Tuesday, November 28, 2017

कापूस, तूर, हरभरा
पिकासाठी कृषि संदेश
नांदेड, दि. 28 :- क्रॉपसॅप सन 2017-18 अंतर्गत किड व रोग सल्ला प्रकल्पातंर्गत कापूस, तूर व हरभरा या पिकाचे सर्वेक्षण चालू आहे. याअंतर्गत नांदेड कृषि उपविभागातील मुदखेड, अर्धापूर, लोहा व कंधार या तालुक्यांमध्ये सर्वेक्षण चालू आहे. सर्वेक्षणाअधारे किड रोगावर कृषि विद्यापीठाकडून उपचाराबाबत संदेश दिला जातो. त्याप्रमाणे मोबाईलवर लघू संदेश पाठवून शेतकऱ्यांना किड रोगाबाबत जागरुक करण्यात येते.  
सध्या कपाशीवर शेंदरी बोंड अळीचा प्रादूर्भाव दिसून येतो. या अळीच्या नियंत्रणासाठी फेनवलरेट 20 ई.सी. 8 मिली किंवा थायोडिकार्ब 75 टक्के डब्ल्यु पी. 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. जेणेकरुन अळीचे नियंत्रण होईल. कपाशीचा हंगाम जास्त काळ लांबवू नये , म्हणजेच फरदड ठेवू नये. कापूस वेचणी झाल्यानंतर जानेवारी महिन्यात मेंढ्या, गुरे चरण्यासाठी कपाशीच्या शेतात सोडावे यामुळे शेंदरी बोंडअळीचे अंडीकोष नष्ट होण्यास मदत होईल व अळीचा जीवनक्रम खंडीत होईल. सोबत कापूस काढणीनंतर जमिनीची खोल नांगरट करुन सुर्यप्रकाशात तापण्यासाठी खुली ठेववी  म्हणजे पक्षांना खाण्यास अंडी कोष उपलब्ध होतील.
तूर हे पिक कळी शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे. तूरीवर प्रामुख्याने पाने गुंडाळणारी अळी, पिसारी पतंग , शेंग माशी व शेंगापोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने दिसून येत असतो. गुंडाळलेली पाने तोडून नष्ट करावीत. शेंगमाशीचा प्रादुर्भाव आढळून येत असल्यास क्विनॉलफॉस 25 टक्के 16 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. तूरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीमुळे 30 ते 35 टक्के नुकसान होते. या अळीच्या सर्वेक्षणासाठी हे. 5 कामगंधा सापळ्यांचा वापर करावा. यामध्ये सलग 3 रात्री 8 ते 10 पतंग हेलीकोवरपाचे पडल्यास फवारणीची आवश्यकता आहे, असे समजून एचएएनपीव्ही ही जैविक किटकनाशक 500 मिली प्रति हे. फवारावी. प्रादुर्भाव अधिक असल्यास ईमामेक्टींन बेंझोऐट 5 एसजी 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावीत.
हरभरा हे पिक सध्या शाखीय वाढ अवस्था व फुलोरा अवस्थेत आहेत. हरभऱ्यावर प्रामुख्याने मर रोगाचा प्रादुर्भाव आढळून येतो. या मर रोगाच्या नियंत्रणासाठी ट्रायकोड्रमा व्हीरीडी एक टक्के डब्ल्युपी 4 ग्रॅम बीजप्रक्रियेसोबतच प्रादुर्भावीत पिकांनी अळवणी करावी. हरभरा या पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो. या अळीच्या नियंत्रणासाठी हे. 20 पक्षी थांबे उभारावेत. या अळीच्या सर्वेक्षणासाठी कामगंध सापळ्याचा वापर करावा. या सापळ्यात हेलिल्युर या घाटेअळीच्या माधीचा गंध असलेल्या ल्यूर वापरलेला असतो. या गंधामुळे हेलीकोवरपाचे नर पतंग आकर्षित होऊन त्या सापळ्यात अडकतात. त्यामुळे मादी अंडी फलनास अकार्यक्षम होते व त्यामुळे किडीवर नियंत्रण मिळण्यास मदत होते. प्रति सापळ्यात 8 ते 10 पतंग सलग 3 रात्री आढळून आल्यास प्रादुर्भाव अधिकचा समजून रासायनिक किटकनाशकाची फवारणी करावी. याकरिता क्विनॉलफॉस 25 टक्के 16 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावीत. याशिवाय कृषि विद्यापीठाने शिफारस केलेले लेबरक्लेम रासायनिक किटकनाशकांचा वापर क्षेत्रीय कर्मचाऱ्यांशी संपर्क करुन करावा, असे आवाहन नांदेडचे उपविभागीय कृषि अधिकारी डॉ. व्ही. व्ही. भरगंडे यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...