Monday, February 6, 2017

अर्थशास्त्रावरील कोळंबे यांच्या
व्याख्यानास उत्स्फुर्त प्रतिसाद 
नांदेड, दि. 6 :- स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय सेतू समिती, नांदेड वाघाळा शहर महानगरपालीका, जिल्हा ग्रंथालय अ‍धिकारी यांच्यावतीने “उज्ज्वल” नांदेड माहिमेअतंर्गत रविवार 5 फेब्रुवारी 2017 रोजी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्रात ज्यांची ख्याती आहे असे पुणे येथील अर्थशास्त्राचे व्याख्याते रजंन कोळंबे यांनी विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले. या व्याख्यानासाठी होतकरु विद्यार्थ्यांची मोठी गर्दी झाली.

व्याख्यानात श्री. कोळंबे यांनी स्पर्धा परीक्षेमधील अर्थशास्त्राचे महत्व या विषयातील महत्वाच्या अभ्यासाच्याबाबी, परीक्षेतील प्रश्नांचे स्वरुप, उत्तराची पध्दत व एकूणच स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी करावी लागणारी अभ्यासाची तयारी याविषयीही मार्गदर्शन केले.
शिबिराचे उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले. ते म्हणाले की,  विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी करताना कोणताही मनात न्यूनगंड न बाळगता सक्षमपणे परीक्षांना सामोरे जावे. प्रशासन विद्यार्थ्यांसाठी सर्व सुविधा पुर‍विण्यासाठी कटीबद्ध आहे.
व्याख्याते रंजन कोळंबे व त्यांच्या पत्नी पूनम कोळंबे यांचे ग्रामगीता देऊन स्वागत करण्यात आले. राज्यातून प्रथम क्रमांकाने सहायक कक्ष अधिकारी या पदासाठी निवड झालेल्या अश्विनी अर्जूनराव पोतलवार यांचा यावेळी मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
व्याख्यानासाठी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी झाली. सभागृह तुंडुब भरल्यानंतर सभागृहा बाहेर एलईडी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली होती. अनेक विद्यार्थी झाडाखाली, जिकडे जागा मिळेल तिकडे मैदानामध्ये उभे राहून, बसून  व्याख्यान ऐकत होते. मनपाच्या सहायक आयुक्त माधवी मारकड, उमरी-धर्माबादच्या मुख्याधिकारी अंधारे, नायगावच्या मुख्याधिकारी टोंगे यांच्यासह इतरही अधिकारी ज्यांना कोळंबे यांचे मार्गदर्शन मिळाले आहे तेही आवर्जून उपस्थित होते.
उपविभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी प्रास्ताविक केले. सुत्रसंचालन व आभार  जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मीना सोलापूरे, आरती कोकूलवार, संजय कर्वे, प्रताप सुर्यंवशी, अजय वटमवार, कोंडिबा गाडेवाड, विठ्ठल यनगुलवार, बाळू पावडे, रघुवीर श्रीरामवार, शहादत्त पुयड, अभीजीत पवार, नितीन कसबे, सतपाल सिंग, लक्ष्मण सेनेवाड, ज्ञानेश्वर सेनेवाड, सोपान यनगुलवार आदींने सहकार्य केले.

000000 
जि.प., पं.स निवडणुकीसाठीचे
निरीक्षक आजपासून जिल्हा दौऱ्यावर
नांदेड, दि. 6 :- जिल्ह्यातील जिल्‍हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2017 साठी राज्‍य निवडणूक आयोगाकडून चार निवडणूक निरीक्षकांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. मुख्‍य निवडणूक निरीक्षक व इतर निवडणूक निरीक्षक हे मंगळवार 7 फेब्रुवारी 2017 रोजी संबंधीत तालुक्‍यातील तहसिल कार्यालयात कार्यालयीन वेळेत उपस्थित राहणार आहेत. नागरीकांनी , उमेदवारांनी याची नोंद घ्‍यावी , असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांनी केले आहे.   
मुख्‍य निवडणूक निरीक्षक म्हणून परभणी जिल्हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी सुशिल खोडवेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. खोडवेकर हे लोहा, कंधार मुखेड, देगलूर तालुक्यांचे काम पाहणार आहेत. औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयाचे उपआयुक्त (करमणूक) संजय काटकर यांची नांदेड, हदगाव, अर्धापूर, नायगाव खै. तालुक्यांचे निवडणूक निरीक्षक राहतील. औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयाच्या उपआयुक्त (पुरवठा) श्रीमती वर्षा ठाकूर यांची मुदखेड, उमरी, धर्माबाद, बिलोली तालुक्यांचे निवडणूक निरीक्षक राहतील. औरंगाबाद महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अपर जिल्हाधिकारी जगदीश मिनियार माहूर, किनवट, हिमायतनगर, भोकर तालुक्यांचे निवडणूक निरीक्षक म्हणून काम पाहतील. 

0000000
 जि.प. , पं.स. निवडणूक मतदानासाठी
खासगी आस्थापनातील मतदारांना सुट्टी
नांदेड, दि. 6 :- जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूक क्षेत्रातील दुकाने, आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्नगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर्स, मॉल्स, रिटेलर्स इत्यादी आस्थापनांमध्ये कार्यरत असलेल्या मतदारांना मतदानाच्या दिवशी गुरुवार 16 फेब्रुवारी 2017 रोजी मतदान करण्यासाठी सुट्टी अथवा दोन तासांची सवलत देण्याबात उद्योग, उर्जा व कामगार विभागाने परिपत्रक काढले आहे. त्याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी नांदेड यांच्यावतीने करण्यात आले आहे.
नांदेड जिल्ह्यात 16 तालुक्यात ज्या गट व गणामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत त्या मतदान क्षेत्रातील विविध आस्थापनातील कामगारांना निवडणूक मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावे, असे आदेशित करण्यात आले आहे. तसेच मतदानाच्या दिवशी निवडणूक क्षेत्रात कामगाराच्या अनुपस्थितीमध्ये धोका अथवा मोठ्या प्रमाणात नुकसान होईल अशा आस्थापनातील उद्योगातील कामगारांना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या निर्यात व्यवसायात असलेल्या कंपन्या, कायम / अखंडीत उत्पादन सुरु असलेल्या कंपन्यातील कामगारांना मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दोन तासांची सवलत देण्यात यावे, असेही परिपत्रकात म्हटले आहे.
00000

Sunday, February 5, 2017

नांदेडचे पहिले जिल्हाधिकारी (1953) व  त्यानंतर सन 1956 मध्ये औरंगाबदचे जिल्हाधिकारी म्हणून रुजू होऊन औरंगाबादच्या विविधांगी विकासाची ज्यांनी मुहूर्तमेढ रोवली, महाराष्ट्र सरकारच्या प्रशासनात विविध पदांवर  काम करून महाराष्ट्राच्या जडण घडणीत मोलाची कामगिरी केलेल्या मा. श्री. भुजंगराव कुलकर्णी यांचा आज 99 वा वाढदिवस, आज त्यांनी 100 व्या वर्षात पाऊल टाकलं , त्यांना वाढदिवसच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यांच्या उज्वल प्रशासकीय कारकिर्दी बद्दल त्यांच्या घरी जाऊन  उजाळा देताना शासन,  मा. मुख्य सचिव व आय ए एस ऑफिसर्स असोसीएशन यांचे वतीने  विभागीय आयुक्त डाँ. पुरुषोत्तम भापकर व औरंगाबाद विभागातील सर्व जिल्हाधिकारी यांनी सत्कार केला व त्यांचेसाठी शुभचिंतन केले.

Saturday, February 4, 2017

पोलीस कॉलनीत आरोग्य शिबीर संपन्न
नांदेड, दि. 4 :-  राष्ट्रीय असंसार्गजन्यरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत  जिल्हा रुग्णालय, नांदेड यांच्यावतीने 4 ते 20 फेब्रुवारी 2017 या कालावधीत कर्करोग दिन व जनजागृती साप्ताह निमित्त आज  पोलीस कॉलनी स्नेहनगर नांदेड येथील पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि नातेवाईक  यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
या शिबिरात 228 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 160 रुग्णांची मधुमेह व उच्च रक्तदाबासाठी तसेच 53 रुग्णांची दंत तपासणी झाली. 52 रुग्णांची भौतिकोपचार व 19 रुग्णांची ई. सी.जी. काढण्यात आली. या शिबीरास पोलीस अधीक्षक संजय येनपुरे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एच. आर. गुंटूरकर, पोलीस उपअधीक्षक व्ही. पी. नांदेडकर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. दीपक हजारी, बालरोग तज्ज्ञ डॉ. मिर्झापुरे डी.एल. हे उपस्थित होते.

000000
राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार- 2016 
प्रवेशिका पाठविण्यासाठी 9 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
नांदेड , दि. 4 :- राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार,सोशल मीडिया आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लिखाणासाठी पुरस्कार स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत प्रवेशिका पाठविण्यासाठी 9 फेब्रुवारी 2017 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2016 ते 31डिसेंबर, 2016 पर्यंतच्या कालावधीत प्रसिध्द झालेल्या लेखनाच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. इच्छुकांनी जिल्हा माहिती कार्यालयाकडून, तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय (तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक,मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32) येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत.अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in किंवा www.maharashtra.gov.in तसेच www.mahanews.gov.in या संकेतस्थळांवरही उपलब्ध आहेत.  
राज्यस्तरीय पुरस्कारांची माहिती पुढीलप्रमाणे – बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी), अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी), बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी),मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार(उर्दू), यशवंतराव चव्हाण पुरस्कार - शासकीय गट (मराठी) (मा. व ज.), पु. ल. देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार, तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार, केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट (मा.व ज.), सोशल मीडिया पुरस्कार, स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (सर्व पुरस्कार प्रत्येकी 51 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
विभागीय पुरस्कारांची माहिती पुढीलप्रमाणे – अनंतराव भालेराव पुरस्कार (औरंगाबाद विभाग) (लातूरसह), आचार्य अत्रे पुरस्कार (मुंबई विभाग), नानासाहेब परूळेकर पुरस्कार (पुणे विभाग), शि. म. परांजपे पुरस्कार (कोकण विभाग), ग. गो. जाधव पुरस्कार (कोल्हापूर विभाग), लोकनायक बापूजी अणे पुरस्कार (अमरावती विभाग), ग. त्र्यं. माडखोलकर पुरस्कार (नागपूर विभाग) (सर्व पुरस्कार प्रत्येकी 51 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) तर दादासाहेब पोतनीस पुरस्कार (नाशिक विभाग) (51 हजार रुपये,मानचिन्ह व प्रशस्तीपत्र तसेच याव्यतिरिक्त रुपये 10 हजार दै. गावकरीने पुरस्कृत केले आहेत.)
या स्पर्धेत राज्यातील पत्रकारांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

000000
हरभरा पिक संरक्षणासाठी कृषि संदेश
नांदेड , दि. 4 :- जिल्ह्यात हरभरा पिकासाठी किड व रोग सर्वेक्षण या प्रकल्पांतर्गत काम सुरु आहे. शेतकऱ्यांनी हरभरा पिकाच्या किडीपासून संरक्षणासाठी पुढीलप्रमाणे संदेश देण्यात आला आहे.
हरभरा पिकावरील घाटेअळीसाठी क्लोरोपायरीफॉस 20 ई.सी. 2 मिली प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारावे. मर रोगासाठी कार्बन्डेन्जीम 2 ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी डॉ. व्ही. व्ही. भरगंडे यांनी केले आहे.

000000

  वृत्त   नांदेड जिल्हा प्रशासनाने पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे-पालकमंत्री अतुल सावे यांचे निर्देश  मुंबई, दि. १३, नांदेड जिल्हा प...