लातूर विभागीय कृषी सहसंचालक यांनी केले आहे.
000000


जात पडताळणीचे प्रस्ताव दाखल करण्याचे
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना आवाहन
नांदेड, दि. 19 :- अनुसूचित जमातीच्या व्यवसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनी त्यांचे जात पडताळणीचे प्रस्ताव ऑनलाईन आवश्यक कागदपत्रांसह 31 डिसेंबर 2019 पर्यंत सादर करावीत, असे आवाहन औरंगाबाद येथील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीचे सहसंचालक तथा उपाध्यक्ष यांनी केले आहे.
या समिती कार्यालयाच्या कार्यक्षेत्रांतर्गत नांदेड, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांचा समावेश आहे. या विभागातील व्यवसायिक अभ्यासक्रमात प्रवेशित विद्यार्थ्यांचे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र वेळेवर तपासणी होऊन त्यांच्या प्रवेशाची कार्यवाही विहीत वेळेत पूर्ण व्हावी. यासाठी शैक्षणिक वर्ष 2019-2020 या वर्षामध्ये शैक्षणिक संस्थामध्ये इयत्ता अकरावी व बारावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या व पुढील वर्षामध्ये व्यवसायिक अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी त्यांचे जात पडताळणीचे प्रस्ताव ऑनलाईन आवश्यक कागदपत्रांसह संबंधित शैक्षणिक संस्थेमार्फत या समिती कार्यालयास 31 डिसेंबर 2019 पर्यंत सादर करावेत अन्यथा तदनंतरचे प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत.
शैक्षणिक वर्ष 2020-21 पासून पुढील प्रत्येक शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता अकरावी व बारावी वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या व पुढील वर्षामध्ये व्यवसायिक अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी त्यांचे जात पडताळणीचे प्रस्ताव ऑनलाईन आवश्यक कागदपत्रांसह संबंधित शैक्षणिक संस्थेमार्फत या समिती कार्यालयास प्रत्येक शैक्षणिक वर्षाच्या 30 नोव्हेंबर पर्यंत सादर करणे आवश्यक असेल त्याप्रमाणे कार्यवाही करावी.
विहित कालमर्यादेत जमातीचे प्रमाणपत्र तपासणीचा प्रस्ताव सादर न करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी. त्यामुळे विद्यार्थी व कनिष्ठ महाविद्यालये यांनी विहीत मुदतीत प्रस्ताव सादर करावेत असेही सहआयुक्त अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीने कळविले आहे.
00000


शासकीय अध्यापक महाविद्यालयात
पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा
नांदेड दि. 19 :- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ  नांदेड यांच्या निर्देशानुसार शासकीय अध्यापक महाविद्यालय स्वातंत्र्य सैनिक कॉलनी शोभानगर नांदेड या महाविद्यालयात शैक्षणिक वर्षे 2018-19 मध्ये बी.एड व एम.एड उत्तीर्ण झालेल्या व पदवी प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर केलेल्या विद्यार्थ्यांसाठी पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ 2 जानेवारी 2020 रोजी दुपारी 12.30 वा. आयोजित करण्यात आला आहे.
यासाठी सोमवार 30 डिसेंबर ते गुरुवार 2 जानेवारी 2020 पर्यंत सकाळी 10 वा. नाव नोंदणी करुन पदवी प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांने समितीकडे नाव नोंदणी करणे आवश्यक असल्याचे प्राचार्य डॉ. सुनंदा गो. रोडगे यांनी कळविले आहे.
सर्वांनी विहित कालमर्यादेत नाव नोंदणी करुन बी.एड विभाग प्रमुख प्रा. डॉ. मुरुमकर व एम. एड विभाग प्रमुख प्रा. डॉ. हारुण शेख यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन शासकीय अध्यापक महाविद्यालय प्राचार्य डॉ. सुनंदा गो. रोडगे यांनी केले आहे.
0000


श्री खंडोबा माळेगाव यात्रेनिमित्त
पोलीस अंमलदारांना अधिकार प्रदान
नांदेड दि. 19 :- माळेगाव येथील खंडोबा यात्रेतील पालखी मिरवणूक व इतर कार्यक्रम शांततेत पार पडावे. त्यात कसल्याही प्रकारची बाधा येऊ नये व शांतता रहावी म्हणून पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी मुंबई पोलीस कायदा 1951 कलम 36 अन्वये प्राप्त अधिकारान्वये 24 ते 28 डिसेंबर 2019 च्या मध्यरात्री पर्यंत कंधारचे उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर कांबळे व माळाकोळीचे स्वाधीन अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक श्री घाटे यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 36 मधील पोट कलम अ ते फ प्रमाणे पुढील अधिकार प्रदान केले आहेत.
श्री खंडोबा यात्रेत महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, इतर राज्यातून भाविकांची दर्शनासाठी व यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्याअनुषंगाने रस्त्यावरील व रस्त्यावरुन जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कशा रितीने चालावे व कोणत्या रितीने वागावे हे फर्मविण्यासाठी. अशा कोणत्याही मिरवणुकांना कोणत्या मार्गाने आणि कोणत्या वेळात काढाव्यात किंवा काढू नयेत असे मार्ग अशा वेळा विहित करण्याबद्दल. सर्व मिरवणुकीच्या व जमावाच्या प्रसंगी व पुजा-अर्चेच्या प्रार्थना स्थळाच्या सर्व जागेच्या आसपास पुजा-अर्चेच्या वेळी कोणताही रस्ता किंवा सार्वजनिक जागा येथे गर्दी होणार असेल किंवा अडथळे होण्याचा संभव असेल अशा सर्व बाबतीत अडथळा होऊ न देण्याबद्दल. सर्व रस्त्यावर किंवा रस्त्यामध्ये, घाटांत किंवा घाटांवर, सर्व धक्क्यांवर व धक्क्यांमध्ये आणि सार्वजनिक स्नानाच्या, कपडे धुण्याच्या व उतरण्याच्या जागांच्या ठिकाणी व जागांमध्ये, जत्रा, देवालये आणि सार्वजनिक स्थळी किंवा लोकांच्या जाण्या-येण्याच्या जागेमध्ये सुव्यवस्था राखण्याबाद्दल. तसेच सार्वजनिक ठिकाणी अथवा सार्वजनिक करमवणुकीच्या ठिकाणी ध्वनीक्षेपकांच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी व सुचना देण्यासंबंधी. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33, 35 ते 40, 42, 43, 45 या अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशास अधीन असलेले व त्यास पुष्टी देणारे सुव्यवस्था राखणेकामी योग्य आदेश देण्याबाबत.
कोणीही इसमांनी हा आदेश लागू असे पर्यंत नांदेड जिल्ह्यातील कंधार येथील उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर कांबळे व माळाकोळीचे सहा. पोलीस निरीक्षक घाटे यांचेकडून रहदारीचे नियमन व मार्गाबाबत सुचना कार्यक्रमाची तारीख, वेळ, जाहीरसभा, मोर्चे, मिरवणूक, निदर्शने, पदयात्रा इत्यादी कार्यक्रम संबंधीत पोलीस उपनिरीक्षक किंवा त्याच्या वरिष्ठांकडून तारीख व वेळ सभेची जागा, मिरवणुकीचा, मोर्चाचा मार्ग व त्यात दिल्या जाणाऱ्या घोषणा, पुर्व परवानगी शिवाय आयोजित करु नये. संबंधीत अधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करावे. परवानगी दिलेल्या जाहीरसभा, मिरवणुका, पदयात्रा यात समयोजित घोषणा सोडून किंवा ज्या घोषणांनी शांतता व सुव्यवस्थेला बाधा होऊ शकते अशा घोषणा देऊ नये. हा आदेश लग्नाच्या ठिकाणी, प्रेत यात्रेस लागू नाही. या आदेशाचे उल्लंघन केल्यास मुंबई कायदा कलम 134 प्रमाणे अपराधास पात्र ठरेल, असे आदेशही पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी जारी केले आहेत.
00000

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...