Thursday, July 13, 2017

 क्रीडा स्पर्धा आयोजनासाठी
  शिक्षकांची 18 जुलैला बैठक 
नांदेड, दि. 13 :- क्रीडा व युवक सेवा संचालनालयांतर्गत सन 2017-18 या शैक्षणिक वर्षातील विविध शासकीय क्रीडा स्पर्धा आयोजन व नियोजनाबाबत नांदेड जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यातील (महानगरपालिका क्षेत्र वगळून) प्राचार्य, मुख्याध्यापक, तालुका क्रीडा संयोजक, क्रीडा शिक्षकांची बैठक मंगळवार 18 जुलै 2017 रोजी जिल्हा क्रीडा संकुल इनडोअर हॉल स्टेडीयम परीसर नांदेड येथे दुपारी 12.30 वा. आयोजित करण्यात आली आहे. संबंधितांनी बैठकीस वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गंगालाल यादव यांनी केले आहे.  

000000
होमगार्ड सदस्य नोंदणी सोमवारी
सकाळी 8 ते सायं 4 यावेळेत होणार
नांदेड दि. 13 :- जिल्हा होमगार्ड कार्यालयांतर्गत नांदेड जिल्ह्यातील पथक निहाय नवीन होमगार्ड सदस्य नोंदणी प्रक्रिया सोमवार 17 जुलै 2017 रोजी सकाळी 8 ते सायं 4 वाजेपर्यंत पोलीस मुख्यालय, वजिराबाद नांदेड येथे होणार आहे. जास्तीतजास्त नागरिकांनी होमगार्ड सदस्य नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रांसह वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन नांदेड जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अपर पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांनी केले आहे.
सदस्य नोंदणी प्रक्रियेसाठी सर्वसाधारण अटी व शर्ती पुढील प्रमाणे राहतील. पुरुष उमेदवार- वय 20 ते 50 वर्षे, शिक्षण- दहावी उत्तीर्ण, उंची- 162 सेंमी. छाती न फुगवता 76 सेमी व फुगवुन 81 सेमी. महिला उमेदवार- वय 20 ते 50 वर्षे, शिक्षण- दहावी उत्तीर्ण, उंची- 150 सेमी.
सदस्य नोंदणीचे वेळी पुढील प्रमाणे मुळ कागदपत्रे व झेरॉक्स प्रती आणणे आवश्यक आहे. शाळा सोडल्याचा दाखला, दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र, आधारकार्ड / मतदान कार्ड / रहिवाशी दाखला किंवा रेशनकार्ड. नुकतेच काढलेले दोन पासपोर्ट आकाराचे छायाचित्र. तसेच जिल्हास्तर, राज्यस्तर व राष्ट्रीय स्तरीय क्रीडा प्रमाणपत्र, एनसीसीबी सर्ट, सी. सर्ट प्रमाणपत्र, जडवाहन परवाना, नागरी संरक्षण सेवेत असलेले परंतू स्थानीक ठिकाणी तीन प्रशिक्षण प्रमाणपत्रधारक, आयटीआय प्रमाणपत्र किंवा माजी सैनिक यांना प्राधान्य देण्यात येईल.
अधिक माहितीसाठी भाग्यनगर येथील नांदेड जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालयाचा दूरध्वनी नंबर 02462-254261 वर संपर्क साधावा. नवीन उमेदवार नोंदणी तसेच मैदानी चाचणीसाठी येणाऱ्या उमेदवारांना येण्या-जाण्याचा कुठलाही प्रवास खर्च दिला जाणार नाही याची संबंधीतांनी नोंद घ्यावी, असेही आवाहन जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अपर पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांनी केले आहे.

000000
  परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश 
नांदेड, दि. 13 :- सहायक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक संयुक्त पुर्व परीक्षा- 2017 ही रविवार 16 जुलै 2017 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 12 वा. या कालावधीत नांदेड शहरातील एकूण 51 केंद्रावर घेण्यात येत आहे. या परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला आहे.
या परीक्षा केंद्राच्या परिसरात रविवार 16 जुलै रोजी सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत या कालावधीत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी व कर्मचारी या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच यावेळेत परीक्षा केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध राहील, असे जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
000000


बिलोली, भोकर ग्रामीण रुग्णालयाचा
शासनाच्या "कायाकल्प" पुरस्काराने गौरव
नांदेड दि. 13 :- ग्रामीण रुग्णालय बिलोली व भोकर यांना शासनाकडून उत्कृष्ट कार्याबद्दल दिला जाणारा "कायाकल्प-2016-17" या पुरस्काराचे वितरण आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते प्रत्येकी एक लक्ष रुपये, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र या स्वरुपात देऊन नुकतेच गौरविण्यात आले.   
हा पुरस्कार वितरण सोहळा मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात सोमवार 10 जुलै रोजी पार पडला. यावेळी खासदार अरविंद सावंत, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. विजय सतबीर सिंग, आरोग्य सेवा आयुक्त डॉ. प्रदीप व्यास, आरोग्य सेवा संचालक डॉ. सतीश पवार, डॉ. अर्चना पाटील आदी उपस्थित होते.
पुरस्काराबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. पी. कदम म्हणाले की,  हा केवळ संस्थानाचा गौरव नसून त्यासाठी काम करणाऱ्या सर्व कर्मचारी यांचा आहे. येत्या वर्षी नांदेड जिल्ह्याला अधिकाधिक पारितोषिक मिळतील यासाठी आम्ही प्रयत्न करु. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी राज्यस्तरीय पुरस्कार मिळणे ही आनंदाची बाब असून नांदेड जिल्ह्यातील वैद्यकीय सेवांची गुणवत्ता उंचावली जाईल. पुरस्काराचे श्रेय जिल्हा गुणवत्ता आश्वासन चमुचे असल्याचे सांगितले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम इंगळे म्हणाले, सातत्य व चिकाटी हा गुरुमंत्र अवलंबून प्रथमवर्षीच राज्यस्तरावर 17 व्या स्थानी आहोत. या पुरस्कारासाठी डॉ. कंदेवाड व डॉ. बि. पी. कदम (जिल्हा शल्य चिकीत्सक) यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले तसेच या पुरस्काराचे श्रेय ग्रामीण रुग्णालय भोकर येथील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना जाते.  पुढील काळात सातत्य राखून आणखी सुधारणा करु असे सांगितले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. नागेश लखमावार यांनी, ही आमच्यासाठी गौरवाची बाब असून असेच कार्य करून पुढील काळात राज्यात अव्वल स्थानी येण्यासाठी प्रयत्न करु असे सांगितले.
राज्यस्तरीय ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय प्रवर्गात ग्रामीण रुग्णालय बिलोली दहाव्या क्रमांकावर तर ग्रामीण रुग्णालय भोकर सतराव्या क्रमांकावर आहे. यामुळे नांदेड जिल्ह्यातील आरोग्य विभागाची मान उंचावली आहे. तसेच जिल्हास्तरावर एकूण 5 प्राथमिक आरोग्य केंद्रांना कायाकल्प पारितोषिक जाहीर झाला आहे ज्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र भोसी, सरसम, अर्धापूर, मालेगाव व तुप्पा यांचा समावेश आहे. नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते नुकतेच ग्रामीण रुग्णालय बिलोली व भोकर यांना ISO २००९:२०१५ नामांकनाचे प्रमाणपत्र देण्यात आले होते.
महाराष्ट्रातील शासकीय वैद्यकीय संस्थांची चार स्तरीय तपासणी करून तेथे सर्व सोई-सुविधा, स्वच्छता, बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट, कर्मचारी यांची प्रशिक्षणे व त्यांचा वापर या सर्व बाबींचा बारकाईने निरीक्षण करून सर्वोत्कृष्ट आरोग्य संस्थांना कायाकल्प हा पुरस्कार शासनामार्फत दिला जातो.
हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिंदे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. इंगळे, डॉ. लखमावार, जिल्हा गुणवत्ता आश्वासन समन्वयक डॉ. साईप्रसाद शिंदे, भोकर वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप लोखंडे सोबत सोएल रब्बानी, विनोद बोधगीरे व विठ्ठल शेळके उपस्थित होते.

000000

Wednesday, July 12, 2017

महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांचा दौरा
नांदेड, दि. 12 :- राज्याचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
गुरुवार 13 जुलै 2017 रोजी मुंबई येथुन नंदिग्राम एक्सप्रेसने सकाळी 5.10 वा. नांदेड रेल्वे स्टेशन येथे आगमन व शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. सकाळी 5.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. सकाळी 9 वा. शासकीय वाहनाने उमरखेड जि. यवतमाळकडे प्रयाण करतील.

000000
जीएसटीबाबत मदत केंद्राची स्थापना;
सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन  
नांदेड, दि. 12 :- वस्तू व सेवाकर (जीएसटी) कायदाबाबत येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी येथील राज्य वस्तू व सेवाकर कार्यालयातील मदत केंद्राद्वारे शंकाचे निरसन करुन मार्गदर्शन करण्यात येत आहे. संबंधितांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नांदेड विभागाचे राज्यकर सहआयुक्त मा. म. कोकणे यांनी केले आहे.
वस्तू व सेवाकर कायदाबाबत (जीएसटी) माहिती देण्यासाठी वस्तू व सेवाकर कार्यालयात मदत केंद्र उपलब्ध करण्यात आले आहे. या केंद्रात राज्यकर अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मदत केंद्राची माहिती राज्यकर विभागाच्या संकेतस्थळावर व 02462-231977 या दुरध्वनी क्रमांकासह उपलब्ध करण्यात आली आहे. या केंद्रात व्यापाऱ्यांना वस्तू व सेवाकर कायदाबाबत येणाऱ्या अडचणीचे निराकरण केले जात आहे. व्यापाऱ्यांना वस्तू व सेवाकर कायदात एनरोलमेंट व नोंदणी अर्ज नि:शुल्क भरुन देण्यात येत आहे. 
            भारत सरकारने 1 जुलै 2017 पासून वस्तू व सेवाकर कायदयाची अंमलबजावणी सुरु केली आहे. त्यानुसार राज्यातील कर गोळा करण्याची जबाबदारी राज्य वस्तू व सेवाकर कार्यालयावर सोपविण्यात आली आहे. राज्य वस्तू व सेवाकर कार्यालय नांदेड यांच्यावतीने वस्तू व सेवाकर कायदाबाबत विविध कार्यक्रमांद्वारे जिल्ह्यात जनजागृती व शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
            राज्य वस्तू व सेवाकर कार्यालयाच्यावतीने वस्तू व सेवाकर कायदांतर्गत नोंदणीसाठी दोन राज्यकर अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. संबंधीत अधिकारी यांना नांदेड विभागातील नवीन नोंदणी अर्ज मंजूर करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. नोंदणी प्रक्रिया पूर्ण करुन जीएसटी नोंदणी क्रमांक देण्यात येत आहेत. नोंदणी अर्ज www.gst.gov.in या संकेतस्थळावर दाखल करण्यासाठी सर्व आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यामध्ये वस्तू व सेवाकर कायदानुसार नोंदणी घेण्याची वार्षिक उलाढाल मर्यादा 20 लाख इतकी निर्धारीत करण्यात आली आहे. नवीन नोंदणी अर्ज केंद्रीय कर विभाग व राज्यकर विभाग यामध्ये विभागून येत आहेत. जीएसटीत पात्र अनोंदणी व्यापाऱ्यांनी त्वरीत नोंदणी अर्ज करावेत. व्यापाऱ्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी तालुकानिहाय 16 अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जीएसटी कायदाच्या अंमलबजावणीचा व्यापारावर होणाऱ्या परिणामाचा व विविध वस्तुंच्या विक्री दरात होणाऱ्या बदलांचे सर्वेक्षण करीत आहेत. व्यापाऱ्यांनी व ग्राहकांनी राज्यकर अधिकाऱ्यांना सहकार्य करावे, असेही आवाहन नांदेड विभागाचे राज्यकर सहआयुक्त मा. म. कोकणे यांनी केले आहे.

0000000
अकरावी व्यवसायिक प्रशिक्षण
अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरु
नांदेड दि. 12 :- येथील शासकीय तंत्र प्रशाला केंद्र संचलित इयत्ता 11 वी व्यवसायिक प्रशिक्षण अभ्यासक्रमांना (एचएससी व्होकेशनल) प्रवेश सुरु असल्याचे मुख्याध्यापक शासकीय तंत्र प्रशाला केंद्र नांदेड यांनी कळविले आहे.
या प्रशाला केंद्रात चालवण्यात येणाऱ्या  व्यवसाय अभ्यासक्रमात ॲटोमोबाईल टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रीकल टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी यांचा समावेश असून प्रत्येकी 25 प्रवेश क्षमता असणाऱ्या या अभ्यासक्रमांना दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल.
ॲटोमोबाईल टेक्नॉलॉजीसाठी शासकीय व निमशासकीय क्षेत्रात विविध संधी उपलब्ध असून स्वयंचलीत दुचाकी, चारचाकी वाहनाचे दुरुस्ती केंद्र सुरु करता येते. ऑटो फिटर, असेंब्ली शॉपमध्ये, निरीक्षक, कारखान्यात विविध पदावर कामे करता येतात. ऑटो डिलर, ऑटो स्पेअर पार्ट, सेल्समन, व्हेईकल, सर्वेअर, ड्रायव्हर, शिल्प निदेशक इत्यादी. टायर पंक्चर दुरुस्ती, पार्ट दुरुस्ती, सर्व्हिसींग सेंटर, वेल्डींग, लेथ मशीन ऑपरेटर इत्यादी व्यवसाय करता येतात. एसटीमध्ये अप्रेंटिशीप लागू.
इलेक्ट्रीकल टेक्नॉलॉजी – शासकीय व निमशासकीय क्षेत्रात विविध संधी उपलब्ध. घरगुती उपकरणाची दुरुस्तीची कामे करता येतात. मोटार रिवायंडिंगजी कामे करता येतात. सेल्समन, विद्युत उपकरणाची डिलरशीप, एजन्सी इत्यादी  ठेकेदारी प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था सुशिक्षीत बेरोजगार म्हणून 2 लाख 50 हजार रुपयांपर्यंत विना निविदा कामे देण्याची व्यवस्था, स्वयंरोजगार कार्यालयात व्होकेशनल टेक्निशीयन म्हणून नोंदणी.  कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी – शासकीय व निमशासकीय क्षेत्रात विविध संधी उपलब्ध. संगणक हाताळण्याचे सविस्तर प्रशिक्षण.
अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य. मर्यादित जागा असल्यामुळे दहावीचा निकाल लागताच आपला प्रवेश निश्चित करावा. प्रवेशीत विद्यार्थ्यांना पोस्ट योजनेखाली कमवा व शिका या कार्यक्रमात सहभागी होता येते. विद्यार्थ्यांनी ओजेटी या योजनेखाली औद्योगिक आस्थापनाकडे विशेष प्रशिक्षणासाठी दरवर्षी एक महिन्यासाठी पाठविल्या जाते. लोकसेवा केंद्राच्या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना संस्थेच्या मदतीने सहकारी संस्थेची नोंदणी करता येते. ज्यामध्ये काम मिळाल्यावर सुरक्षा अनामत भरण्यापासून सूट मिळते. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना संबंधित व्यवसायाचे टुलकीटस् व पुस्तके मोफत देण्यात येतील. तांत्रिक बेरोजगारांची सोसायटी स्थापन करुन शासनाकडून अनुदान मिळविता येते. सर्व व्यवसायांना शिकाऊ उमेदवारी लागू असून त्याअंतर्गत एक ते दोन वर्षापासून 2 हजार 100 ते 2 हजार 400 प्रती महिना मानधन, ईबीसी सवलत लागू.
तज्ज्ञ शिक्षक वर्ग, परिपूर्ण यंत्रसामुग्री, कार्यशाळा, ग्रंथालय सुविधा, प्रशिक्षणाच्या कामात संगणकाचा वापर करण्यात येतो. व्यवसाय मार्गदर्शन केंद्रामार्फत रोजगार किंवा स्वयंरोजगार मिळविण्यासाठी उपयुक्त सल्ला दिला जातो. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर बीए, बीकॉम, बीसीए प्रथम वर्ष तसेच पॉलिटेक्निकच्या द्वितीय वर्षास प्रवेशासाठी पात्र. इयत्ता बारावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी. अधिक माहितीसाठी इच्छूकांनी शासकीय तंत्र प्रशाला केंद्र आनंदनगर रोड बाबानगर नांदेड (दूरध्वनी 02462-259139) येथे संपर्क साधावा. 

0000000

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...