Wednesday, July 12, 2017

जीएसटीबाबत मदत केंद्राची स्थापना;
सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन  
नांदेड, दि. 12 :- वस्तू व सेवाकर (जीएसटी) कायदाबाबत येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी येथील राज्य वस्तू व सेवाकर कार्यालयातील मदत केंद्राद्वारे शंकाचे निरसन करुन मार्गदर्शन करण्यात येत आहे. संबंधितांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नांदेड विभागाचे राज्यकर सहआयुक्त मा. म. कोकणे यांनी केले आहे.
वस्तू व सेवाकर कायदाबाबत (जीएसटी) माहिती देण्यासाठी वस्तू व सेवाकर कार्यालयात मदत केंद्र उपलब्ध करण्यात आले आहे. या केंद्रात राज्यकर अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मदत केंद्राची माहिती राज्यकर विभागाच्या संकेतस्थळावर व 02462-231977 या दुरध्वनी क्रमांकासह उपलब्ध करण्यात आली आहे. या केंद्रात व्यापाऱ्यांना वस्तू व सेवाकर कायदाबाबत येणाऱ्या अडचणीचे निराकरण केले जात आहे. व्यापाऱ्यांना वस्तू व सेवाकर कायदात एनरोलमेंट व नोंदणी अर्ज नि:शुल्क भरुन देण्यात येत आहे. 
            भारत सरकारने 1 जुलै 2017 पासून वस्तू व सेवाकर कायदयाची अंमलबजावणी सुरु केली आहे. त्यानुसार राज्यातील कर गोळा करण्याची जबाबदारी राज्य वस्तू व सेवाकर कार्यालयावर सोपविण्यात आली आहे. राज्य वस्तू व सेवाकर कार्यालय नांदेड यांच्यावतीने वस्तू व सेवाकर कायदाबाबत विविध कार्यक्रमांद्वारे जिल्ह्यात जनजागृती व शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
            राज्य वस्तू व सेवाकर कार्यालयाच्यावतीने वस्तू व सेवाकर कायदांतर्गत नोंदणीसाठी दोन राज्यकर अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. संबंधीत अधिकारी यांना नांदेड विभागातील नवीन नोंदणी अर्ज मंजूर करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. नोंदणी प्रक्रिया पूर्ण करुन जीएसटी नोंदणी क्रमांक देण्यात येत आहेत. नोंदणी अर्ज www.gst.gov.in या संकेतस्थळावर दाखल करण्यासाठी सर्व आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यामध्ये वस्तू व सेवाकर कायदानुसार नोंदणी घेण्याची वार्षिक उलाढाल मर्यादा 20 लाख इतकी निर्धारीत करण्यात आली आहे. नवीन नोंदणी अर्ज केंद्रीय कर विभाग व राज्यकर विभाग यामध्ये विभागून येत आहेत. जीएसटीत पात्र अनोंदणी व्यापाऱ्यांनी त्वरीत नोंदणी अर्ज करावेत. व्यापाऱ्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी तालुकानिहाय 16 अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जीएसटी कायदाच्या अंमलबजावणीचा व्यापारावर होणाऱ्या परिणामाचा व विविध वस्तुंच्या विक्री दरात होणाऱ्या बदलांचे सर्वेक्षण करीत आहेत. व्यापाऱ्यांनी व ग्राहकांनी राज्यकर अधिकाऱ्यांना सहकार्य करावे, असेही आवाहन नांदेड विभागाचे राज्यकर सहआयुक्त मा. म. कोकणे यांनी केले आहे.

0000000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...