Wednesday, March 15, 2017

ग्राहक दिनानिमीत्त वैध मापनच्यावतीने  
गुजराती हायस्कुलमध्ये प्रदर्शन संपन्न
नांदेड दि. 15 :- दरवर्षी 15 मार्च हा दिवस “जागतिक ग्राहक दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. त्याअनुषंगाने यावर्षी साजरा करावयाच्या जागतिक ग्राहक हक्क दिन 2017 साठी "डिजीटल युगात ग्राहकांचे हक्क" या संकल्पनेवर आधारीत सहायक नियंत्रक, वैध मापन शास्त्र नांदेड जिल्हातर्फे गुजराती हायस्कूल, वजिराबाद, नांदेड येथे प्रदर्शन आयोजित करण्यात आले.
            या प्रदर्शनात मुलांनी ग्राहकांचे हक्क याबाबत माहिती करुन घेतली. ग्राहकांचे हक्क तसेच वजन व मापासंबंधात खरेदी करतांना तसेच आवेष्टीत वस्तू खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी याबाबत वैध मापन शास्त्र सहायक नियंत्रक एस. एन. कवरे, निरीक्षक के. एन. रिठे, एम. आर. कांबळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.  यावेळी शाळेचे पर्यवेक्षक एस. के.नाईक, आदी शिक्षक तसेच सहायक नियंत्रक वैध मापन शास्त्र कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

000000
व्यसन मुक्त क्षेत्रात कार्यरत संस्थांकडून
केंद्रीय अर्थसहाय्यासाठी प्रस्ताव मागवले
नांदेड दि. 15 :- नांदेड जिल्ह्यातील व्यसन मुक्त क्षेत्रात काम करीत असलेल्या स्वयंसेवी संस्थांकडून केंद्रीय अर्थसहाय्यासाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहे , अशी माहिती नांदेड जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.
अर्थसहाय्यासाठी प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने पाठवावी लागेल. त्यासाठी व्यवसन मुक्ती क्षेत्रात काम करीत असलेल्या संबंधीत स्वयंसेवी संस्थांनी संस्थेची सर्व माहिती पॉवर पॉईंट प्रेझेन्टेंशन स्वरुपात तयार करुन जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालयातील समाज कल्याण निरीक्षक कैलास मोरे यांच्याकडे शुक्रवार 18 मार्च 2017 पर्यंत सादर करावेत , असे आवाहन करण्यात आले आहे.

000000
कॅशलेस व्यवहार प्रचार-प्रसारासाठी
जिल्हास्तरीय घोषवाक्‍य स्‍पर्धा
नांदेड दि. 15 :-  रोकडरहीत (कॅशलेस) व्यवहारास अर्थात डिजीटल अर्थप्रणालीला चालना देण्‍यासाठी  भारत सरकार आणि महाराष्‍ट्र शासन यांच्यावतीने शुक्रवार 24 मार्च 2017 रोजी जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड येथे डिजीधन मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले आहे. या मेळाव्‍याचे औचित्‍य साधुन कॅशलेस व्‍यवहारांच्‍या प्रचार आणि प्रसारासाठी शासनातर्फे घोषवाक्‍य स्‍पर्धा आयोजीत करण्‍यात आली आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
स्‍पर्धेतील विजेत्‍यांना शुक्रवार 24 मार्च 2017 रोजी डिजीधन मेळाव्‍यात पारितोषिक सन्‍मानित करण्‍यात येणार आहे. यास्‍पर्धेत सहभागी होण्‍यासाठी nanded.gov.in या नांदेड जिल्‍हयाच्‍या अधिकृत संकेस्‍थळावरील घोषवाक्‍य स्‍पर्धा किंवा जिल्‍हयाच्‍या अधिकृत मोबाईल अॅप "आपलं नांदेड"चा वापर करावा लागेल.
या स्पर्धेसाठी अटी पुढील प्रमाणे- घोषवाक्‍य स्‍पर्धेत सहभागी होण्‍यासाठी केवळ ऑनलाईन प्रणालीचाच वापर करावा. छापील किवा हस्‍तलिखीत किंवा अन्‍य कोणत्‍याही माध्‍यमातून प्रवेशिका स्‍विकारल्‍या जाणार नाहीत. स्‍पर्धेसाठी जास्‍तीत जास्‍त दोन घोषवाक्‍य पाठविण्‍यात याव्‍यात. एका स्‍पर्धकाला एकच प्रवेशिका भरता येईल. स्‍पर्धक नांदेड जिल्‍हयाचा रहिवाशी असावा. स्‍पर्धेचा कालावधी गुरुवार 16 मार्च ते सोमवार 20 मार्च 2017 असून त्‍यानंतर ऑनलाईन सुविधा बंद करण्‍यात येईल. स्‍पर्धेचा निकाल डिजीधन मेळाव्‍यात जाहीर करण्‍यात येईल. स्‍पर्धेत पात्र झालेल्‍या स्‍पर्धकांना बुधवार 22 मार्च 2017 रोजी स्‍वत:चे ओळखपत्र  पडताळणीसाठी घेऊन समक्ष उपस्थित रहावे लागेल. ओळखपत्र पडताळणीस अनुपस्थित राहिलेल्या स्पर्धकाचा स्पर्धेसाठी विचार केला जाणार नाही. ओळखपत्र म्हणून आधार कार्ड किंवा निवडणूक ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येईल. या स्पर्धेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी , असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.  

0000000
अवकाळी पावसाबाबत सतर्कतेचा इशारा
नांदेड दि. 15 :- मराठवाड्यासह विदर्भात येत्या 48 तासात  काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यापार्श्वभुमीवर सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती नियंत्रण कक्षाच्यावतीने करण्यात आले आहे.  
भारतीय हवामान खात्याच्या या इशारात येत्या 48 तासात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविल्याच्या पार्श्वभुमीवर आपत्ती व्यवस्थापन कक्षाने विविध यंत्रणांना सतर्क राहण्याचे सूचना दिल्या आहेत. नागरिकांनीही विशेषत: शेतकऱ्यांनी काढणीस आलेल्या शेतमालाबाबत दक्षता घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले.
याशिवाय अत्यावश्यक बाबींसाठी तातडीच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाशी तसेच पुढील दूरध्वनी क्रमांकाशी संपर्क साधावा. हे क्रमांक असे जिल्हाधिकारी कार्यालय  नियंत्रण कक्ष- 02462-235077, नि:शुल्क दूरध्वनी क्रमांक (टोल फ्री)- 1077, महानगरपालिका नियंत्रण कक्ष- 02462 234461, पोलीस नियंत्रण कक्ष- 02462 234720, आरोग्य विभाग- 02462 236699, नि:शुल्क दूरध्वनी क्रमांक (टोल फ्री)- 108. आपत्तकालीन परिस्थितीबाबत माहिती देण्यासाठी या दूरध्वनी क्रमांकाशी संपर्क साधता येईल.

000000

Tuesday, March 14, 2017

जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती ,
उपसभापती पदाची निवड जाहीर    
नांदेड दि. 14 :- जिल्हा परिषद , पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2017 च्या कार्यक्रमांतर्गत आज नांदेड जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाच्या निवडीसाठी विशेष सभा झाल्या. जिल्ह्यातील 16 तालुक्यात त्या-त्या पंचायत समित्यांमध्ये पिठासीन अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाची निवड करुन पंचायत समित्यांचे गठन करण्यात आले.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक विभागाने दिलेल्या माहिती नुसार पंचायत समिती गठनाबाबत त्या-त्या तालुक्यात सर्वसंबंधित पिठासन अधिकारी यांचेकडून पंचायत समितीच्‍या नवनिर्वाचित सदस्‍यांना अधिसूचना निर्गमित करण्यात आल्या होत्या. त्यानुसार सकाळी 10 ते दुपारी 12 यावेळेत नामनिर्देशनपत्रे दाखल करुन घेण्यात आली. त्यानंतर दुपारी 2 वा. पदाधिकारी निवडीसाठी विशेष सभा संपन्न झाल्या. यातून सभापती , उपसभापती पदाच्या निवडी जाहीर करण्यात आल्या.  
निवडण्यात आलेले पंचायत समिती सभापती पुढील प्रमाणे (कंसात पक्ष). माहूर- नामनिर्देशनपत्र अवैध ठरल्याने निवड नाही. किनवट- श्रीमती कलावती नारायण राठोड (भारतीय जनता पक्ष). हिमायतनगर- सौ. माया दिलीप राठोड (भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस). हदगाव- श्रीमती सुनिता कोंडबा दवणे (भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस). अर्धापूर-  श्रीमती मंगल शिवलिंग स्‍वामी (भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस ). नांदेड- सुखदेव बापुराव जाधव (भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस ). मुदखेड- श्रीमती शिवकांता शत्रुघ्न गंड्रस (भारतीय राष्‍ट्रीय कॉग्रेस). भोकर- श्रीमती झिमाबाई गुलाब चव्‍हाण (भारतीय राष्‍ट्रीय कॉग्रेस). उमरी- शिरिष श्रीनिवासराव देशमुख (राष्‍ट्रवादी काँग्रेस पार्टी). धर्माबाद- रत्नमाला जयराम कदम (भारतीय जनता पक्ष). बिलोली- श्रीमती भाग्‍यश्री गंगाधर अनपलवार (भारतीय जनता पक्ष). नायगाव- वंदना मनोहर पवार (भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस). लोहा- सतिष संभाजी पाटील उमरेकर (शिवसेना). कंधार- सौ. सत्‍यभामा पंडीत देवकांबळे (राष्‍ट्रीय समाज पक्ष). मुखेड- अशोक अमृतराव पाटील (भारतीय जनता पक्ष). देगलूर- शिवाजीराव दत्‍ताजीराव देशमुख बळेगावकर (भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस).     
निवडण्यात आलेले पंचायत समिती उपसभापती पुढील प्रमाणे (कंसात पक्ष). माहूर- सौ. नीलाबाई तुळशीराम राठोड (भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस). किनवट- गजानन विठठल कोल्‍हे  (शिवसेना). हिमायतनगर- खोबाजी जयवंतराव वाळके (भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस). हदगाव- कदम शेषराव मुकिंदराव (शिवसेना). अर्धापूर- इंगोले लक्ष्‍मण नानाराव (अपक्ष). नांदेड- शेख हसीना बेगम भ्र. शेख फहिम (भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस). मुदखेड- आनंदा रामजी गादिलवाड (भारतीय राष्‍ट्रीय  काँग्रेस ). भोकर-  सुर्यकांत गंगाधर बिल्‍लेवाड (अपक्ष ). उमरी- सौ. पल्‍लवी विनायक मुंगल (राष्‍ट्रवादी काँग्रेस पार्टी). धर्माबाद- चंद्रकांत लालू वाघमारे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी). बिलोली–दत्‍तराम ईश्‍वरा बोधने (भारतीय जनता पक्ष). नायगाव- श्रीमती सुलोचना प्रल्‍हादराव हंबर्डे (राष्‍ट्रवादी काँग्रेस पार्टी). लोहा- सौ. इंदुबाई बालाजी कदम (शिवसेना). कंधार- भिमराव तोलबा जायभाये (अपक्ष). मुखेड- श्रीमती पंचफुलाबाई लक्ष्‍मण बा-हाळे (भारतीय जनता पक्ष). देगलूर- संजय ग्‍यानोबा वल्कले (भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस ).
जिल्‍हा परिषद नांदेडच्‍या अध्‍यक्ष व उपाध्‍यक्ष पदाची निवड करुन जिल्‍हा परिषदेचे गठन करण्‍याकरीता जिल्‍हा परिषदेची पहिली विशेष सभा मंगळवार 21 मार्च 2017 रोजी कै. यशवंतराव चव्‍हाण सभागृह, जिल्‍हा परिषद नांदेड येथे होणार आहे.

0000000
अनुसूचित जाती बचतगट मिनी ट्रॅक्टर
योजनेत अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड दि. 14 :- अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचतगटाना 90 टक्के अनुदानावर 9 ते 18 आश्वशक्ती मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांच्या खरेदीच्या रुपये 3 लाख 50 हजाराच्या मर्यादेत पुरवठा करण्याची योजना कार्यान्वित झाली आहे. योजनेच्या लाभासाठी विहित नमुन्यातील अर्ज करण्यासाठी मंगळवार 21 मार्च 2017 पर्यंत प्रस्ताव सादर करावे,  असे आवाहन नांदेड समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त बी. एन. वीर यांनी केले आहे.
योजनेसाठी अर्ज करणाऱ्या स्वयंसहाय्यता बचतगटातील सदस्य महाराष्ट्राचे रहिवाशी असावे. एकूण सदस्यांपैकी 80 टक्के सदस्य अनुसूचित जातीचे असणे आवश्यक आहे. तसेच अध्यक्ष व सचिव हे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावेत. आदी अटी पूर्ण करणाऱ्या स्वयंसहाय्यता बचतगटाना मिनी ट्रॅक्टर व इतर साहित्यासाठी शासनाकडून 3 लाख 15 हजार पर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नमस्कार चौक, ग्यानमाता शाळेसमोर नांदेड येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असेही आवाहन केले आहे.

0000000

Saturday, March 11, 2017

सामाजिक न्यायाच्या क्षेत्रातील व्यक्ती , संस्थांच्या
पाठिशी शासनाचे नेहमीच पाठबळ - बडोले
संत रविदास, कर्मवीर दादासाहेब गायकवाड, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुरस्कारांचे
नांदेडमध्ये दिमाखदार सोहळ्यात वितरण              
            नांदेड दि. 11 :- शासनाच्या योजनांची यशस्विता, त्यामधील लोकसहभागावर आधारित असते. त्यामुळे सामाजिक न्यायाच्या योजना तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या या क्षेत्रातील व्यक्ती , संस्थांच्या पाठिशी शासनाचे नेहमीच पाठबळ राहील , अशी ग्वाही राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी आज येथे केले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या संत रविदास, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कारांच्या वितरण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी सामाजिक न्याय्य आणि विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, भुकंप पुनर्वसन, अल्पसंख्याक विकास व वक्फ राज्यमंत्री दिलीप कांबळे होते. येथील डॅा. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात हा राज्यस्तरीय सोहळा दिमाखात आणि नीटनेटक्या संयोजनात संपन्न झाला.
सोहळ्यास नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मंगलताई गुंडले, नांदेडच्या महापौर शैलजा स्वामी, आमदार सर्वश्री अमरनाथ राजूरकर, डी. पी. सावंत, प्रताप पाटील चिखलीकर, सुभाष साबणे, हेमंत पाटील, नागेश पाटील आष्टीकर, डॅा. तुषार राठोड, मनपा आयुक्त समीर उन्हाळे, प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील, समाज कल्याण आयुक्तालयाचे अपर आयुक्त डॅा. सदानंद पाटील, उपायुक्त बी. टी. मुळे, लातुरचे प्रादेशिक उपायुक्त एल. आय. वाघमारे, सहायक आयुक्त बी. एन. वीर यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राम पाटील-रातोळीकर, प्रवीण साले, देविदास राठोड आदींची उपस्थिती होती.
संत रविदास, कर्मवीर दादासाहेब गायकवाड, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे दलित-आदिवासींना समाजात मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी चंदनाप्रमाणे देह झिजल्याचे नमूद करून सामाजिक न्याय मंत्री श्री. बडोले म्हणाले की , सत्ता आणि संपत्तीचा मोह न बाळगता समाजाचे काम करण्याची वृत्ती या थोरांकडे होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला चातुवर्ण्याच्या अंधारातून प्रकाश दाखविण्याचे काम केले. महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू छत्रपती यांनी सामाजिक समतेसाठी कर्मयोग साधला. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आज समाज सेवकांची फळी उभी राहते आहे , ही समाधानाची गोष्ट आहे. शासनाच्या योजनांची तळागाळापर्यंत पोहचून अंमलबजावणी करावी लागते. या योजनांची यशस्विता लोकसहभागावरच आधारीत असते. या दोन्हीमध्ये या व्यक्ती , संस्थांची भुमिका महत्त्वपुर्ण असते. या पुरस्कारांचा उद्देशच अशा गुणीजनांना प्रोत्साहन देण्याचा आहे. अशांच्या मागे शासनाचे नेहमीच पाठबळ राहील. यातून महान व्यक्तींचे कार्यही समाजातील दिन, दुबळे आणि दलित, शोषित वर्गांपर्यंत पोहचणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील शासनाने जातिअंताच्या दूरदृष्टीतून कन्यादान, आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनांच्या अनुदानात भरीव वाढ केल्याचे तसेच शिक्षणासाठी स्वाधार योजना कार्यान्वीत केल्याचेही मंत्री बडोले यांनी नमूद केले. ते म्हणाले की, समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा शासनाचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. यामुळे विदेशी शिक्षणासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना पाठविता येऊ लागले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या तयारीसाठीही सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यामुळे भारतीय प्रशासकीय सेवेसाठी विद्यार्थी निवडले जाऊ लागले आहेत. ही अभिमानाची बाब आहे. यावेळी त्यांनी पुरस्कार प्राप्त व्यक्ती, संस्थांनी दलित, शोषित बहुजनांसाठीचे काम अव्याहतपणे चालू ठेवावे अशी अपेक्षाही व्यक्त केली.
राज्यमंत्री श्री. कांबळे म्हणाले की, पुरस्कार प्राप्त व्यक्ती, संस्थांनी पददलित, शोषित समाजासाठी पुढाकाराने काम करावे यासाठी हे पुरस्कार आहेत. समाजात सामाजिक समता प्रस्थापित झाली पाहिजे. शोषित, दलित समाजाचा सामाजिक-आर्थिक उत्कर्ष झाला पाहिजे यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. त्यासाठी शिष्यवृती, वसतिगृह या सुविधांसह, मागासांसाठीच्या महामंडळांचे काम प्रभावी आणि चोख रहावे यासाठी जाणीवपुर्वक प्रयत्न केले जात आहेत. यावेळी त्यांनी संत रविदास, कर्मवीर दादासाहेब गायकवाड तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यांचाही गौरवाने उल्लेख केला.
सोहळ्यात सुरवातीला छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू छत्रपती, भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर, तसेच संत रविदास, कर्मवीर दादासाहेब गायकवाड, साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन झाले, तसेच दिपप्रज्वलन करण्यात आले. रागिणी जोशी यांनी स्वागत गीत सादर केले. अपर आयुक्त डॅा. पाटील यांनी प्रास्ताविकात पुरस्कारांबाबतची माहिती दिली.
पुरस्कार प्राप्त व्यक्ती व संस्थांची नावे पुढील प्रमाणे- संत रविदास पुरस्कार - डॉ. वसंतराव मारोतराव धाडवे, वाशिम. संस्था - चर्मकार सेवा संघ, नागपूर. कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड पुरस्कार- चंद्रकांत गुंडप्पा गडेकर, बाळे जि. सोलापूर. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार- अजाबराव बन्साजी अंभोरे, मुंबई. व्यंकट विश्वनाथ शिंदे, ठाणे.  बबनराव शंकराव कांबळे, चंचळी जि. सातारा. अशोक रामचंद्र साठे, नाशिक. सौ. सुमन वसंत खरात, नाशिक. साठे नारायण मनोहर, राहुरी जि. अहमदनगर. डॉ. भीवसनराव राघुजी दाभाडे, बुलढाणा. रामदास गेंदुजी तायडे, मलकापूर जि. अकोला. सौ. उषा वासुदेवराव अडागळे, नागपूर. शंकरराव लक्ष्मणरावजी ठोसर, नागपूर. डोमाजी मंगलुजी कावळे, नागपूर. जीवन रामचंद्र गायकवाड, नागपूर. नवनाथ दशरथ उपळेकर, उपळा (मा) जि. उस्मानबाद. गादेकर माधव पोतलींग, लातूर. ज्ञानोबा शंकरराव कांबळे, लातूर. गणेश नागोराव वाघमारे, नांदेड. सौ. मंगल शंकर कुंडले, खोपोली जि. रायगड. सौ. अस्मिता दिपक चांदणे, खेड जि. पुणे. सिताराम मारुती तथा दादासाहेब सोनवणे, हडपसर, जि. पुणे. किशन यादवराव साठे, औरंगाबाद. पांडुरंग दत्तात्रय वाघमारे, नागलगाव जि. नांदेड. आनंद व्यंकट शिंदे, पनवेल जि. रायगड. सौ. निताताई गौतम देवकुळे, माढा जि. सोलापूर. कु. आम्रपाली उर्फ सुनिता रामचंद्र इंगळे, गोविंदपूर जि. गोंदिया. भास्कर पुंडलिक कावडे, वसुर जि. नांदेड. संस्था- जन-आधार सेवाभावी संस्था, लातूर. कै. सोपानराव तादंलापूरकर क्रिडा मंडळ व्यायामशाळा, नायगाव, जि. नांदेड. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाज प्रबोधिनी, मिरज, जि. सांगली. बाबासाहेब गोपले बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, नाशिक. श्रमसाफल्य बहुउद्देशिय सेवाभावी संस्था, जालना. स्व. तुळशीरामजी बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्था, वाशिम. यातील उपस्थितांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, मानपत्र, पुष्पहार तसेच धनादेश स्वरुपातील पुरस्कारांचे वितरण झाले.
सहाय्यक आयुक्त वीर, समाजकल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक बापू दासरी आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले. श्रीमती रेणुका देशकर यांनी सुत्रसंचलन केले. प्रादेशिक उपायुक्त श्री. वाघमारे यांनी आभार मानले. तत्पुर्वी सोहळ्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी, शासनाच्या सामाजिक न्याय विभागाविषयीचा वसा सामाजिक न्यायाचा तसेच पुरस्काराविषयीची चित्रफितही सादर करण्यात आली. सोहळ्यास राज्यातील विविध भागातील पुरस्कार प्राप्त व्यक्ती, संस्था, प्रतिनिधी, नागरिक, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

0000000

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...