Friday, January 25, 2019


नाणी वैध मुद्राच्या रुपात
स्वीकारण्याचे आवाहन   
नांदेड, दि. 25 :-भारतीय रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकानुसार एक, दोन, पाच आणि दहा रुपयांची नाणी चलनात आहेत. लोकांच्या दैनंदिन व्यवहारात देवाण-घेवाणसाठी नाणी बँकेमार्फत वाटप करण्यात येतात. नाणी ही चलनात वैध असल्यामुळे नाणी नाकरणारे दंडात्मक कार्यवाहीसाठी पात्र होऊ शकतात. ग्राहकाकडून बँक शाखेच्या कॉउंटरवर जमा करण्यासाठी दिलेली नाणी बँकांनी स्वीकारणे बंधनकारक आहे. यासंदर्भात कोणताही गैर अनुपालन भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या निर्देशांचे उल्लंघन आणि वेळोवेळी लागू असलेल्या दंडात्मक उपायासह कारवाईचे उल्लंघन म्हणून पाहिले जाईले, असे जिल्हा प्रशासनाकडून दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
000000

मतदान प्रक्रियेत उत्स्फुर्त सहभाग नोंदवावा
– जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
नांदेड, दि. 25 :- अठरा वर्षे पूर्ण झालेल्या युवक-युवतींसह व नागरिकांनी मतदान केंद्रावर अथवा निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरील मतदार यादीत आपल्या नावासह, कुटूंबाचे, शेजारांचे, मित्रांचे नाव तपासून मतदान प्रक्रियेत उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.
            भारत निवडणूक आयोगाच्यावतीने 25 जानेवारी हा दिवस आज 9 वा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून देशभरात साजरा केला जात आहे. या दिनानिमित्त महात्मा फुले पुतळा आयटीआय परिसरातून मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला जिल्हाधिकारी श्री डोंगरे यांनी हिरवी झेंडी दाखून मार्गस्थ केले. त्यानंतर डॉ. शंकरराव चव्‍हाण प्रेक्षागृह येथे आयोजित जिल्हास्तरीय मुख्य कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.
मतदार जागृती रॅली दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या नेतृत्वाखाली महात्मा फुले पुतळ्यास अभिवादन करुन काढण्यात आली. या रॅलीत जिल्हाधिकारी अरुण डोंगरे व पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. रॅलीचा महात्मा फुले पुतळा–आय टी आय –गणेशनगर वाय पॉईंट – मोरचौक -छत्रपती चौक राज कॉर्नर - वर्कशॉप कॉर्नर–आनंदनगर- हिंगोली गेट -शहीद भगतसिंग मार्ग -बाफना -जुना मोंढा टॉवर–शिवाजीनगर- महात्मा फुले पुतळा ते डॉ. शंकरराव चव्‍हाण प्रेक्षागृह येथे समारोप  करण्यात आला. या रॅलीमध्ये “मतदार राजा जागा हो, मतदानाचा धागा हो”, “एक-एक मत मतदाराचे भविष्य घडवेल राष्ट्राचे” अशा उत्साहवर्धक उद्घोषणा दिल्यामुळे मतदारांना या दिवसाचे व मतदानाचे महत्व अधिकच बिंबल्या गेले.           

यावेळी पोलीस अधीक्षक संजय जाधव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी दीपाली मोतीयेळे, मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, सुनिल मेंहद्रीकर, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, मनपा शिक्षणधिकारी दिलीप बनसोडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
           

जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी म्हणाले, सर्वांच्या सहभागाने मतदानाचा संदेश देत मतदार जनजागृतीची ही रॅली अनोखी झाली. याप्रमाणे लोकशाहीत सर्वांनी एकत्र येऊन शासकीय व विकासाची कामे केली पाहिजे. आगामी सार्वत्रिक निवडणुकीत ईव्हीएम व व्हीव्हीपॅट या नवीन मशीनचा वापर मतदानासाठी करण्यात येणार आहे. या नवीन इलेक्ट्रॉनिक यंत्राबाबत जिल्ह्यात प्रात्यक्षिक दाखविण्यात आले आहे. यातून मतदाराला केलेल्या मतदानाची खात्री होणार आहे. लोकशाहीचे मूल्य सर्वांनी जपले पाहिजे. यात मताचा अधिकार सर्वांना समान दिला आहे. लोकशाहीचे जतन करण्यासाठी कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. मुक्त व शांततापूर्ण निवडणुकांसाठी विविध यंत्रणेच्या माध्यमातून मतदारामध्ये जनजागृती केली जात आहे. यासाठी सोशल माध्यमाद्वारे “मतदान करु या” असे अचूक संदेश दररोज सकाळी एकमेकाला पाठवावे, असे सांगून निवडणूक प्रक्रियेत मतदाराची मतदान करण्याची जबाबदारी मोठी असल्याचे त्यांनी सांगितले.
            पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी मतदानाचे महत्व सर्वांपर्यंत पोहचले पाहिजे यासाठी सोशल माध्यमांचा योग्य वापर मतदानाविषयी माहिती देण्यासाठी करावा, असे आवाहन केले.
            जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. काकडे म्हणाले, लोकशाही बळकटीसाठी मतदार यादीत 18 वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक नागरिकाचे नाव असणे आवश्यक आहे. मतदानातून देशाचे भविष्य घडविण्याचे काम मतदाराने केले पाहिजे. सर्वांनी आपल्या नावासह इतर ओळखीची नावे मतदार यादीत असल्याचे वेळेत तपासून घ्यावीत. कितीही कामे असली तरी मतदानाकडे दुर्लक्ष करु नका आणि केलेले मतदान गोपनीय ठेवा, असे आवाहन त्यांनी केले.
           
अपर जिल्हाधिकारी श्री. परेदशी यांनी राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त मोटार सायकल रॅलीचे अभूतपूर्व आयोजन केल्यामुळे निवडणूक प्रक्रियेत मतदाराचे महत्व वाढले आहे, त्याबद्दल सहभागी सर्वांचे अभिनंदन केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी परदेशी यांनी राष्ट्रीय मतदार दिवस या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केल्यामुळे दीपाली मोतीयेळे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व सर्व स्वीप टिमला शुभेच्छा दिल्या.
            प्रास्ताविकात मतदानापासून मतदार वंचित राहू नये यासाठी विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगून उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती मोतीयेळे म्हणाल्या, यावर्षी राष्ट्रीय मतदान दिनानिमित्त आयोगाने “वंचित ना राहो कोणी मतदार!” हे घोषवाक्य दिले आहे. मतदारांमध्ये मतदानाचा संदेश पोहचण्यासाठी या रॅलीचे आयोजन केले असल्याचे सांगून नवव्या राष्ट्रीय मतदार दिनाचे महत्व व उद्देश त्यांनी सांगितला.   
            सुरुवातीला जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी राष्ट्रीय मतदार दिवसाची मतदारांसाठीची सामुहिक प्रतिज्ञा दिली. मतदानासाठी मतदारामध्ये जनजागृती निर्माण करण्याकरीता विविध उपक्रम राबविलेल्या संस्थाचा, विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. ऑक्सफर्ड ग्लोबल शाळेच्या विद्यार्थ्यांनी लोकशाहीत मतदानाचे महत्व पथनाट्यातून सादर करुन उपस्थितांची दाद मिळविली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजेश कुलकर्णी यांनी केले तर आभार तहसिलदार किरण अंबेकर यांनी मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नायब तहसिलदार गजानन नांदगावकर, दीपक मरळे, आर. जी. कुलकर्णी, सुरेश दंडवते, संजय भालके, कुणाल जगताप, शिरपुरकर, रायेवार व महसूल, जिल्हा परिषद, मनपा यासह विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, बचतगटांच्या महिला यांनी सहभाग घेतला.
000000

Thursday, January 24, 2019


शासकीय तंत्रनिकेतनमध्ये
सी.एन.सी. प्रोग्रामिंगवर प्रशिक्षणाचे आयोजन
नांदेड, दि. 24 :- प्राध्यापकांनी आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती करुन घेणे आवश्यक असून  प्रशिक्षणातून याबाबी शिकावयास मिळतात, असे प्रतिपादन डॉ. व्ही. एम. नांदेडकर यांनी केले.  
राज्यातील तंत्रनिकेतनमधील यंत्र अभियांत्रिकी अध्यापकांसाठी आयोजित शासकीय तंत्रनिकेतन नांदेड येथील यंत्र अभियांत्रिकी विभागाने सी.एन.सी. प्रोग्रामिंगवर आधारित एका आठवडयाचे प्रशिक्षणाचे उद्घाटन डॉ. नांदेडकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य डॉ. जी. व्ही गर्जे हे होते.
डॉ. गर्जे यांनी नवीन अभ्यासक्रमाची गरज पाहता शिक्षकांच्या निरंतर प्रशिक्षणाची आवश्यकता ओळखून हे प्रशिक्षण आयोजित केले असे सांगितले. प्रशिक्षणाचा लाभ विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
यंत्र अभियांत्रिकी विभागाने पुढाकार घेऊन तंत्रशिक्षण संचालनालयाच्या संयुक्त विद्यमाने प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. प्रशिक्षणाच्या आयोजनाबद्दल संस्थेचे व प्राचार्यांचे डॉ. नांदेडकर यांनी अभिनंदन केले.
राज्यातील गडचिरोली, ठाणे, वाशिम, यवतमाळ, उस्मानाबाद या विविध शासकीय तंत्रनिकेतन, मधील प्राध्यापकांनी सहभाग घेतला आहे. आठवडयाभरात तज्ज्ञ मार्गदर्शकांची व्याख्याने व विविध प्रकारच्या सी.एन.सी. मशिनवर आधारित प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रास्ताविक समन्वयक यंत्र विभाग प्रमुख प्रा. आर. एम. सकळकळे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. एस. ए. कुलकर्णी केले. शेवटी आभार डॉ. एस. एस. चौधरी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यंत्र विभागातील अधिकारी व कर्मचारी वर्गाने आपले योगदान दिले.     
0000000


26 जानेवारी ते 10 फेब्रुवारी कालावधीत
लोकशाही पंधरवडाचे आयोजन
नांदेड, दि. 24 :-  प्रत्येक निवडणुकांमध्‍ये मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावावा. तसेच लोकशाही निवडणूक आणि सुशासन याविषयाच्‍या अनुषंगाने स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था व महाविद्यालयांनी 26 जानेवारी ते 10 फेब्रुवारी या कालावधीत विविध कार्यक्रम घेऊन लोकशाही पंधरवाडा यशस्‍वी करावा, असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणुक अधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.  
भारतीय संविधानातील 73 व 74 व्‍या घटनादुरुस्‍तीस 25 वर्षे पुर्ण झाल्‍याच्‍या निमित्‍ताने नोव्‍हेंबर 2017 पासुन लोकशाही, निवडणूक व सुशासन या विषयावर राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय परीषदेचे नियोजन करण्‍यात आलेले होते. त्‍याअनुषंगाने 26 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2019 या कालावधीत लोकशाही पंधरवडा साजरा करण्‍याचे निर्देश राज्‍य निवडणुक आयोगाने दिले आहेत. 
        विविध प्रयत्‍नाने आपली लोकशाही अधिकाधिक मजबुत करणे, लोकशाही विकेंद्रीकरणाची कास धरणाऱ्या राष्‍ट्रपिता महात्‍मा गांधीचे 150 वे जयंती वर्ष आहे. त्‍यांच्‍या स्‍वप्‍नाची पुर्तता करणाऱ्या 73 व्‍या व 74 व्‍या घटना दुरुस्‍तीचे रौप्‍य महोत्‍सव वर्षानिमित्त यावर्षात व पुढील सर्व निवडणुकात मतदारांचा राष्‍ट्रीय कर्तव्‍य भावनेतून सहभाग कसा वाढवता येईल याबाबत लोकशाही पंधरवाडयात 26 जानेवारी च्‍या मुख्‍य ध्‍वजारोहण कार्यक्रमामध्‍ये चित्ररथ तयार करुन त्‍याचे सादरीकरण करण्‍यात येणार आहे. ध्‍वजारोहणास उपस्थित प्रमुख वक्‍त्‍यांच्‍या भाषणात सदरील विषय अंतर्भुत करण्‍यात आला आहे. तसेच मतदारांना मतदानासाठी प्रोत्‍सा‍हीत करणे, मतदान टक्‍केवारी वाढविण्यासाठी विविध उपाय योजना करण्‍यात येत आहेत. तसेच जिल्‍ह्यातील विविध महाविद्यालयात या पंधरवाड्याच्‍या कालावधीत निबंध स्‍पर्धा, वकृत्व स्‍पर्धा आदी स्‍पर्धा स्‍वामी रामानंद तिर्थ विद्यापीठ नांदेड मार्फत आयोजीत करण्‍यात येणार आहेत. त्‍याअनुषंगाने सर्व विद्यार्थ्यांना या स्‍पर्धांमध्‍ये  मोठया प्रमाणावर सहभाग नोंदविण्‍याबाबत नांदेड जिल्‍हा प्रशासनामार्फत आवाहन करण्‍यात आले आहे.
मतदार जनजागृतीबाबत जिंगल्‍स तयार करुन त्‍या आकाशवाणी केंद्रावरुन 26 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2019 या कालावधीत सर्वत्र प्रक्षेपित करण्‍यात येणार आहेत. महानगरपालीका व जिल्‍हा परीषद कार्यक्षेत्रात पोस्‍टर्स, बॅनर्स तयार करुन पंधरवाडयाची व्‍यापक प्रसिद्धी करण्‍यात आली आहेत, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
000000


राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त
आज रॅलीचे आयोजन 
नांदेड दि. 24 :- नऊ वा राष्‍ट्रीय मतदार दिवस शुक्रवार 25 जानेवारी 2019 रोजी साजरा करण्‍यात येणार असून सकाळी 7 वा. मोटार सायकल / मोपेड रॅलीचे आयोजन करण्‍यात आले आहे. या रॅलीस मान्‍यवरांचे हस्‍ते हिरवी झेंडी दाखवून महात्‍मा फुले पुतळा आयटीआय येथुन सुरुवात करण्‍यात येणार आहे.  
            या रॅलीचा मार्ग महात्‍मा फुले पुतळा–आय टी आय –गणेशनगर वाय पॉईंट – मोरचौक -छत्रपती चौक राज कॉर्नर - वर्कशॉप कॉर्नर –आनंदनगर- हिंगोली गेट -शहीद भगतसिंग मार्ग -बाफना -जुना मोंढा टॉवर–शिवाजीनगर- महात्मा फुले पुतळा ते डॉ. शंकरराव चव्‍हाण पेक्षागृह असा राहील. या रॅलीचा समारोप व राष्‍ट्रीय मतदार दिनाचे मुख्‍य कार्यक्रमाचे आयोजन डॉ. शंकरराव चव्‍हाण प्रेक्षागृह नांदेड येथे करण्‍यात आले आहे. या राष्‍ट्रीय मतदार दिन कार्यक्रमात जास्‍तीत जास्‍त नगरिकांनी / नव मतदारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन उपजिल्हा‍ निवडणूक अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000


प्रजासत्ताकदिनी प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा
वापर न करण्याचे प्रशासनाचे आवाहन
नांदेड, दि. 24 :- येत्या 26 जानेवारी या प्रजासत्ताक दिनी प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वजांचा वापर करु नये, असे आवाहन राज्यशासनातर्फे करण्यात आले आहे.
राष्ट्रध्वजाचा आदर करणे हे देशाच्या प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे.दरवर्षी 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे, इतर राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा सामन्यांच्या वेळी विद्यार्थी व नागरिकांकडून राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. कार्यक्रम पार पडल्यानंतर खराब झालेले, माती लागलेले राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी पडलेले असतात. हे राष्ट्रध्वज गोळा करून ते तालुका व जिल्हा स्तरावर निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करण्याचे अधिकार अशासकीय संस्था तसेच इतर संघटनांना देण्यात आले आहेत. त्यांनी हे राष्ट्रध्वज जिल्हाधिकारी व तहसिलदार यांच्याकडे सुपूर्द करावेत.
प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी व जनजागृती करण्यासाठी जिल्हा व तालुका पातळीवर समित्या कार्यरत आहेत. शासनाने प्लास्टिक मुक्त महाराष्ट्र ही मोहीम सुरु केली आहे. प्लास्टिक बंदीचा कायदा लागू केला आहे. प्लास्टिकची वस्तू वापरल्यास दंडाची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे  प्लास्टिकचे ध्वज न वारण्याबाबत शाळा, महाविद्यालये, विविध सामाजिक संस्था यांनी प्रबोधन करणे आवश्यक आहे. ध्वजाचा योग्य सन्मान राखणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.
00000

प्रजासत्ताक दिनानिमित्त
पालकमंत्री कदम यांच्या हस्ते ध्वजवंदन
नांदेड, दि. 24 :- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 69 व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवार 26 जानेवारी 2019 रोजी वजिराबाद परिसरातील पोलीस मुख्यालय कवायत मैदान येथे सकाळी 9.15 वा. राष्ट्रध्वज वंदनाचा मुख्य शासकीय समारंभ होणार आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे. या समारंभास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
समारंभासाठी निमंत्रीतांनी समारंभ सुरु होण्यापुर्वी 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे, सुरक्षिततेच्यादृष्टिने सोबत बँग किंवा तत्सम वस्तू आणू नयेत. या मुख्य शासकीय कार्यक्रमास सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी इतर सर्व कार्यालय, संस्था, आदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे समारंभ सकाळी 8.30 पुर्वी किंवा 10 वाजेनंतर आयोजित करावेत, असेही आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान प्रजासत्ताक दिनाच्यानिमित्ताने विविध कार्यक्रम, समारंभ, आदी ठिकाणी राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पध्दतीबाबत शासन परिपत्रक तसेच ध्वजसंहितेतील सूचनेचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. गृहविभागाच्या राष्ट्रध्वजाच्या उचित सन्मानाबाबतच्या परिपत्रकात नमुद केलेल्या निर्देशनानुसार राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर होणार नाही याची दक्षता संबंधितानी घ्यावी, असेही आवाहनही राष्ट्रध्वज वापराबाबतच्या जिल्हास्तरीय जनजागरण समितीने केले आहे.
000000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...