Friday, January 25, 2019

मतदान प्रक्रियेत उत्स्फुर्त सहभाग नोंदवावा
– जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
नांदेड, दि. 25 :- अठरा वर्षे पूर्ण झालेल्या युवक-युवतींसह व नागरिकांनी मतदान केंद्रावर अथवा निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरील मतदार यादीत आपल्या नावासह, कुटूंबाचे, शेजारांचे, मित्रांचे नाव तपासून मतदान प्रक्रियेत उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.
            भारत निवडणूक आयोगाच्यावतीने 25 जानेवारी हा दिवस आज 9 वा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून देशभरात साजरा केला जात आहे. या दिनानिमित्त महात्मा फुले पुतळा आयटीआय परिसरातून मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला जिल्हाधिकारी श्री डोंगरे यांनी हिरवी झेंडी दाखून मार्गस्थ केले. त्यानंतर डॉ. शंकरराव चव्‍हाण प्रेक्षागृह येथे आयोजित जिल्हास्तरीय मुख्य कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.
मतदार जागृती रॅली दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या नेतृत्वाखाली महात्मा फुले पुतळ्यास अभिवादन करुन काढण्यात आली. या रॅलीत जिल्हाधिकारी अरुण डोंगरे व पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. रॅलीचा महात्मा फुले पुतळा–आय टी आय –गणेशनगर वाय पॉईंट – मोरचौक -छत्रपती चौक राज कॉर्नर - वर्कशॉप कॉर्नर–आनंदनगर- हिंगोली गेट -शहीद भगतसिंग मार्ग -बाफना -जुना मोंढा टॉवर–शिवाजीनगर- महात्मा फुले पुतळा ते डॉ. शंकरराव चव्‍हाण प्रेक्षागृह येथे समारोप  करण्यात आला. या रॅलीमध्ये मतदार राजा जागा हो, मतदानाचा धागा हो, एक-एक मत मतदाराचे भविष्य घडवेल राष्ट्राचे अशा उत्साहवर्धक उद्घोषणा दिल्यामुळे मतदारांना या दिवसाचे व मतदानाचे महत्व अधिकच बिंबल्या गेले.           

यावेळी पोलीस अधीक्षक संजय जाधव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी दीपाली मोतीयेळे, मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, सुनिल मेंहद्रीकर, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, मनपा शिक्षणधिकारी दिलीप बनसोडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
           

जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी म्हणाले, सर्वांच्या सहभागाने मतदानाचा संदेश देत मतदार जनजागृतीची ही रॅली अनोखी झाली. याप्रमाणे लोकशाहीत सर्वांनी एकत्र येऊन शासकीय व विकासाची कामे केली पाहिजे. आगामी सार्वत्रिक निवडणुकीत ईव्हीएम व व्हीव्हीपॅट या नवीन मशीनचा वापर मतदानासाठी करण्यात येणार आहे. या नवीन इलेक्ट्रॉनिक यंत्राबाबत जिल्ह्यात प्रात्यक्षिक दाखविण्यात आले आहे. यातून मतदाराला केलेल्या मतदानाची खात्री होणार आहे. लोकशाहीचे मूल्य सर्वांनी जपले पाहिजे. यात मताचा अधिकार सर्वांना समान दिला आहे. लोकशाहीचे जतन करण्यासाठी कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. मुक्त व शांततापूर्ण निवडणुकांसाठी विविध यंत्रणेच्या माध्यमातून मतदारामध्ये जनजागृती केली जात आहे. यासाठी सोशल माध्यमाद्वारे मतदान करु या असे अचूक संदेश दररोज सकाळी एकमेकाला पाठवावे, असे सांगून निवडणूक प्रक्रियेत मतदाराची मतदान करण्याची जबाबदारी मोठी असल्याचे त्यांनी सांगितले.
            पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी मतदानाचे महत्व सर्वांपर्यंत पोहचले पाहिजे यासाठी सोशल माध्यमांचा योग्य वापर मतदानाविषयी माहिती देण्यासाठी करावा, असे आवाहन केले.
            जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. काकडे म्हणाले, लोकशाही बळकटीसाठी मतदार यादीत 18 वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक नागरिकाचे नाव असणे आवश्यक आहे. मतदानातून देशाचे भविष्य घडविण्याचे काम मतदाराने केले पाहिजे. सर्वांनी आपल्या नावासह इतर ओळखीची नावे मतदार यादीत असल्याचे वेळेत तपासून घ्यावीत. कितीही कामे असली तरी मतदानाकडे दुर्लक्ष करु नका आणि केलेले मतदान गोपनीय ठेवा, असे आवाहन त्यांनी केले.
           
अपर जिल्हाधिकारी श्री. परेदशी यांनी राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त मोटार सायकल रॅलीचे अभूतपूर्व आयोजन केल्यामुळे निवडणूक प्रक्रियेत मतदाराचे महत्व वाढले आहे, त्याबद्दल सहभागी सर्वांचे अभिनंदन केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी परदेशी यांनी राष्ट्रीय मतदार दिवस या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केल्यामुळे दीपाली मोतीयेळे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व सर्व स्वीप टिमला शुभेच्छा दिल्या.
            प्रास्ताविकात मतदानापासून मतदार वंचित राहू नये यासाठी विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगून उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती मोतीयेळे म्हणाल्या, यावर्षी राष्ट्रीय मतदान दिनानिमित्त आयोगाने वंचित ना राहो कोणी मतदार! हे घोषवाक्य दिले आहे. मतदारांमध्ये मतदानाचा संदेश पोहचण्यासाठी या रॅलीचे आयोजन केले असल्याचे सांगून नवव्या राष्ट्रीय मतदार दिनाचे महत्व व उद्देश त्यांनी सांगितला.   
            सुरुवातीला जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी राष्ट्रीय मतदार दिवसाची मतदारांसाठीची सामुहिक प्रतिज्ञा दिली. मतदानासाठी मतदारामध्ये जनजागृती निर्माण करण्याकरीता विविध उपक्रम राबविलेल्या संस्थाचा, विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. ऑक्सफर्ड ग्लोबल शाळेच्या विद्यार्थ्यांनी लोकशाहीत मतदानाचे महत्व पथनाट्यातून सादर करुन उपस्थितांची दाद मिळविली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजेश कुलकर्णी यांनी केले तर आभार तहसिलदार किरण अंबेकर यांनी मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नायब तहसिलदार गजानन नांदगावकर, दीपक मरळे, आर. जी. कुलकर्णी, सुरेश दंडवते, संजय भालके, कुणाल जगताप, शिरपुरकर, रायेवार व महसूल, जिल्हा परिषद, मनपा यासह विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, बचतगटांच्या महिला यांनी सहभाग घेतला.
000000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...