Tuesday, September 13, 2016

“संवाद पर्व” अभियानांतर्गत
विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न
प्रदर्शनास नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद  

नांदेड, दि. 13 :- शासनाच्या विविध योजना व उपक्रमांची जनजागृती व्हावी यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या “संवाद पर्व” या अभियानांतर्गत  शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालयात आयोजित  “मानवी अवयवदान नाव नोंदणी व विज्ञान प्रदर्शनाचे” उद्घाटन महाविद्यालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अवयवदान नाव नोंदणीस उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला असून महाविद्यालयाच्यावतीने आतापर्यंत सुमारे 1 हजार अवयवदान नाव नोंदणी करण्यात आली.
नांदेड  शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालयात जिल्हा माहिती कार्यालय व श्री आयुर्वेदीक गणेश मंडळ नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने “संवाद पर्व”  उपक्रमांतर्गत “मानवी अवयवदान नाव नोंदणी व विज्ञान प्रदर्शनाचे” आयोजित करण्यात आले. यावेळी जेष्ठ पत्रकार  डॉ. रविंद्र रसाळ, जिल्हा माहिती अधिकारी दिलीप गवळी, गणेश मंडळाचे अध्यक्ष अनिकेत नादरे, उपाध्यक्ष विशाल वाघमारे, सचिव दिलीप वरडे, कोषाध्यक्ष किरण गव्हाणे आदी उपस्थित होते. हे  प्रदर्शन दोन दिवस सर्वांसाठी खुले आहे.
अवयवदानाने मृत्युच्या उंबरठ्यावर उभे असलेल्या रुग्णांना दुसरे जीवन जगण्याची संधी मिळू शकते. म्हणून राज्य शासनाने राज्यात महाअवयवदान अभियान राबविले आहे. त्याला सर्वस्तरावर चांगला प्रतिसादही मिळत आहे. या पार्श्वभुमीवर जनतेमध्ये अधिक जनजागृतीसाठी “संवाद पर्व” या अभियानातून प्रयत्न केला जात आहे. त्याअनुषंगाने आयुर्वेदीक महाविद्यालयात अवयवदान नाव नोंदणी व विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले.  डोळा, त्वचा, फुफ्फुसे, हृदय, प्लीहा, मुत्रपिंड, यकृत आदी मानवी अवयवांची प्रात्याक्षिकासह माहिती देवून नागरिकांना त्याचे महत्व पटवून देण्यात आले. 
यावेळी डॉ. यादव यांनी नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी “संवाद पर्व” हे अभियान निश्चित उपयुक्त आहे. अवयव ही निर्सगाने दिलेली अमुल्य भेट आहे. मृत्युनंतर इतर गरजू रुग्णांना आपण अवयवदान देवू शकता असे सांगून या प्रदर्शनाला नागरिकांनी भेट देवून अवयवदान करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन केले.
प्रारंभी जिल्हा माहिती अधिकारी दिलीप गवळी यांनी “संवाद पर्व” या उपक्रमामागील भुमिका विशद केली. या उद्घाटन समारंभानंतर “बेटी बचाओ बेटी पढाओ” या विषयावर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. या पथनाट्यामध्ये स्त्रीभ्रुण हत्या, व्यसन मुक्ती, गर्भलिंग निदान, महिला अत्याचार, हुंडाबंदी आदी विषयी आकर्षक मांडणीतून संदेश दिला.  
  या पथनाट्याचे लेखन किरण मुदखेडे यांनी केले तर दिगदर्शन डॉ. किशोर यादव यांनी केले.  बोईनवाड आकाश, प्रवीण चव्हाण, अक्षय पवार, हरिष बोडके, विशाल सांगळे, प्रविण बोडके, धनश्री गोरे, कल्याणी अग्रवाल, प्राजक्ता गोखने, जुई केंद्रे, येागेश झाडे यांनी या पथनाट्यात भाग घेतला. शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालयाच्या परिसरात  “बेटी बचाओ बेटी पढोओ” , “स्त्री भ्रुण हत्या”, “व्सन मुक्ती”, “पाणी बचत” आदी विषयांवर काढलेल्या आकर्षक रांगोळ्या उपस्थितांचे लक्ष वेधत होत्या. यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थींनी, नागरिक  उपस्थित होते.     

00000
“संवाद पर्व” अभियानांतर्गत विविध योजनेची माहिती नांदेड आकाशवाणी केंद्रावरुन आज प्रसारण
           नांदेड, दि. 13 :- शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी हाती घेतलेल्या "संवाद पर्व"  अभियानांतर्गत नांदेड आकाशवाणी मालिकेतील चौथ्या भागात सौ. राजश्री हेमंत पाटील, सौ. अरुंधती पुरंदरे-साले, सौ. रेणुका तम्मलवाड व डॉ. मिरा कुलकर्णी यांनी सहभाग घेतला आहे. या कार्यक्रमाचे नांदेड आकाशवाणी केंद्रावरुन 13 व 14 सप्टेंबर 2016 रोजी प्रसारण होणार आहे.   
          
  माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालय व आकाशवाणी केंद्र नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने "संवाद पर्व" अभियानांतर्गत विविध योजना विषयी माहिती देण्यासाठी मालिकेचे प्रसारण करण्यात येत आहे. या मालिकेतील चौथ्या भागात बेटी बचाव बेटी पढाओ, माझी कन्या भाग्यश्री योजना, पीसीपीएनडीटी कायदा व प्रमोद महाजन कौशल्य विकास कार्यक्रम आदी योजनांविषयी गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट को-ऑप. सोसायटीच्या अध्यक्षा सौ. राजश्री हेमंत पाटील, माजी नगरसेविका सौ. अरुंधती पुरंदरे-साले, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गर्शन केंद्राच्या सहायक संचालक सौ. रेणुका तम्मलवाड, रोटरी क्लबच्या अध्यक्षा डॉ. मिरा कुलकर्णी यांनी माहिती दिली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आकाशवाणीचे केंद्र संचालक भिमराव शेळके यांनी केले आहे.  
या कार्यक्रमाचे नांदेड आकाशवाणी केंद्रावरुन आज मंगळवार 13 सप्टेंबर 2016 रोजी रात्री 8.15 वाजता व त्याचे पूर्नप्रसारण बुधवार 14 सप्टेंबर रोजी रात्री 8.15 वा. होणार आहे. याचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी दिलीप गवळी व नांदेड आकाशवाणीचे केंद्र संचालक भिमराव शेळके यांनी केले आहे.

000000
जिल्ह्यात हंगामात 72.52 टक्के पाऊस   
           नांदेड, दि. 13 :- जिल्ह्यात  मंगळवार 13 सप्टेंबर 2016 रोजी  सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात एकूण 150.41 मिलीमीटर  पाऊस झाला असून  जिल्‍ह्यात  दिवसभरात सरासरी 9.40 मिलीमीटर पावसाची  नोंद  झाली  आहे. जिल्ह्यात या हंगामात आतापर्यंत सरासरी 693.01 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात या हंगामात आतापर्यंत झालेल्या पावसाची तालुका निहाय टक्केवारी पुढील प्रमाणे. (सर्वाधिक ते उतरत्याक्रमाने) भोकर- 88.62, लोहा- 86.08, हदगाव- 84.79, नांदेड- 79.94, अर्धापुर- 79.08, माहूर- 79.01, हिमायतनगर- 77.39, बिलोली- 75.80, कंधार- 69.82, नायगाव- 67.98, धर्माबाद- 67.10, मुखेड- 66.56, किनवट- 64.97, मुदखेड- 64.52, देगलूर- 56.67, उमरी- 51.78. जिल्ह्याची यंदाच्या  हंगामातील  पावसाची  टक्केवारी  72.52 इतकी झाली आहे.   
जिल्ह्यात मंगळवार 13 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात  झालेला  पाऊस मिलीमीटरमध्ये  तालुकानिहाय  पुढील  प्रमाणे  कंसात  एकूण  पाऊस  : नांदेड- 4.00 (728.99), मुदखेड- 6.00 (550.68), अर्धापूर- 1.33 (687.66) , भोकर- 9.00 (883.00), उमरी- 11.67 (515.93), कंधार- 3.33 (563.14), लोहा- 4.50 (717.34), किनवट- 23.71 (805.60), माहूर- 19.25 (979.75), हदगाव- 9.71 (828.69), हिमायतनगर- 10.00 (756.32), देगलूर- 9.50 (510.18), बिलोली- 8.60 (733.80), धर्माबाद- 16.67 (614.37), नायगाव- 8.00 (622.40), मुखेड- 5.14 (590.27) आज  अखेर  पावसाची सरासरी 693.01  (चालू वर्षाचा एकूण पाऊस 11088.12) मिलीमीटर आहे. 

000000

Monday, September 12, 2016

मतदार यादयांची विशेष संक्षिप्‍त पुनरिक्षण मोहीम
18 सप्टेंबर, 9 ऑक्टोंबर रोजी केंद्रावर बीएलओ उपस्थित राहणार  
नांदेड, दि. 12 :- भारत निवडणुक आयोगाने दिनांक 1 जानेवारी 2017 या अर्हता दिनांकावर विधानसभा मतदार यादयाच्‍या विशेष पुर्नरिक्षणाचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याचा कालावधी शुक्रवार 16 सप्‍टेंबर 2016 ते 14 ऑक्‍टोबर 2016 असा आहे. तर रविवार 18 सप्‍टेंबर व 9 ऑक्‍टोंबर 2016 रोजी विशेष मोहीम निश्‍चीत केली आहे. यादिवशी जिल्‍हयातील सर्व केंद्रावर बीएलओ उपस्थित राहून अर्ज स्‍वीकारतील. याचा सर्व मतदारांनी लाभ घ्‍यावा , असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणुक अधिकारी नांदेड यांनी केले आहे. दिनांक 1 जोनवारी 2017 रोजी ज्‍यांचे वयाची 18 वर्षे पूर्ण होणार आहेत अशा सर्व मतदारांनी सुध्‍दा नाव नोंदणीसाठी अर्ज करण्‍याचे आवाहन करण्‍यात येत आहे.
            विशेष मोहिमेच्‍या तारखा व्यतिरिक्त  16 सप्‍टेंबर ते 14 ऑक्‍टोंबर 2016 या कालावधीत जिल्‍हयातील सर्व तहसिल कार्यालयातील मतदार मदत केंद्र व संबंधीत बीएलओ यांचेकडे अर्ज करता येतील. मतदारांनी अर्ज करताना आवश्‍यक ते पुरावे जोडूनच अर्ज करावेत. तसेच कुटूंबातील व्‍यक्‍तींनीच अर्ज जमा करावेत. त्रयस्थ व्‍यक्‍तीमार्फत गठ्ठयांनी अर्ज स्‍वीकरले जाणार नाहीत याची नोंद घ्‍यावी.
भारत निवडणुक आयोगाने दिनांक 1 जानेवारी 2017 या अर्हता दिनाकांवर विधानसभा मतदारसंघाच्‍या मतदान यादयांच्‍या संक्षिप्‍त पुर्नरिक्षणाचा कार्यक्रम जाहीर केला आहे. मतदार यादीत नाव नोंदणी, नावात दुरुस्‍ती, आक्षेप नोंदविण्‍यासाठी 16 सप्‍टेंबर ते 14 ऑक्‍टोबर 2016 हा कालावधी आयोगाने निश्‍चीत केला आहे. जिल्‍हयात सध्‍या मतदार संख्‍या 23 लाख 84 हजार 666 इतकी असून त्‍यापैकी पुरुष 12 लाख 43 हजार 586, स्त्री- 11 लाख 41 हजार 26 व  इतर- 54 मतदार आहेत.  
येत्‍या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिका
निवडणुकीस हीच यादी वापरण्‍याची शक्‍यता
            सन 2017 मध्‍ये जिल्‍हा परिषद, पंचायत समिती आणि नांदेड वाघाळा महानगरपालिका निवडणुका प्रस्‍तावित आहेत. जिल्‍हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिका निवडणुकांसाठी विधानसभेची मतदार यादी वापरली जाते. त्‍यामुळे येत्‍या जिल्‍हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिका निवडणुकासाठी दि. 1.1.2017 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादी वापरली जाण्‍याची शक्‍यता आहे. त्‍यामुळे सर्व मतदारांनी आपली नावे यादीत असल्‍याची खात्री करावी तसेच यादीत नावेही नोंदवावीत, असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणुक अधिकारी नांदेड यांनी केलेले आहे.
फोटो जमा करावेत
ज्‍या मतदारांचे यादीमध्‍ये फोटो नाहीत अशा मतदारांनी संबंधित बीएलओकडे फोटो जमा करावेत जेणे करुन त्‍यांना ओळखपत्र देण्‍यात येतील.
दुबार नावे वगळणे
मतदार यादीत एकापेक्षा जास्‍त ठिकाणी नाव नोंदविणे बेकायदेशिर आहे. त्‍यामुळे ज्‍या मतदारांना यापुर्वी एकापेक्षा जास्‍त ठिकाणी नोंदविली असतील त्‍यांनी एका ठिकाणावरुन नांव वगळण्‍यासाठी नमुना 7 मध्‍ये अर्ज सादर करावेत.

00000
दारु दुकाने आज बंद 
नांदेड दि. 12 :- नांदेड जिल्ह्यात मंगळवार 13 सप्टेंबर 2016 रोजी मुस्लीम बांधवाच्यावतीने मोठया प्रमाणात ईद उल अझहा (बकरी ईद) साजरी करण्यात येणार आहे. त्यामुळे या दरम्यान जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवून अनुसूचित प्रकार घडू नये, याकरीता मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन जिल्हाधिकारी यांनी ईद उल अझहा (बकरी ईद)  निमित्त नांदेड वाघाळा महानगरपालिका, जिल्ह्यातील सर्व तालुका मुख्यालये, अन्य नगरपरिषद, नगरपालिका, नगर पंचायत हद्दीतील सर्व सीएल-3, एफएल-4 एफएल-2, एफएल-3 (परवाना कक्ष), एफएल / बिआर-2 व ताडी विक्रीच्या अनुज्ञप्त्याचे अंतर्गत व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुध्द दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, असेही या आदेशात नमुद केले आहे.    

00000000
आयटीआय शिकाऊ उमेदवारांसाठी
भरती मेळाव्याचे गुरुवारी आयोजन  
नांदेड दि. 12 :- औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे मारोती सुझुकी इंडिया लि. गुरगाव हरियाणा या कंपनीकडून गुरुवार 15 सप्टेंबर 2016 रोजी सकाळी 10 वा. सभागृहात आयटीआय शिकाऊ उमेदवारांची लेखी व तोंडी परीक्षेसाठी भरती मेळावा आयोजित केला आहे. मेळाव्यात जास्तीतजास्त उमेदवारांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य एस. आर. बुजाडे यांनी केले आहे.
आयटीआय पास व जुलै 2016 मध्ये परीक्षा दिलेले प्रशिक्षणार्थी व्यवसाय इलेक्ट्रीशीयन, जोडारी, मशिनिस्ट, मेकॅ. मोटार व्हेकल, टीडीएम, फॉउन्डीमॅन, मोल्डर, पेंटर ज., शिटमेटल वर्कर, टर्नर, वेल्डर, डिझल मेकॅ. डॉसमन मेकॅ. टॅक्टर मेकॅनिक या व्यवसायातील मुलांनी उपस्थित रहावे. स्टायफंड 8 हजार 776 रुपये महिना देण्यात येणार आहे. तसेच बोनस 2 हजार 600 रुपये मिळणार आहे, असे कंपनीच्या प्रतिनिधींने कळविले आहे. सोबत दहावी, आयटीआय उत्तीर्ण गुणपत्रिका, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र व ओळखपत्र आणावे लागतील.

00000
जिल्हाधिकारी कार्यालयात
      बुधवारी पेन्शन अदालत
नांदेड, दि. 12 :- जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवार 14 सप्टेंबर 2016 रोजी पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे. मंगळवार 13 सप्टेंबर रोजी सुट्टी असल्याने लगतच्या दिवशी बुधवारी ही पेन्शन अदालत आयोजित केली आहे.
जिल्ह्यामधील महसूल विभागातील सेवानिवृत्त झालेले अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अडचणी निवारण्यासाठी 14 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत उपस्थित राहून तक्रारीचे निवेदने दयावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.

0000000

वृत्त क्रमांक   मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत दावे व हरकती दाखल करण्याच्या कालावधीत वाढ   वाढीव कालावधीचा ...