Tuesday, December 12, 2017


किनवट नगरपरिषद मतदान, मतमोजणी
केंद्र परिसरात 144 कलम लागू
 नांदेड दि. 12 :- जिल्ह्यातील किनवट नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक हद्दीतील मतदानाच्या दिवशी मतदान केंद्र परिसरात बुधवार 13 डिसेंबर रोजी मतदान सुरु झाल्यापासून मतदान संपेपर्यंत व मतमोजणीच्या दिवशी जिल्हा परिषद मुलांची शाळा साईनगर, किनवट या मतमोजणी केंद्र परिसरात गुरुवार 14 डिसेंबर 2017 रोजी मतमोजणी सुरु झाल्यापासून मतमोजणी संपेपर्यंत प्रतिबंधीत आदेश जिल्हादंडाधिकारी संतोष पाटील यांनी काढले आहेत.
फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी निवडणूक कालावधीत जिल्ह्यातील किनवट नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीची संपुर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोणातून कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी बुधवार 13 डिसेंबर रोजी ज्या ठिकाणी मतदान होणार आहे त्या ठिकाणापासून तसेच गुरुवार 14 डिसेंबर 2017 रोजी जिल्हा परिषद मुलांची शाळा, साईनगर किनवट या मतमोजणी केंद्रापासून 200 मीटर परिसरातील सर्व पक्षकारांचे मंडपे, सर्व दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, निवडणुकीच्या कामाव्यतीरिक्त खाजगी वाहन, संबंधीत पक्षाचे चिन्हांचे प्रदर्शन व निवडणुकीच्या कामाव्यतीरिक्त व्यक्तीस प्रवेश करण्यासाठी प्रतिबंध करण्यात आले आहे, असेही आदेशात नमुद केले आहे.

00000
कर्जमाफी दिल्याबद्दल पिंपळगावात   
शेतकऱ्यांनी व्यक्त केली कृतज्ञता  

नांदेड दि. 12 :- राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दिलासा देणारी कर्जमाफी दिल्याबद्दल नांदेड तालुक्यातील पिंपळगाव (निमजे) येथील शेतकऱ्यांनी राज्य सरकारबद्दल कृतज्ञता व्यक्त करुन अभिनंदन केले.
कर्जदार शेतकऱ्यांच्या जीवनातील दु:खाचा भार हलका करण्याचा प्रयत्न राज्य सरकाने केला आहे. नांदेड तालुक्यातील पिंपळगाव निमजे या गावातील शेतकरी विठ्ठल गंगाराम डक, गंगाधर धर्माजी डक कर्जदाराची पत्नी श्रीमती ताराबाई गंगाधर डक, रामजी सिताराम डक (निधन) यांचा मुलगा माधव रामजी डक, मधुकर व्यंकटराव पुंड यांची पत्नी श्रीमती सुनिता मधुकर पुंड , पार्वतीबाई शंकरराव डक, दिलीप व्यंकटराव पुंड यांचे भाऊ प्रतापराव पुंड यांची मुलाखत घेण्यात आली.  
श्रीमती सुनिता पुंड यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेडून 40 हजार रुपयाचे कर्ज घेतले होते. हे कर्ज शासनाकडून पूर्णपणे माफ झाल्याबद्दल राज्य सरकारचे आभार व्यक्त केले. सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन प्रतापराव पुंड यांनी सेवा सहकारी सोसायटीचे 30 लाभार्थी असून  20 शेतकऱ्यांचे 25 टक्के कर्ज  माफ झाले असून तर 10 सभासदांना पूर्ण कर्ज माफी मिळाली आहे.  कर्ज माफ झालेल्या शेतकऱ्यांना बेबाकी प्रमाणपत्र व नवीन कर्ज मिळणार असून सावकारी, आडतीवर पैसे उचलण्याची आता गरज राहिली नाही. त्यांना कोणत्याही बँकेकडून शेतीसाठी कर्ज  मिळू शकते. ही कर्ज माफी दिल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
श्रीमती ताराबाई डक यांनी 40 हजार रुपयाचे तर गंगाधर डक यांनी 35 हजार रुपयाचे कर्ज सहकारी सोसायटी नवा मोंढा नांदेड यांच्याकडून घेतल्याचे सांगितले. परंतु, शेतीच्या नापिकीमुळे हे कर्ज भरु शकलो नाही. राज्य शासनाकडून झालेल्या कर्जमाफीमुळे आम्हा शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाल्याचे सांगितले.
विठ्ठल डक या शेतकऱ्यांनी सेवा सहकारी सोसायटीकडून 40 हजार कर्ज घेतले होते त्यापैकी 25 हजारांचे कर्ज शासनाकडून माफ झाल्याचे सांगितले. मागील तीन वर्षापासून दुष्काळी परिस्थती असल्याने शेतकरी अडचणीत होता. त्यामुळे शेतकऱ्यांची कर्ज माफी झाल्याने शेतकरी आनंदी असल्याचेही यावेळी ते म्हणाले. रामजी डक यांनी 9 हजार रुपये कर्ज घेतेले होते. माधव रामजी डक (मुलगा) यांनी माझ्या वडिलांनी घेतलेले कर्ज शासनाने माफ केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. 

 0000000
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत
नांदेड जिल्ह्यातील 83 हजार 950 शेतकऱ्यांना
396 कोटी 42 लाख रुपयांची कर्जमाफी  
 नांदेड दि. 12 :- राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा निर्णय घेऊन कर्जदार शेतकऱ्यांच्या जीवनातील दु:खाचा भार हलका करण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये पात्र शेतकऱ्यांना 1 लाख 50 हजारापर्यंत तर नियमीत कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम देण्यास शासन प्रयत्नशील आहे. नांदेड जिल्ह्यात एकूण 83 हजार  950 शेतकऱ्यांच्या खात्यात 396 कोटी 42 लाख 16 हजार 887 रुपये जमा केले आहेत. जिल्ह्यात डिसेंबर 2017 पासून प्रत्यक्ष लाभ हस्तांतरणास सुरुवात झाली असून ती आता पुर्णत्वाच्या टप्प्यात आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, प्रवीण फडणीस यांनी दिली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत नांदेड जिल्ह्यात मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत 11 डिसेंबर 2017 अखेर 2 हजार 331 शेतकऱ्यांच्या खात्यात 7 कोटी 6 लाख 22 हजार 986 रुपये जमा करण्यात आले आहेत. तर प्रोत्साहनपर लाभ स्वरुपात 24 हजार 380 शेतकऱ्यांच्या खात्यात 30 कोटी 13 लाख 93 हजार 901 रुपये जमा करण्यात आली आहेत. तसेच जिल्ह्यातील व्यापारी, राष्ट्रीयकृत / ग्रामीण बँकांकडून 11 डिसेंबर 2017 अखेर 57 हजार 239 शेतकऱ्यांच्या खात्यात  359 कोटी 21 लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. अशा प्रकारे  नांदेड जिल्ह्यात एकूण 83 हजार  950 शेतकऱ्यांच्या खात्यात 396 कोटी 42 लाख 16 हजार 887 रुपये जमा केले आहेत.
            छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी कर्जमाफीचे ऑनलाईन अर्ज केल्यानंतर प्रशासन व बँक स्तरावरुन कर्जाची माहिती लेखापरीक्षण करुन माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची ग्रीन लिस्ट बँकांना देण्यात आली आहे. या यादीनुसार बँकेमार्फत संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफी व प्रोत्साहनपर लाभाची रक्कम हस्तांतरीत करण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी व प्रोत्साहनपर रकमेचा लाभ बँकेकडून प्रत्यक्ष दिला जात आहे त्यांना बँकेमार्फत शेतकऱ्यांच्या नोंदणीकृत भ्रमणध्वनीद्वारे एसएमएस संदेश पाठविण्यात येणार आहेत.
            ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज भरताना किंवा बँकांकडून कर्जाबाबत माहिती भरताना काही त्रुटी राहिल्या आहेत अशा शेतकऱ्यांच्या माहितीची दुरुस्ती तालुकास्तरीय समितीकडून करण्यात येत असून उर्वरीत सर्व पात्र शेतकरी या योजनेपासून वंचीत राहणार नाहीत तसेच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यासाठी शासन व प्रशासनाकडून पूर्ण दक्षता घेण्यात येत आहे, असेही जिल्हा उपनिबंधक  श्री. फडणीस यांनी सांगितले आहे.

00000

Monday, December 11, 2017

किनवट नगरपरिषद क्षेत्रात
मतदानासाठी बुधवारी सुट्टी
नांदेड , दि. 11 :- राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नगरपरिषद किनवट सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदानाच्या दिवशी बुधवार 13 डिसेंबर 2017 रोजी संबंधीत क्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
किनवट नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2017 साठी बुधवार 13 डिसेंबर रोजी मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी शासनाने जाहीर केली आहे. ही सुट्टी निवडणूक क्षेत्रातील मतदारासंघातील जे मतदार उपरोक्त नमूद कार्यक्षेत्राच्या बाहेर कामासाठी असतील त्यांना ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील. तसेच केंद्र शासनाचे शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका इत्यादींना सुट्टी लागू राहील, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी पत्रात नमुद केले आहे.

00000
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार
अर्ज करण्यासाठी 15 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
नांदेड, दि. 11 :  राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांसाठी अर्ज मागविण्यात आले असून आता अर्ज करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. यापुर्वी या पुरस्कारासाठी 9 डिसेंबर 2017 पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते आता या पुरस्कारासाठी 15 डिसेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहे. सदर अर्जासोबत 100 प्रमाणपत्राची मर्यादा रद्द करुन अर्जदाराने अर्जासोबत सादर केलेल्या सर्व ॲटॅचमेंट अपलोड करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
अर्जदारांनी विहीत नमुन्यात अर्ज ऑनलाईन पध्दतीने सादर करून त्याची एक प्रत जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या कार्यालयात दि. 16 डिसेंबर 2017 पूर्वी सादर करण्याचे आवाहन प्रसिद्धी पत्रकाव्दारे करण्यात आले आहे.
राज्य शासनाच्या क्रीडा विभागामार्फत प्रतिवर्षी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्याची योजना कार्यान्वित असून राज्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू, साहस उपक्रम, दिव्यांग खेळाडूंसह संघटक/ कार्यकर्ते, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, महिला मार्गदर्शक व संघटक/ कार्यकर्ती यांच्यासाठी जिजामाता क्रीडा पुरस्कार तसेच ज्येष्ठ क्रीडा महर्षीकरिता शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
सन 2014-15, 2015-16 व सन 2016-17 या वर्षासाठी मान्यताप्राप्त खेळांच्या अधिकृत राज्य संघटनेमार्फत त्या त्या आंतरराष्ट्रीय / राष्ट्रीय स्तरावरील कनिष्ठ व वरिष्ठ गटातील पदक विजेते पुरुष व महिला खेळाडू, साहसी उपक्रम दिव्यांग खेळाडूंसह संघटक/ कार्यकर्ते, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, महिला मार्गदर्शक व संघटक/ कार्यकर्ती यांच्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज संबंधित राज्य संघटनेच्या कार्यकारिणीच्या ठरावासह दि. 15 डिसेंबर 2017 पर्यंत अर्जदाराने आपल्या कामगिरीचा तपशील देऊन विहित नमुन्यात अर्ज ऑनलाईन पद्धतीने www.mumbaidivsports.com या वेबसाईटवर उपलब्ध करुन दिलेल्या लिंकवर अर्ज सादर करावा. तसेच ऑनलाईन अर्जाची एक प्रत अर्जदाराने संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या कार्यालयात 16 डिसेंबर 2017 पूर्वी स्वयंसाक्षांकित प्रमाणपत्रांसह सादर करावी. असे आवाहन क्रिडा प्र.आयुक्त श्री.नरेंद्र सोपल यांनी केले आहे.

00000
ग्रामपंचायत क्षेत्रात मतदानासाठी
26 डिसेंबर रोजी स्थानिक सुट्टी
नांदेड , दि. 11 :- राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये जिल्ह्यातील नांदेड तालुक्यातील नागापूर, धर्माबाद तालुक्यातील येलापूर, मुदखेड तालुक्यातील वर्दडातांडा, हिमायतनगर तालुक्यातील वाईतांडा या ग्रामपंचायत क्षेत्रात सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान होणार आहे. त्या ठिकाणच्या मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी त्या मर्यादीत क्षेत्रापुरती मंगळवार 26 डिसेंबर 2017 रोजी जिल्हाधिकारी नांदेड यांनी स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने जानेवारी ते फेब्रुवारी 2018 मध्ये मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापीत ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार या क्षेत्रात सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, असे अधिसुचनेत नमुद केले आहे.

000000
माळेगाव यात्रेतील पशुप्रदर्शनासाठी    
जनावरांच्या नोंदणीचे आवाहन  
नांदेड , दि. 11 :-  माळेगाव येथील खंडोबा यात्रेत पशुसंवर्धन विभागाच्यावतीने 16 ते 20 डिसेंबर या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पशुप्रदर्शनात भाग घेण्यासाठी प्रत्येक पशुपालकाने आपल्या जनावरांची नोंदणी करणे आवश्यक आहे,  असे आवाहन नांदेड जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी केले आहे.
शनिवार 16 डिसेंबर रोजी पशुसंवर्धन विषयक प्रदर्शनी स्टॉलचे उद्घाटन होणार आहे. रविवार 17 डिसेंबर रोजी भव्य पशु, अश्व, श्वान व कुक्कुट प्रदर्शन तर मंगळवार 19 डिसेंबर रोजी बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पशुप्रदर्शनासाठी पुढील प्रमाणे मार्गदर्शक सुचना पशुपालकांसाठी देण्यात येत आहेत.  पशुपालकासाठी जनावरांची नोंदणीची वेळ सकाळी 8 ते दुपारी 12 अशी राहील. नोंदणी शिवाय रिंगममध्ये प्रवेश दिला जाणार नाही. निवड समितीचा निकाल अंतीम राहील. बक्षीस पात्र पशुपालकांना बक्षीसासोबत प्रशस्तीपत्र दिले जाईल. प्रत्येक गटात प्रथम, द्वितीय व तृतीय बक्षीसे दिले जातील. पशुपालकांनी येतांना बॅंक पासबुक व आधार कार्डची झेरॉक्स प्रत सोबत अणावी असेही जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी निवेदनात म्हटले आहे.

000000

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...