Saturday, March 11, 2017

सामाजिक न्यायाच्या क्षेत्रातील व्यक्ती , संस्थांच्या
पाठिशी शासनाचे नेहमीच पाठबळ - बडोले
संत रविदास, कर्मवीर दादासाहेब गायकवाड, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुरस्कारांचे
नांदेडमध्ये दिमाखदार सोहळ्यात वितरण              
            नांदेड दि. 11 :- शासनाच्या योजनांची यशस्विता, त्यामधील लोकसहभागावर आधारित असते. त्यामुळे सामाजिक न्यायाच्या योजना तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या या क्षेत्रातील व्यक्ती , संस्थांच्या पाठिशी शासनाचे नेहमीच पाठबळ राहील , अशी ग्वाही राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी आज येथे केले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या संत रविदास, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कारांच्या वितरण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी सामाजिक न्याय्य आणि विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, भुकंप पुनर्वसन, अल्पसंख्याक विकास व वक्फ राज्यमंत्री दिलीप कांबळे होते. येथील डॅा. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात हा राज्यस्तरीय सोहळा दिमाखात आणि नीटनेटक्या संयोजनात संपन्न झाला.
सोहळ्यास नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मंगलताई गुंडले, नांदेडच्या महापौर शैलजा स्वामी, आमदार सर्वश्री अमरनाथ राजूरकर, डी. पी. सावंत, प्रताप पाटील चिखलीकर, सुभाष साबणे, हेमंत पाटील, नागेश पाटील आष्टीकर, डॅा. तुषार राठोड, मनपा आयुक्त समीर उन्हाळे, प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील, समाज कल्याण आयुक्तालयाचे अपर आयुक्त डॅा. सदानंद पाटील, उपायुक्त बी. टी. मुळे, लातुरचे प्रादेशिक उपायुक्त एल. आय. वाघमारे, सहायक आयुक्त बी. एन. वीर यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राम पाटील-रातोळीकर, प्रवीण साले, देविदास राठोड आदींची उपस्थिती होती.
संत रविदास, कर्मवीर दादासाहेब गायकवाड, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे दलित-आदिवासींना समाजात मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी चंदनाप्रमाणे देह झिजल्याचे नमूद करून सामाजिक न्याय मंत्री श्री. बडोले म्हणाले की , सत्ता आणि संपत्तीचा मोह न बाळगता समाजाचे काम करण्याची वृत्ती या थोरांकडे होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला चातुवर्ण्याच्या अंधारातून प्रकाश दाखविण्याचे काम केले. महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू छत्रपती यांनी सामाजिक समतेसाठी कर्मयोग साधला. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आज समाज सेवकांची फळी उभी राहते आहे , ही समाधानाची गोष्ट आहे. शासनाच्या योजनांची तळागाळापर्यंत पोहचून अंमलबजावणी करावी लागते. या योजनांची यशस्विता लोकसहभागावरच आधारीत असते. या दोन्हीमध्ये या व्यक्ती , संस्थांची भुमिका महत्त्वपुर्ण असते. या पुरस्कारांचा उद्देशच अशा गुणीजनांना प्रोत्साहन देण्याचा आहे. अशांच्या मागे शासनाचे नेहमीच पाठबळ राहील. यातून महान व्यक्तींचे कार्यही समाजातील दिन, दुबळे आणि दलित, शोषित वर्गांपर्यंत पोहचणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील शासनाने जातिअंताच्या दूरदृष्टीतून कन्यादान, आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनांच्या अनुदानात भरीव वाढ केल्याचे तसेच शिक्षणासाठी स्वाधार योजना कार्यान्वीत केल्याचेही मंत्री बडोले यांनी नमूद केले. ते म्हणाले की, समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा शासनाचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. यामुळे विदेशी शिक्षणासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना पाठविता येऊ लागले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या तयारीसाठीही सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यामुळे भारतीय प्रशासकीय सेवेसाठी विद्यार्थी निवडले जाऊ लागले आहेत. ही अभिमानाची बाब आहे. यावेळी त्यांनी पुरस्कार प्राप्त व्यक्ती, संस्थांनी दलित, शोषित बहुजनांसाठीचे काम अव्याहतपणे चालू ठेवावे अशी अपेक्षाही व्यक्त केली.
राज्यमंत्री श्री. कांबळे म्हणाले की, पुरस्कार प्राप्त व्यक्ती, संस्थांनी पददलित, शोषित समाजासाठी पुढाकाराने काम करावे यासाठी हे पुरस्कार आहेत. समाजात सामाजिक समता प्रस्थापित झाली पाहिजे. शोषित, दलित समाजाचा सामाजिक-आर्थिक उत्कर्ष झाला पाहिजे यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. त्यासाठी शिष्यवृती, वसतिगृह या सुविधांसह, मागासांसाठीच्या महामंडळांचे काम प्रभावी आणि चोख रहावे यासाठी जाणीवपुर्वक प्रयत्न केले जात आहेत. यावेळी त्यांनी संत रविदास, कर्मवीर दादासाहेब गायकवाड तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यांचाही गौरवाने उल्लेख केला.
सोहळ्यात सुरवातीला छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू छत्रपती, भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर, तसेच संत रविदास, कर्मवीर दादासाहेब गायकवाड, साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन झाले, तसेच दिपप्रज्वलन करण्यात आले. रागिणी जोशी यांनी स्वागत गीत सादर केले. अपर आयुक्त डॅा. पाटील यांनी प्रास्ताविकात पुरस्कारांबाबतची माहिती दिली.
पुरस्कार प्राप्त व्यक्ती व संस्थांची नावे पुढील प्रमाणे- संत रविदास पुरस्कार - डॉ. वसंतराव मारोतराव धाडवे, वाशिम. संस्था - चर्मकार सेवा संघ, नागपूर. कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड पुरस्कार- चंद्रकांत गुंडप्पा गडेकर, बाळे जि. सोलापूर. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार- अजाबराव बन्साजी अंभोरे, मुंबई. व्यंकट विश्वनाथ शिंदे, ठाणे.  बबनराव शंकराव कांबळे, चंचळी जि. सातारा. अशोक रामचंद्र साठे, नाशिक. सौ. सुमन वसंत खरात, नाशिक. साठे नारायण मनोहर, राहुरी जि. अहमदनगर. डॉ. भीवसनराव राघुजी दाभाडे, बुलढाणा. रामदास गेंदुजी तायडे, मलकापूर जि. अकोला. सौ. उषा वासुदेवराव अडागळे, नागपूर. शंकरराव लक्ष्मणरावजी ठोसर, नागपूर. डोमाजी मंगलुजी कावळे, नागपूर. जीवन रामचंद्र गायकवाड, नागपूर. नवनाथ दशरथ उपळेकर, उपळा (मा) जि. उस्मानबाद. गादेकर माधव पोतलींग, लातूर. ज्ञानोबा शंकरराव कांबळे, लातूर. गणेश नागोराव वाघमारे, नांदेड. सौ. मंगल शंकर कुंडले, खोपोली जि. रायगड. सौ. अस्मिता दिपक चांदणे, खेड जि. पुणे. सिताराम मारुती तथा दादासाहेब सोनवणे, हडपसर, जि. पुणे. किशन यादवराव साठे, औरंगाबाद. पांडुरंग दत्तात्रय वाघमारे, नागलगाव जि. नांदेड. आनंद व्यंकट शिंदे, पनवेल जि. रायगड. सौ. निताताई गौतम देवकुळे, माढा जि. सोलापूर. कु. आम्रपाली उर्फ सुनिता रामचंद्र इंगळे, गोविंदपूर जि. गोंदिया. भास्कर पुंडलिक कावडे, वसुर जि. नांदेड. संस्था- जन-आधार सेवाभावी संस्था, लातूर. कै. सोपानराव तादंलापूरकर क्रिडा मंडळ व्यायामशाळा, नायगाव, जि. नांदेड. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाज प्रबोधिनी, मिरज, जि. सांगली. बाबासाहेब गोपले बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, नाशिक. श्रमसाफल्य बहुउद्देशिय सेवाभावी संस्था, जालना. स्व. तुळशीरामजी बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्था, वाशिम. यातील उपस्थितांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, मानपत्र, पुष्पहार तसेच धनादेश स्वरुपातील पुरस्कारांचे वितरण झाले.
सहाय्यक आयुक्त वीर, समाजकल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक बापू दासरी आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले. श्रीमती रेणुका देशकर यांनी सुत्रसंचलन केले. प्रादेशिक उपायुक्त श्री. वाघमारे यांनी आभार मानले. तत्पुर्वी सोहळ्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी, शासनाच्या सामाजिक न्याय विभागाविषयीचा वसा सामाजिक न्यायाचा तसेच पुरस्काराविषयीची चित्रफितही सादर करण्यात आली. सोहळ्यास राज्यातील विविध भागातील पुरस्कार प्राप्त व्यक्ती, संस्था, प्रतिनिधी, नागरिक, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

0000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 1133 नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत  भाजपचे 5, शिवसेनेचे 3 तर राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी  नां...