Tuesday, November 28, 2017

जिल्ह्यातील शस्त्र परवानाधारकांना
नुतनीकरणाबाबत आवाहन
नांदेड, दि. 28 :- जिल्ह्यातील शस्त्र परवानाधारकांनी जिल्हाधिकरी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालय नांदेड यांचेमार्फत निर्गमीत शस्त्र परवाने ज्याची मुदत रविवार 31 डिसेंबर 2017 रोजी संपुष्टात येत आहे अशा शस्त्र परवानाधारकांनी त्यांचा शस्त्र परवाना पुढील कालावधीसाठी नुतनीकरण करुन घ्यावा. परवानाधारकाने 1 ते 31 डिसेंबर 2017 या कालावधीत आपला शस्त्र परवाना नुतनीकरण करुन घेण्यासाठी नुतनिकरण शुल्क चलनाने शासन जमा करुन विहित नमुन्यातील अर्ज व मुळ शस्त्र परवाना सेतू समिती जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालय नांदेड येथे दाखल करावा, असे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी केले आहे.
केंद्र शासनाचे निर्देशानुसार NATIONAL DATA BASE (NDAL) च्या संकेतस्थळावर ज्या शस्त्र परवानाधारकांची माहिती अपलोड करण्यात आली आहे, अशा शस्त्र परवानाधारकांना युआयएन नंबर देण्यात आला आहे. अशा शस्त्र परवानाधारकांनी स्वत:चा आधार क्रमांक, पॅन क्रमांक अपलोड करण्यासाठी केंद्र शासनाचे निर्देश आहेत. सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असेही आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000
कापूस, तूर, हरभरा
पिकासाठी कृषि संदेश
नांदेड, दि. 28 :- क्रॉपसॅप सन 2017-18 अंतर्गत किड व रोग सल्ला प्रकल्पातंर्गत कापूस, तूर व हरभरा या पिकाचे सर्वेक्षण चालू आहे. याअंतर्गत नांदेड कृषि उपविभागातील मुदखेड, अर्धापूर, लोहा व कंधार या तालुक्यांमध्ये सर्वेक्षण चालू आहे. सर्वेक्षणाअधारे किड रोगावर कृषि विद्यापीठाकडून उपचाराबाबत संदेश दिला जातो. त्याप्रमाणे मोबाईलवर लघू संदेश पाठवून शेतकऱ्यांना किड रोगाबाबत जागरुक करण्यात येते.  
सध्या कपाशीवर शेंदरी बोंड अळीचा प्रादूर्भाव दिसून येतो. या अळीच्या नियंत्रणासाठी फेनवलरेट 20 ई.सी. 8 मिली किंवा थायोडिकार्ब 75 टक्के डब्ल्यु पी. 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. जेणेकरुन अळीचे नियंत्रण होईल. कपाशीचा हंगाम जास्त काळ लांबवू नये , म्हणजेच फरदड ठेवू नये. कापूस वेचणी झाल्यानंतर जानेवारी महिन्यात मेंढ्या, गुरे चरण्यासाठी कपाशीच्या शेतात सोडावे यामुळे शेंदरी बोंडअळीचे अंडीकोष नष्ट होण्यास मदत होईल व अळीचा जीवनक्रम खंडीत होईल. सोबत कापूस काढणीनंतर जमिनीची खोल नांगरट करुन सुर्यप्रकाशात तापण्यासाठी खुली ठेववी  म्हणजे पक्षांना खाण्यास अंडी कोष उपलब्ध होतील.
तूर हे पिक कळी शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे. तूरीवर प्रामुख्याने पाने गुंडाळणारी अळी, पिसारी पतंग , शेंग माशी व शेंगापोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने दिसून येत असतो. गुंडाळलेली पाने तोडून नष्ट करावीत. शेंगमाशीचा प्रादुर्भाव आढळून येत असल्यास क्विनॉलफॉस 25 टक्के 16 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. तूरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीमुळे 30 ते 35 टक्के नुकसान होते. या अळीच्या सर्वेक्षणासाठी हे. 5 कामगंधा सापळ्यांचा वापर करावा. यामध्ये सलग 3 रात्री 8 ते 10 पतंग हेलीकोवरपाचे पडल्यास फवारणीची आवश्यकता आहे, असे समजून एचएएनपीव्ही ही जैविक किटकनाशक 500 मिली प्रति हे. फवारावी. प्रादुर्भाव अधिक असल्यास ईमामेक्टींन बेंझोऐट 5 एसजी 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावीत.
हरभरा हे पिक सध्या शाखीय वाढ अवस्था व फुलोरा अवस्थेत आहेत. हरभऱ्यावर प्रामुख्याने मर रोगाचा प्रादुर्भाव आढळून येतो. या मर रोगाच्या नियंत्रणासाठी ट्रायकोड्रमा व्हीरीडी एक टक्के डब्ल्युपी 4 ग्रॅम बीजप्रक्रियेसोबतच प्रादुर्भावीत पिकांनी अळवणी करावी. हरभरा या पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो. या अळीच्या नियंत्रणासाठी हे. 20 पक्षी थांबे उभारावेत. या अळीच्या सर्वेक्षणासाठी कामगंध सापळ्याचा वापर करावा. या सापळ्यात हेलिल्युर या घाटेअळीच्या माधीचा गंध असलेल्या ल्यूर वापरलेला असतो. या गंधामुळे हेलीकोवरपाचे नर पतंग आकर्षित होऊन त्या सापळ्यात अडकतात. त्यामुळे मादी अंडी फलनास अकार्यक्षम होते व त्यामुळे किडीवर नियंत्रण मिळण्यास मदत होते. प्रति सापळ्यात 8 ते 10 पतंग सलग 3 रात्री आढळून आल्यास प्रादुर्भाव अधिकचा समजून रासायनिक किटकनाशकाची फवारणी करावी. याकरिता क्विनॉलफॉस 25 टक्के 16 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावीत. याशिवाय कृषि विद्यापीठाने शिफारस केलेले लेबरक्लेम रासायनिक किटकनाशकांचा वापर क्षेत्रीय कर्मचाऱ्यांशी संपर्क करुन करावा, असे आवाहन नांदेडचे उपविभागीय कृषि अधिकारी डॉ. व्ही. व्ही. भरगंडे यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

00000
गरीब, निर्धन रुग्णांसाठी
मोफत आरोग्य शिबीर
नांदेड , दि. 28 :- गरीब आणि निर्धन रुग्णांसाठी धर्मादाय रुग्णालयाच्या योजनेंतर्गत सहाय्यक धर्मादाय आयुक्त, सार्वजनिक न्याय नोंदणी कार्यालय नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. वाडेकर संचलित मराठवाडा मेडिकल फाऊंडेशन नांदेड धर्मादाय रुग्णालयातर्फे मोफत आरोग्य शिबीर सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय नांदेड रेल्वेस्टेशन समोर, चौधरी पेट्रोलपंपाच्या बाजूला, गवळीपुरा, नांदेड येथे रविवार 3 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 यावेळेत मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन निर्धन व गरीब रुग्णांसाठी केले आहे.
नांदेड जिल्ह्यातील नागरिकांनी या शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन नांदेडचे सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांनी केले आहे.

0000
मुख स्वास्थ तपासणी मोहीम
1 ते 31 डिसेंबर कालावधीत
नांदेड दि. 28 :- जिल्ह्यात “मुख स्वास्थ तपासणी मोहीम” 1 ते 31 डिसेंबर 2017 या कालावधी साजरा करण्यात येणार आहे. यात जिल्ह्यातील 30 वर्षावरील स्त्री व पुरुषांची तोंडाची तपासणी केली जाणार आहे. तपासणी सर्व शासकीय, मनपा, न.पा दवाखाने येथे मोफत आहे. गावपातळीवर आशा, ए.एन.एम. व एम.पी.डब्लू. यांच्यामार्फत तपासणी करुन उपचारासाठी शासकीय दवाखान्यात पाठविण्यात येणार आहे. गरजू व्यक्तींनी या तपासणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रभारी जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. गुंटूरकर यांनी केले आहे.
मुख स्वास्थ हे सर्व शरीराच्या स्वास्थाचे गमक आहे. त्याचप्रमाणे मुख स्वास्थ जर व्यवस्थित ठेवले तर पुढील पुष्कळ आजारांपासून आपण वाचू शकतो. मुख कर्करोग हा कर्करोगामध्ये सर्वात प्रथम क्रमांकावर आढळून येतो. मौखिक कर्करोग जर पुर्वावस्थेत ओळखला तर तो कर्करोगामध्ये परावर्तीत होण्यापासून आपण वाचवू शकतो. तंबाखूचे सेवन करणे हे कर्करोगाचे प्रमुख कारण आहे.

000000
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे
2018 या वर्षातील परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर
नांदेड, दि. 28 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 2018 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर हे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
लोकसेवा आयोगाच्या वेळापत्रकानुसार राज्य कर (विक्रीकर) निरीक्षक परीक्षा 2017 ( परीक्षेसाठी मागणीपत्र प्राप्त दि. 19 एप्रिल ) साठीची पूर्व परीक्षा रविवार, दिनांक 16 जुलै 2017 रोजी घेण्यात आली होती. आता या पदासाठीची मुख्य परीक्षा रविवार, दि. 7 जानेवारी 2018 रोजी घेण्याचे नियोजित करण्यात आली आहे. राज्य सेवा परीक्षा 2018 साठीची जाहिरात डिसेंबर 2017 मध्ये प्रसिद्ध करण्यात येणार असून पूर्व परीक्षा रविवार, दि. 8 एप्रिल 2018 रोजी तर मुख्य परीक्षा शनिवार, दि. 18,19 ऑगस्ट व सोमवार दि. 20 ऑगस्ट, 2018 अशी तीन दिवस घेण्यात येणार आहे.
महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त परीक्षेसाठी जानेवारी- 2018 मध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार असून पूर्व परीक्षा रविवार दि. 6 मे 2018 रोजी घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2018 अंतर्गत संयुक्त पेपर क्रमांक 1- रविवार दि. 26 ऑगस्ट 2018 रोजी, पेपर क्र. 2 (पोलीस उपनिरीक्षक)- रविवार दिनांक 2 सप्टेंबर 2018, पेपर क्रमांक 2 (राज्य कर निरीक्षक)- रविवार दि. 30 सप्टेंबर 2018, पेपर क्र. 2 ( सहायक कक्ष अधिकारी)- शनिवार दि. 6 ऑक्टोबर 2018 रोजी घेण्यात येणार आहे.
महाराष्ट्र कृषि सेवा परीक्षा 2018 साठी फेब्रुवारी 2018 मध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार असून पूर्व परीक्षा रविवार दि. 13 मे 2018 रोजी तर मुख्य परीक्षा शनिवार दि. 8 सप्टेंबर 2018 रोजी घेण्याचे नियोजित आहे. सहायक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा 2018 साठी फेब्रुवारी 2018 मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असून पूर्व परीक्षा रविवार दि. 20 मे 2018 रोजी तर मुख्य परीक्षा रविवार दिनांक 9 सप्टेंबर2018 रोजी घेण्यात येणार आहे.
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त परीक्षा 2018 साठी मार्च 2018 मध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार असून पूर्व परीक्षा रविवार दि. 10 जून 2018 रोजी घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2018अंतर्गत संयुक्त पेपर क्रमांक 1- रविवार दि. 14 ऑक्टोबर 2018 रोजी, संयुक्त पेपर क्रमांक 2 (लिपिक-नि-टंकलेखक)- रविवार दि. 21 ऑक्टोबर 2018, संयुक्त पेपर क्रमांक 2 (दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-क)- रविवार दि. 4 नोव्हेंबर 2018, संयुक्त पेपर क्रमांक 2 (कर सहायक)- रविवार दि. 2 डिसेंबर 2018 रोजी घेण्यात येणार आहे.
महाराष्ट्र वन सेवा परीक्षा 2018 साठी मार्च 2018 मध्ये जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असून पूर्व परीक्षा रविवार दि. 24 जून 2018 रोजी तर मुख्य परीक्षा रविवार दि. 28 ऑक्टोबर 2018 रोजी घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2018 साठी एप्रिल 2018 मध्ये जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असून महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2018 रविवार दि. 8 जुलै 2018 मध्ये घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2018 शनिवार दि. 17 नोव्हेंबर 2018 रोजी घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2018 शनिवार दि. 24 नोव्हेंबर2018 रोजी घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2018 रविवार दि. 25 नोव्हेंबर 2018 रोजी घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र विद्युत / यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2018शनिवार दि. 15 डिसेंबर 2018 रोजी घेण्यात येणार आहे.
महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब प्रशासन शाखा मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा- 2018 साठी मे 2018 मध्ये जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असून शनिवार दि. 4 ऑगस्ट 2018 रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे.सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2018 साठी मे, 2018 मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असून परीक्षा शनिवार दि. 25 ऑगस्ट 2018 रोजी घेण्याचे नियोजित आहे. परीक्षांचे वेळापत्रक आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
0000000

Monday, November 27, 2017

माहूरगड येथे श्री दत्तजयंती उत्सवानिमित्त
पोलीस अंमलदारांना अधिकार प्रदान
नांदेड, दि. 27 :- माहूरगड येथे श्री दत्तजयंती उत्सव मंगळवार 28 नोव्हेंबर ते सोमवार 4 डिसेंबर 2017 या कालावधीमध्ये साजरा होत आहे. या उत्सवासाठी राज्याच्या विविध भागांसह, तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक व इतर राज्यातून भाविक मोठ्या प्रमाणावर येतात. त्यामुळे या कालावधीत मिरवणुका व इतर कार्यक्रम शांततेत पार पडावे व शांतता व सुव्यवस्था रहावी यासाठी पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारान्वये 28 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर 2017 च्या मध्यरात्री पर्यंत माहूर उपविभागीय पोलीस अधीकारी ए. डी. जहारवाल व माहूर पोलीस स्टेशचे पोलीस निरीक्षक अभिमन्यु साळुंके यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 36 मधील पोट कलमे अ ते फ प्रमाणे पुढील अधिकार केले आहेत.
प्रदान करण्यात आलेले अधिकार पुढीलप्रमाणे - रस्त्यावरील व रस्त्याने जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कशा रितीने चालावे व कोणत्या रितीने वागावे याविषयी निर्देश देणे. अशा कोणत्याही मिरवणुका या कोणत्या मार्गाने, कोणत्या वेळात काढाव्यात किंवा काढू नयेत असे मार्ग व अशा वेळा विहित करणे. सर्व मिरवणुकीच्या व जमावाच्या प्रसंगी व पुजा-अर्चेच्या प्रार्थना स्थळाच्या सर्व जागेच्या आसपास पुजा-अर्चेच्या वेळी कोणत्याही रस्त्यावर किंवा सार्वजनिक जागा येथे गर्दी होणार असेल किंवा अडथळा होण्याचा संभव असेल अशा सर्व प्रसंगी अडथळा न होऊ देणे यासाठी योग्य ते आदेश देणे. सर्व रस्त्यावर किंवा रस्त्यामध्ये घाटात किंवा घाटावर, सर्व धक्क्यावर किंवा धक्क्यामध्ये आणि सार्वजनिक स्नानांच्या, कपडे धुण्याच्या व उतरण्याच्या जागांच्या ठिकाणी व जागामध्ये, जत्रा, देवालय आणि सार्वजनिक स्थळी, लोकांच्या जाण्या-येण्याच्या जागेमध्ये सुव्यवस्था राखणेसाठी योग्य ते आदेश देणे. तसेच सार्वजनिक ठिकाणी अथवा सार्वजनिक करमणुकीच्या ठिकाणी ध्वनिक्षेपकांच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी व सूचना देण्यासंबंधी योग्य ते आदेश देणे. मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33, 35 ते 40, 42, 43, 45 या अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशास अधिन असलेले व त्यास पुष्टी देणारे सुव्यवस्था राहणेकामी योग्य आदेश देण्याबाबत.
हा आदेश लागू असेपर्यंत माहूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. जहारवाल व पोलीस निरीक्षक श्री. साळुंके यांच्याकडून रहदारीचे नियम व मार्गाबाबत सूचना कार्यक्रमाची तारीख, वेळ, जाहीरसभा, मोर्चे, मिरवणूक, निदर्शने, पदयात्रा इत्यादी कार्यक्रम संबंधीत पोलीस फौजदार किंवा त्याच्या वरिष्ठांकडून तारीख व वेळ सभेची जागा, मिरवणुकीचा, मोर्चाचा मार्ग व त्यात दिल्या जाणाऱ्या घोषणा, पूर्व परवानगी शिवाय आयोजित करु नये. संबंधीत अधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करावे. परवानगी दिलेल्या जाहीरसभा, मिरवणुका, पदयात्रा यात समायोजित घोषणा सोडून ज्या घोषणांनी शांतता व सुव्यवस्थेला बाधा होऊ शकते अशा घोषणा देऊ नये. हा आदेश लग्नाच्या ठिकाणी, प्रेत यात्रेस लागू नाही. या आदेशाचे उल्लंघन केल्यास मुंबई कायदा कलम 134 प्रमाणे अपराधास पात्र ठरेल, असेही आदेश पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी जारी केले आहेत.
000000


"राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क"
शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 27 :- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज https://mahadbt.gov.in करण्याचे आवाहन डॉ. शैला सारंग सहसंचालक उच्च शिक्षण नांदेड यांनी केले आहे.  
राज्य शासनाकडून सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी https://mahadbt.gov.in हे संकेतस्थळ संचालक, माहिती व तंत्रज्ञान (DIT) यांचेमार्फत विकसीत करण्यात आले आहे. या संकेतस्थळामध्ये शिक्षण संचालक, उच्च शिक्षण, विभागाच्यावतीने शिष्यवृत्ती योजनेचा समावेश करण्यात आला आहे. देय होणाऱ्या वित्तीय लाभाची सर्व रक्कम लाभार्थी विद्यार्थ्याच्या आधार संलग्नीत बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्याने शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळण्यासाठी स्वत:ची नोंदणी करणे, अर्ज भरणे, अर्ज भरण्यापासून ते रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा करण्याची सर्व प्रक्रिया आता राजर्षी DBT पोर्टल मार्फत करणे अनिवार्य करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर ही लाभाची रक्कम जमा केल्याबाबची सुचना DBT पोर्टलद्वारे प्रत्येक महाविद्यालयात दिली जाईल. त्यामुळे संबंधित विद्यापीठ, शैक्षणिक संस्था, महाविद्यालयांनी कोणत्याही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांकडून प्रवेशाच्या वेळी शिक्षण शुल्काची रक्कम घेवू नये. तसेच कोणत्याही आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांची पीळवणूक होणार नाही याची योग्य ती काळजी घेण्याची जबाबदारी संबंधित शैक्षणिक संस्थेची असेल.
उच्च शिक्षण, नांदेड विभाग, नांदेड विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती (ईबीसी), अहिंदी भाषीक विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती, एकलव्य आर्थिक सहाय्य योजना, गुणवान विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य योजना, राज्य शासनाची खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना, शासकीय विद्यानिकेतन शिष्यवृत्ती योजना, स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक सहाय्य योजना, माजी सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक सहाय्य योजना, गणित व भौतिक विषयातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती योजना ऑनलाईन करण्यात आल्या आहेत.
ऑनलाईन नोंदणीची पुर्वतयारी करताना विद्यार्थ्याने आपला आधार क्रमांक काढणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याने कोअर बँकींग सुविधा असलेल्या बँकेच्या शाखेमध्ये खाते काढणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याने आपला मागील परीक्षा उत्तीर्ण झालेला दाखला व गुणपत्रक, जन्मतारखेचा पुरावा, रहिवाशी दाखला, उत्पन्न दाखला, प्रवेशित महाविद्यालयाची माहिती आभ्यासक्रमाचा कालावधी, बँकेच्या पासबुकाची झेरॉक्स, आधारकार्ड इत्यादी कागदपत्रे तयार ठेवावीत.
नोंदणी कशी करावी- आपण कोणत्याही ब्राऊजरचा वार करुन (उदा. Internet Explorer (I.E.)/Google Chrome/ Mozilla firefox etc.), https://mahadbt.gov.in या वेबसाईटवर जाऊन "नविन नोंदणी" या बटणावर क्लिक करावे. प्रत्येक विद्यार्थ्याने Maha-DBT पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. "आधारकार्ड आहे" असेल तर "होय" व नसेल तर "नाही" वर क्लिक करा. त्यानंतर "OTP" हा पर्याय निवडा. वैध आधार क्रमांक टाकल्यानंतर OTP पाठवा बटन क्लिक करा. मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेला OTP (One Time Password) टाकून "पडताळणी करा" हे बटन क्लिक करा. उपलब्ध विंडोमध्ये नांव, जन्मदिनांक, फोन नंबर, पत्ता, आधार संलग्न बँक खाते नंबद इ. आधार कार्ड वरील माहिती आपोआप दिसेल. आधार क्रमांक नसल्यास "आधार कार्ड नाही" हा पर्याय निवडा आणि आवश्यक ती माहिती भरावी व कागदपत्रे अपलोड करावे. नोंदणी अर्जाच्या विंडो मधील सर्व माहिती भरावी. स्वत:चा युजर नेम व पासवर्ड तयार करावा.
अर्ज कसा भरावा - महाडीबीटी पोर्टलवर लॉगइन करण्यासाठी "सिलेक्ट युजर मध्ये जावून" विद्यार्थी हा पर्याय निवडा. युजरनेम व पासवर्ड टाकून लॉगइन व्हा. लॉगइन झाल्यानंतर विंडोज मधील "योजना तपशिल" यावर क्लिक करा. यानंतर विभागवार योजना आपण पाहून निवडू शकता. आपण ज्या योजनेसाठी अर्ज करावयाचा आहे त्या योजनेच्या नांवासमोर "पहा" क्लिक केले असता योजनेची सर्व माहिती दिसू शकेल. त्यानंतर कोणत्या योजना (मॅट्रिक पुर्व/ मॅट्रिकोत्तर साठी आपण पात्र आहात त्याची खात्री करा व पर्याय क्लिक करा. (उदा. शालेय विद्यार्थ्यांनी "मॅट्रिकपुर्व व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी "मॅट्रिकोत्तर" हा पर्याय निवडावा.) आवश्यक ती सर्व माहिती उदा. जात, प्रवर्ग, महाराष्ट्राचे रहिवाशी, अपंगत्व, कौटुंबिक उत्पन्न इ. सॉफ्टवेअरमध्ये काळजीपुर्वक भरावी. आवश्यक ते कागदपत्रे, पालकांची माहिती, शाळा व महाविद्यालयाचा तपशिल नमुद करावा.आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावी. (रहिवाशी दाखला, उत्पन्नाचा दाखला, एसएससी प्रमाणपत्र, बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक इ.) अभ्यासक्रमाचा तपशिल, मागील परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा तपशिल इ. सर्व माहिती अर्जदाराने भरावयाची आहे आणि सबमिशन पेज मधील सादर या बटनवर क्लिक करावयाचे आहे. विद्यार्थी/ पालकांना काही आडचण असल्यास त्यांनी 18001025311 या टोल फ्री क्रमांकावर किंवा helpdesk@mahadbt.gov.in या मेल आयडीवर संपर्क करावा.
महाविद्यालयासाठी सुचना :- महाडीबीटी पोर्टलवर विद्यार्थ्यांना ऑनलाईन करणे व अर्ज भरण्यासाठी सहकार्य करावे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्याकडून प्रवेशाच्या वेळी कोणतेही शुल्क स्वीकारु नये. विद्यार्थ्यांना आधार क्रमांक काढणे, कोअर बँकींग सुविधा असलेल्या बँकेच्या शाखेमध्ये खाते उघडण्यासाठी सुचना द्याव्यात. आपल्या महाविद्यालयाचे नांव, महाविद्यालयास मान्य असलेल्या अभ्यासक्रमाची नांवे, अभ्यासक्रमाचा कालावधी, अभ्यासक्रमनिहाय प्रवेश क्षमता महाविद्यालयाच्या व अभ्यासक्रमाच्या मान्यतेचे विविध आदेश याबाबतची माहिती पोर्टलवर मॅप करण्यासाठी संचालनालयास सादर करुन ती मॅप करुन घेण्याची कार्यवाही करावी. महाविद्यालय, त्यांचा अभ्यासक्रम, त्यांची प्रवेश क्षमता, अभ्यासक्रमाचा कलावधी, शुल्क रचना इ. माहिती पोर्टलमध्ये समावेश (मॅप) करण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाची असेल त्यासाठी ज्या प्राधिकाऱ्यांनी (Authority) मान्यता दिली आहे त्यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन नांदेड उच्च शिक्षण विभागीचे सहसंचालक डॉ. शैला सारंग यांनी केले आहे.

00000

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...