Sunday, November 25, 2018


नांदेड शिख गुरुव्‍दारा सचखंड श्री हजूर अपचलनगर
साहिब मंडळाच्या तीन सदस्‍य निवडणूकीचा कार्यक्रम निश्चित  
नामनिर्देशन पत्र घेणे व दाखल करण्यासाठी 26 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर कालावधी

नांदेड दि. 25 :- नांदेड शिख गुरुव्‍दारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब मंडळाच्‍या तीन सदस्‍य निवडणूकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्‍यात आला आहे. सोमवार 26 नोव्‍हेंबर ते शनिवार 1 डिसेंबर 2018  या कालावधीत नामनिर्देशन पत्र घेणे व नामनिर्देशन पत्र दाखल करता येतील. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्‍यावी, असे  आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.   
महसूल व वन विभागाच्या अधिसूचनेनुसार नांदेड शिख गुरुद्वारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब बोर्ड निवडणूक नियम 1963 मधील नियम 12 नुसार नांदेड जिल्‍हाधिकारी यांची अधिसूचना 22 नोव्‍हेंबर 2018 अन्‍वये या निवडणूकीसाठी मतदार यादी तयार करणे व निवडणूक घेण्‍यासाठी आवश्‍यक ती व्‍यवस्‍था करण्यात येत आहेत. अंतिम मतदार यादी गुरुवार 22 नोव्‍हेंबर प्रसिध्‍द करण्यात आली असून निवडणूक कार्यक्रम प्रसिध्‍दीचा दिनांक सोमवार 26 नोव्‍हेंबर 2018 हा आहे. सोमवार 26 नोव्‍हेंबर ते शनिवार 1 डिसेंबर 2018  या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत उपजिल्‍हाधिकारी (सामान्‍य) यांचे दालन, दुसरा मजला, जिल्‍हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे नामनिर्देशन पत्र घेणे व नामनिर्देशन पत्र दा खल करता येतील. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिनांक शनिवार 1 डिसेंबर 2018 हा आहे.
सोमवार 3 डिसेंबर 2018 रोजी बचत भवन जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड ये?थे नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार आहे. छाननीनंतर लगेचच वैध नामनिर्देशन पत्राची सूची प्रसिध्‍द करण्‍यात येणार आहे. उमेदवारी मागे घेण्‍याचा शेवटचा दिनांक व वेळ गुरुवार 6 डिसेंबर 2018 दुपारी 3 वाजेपर्यंत असून उपजिल्‍हाधिकारी (सामान्‍य), यांचे दालन, दुसरा मजला, जिल्‍हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे उमेदवारी मागे घेण्‍याचा अर्ज दाखल करता येतील. 
शुक्रवार 6 डिसेंबर 2018 रोजी दुपारी 3 नंतर बचत भवन जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड येथे उमेदवारांना निवडणूक चिन्‍ह नेमून देण्‍यात येतील. निवडणूक लढविणा-या उमेदवारांची यादी जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड येथे प्रसिध्‍द करण्‍यात येईल. आवश्‍यक असल्‍यास शुक्रवार 28 डिसेंबर 2018 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत संबंधीत मतदान केंद्रावर मतदान घेण्‍यात येईल.
शनिवार 29 डिसेंबर 2018 रोजी सकाळी 9 वाजेपासून संबंधीत मतमोजणी केंद्रावर मतमोजणी करण्‍यात येईल. तालुकानिहाय मतमोजणी संकलन करुन सोमवार 31 डिसेंबर 2018 रोजी सकाळी 11 वाजता बचत भवन जिल्‍हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे निकाल घोषीत करण्‍यात येईल.
निवडणूक कार्यक्रमाची प्रत जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड, औरंगाबाद, बीड, जालना, लातुर, उस्‍मानाबाद, परभणी, हिंगोली व चंद्रपुर तसेच अधिक्षक गुरुव्‍दारा सचखंड बोर्ड, नांदेड यांच्‍या कार्यालयाच्‍या नोटीस बोर्डावर तसेच वरील जिल्‍ह्यातील सर्व तहसिल कार्यालयांच्‍या नोटीस बोर्डावर निवडणूक कार्यक्रमाची प्रत डकवून प्रसिद्ध करण्‍यात आली आहे. नांदेड जिल्‍ह्याच्‍या संकेतस्‍थळावर देखील  (वेब साईटवर) निवडणूक कार्यक्रम प्रसिध्‍द करण्‍यात आला आहे. मराठवाडा विभागातील दोन वृत्‍तपत्रात व चंद्रपुर जिल्‍ह्यातील एक वृत्‍तपत्रात निवडणूक कार्यक्रम प्रसिध्‍द करण्‍यात आला आहे. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्‍यावी, असेही  आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.
00000

Saturday, November 24, 2018


 लोकशाही दिनाचे 3 डिसेंबर रोजी आयोजन
नांदेड, दि. 24 :- सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवार लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. त्यानुसार सोमवार 3 डिसेंबर 2018 रोजी दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात नियोजन भवन कॅबिनेट हॉल येथे लोकशाही दिन आयोजित केला आहे. यासाठी अर्ज स्विकारण्याचे व न स्विकारण्याबाबतच्या निकषांचीही नागरिकांनी नोंद घ्यावी. तक्रार किंवा निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. त्यामुळे केवळ वैयक्तिक स्वरुपाच्या तक्रारी, निवेदन, अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्या‍त आले आहे.
या दिवशी महसूल, गृह, ग्रामविकास, पाटबंधारे, बांधकाम, परिवहन, सहकार, कृषि विभागाचे जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकारी व जिल्हा पाणी पुरवठा समन्वय अधिकारी व ज्या कार्यालयाचे लोकशाही दिनात प्रलंबीत प्रकरणे आहेत असे अधिकारी उपस्थित राहतील. दुपारी 12 वाजेपासून निवेदनाची नोंदणी सुरु होणार आहे. त्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या अर्जावर, निवेदनावर म्हणणे ऐकूण घेण्याच्या कामास सुरुवात करण्यात येईल.
न्याय प्रविष्ट, राजस्व तसेच अपील, सेवाविषयक, आस्थापना विषयक तसेच विहीत नमुन्यात नसलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे किंवा देण्यात येणार असलेले अर्ज, तक्रार निवेदन वैयक्तीक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. अर्ज स्विकृतीसाठी विहीत नमुन्यात तसेच तक्रार व निवेदन वैयक्तीक स्वरुपाचेच असावे. अर्जदाराने विहीत नमुन्यात 15 दिवस अगोदर दोन प्रतींमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय येथे अर्ज पाठविणे आवश्यक आहे. तालुकास्तरावर अर्ज दिल्यानंतर एक महिन्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकशाही दिनामध्ये अर्ज करता येणार आहे. 
लोकशाही दिनाच्या दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी, अडचणी एकत्रीतरीत्या समजावून घेऊन त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यात येतील. ज्या प्रकरणात कालावधी लागणार आहे अशा प्रकरणी पुढील महिन्याच्या पुढील महिण्याच्या होणाऱ्या लोकशाही दिनात मागील अर्जावर कार्यवाहीची माहिती देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
00000


किमान आधारभूत खरेदी योजनेंतर्गत
कापूस खरेदीच्या शुभारंभ संपन्न
              नांदेड दि. 24 :- राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ नांदेड विभागीय कार्यालयामार्फत  केंद्र शासनाच्या किमान आधारभूत खरेदी योजनेंतर्गत कापूस हंगाम 2018-19 मधील कापूस खरेदीच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ खा. अशोकराव चव्हाण यांचे अध्यक्षतेखाली भोकर तालुक्यातील मे. व्यंकटेश कॉटन  प्रा. लि. पोमनाळा या कापूस खरेदी केंद्रावर आ. अमिता चव्हाण यांचे हस्ते आज संपन्न झाला.
          यावेळी भोकर कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती जगदिश पाटील भोसीकर, कापूस पणन महासंघाचे संचालक नामदेवराव केशवे, गोविंदराव शिंदे, भोकर तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन मारोतराव बल्लाळकर, सहायक निबंधक सहकारी संस्था, सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती भोकर मे. व्यंकटेश कॉटन, प्रा. लि. पोमनाळाचे देवानंदजी धुत, विभागीय व्यवस्थापक अे. व्ही. मुळे, विभागीय उपव्यवस्थापक एस. जी. हनवते, जे. अे. सुर्यवंशी, सि. ग्रेडर, व्ही. एन. माने आदींची उपस्थिती होती.
0000

Thursday, November 22, 2018


साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक समितीचे
                                 उपाध्यक्ष तथा सदस्य सचिव मधुकरराव कांबळे यांचा दौरा  

नांदेड दि. 22:-  साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे उपाध्यक्ष तथा सदस्य सचिव मधुकरराव कांबळे (राज्यमंत्री दर्जा) हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

सोमवार, 26 नोव्हेंबर, 2018 रोजी दुपारी 2.45 वा. शासकीय विश्रामगृह, नांदेड येथे आगमन व स्थानिक कार्यकर्त्यासमवेत बैठक (वेळ राखीव). सांयकाळी 5.00 वाजता विश्रामगृह नांदेड येथून शासकीय वाहनाने पानभुशी ता. कंधार जि. नांदेडकडे प्रयाण. 5.30 वा. पानभुशी ता. कंधार येथे आगमन व स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा. 7.30 वाजता पानभुशी येथून शासकीय वाहनाने नांदेडकडे प्रयाण. 8.00 वाजता विश्रामगृह नांदेड येथे आगमन व मुक्काम.

मंगळवार, दि. 27 नोव्हेंबर, 2018 रोजी विश्रामगृह , नांदेड येथून शासकीय वाहनाने उस्मानाबादकडे प्रयाण करतील.

0000

दुष्काळी परिस्थितीत जलाशयाखाली / तलावाखालील जमिनीचा विनियोग
                                         फक्त चारा पीके घेण्याबाबतची बैठक संपन्न   

 
नांदेड दि. 22:-  सन २०१८-१९ च्‍या दुष्‍काळी परिस्थितीत जलाशयाखाली/तलावाखालील जमीनीचा विनियोग फक्‍त चारा पीके घेण्‍याबाबत आज दिनांक २२ नोव्‍हेंबर २०१८ रोजी जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्‍यक्षतेखाली बैठक सपन्‍नं झाली .

या बैठकीत अधिक्षक अभियंता नांदेड पाटबंधारे मंडळ, नांदेड, कार्यकारी अभियंता मृद व जलसंधारण नांदेड, जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड, जिल्‍हा पशुसंवर्धन उप आयुक्‍त, नांदेड जिल्‍हा पशुसंवर्धन अधिकारी जि.प नांदेड सर्व उपविभागीय अधिकारी व तहसिलदार हे उपस्थित होते.

         कृषि व पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विभाग यांचे शासन निर्णय क्रं एफडीआर-२०१७/ प्र.क्र.१६७/ पदुम-४ दि. १५ नोव्हेंबर, २०१८ अन्‍वये महाराष्‍ट्राच्‍या बहुतांश भागात अत्‍यल्‍प पर्जन्‍यमानामुळे दुष्‍काळी परिस्थिती निर्माण झाली असुन, संभाव्‍य चारा टंचाई विचारात घेता, गाळपेर क्षेत्रावर चारा पीकांचे उत्‍पादन  करुन जनावरांसाठी चारा उत्‍पादन करण्‍याच्‍या दृष्‍टीने शासनाने निर्देश दिलेले आहेत. तसेच चारा टंचाई निवारण्‍याकरीता लाभार्थी निवड, समन्‍वय व संनियंत्रण करण्‍यासाठी समिती गठीत करण्‍यात आली आले आहे.

जलसंपदा, मृद व जलसंधारण विभागाकडील जलाशयाखाली / तलावाखालील जमीन प्रकल्पामध्ये पाणीसाठा कमी झाल्यामुळे बुडीताखालील जमीन मोकळ्या , उघड्या पडलेल्या आहेत. अशा जमिनीवर  शेतकऱ्यांना चारा पिके उत्‍पादनाकरीता वर्ष २०१८-१९ रब्‍बी व उन्‍हाळी  हंगामासाठी नाममात्र रु.1 दराने भाडेपट्टयावर देण्‍यात येणार आहे. या गाळपेरा जमिनीवर चारा पिकांचे मका, ज्‍वारी, बाजरी व न्‍युट्रिफिड बियाणे पशुसंवर्धन विभागामार्फत विनामुल्‍य उपलब्‍ध करुन देण्‍यात येणार आहेत.

या योजनेचे अर्ज प्रत्‍येक तालुक्‍यात पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती विस्‍तार यांचे स्‍तरावरुन स्विकारण्‍यात येतील व अर्ज स्किारण्‍याचा कालावधी २६ नोव्हेंबर,2018 ते ०४ डिसेंबर, २०१८ पर्यंत राहणार आहे. या योजनेत पशुधन पालकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्‍याचे आवाहन जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.

0000  

चार लाख पन्नास हजार रुपये किमंतीचा वजीर गुटखा
                                      व बुलोरो पिकअप वाहन किमंत रुपये सात लाख जप्त 

              नांदेड दि. 22:-  भोकर पोलीस स्टेशन व अन्न व औषध प्रशासन, नांदेड यांच्या संयुक्त कारवाईमध्ये प्रतिबंधित गुटख्याची विक्रीसाठी वाहतुक करणारे वाहन चालक बालाजी विठ्ठल करंडेकर यांच्या ताब्यातून वाहन क्रमांक एमएच-26-बीई 0925 व गुटखा जप्त करुन ताब्यात घेतलेले आहे.

           महाराष्ट्र राज्यामध्ये सार्वजनिक आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने गुटखा, पानमसाला इत्यादी तत्सम अन्न पदार्थावर बंदी असून या पदार्थ्याच्या सेवनाने कर्करोग , पोटाचे विकार इत्यादी दुर्धर आजार होतात. हे वैज्ञानिकदृष्ट्या सिध्द झालेले आहे. तथापि, गुटखा पानमसाला इत्यादी तत्सम अन्न पदार्थाच्या व्यसनांच्या आहारी पडलेल्या व्यक्तींना छुप्या प्रकारे चोरुन व जाणूनबुजून विक्री करणारे समाजकंटक त्यांचा पुरवठा करीत आहेत. त्या अनुषंगाने कारवाईचा भाग म्हणून अन्न व औषध प्रशासन , नांदेड व पोलीस प्रशासन भोकर यांनी वाहन चालक बालाजी विठ्ठल करडेंकर यांच्याकडून उपरोक्त नमूद साठा जप्त करुन, वाहन मालक गुलाम यझदानी गुलाम जिलानी रा. बाजार चौक, हिमायतनगर व या गुटख्याचे विक्रीसाठीचे संबंधित जबाबदार व्यक्ती सईद सौदागर व अस्लम मांजरेकर दोघेही रा. भोकर जि . नांदेड या चौघाविरुध्द ( वाहन चालक, वाहन मालक, जबाबदार व्यक्ती) भोकर पोलीस स्टेशन येथे श्री. सु.द. जिंतुरकर, अन्न सुरक्षा अधिकारी, नांदेड यांनी फिर्याद दाखल केलेली आहे. सदर फिर्यादीमध्ये अन्न सुरक्षा व मानदे कायदा व भारतीय दंड संहिता अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून गुन्हा मा. न्यायालयात सिध्द झाल्यास संबंधित आरोपीस दहा वर्षापर्यंत कारावास व रुपये पाच लाखापर्यंत दंड होऊ शकतो .

           तरी गुटखा, पानमसाला , तत्सम पदार्थ अन्न पदार्थ सेवन करणाऱ्या व्यक्तीस आवाहन करण्यात येते की, या प्रतिबंधित अन्न पदार्थाचे सेवन करु नये, तसेच प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा , विक्री वाहतूकीस कोणत्याही व्यक्तीने करु नये, शासनाच्या आदेशाचे उल्लंघन झाल्यास विषयांकित कायद्यातंर्गत कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

          सदर कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी सुनिल जिंतुरकर , अन्न सुरक्षा अधिकारी प्रवीण काळे, संतोष कनकावाड व भोकर पोलीसांच्या सहकार्याने सहाय्यक आयुक्त (अन्न) टी.सी. बोराळकर यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे.

*****

संविधान दिनानिमित्त संविधान दिन रॅलीचे आयोजन

              नांदेड दि. 22:-  दिनांक 26 नोव्हेंबर,2018 हा दिवस संविधान दिन म्हणून राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर साजरा करावायाचा आहे . त्याअनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत सहाय्यक आयुक्त , समाज कल्याण , नांदेड यांच्याकडून 26 नोव्हेंबर, 2018 रोजी संविधान दिनानिमित्त संविधान दिन रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

           संविधान दिन रॅलीचे दिनांक 26 नोव्हेंबर, 2018 रोजी सकाळी 8-00 वाजता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन प्रारंभ होईल. या रॅलीचा मार्ग महात्मा ज्योतिबा फुले पुतळा ते शिवाजी नगर , कलामंदिर , मुथा चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ संविधान प्रस्ताविकेचे सामुहिक वाचन होवून रॅलीचा समारोप होईल. या रॅलीत सर्व विद्यालयीन / महाविद्यालयीन विद्यार्थी , अधिकारी, कर्मचारी, एनसीसी, स्कॉऊट विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, समता दुत इत्यादींचा सहभाग राहणार आहे.

        संविधान रॅलीत सर्वांनी सहभागी व्हावे , असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नांदेड यांनी केले आहे.

0000

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...