Monday, June 30, 2025

२८ जून 2025

 वृत्त क्र. 672

गोदाम बांधकाम अनुदानासाठी इच्छुक व पात्र अर्जदारांनी अर्ज करावेत- जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी 

नांदेड, दि. २८ जून:- कृषि विभागाच्या वतीने नांदेड जिल्ह्यासाठी राष्ट्रीय खादयतेल अभियान सन 2025-26 मध्ये स्थानिक पुढाकाराच्या बाबी अंतर्गत फ्लेक्झी फंडामध्ये शेतकरी उत्पादक संघ , कंपनी (FPO/FPC) करिता जिल्हास्तरावर गोदाम बांधकामाचा 1 लक्षांक प्राप्त आहे. प्राप्त लाक्षांकाच्या अधीन राहून सरकारी/खाजगी उद्योग, शेतकरी उत्पादक संस्था / कंपनी (FPOS) आणि सहकारी संस्था यांच्याकडून विहित नमुन्यातील प्रस्ताव मागवण्यात येत आहेत.

या योजने अंतर्गत ज्या ठिकाणी गोदामाची व्यवस्था नाही व ज्या गावात सदर कार्यक्रम राबवण्यात येतो अशा परिसरात राष्ट्रीय खादयतेल अभियानांतर्गत गोदाम बांधकाम कार्यक्रम देण्यात येतो. या योजने अंतर्गत कमाल 250 मे.टन क्षमतेचे गोदाम बांधकाम करण्यासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के किंवा 12.50 लक्ष रुपये या पैकी जे कमी असेल ते अनुदान देय आहे.

 अटी व शर्तीच्या अधीन राहून इच्छुक शेतकरी उत्पादक संघ /कंपनी (FPO/FPC) सदर बाब बँक कर्जाशी निगडीत असून इच्छुक अर्जदार संस्थेने केंद्र शासनाच्या स्मार्ट / वखार महामंडळ यांचे मार्गदर्शक सूचनांनुसार बँकेकडे प्रकल्प सादर करावा. बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर संबंधित अर्जदार कंपनी सदर बाबीच्या लाभास पात्र राहील.

लक्षांकाच्या तुलनेत जास्त अर्ज प्राप्त झाल्यास सोडत पध्दतीने निवड करण्यात येईल. महाराष्ट्र वखार महामंडळाच्या तांत्रिक निकषाप्रमाणे लाभार्थ्यानी जागेची निवड करावी व त्याची खात्री जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी किंवा त्यांचे प्रतिनिधी करतील. या योजनेचा एकदाच लाभ देण्यात येईल. बांधकाम डिसेंबर 2025 पुर्वी करणे बंधनकारक आहे. अपूर्ण बांधकाम डीझाईन, स्पेसिफिकेशन मध्ये बदल केल्यास अनुदान देय राहणार नाही. गोदामाचा वापर शेतकऱ्यांनी  उत्पादीत केलेल्या कृषि माल साठवणुकीसाठी शेतकऱ्यांना योग्य व माफक दरात करण्यात यावा.

तरी ईच्छुक व पात्र लाभार्थींनी महाराष्ट्र वखार महामंडळाचे प्राधिकृत अधिकार्याकडून अथवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मान्यता प्राप्त डीझाईन/ स्पेसिफिकेशन व खर्चाच्या अंदाज पत्रकासह तालुका कृषि अधिकारी, कार्यालयाकडे अर्ज 31 जुलै 2025 अखेर पर्यंत अर्ज सादर करावेत,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे. 

॰॰॰॰

२७ जून 2025

वृत्त क्र. 671

वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता  

हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सूचना  

नांदेड, दि. २७ जून:- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी 27 जून 2025 रोजी दुपारी 13:57 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी 01 जुलै 2025 या एक दिवसासाठी यलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे. दि. 01 जुलै 2025  ह्या दिवशी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी. नागरिकांनी खबरदारीची उपाययोजना म्हणून पुढील प्रमाणे काळजी घ्यावी. असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 या गोष्टी करा 

विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा. तुमच्या स्मार्ट मोबाईल फोन मध्ये 'दामिनी', 'सचेत' हे दोन ॲप डाउनलोड करा 'दामिनी' ॲप तुमच्या आजूबाजूला वीज विषयक संभाव्य धोके दर्शविते तर 'सचेत' ॲप मुळे तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या हवामानाविषयी अचूक इशारे व माहिती मिळते.

 या गोष्टी करु नका

आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे. असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

००००

Friday, June 27, 2025

वृत्त क्र. 670

'विकसित महाराष्ट्र 2047' साठी सर्वेक्षणामध्ये

17 जुलैपर्यंत नागरिकांनी मत नोंदवावे

नांदेड दि.27 जून : भारत सरकारच्या विकसित भारत 2047 या दूरदृष्टी कार्यक्रमाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने विकसित महाराष्ट्र 2047 ही महत्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. यामध्ये विकसित महाराष्ट्र 2047 साठी व्हिजन डाक्यमेंट तयार करण्यात येणार आहे.  तरी नागरिकांनी 17 जुलै 2025 पर्यत उपलब्ध करुन देण्यात आलेल्या क्युआर कोडवर व या लिंकवर https://wa.link/o93s9m यावर आपले मत नोंदवून विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेमध्ये योगदान द्यावे, असे आवाहन नियोजन विभागाने केले आहे.

व्हिजन डाक्युमेंट तयार करण्याच्या अनुषंगाने नियोजन विभागाच्या 2 जून 2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये 6 मे 2025 ते 2 ऑक्टोंबर 2025 अशा 150 दिवसांच्या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आलेली आहे. या संकल्पनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रासाठी व्हिजन डाक्युमेंट तयार केला जात आहे. व्हिजन डॉक्युमेंटचा आराखडा तयार करण्यासाठी 16 संकल्पनांवर आधारीत क्षेत्रनिहाय गट बनविण्यात आले आहेत. यामध्ये कृषि, शिक्षण, आरोग्य, ग्राम विकास, नगर विकास, भूसंपदा, जलसंपदा, पायाभूत सुविधा, वित्त, उद्योग, सेवा, सामाजिक विकास, सुरक्षा, सॉफ्ट पॉवर, तंत्रज्ञान व मानव विकास, मनुष्यबळ व्यवस्थापन असे हे क्षेत्रनिहाय गट असतील. या सर्व गटांनी प्रगतीशील, शाश्वत, सर्वसमावेशक व सुशासन यावर आधारित आराखडा तयार करावयाचा आहे. आराखडा तयार करताना त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती, शासकीय/अशासकीय संस्थांशी सल्लामसलत करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमामध्ये व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याचा समावेश करण्यात आला आहे. व्हिजन डॉक्युमेंट तयार करताना दीर्घकालीन, मध्यमकालीन व अल्पकालीन अशी टप्पानिहाय उद्दिष्टे ठेवण्याचे निर्देश सर्व विभागांना देण्यात आले आहेत.

00000

 


  वृत्त क्र. 669

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन


नांदेड दि. 27 जून :- केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत बाल शक्ती पुरस्कार दिला जातो. ज्या मुलांचे वय 5 वर्षापेक्षा अधिक व 18 वर्षापेक्षा कमी आहे, अशा मुलांनी शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ, नाविण्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपूण्यपूर्ण कामगिरी केलेली आहे. त्यांना हा पुरस्कार दिला जातो. तरी बाल शक्ती पुरस्कारासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त मुलांचे प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गणेश डी. वाघ यांनी केले आहे.  

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025 साठी अर्ज मागविले आहेत. हे अर्ज https://awards.gov.in या संकेतस्थळामार्फत ऑनलाईन पध्दतीने स्विकारले जाणार आहेत. अर्ज करणाऱ्या मुलांचे वय 5 वर्षापेक्षा अधिक व 31 जुलै 2025 रोजी 18 वर्षापेक्षा कमी असावे व ज्या मुलांनी शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ, नाविण्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केलेली आहे. त्यांचे प्रस्ताव वरीलप्रमाणे नमुद संकेतस्थळावर स्वत: मुले किंवा त्यांच्या वतीने राज्य सरकार, केंद्र शासित प्रदेश, जिल्हाधिकारी, जिल्हादंडाधिकारी, पंचायत राज्य संस्था, नागरी स्वराज्य संस्था, शैक्षणिक संस्था इत्यादी अर्ज करु शकतात असे  जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

 वृत्त क्र. 668

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात

सांडपाणी प्रक्रिया संयंत्राची लवकरच उभारणी

सांडपाणी प्रक्रिया संयंत्र उभारणीसाठी 75 लक्ष रुपये निधी मंजूर

नांदेड दि. 27 जून :- डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नांदेड येथे सांडपाण्याचे शास्त्रशुध्द व्यवस्थापन करण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया संयंत्राची उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून 75 लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात येणार असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी दिली आहे.

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सन 2021 पासून 450 केएलडी क्षमतेचा सिव्हेज ट्रीटमेंट प्लॉट एसटीपी कार्यान्वित आहे. हा एसटीपी प्लांट रुग्णालयातून येणाऱ्या सामान्य सांडपाण्याचे जैविक प्रक्रीयेद्वारे शुध्दीकरण करतो. त्याच्या मदतीने पर्यावरणपूरक पध्दतीने पाण्याचे व्यवस्थापन केले जाते. तसेच पुनर्वापरासाठी पाणी उपलब्ध होते.

धोबीघाट, बायोमेडिकल वेस्ट साठवण क्षेत्र, ओटी कॉम्पलेक्स आणि प्रयोगशाळा यासारख्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या रासायनिक व संसर्गजन्य सांडपाण्याच्या शुध्दीकरणासाठी स्वतंत्र ईटीपी आवश्यक असल्याचे एमपीसीबीच्या अहवालात नमुद करण्यात आले होते. त्यामुळेच बीएमडब्लुएम नियम 2016 नुसार नवीन यंत्रणा उभारण्याची प्रक्रीया राबवीली जात आहे. या ईटीपी मध्ये प्राथमिक, दुय्यम आणि तृतीयक अशा तीन टप्प्यात सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. उपचारीत पाण्याचा वापर फ्लशिंग, बागकाम आणि स्क्रबरसाठी केला जाऊ शकतो. तसेच उर्वरित पाणी सुरक्षितपणे निचऱ्यात सोडले जाईल.

रुग्णालयातून होणाऱ्या सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे हे पर्यावरण रक्षण आणि सार्वजनिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. या प्रकल्पामुळे रुग्णालयाची जबाबदारी अधिक प्रभावीपणे पार पाडली जाईल असे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी सांगितले आहे. तसेच रुग्णालयातील स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि सांडपाणी व्यवस्थापन या बाबींवर सातत्याने रुग्णालय प्रशासनाचे बारीक लक्ष असून यामुळे गरीब आणि गरजू रुग्णांना रुग्णालयात स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरण मिळण्यास मदत होणार आहे.

कोविड काळात सिव्हेज ट्रीटमेंट प्लांट एसटीपी उभारणीसाठी प्रशासकीय आणि राजकीय पातळीवर सातत्याने पाठपुरावा करुन मंजूरी मिळविली होती. त्याच धर्तीवर ईटीपी प्रकल्पासाठी प्रयत्न करुन हा प्रस्ताव मंजूरीपर्यत पोहोचविला असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी दिली आहे.

00000

  वृत्त क्र. 666 

कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष

ॲड निलेश हेलोंडे पाटील यांचा नांदेड दौरा  

नांदेड, दि. 27 जून :- कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) ॲड निलेश हेलोंडे पाटील हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.  

शुक्रवार 4 जुलै 2025 रोजी अमरावती येथून सकाळी 10.15 वा. नांदेडकडे प्रयाण. दुपारी 2.30 वा. विश्रामभवन, जि.नांदेड येथे आगमन. दुपारी 3 वा. रोहयोअंतर्गत शासकीय गायरान जमीनीवर चारा लागवडीसंबंधी उपजिल्हाधिकारी (रोहयो) व तहसिलदार नांदेड यांनी सुचविलेल्या नांदेड तालुक्यातील जागेस भेट व पाहणी. सायं. 6 वा. सोईनुसार अमरावतीकडे प्रयाण करतील.

00000

Thursday, June 26, 2025

 वृत्त क्र. 665

फळ पिक विमा योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

30 जून पर्यंत विमा योजनेत भाग घेण्याची मुदत


नांदेड, दि. 26 जून :- पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना मृग बहार सन 2025-26 साठी राज्य शासनाच्या शासन निर्णयानुसार नांदेड जिल्ह्यामध्ये ही योजना चिकू, पेरु, मोसंबी, लिंबू व सिताफळ या अधिसुचित पिकांकरीता अधिसुचित महसूल मंडळामध्ये भारतीय कृषि विमा कंपनी लिमिटेड स्टॉक एक्चेंच टॉवर्स 20 वा मजला दलाल स्टिट्र फोर्ट मुंबई 400023 यांच्या मार्फत राबविण्यात येत आहे.

पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना मृग बहार 2025 मधील पेरु, द्राक्ष, संत्रा, लिंबू या पिकांना भाग घेण्याची अंतिम मुदतवाढ 30 जून 2025 पर्यंत देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी शासन निर्णय संकेतस्थळावर उपलब्ध असुन संबंधित विमा कंपनी किंवा कृषि विभागाचे सहाय्यक कृषि अधिकारी उपकृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.

 

पुनर्रचित हवामान आधारित फळ पिक विमा योजना राज्यात मृग व आंबिया बहार मध्ये राबविण्यात येते. मृग बहार मध्ये पेरू, द्राक्ष, संत्रा लिंबू या पिकांसाठी भाग घेण्याची यापूर्वी अंतिम 14 जून होती. विमा योजनेत भाग घेण्यासाठी काही तांत्रिक अडचणीमुळे पीक विमा पोर्टल www.pmfby.gov.in हे दिनांक 13 जून रोजी सुरु झाले. त्यामुळे पीकांची भाग घेण्याची अत्यंत अल्पकालावधी मिळाला. त्यामुळे हा कालावधी वाढविण्यासाठी राज्याकडून केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. याबाबत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला. या प्रस्तावास केंद्र शासनाने मान्यता दिली असून आता या चार फळ पिकांसाठी विमा योजनात भाग घेण्याची अंतिम मुदत 30 जून 2025 अशी राहील.

 

नांदेड जिल्ह्यातील पुढील प्रमाणे अधिसूचित महसूल मंडळातील फळं पिक उत्पादक शेतकऱ्यांनी याची नोंद घेऊन फळ पिक विमा योजनेत सहभाग घ्यावा.

 

फळपिक मोसंबीसाठी विमा संरक्षित रक्कम (नियमित) रुपये 1 लाख, शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता रक्कम (नियमित) 5 हजार असून याप्रमाणे लिंबू संरक्षित रक्कम 80 हजार रुपये तर शेतकऱ्यांनी 4 हजार रुपये, सिताफळ संरक्षित रक्कम 70 हजार रुपये तर शेतकऱ्यांनी 3 हजार 500, चिकु संरक्षित रक्कम 70 हजार शेतकऱ्यांनी 4 हजार 900, पेरु संरक्षित रक्कम 70 हजार तर शेतकऱ्यांना 3 हजार 500 रुपये विमा हप्ता रक्कम भरावयाचा आहे.

योजना अंमलबजावणी वेळापत्रक व अधिसुचित मंडळे

ही योजना जिल्ह्यामध्ये पुढे दर्शविल्याप्रमाणे अधिसुचित फळपिकांसाठी, अधिसुचित महसुल मंडळांना लागु राहिल. मोसंबी फळपिकासाठी कंधार तालुक्यात बारुळ, कंधार, फुलवळ, उस्माननगर अधिसुचित महसूल मंडळात, धर्माबाद तालुक्यातील करखेली मंडळात, नांदेड तालुक्यातील लिंबगाव, विष्णुपुरी, नाळेश्वर, तरोडा बु मंडळात, मुखेड तालुक्यात मुखेड, जाहुर मंडळात, मुदखेड तालुक्यात मुदखेड, बारड मंडळात, हदगाव तालुक्यात हदगाव, पिंपरखेड, मनाठा मंडळात, अर्धापूर तालुक्यात मालेगाव मंडळात या अधिसुचित मंडळात पिक विमा भरण्याची अंतिम मुदत 30 जून आहे. विमा संरक्षण प्रकार कमी पाऊस 1 ते 31 जुलै विमा संरक्षण कालावधी तर पावसाचा खंड यासाठी विमा संरक्षण कालावधी 1 ते 31 ऑगस्ट राहील.

 

लिंबु फळ पिकासाठी उमरी तालुक्यात उमरी तर नांदेड तालुक्यात लिंबगाव, नाळेश्वर मंडळात विमा भरण्याची मुदत 30 जून असून कमी पाऊस 15 जुन ते 15 जुलै, पावसाचा खंड 16 जुलै ते 15 ऑगस्ट राहील. सिताफळ पिकासाठी कंधार तालुक्यातील बारुळ, कंधार, दिग्रस बु. मंडळात, हदगाव तालुक्यात तामसा, मनाठा, आष्टी, पिंपरखेड तर भोकर तालुक्यात भोकर मंडळात विमा भरण्याची मुदत 31 जुलै असून पावसाचा खंड 1 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर, जास्त पाऊस 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर विमा संरक्षण कालावधी राहील. चिकु पिकासाठी नांदेड तालुक्यातील लिंबगाव, तरोडा बु, नाळेश्वर मंडळात विमा भरण्याची मुदत 30 जून असून विमा संरक्षण प्रकार जादा आर्द्रता व जास्त पाऊस विमा संरक्षण कालवधी 1 जुलै ते 30 सप्टेंबर राहील. 

पेरु फळ पिकासाठी नांदेड तालुक्यात विष्णुपुरी, लिंबगाव, नाळेश्वर मंडळात, कंधार तालुक्यातील उस्माननगर, बारुळ, लोहा तालुक्यात सोनखेड, शेवडी मंडळात, मुखेड तालुक्यातील जाहूर, अंबुलगा बु. चांडोळी, येवती मंडळात, हदगाव तालुक्यात तामसा, आष्टी, पिंपरखेड मंडळात, भोकर तालुक्यातील मोघाळी, भोसी मंडळात तर देगलूर तालुक्यात देगलूर, खानापूर, माळेगाव, नरंगल बु मंडळात विमा भरण्याची मुदत 30 जून असून विमा संरक्षण प्रकार कमी पाऊस 15 जून ते 14 जुलै राहील तर पावसाचा खंड व जास्त तापमान यासाठी 15 जुलै ते 15 ऑगस्ट यानुसार विमा संरक्षण कालावधी राहील. 

 

या योजनेत अधिसुचित क्षेत्रात, अधिसुचित फळपिकासाठी कुळाने भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसहित इतर सर्व शेतकरी भाग घेवू शकतात. पिककर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदारांसाठी योजनेतील सहभाग ऐच्छिक राहणार आहे. बिगर कर्जदार शेतकरी विहित मुदतीत बँकेने किंवा ऑनलाईन फळपीक विमा पोर्टल WWW.pmfby.gov.in वर विमा हप्ता जमा करुन सहभाग घेवू शकतात. त्यासाठी, आधार कार्ड. जमीन धारणा 7/12, 8 (अ) उतारा व पिक लागवड स्वयंघोषणा पत्र, फळबागेचा (Geo Tagging) केलेला फोटो, बँक पासबूक वरील बँक खाते बाबत सविस्तर माहिती लागेल. कॉमन सर्विस सेंटरमार्फत अर्ज ऑनलाइन भरता येतील.

 

शासनाच्या 11 एप्रिल 2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक (Farmer ID) 15 एप्रिल 2025 पासून अनिवार्य करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना मृग व आंबिया बहार सन 2025-26 मध्ये योजनेत सहभागी होण्याकरीता अॅग्रिस्टेंक अंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक बंधनकारक राहील. पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत सहाभागी होणाऱ्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी करणे बंधनकारक आहे.पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी करणे बंधनकारक आहे.

 

ज्या सर्व्हे नंबरसाठी व क्षेत्रासाठी पिक विमा काढण्यात आलेला आहे. त्या क्षेत्राच्या सात/बारा उताऱ्यावर शेतकऱ्याचे नाव नसणे, बोगस सातबारा व पिक पिक पेरा करणे नोंदीच्या आधारे पिक विम्याची बोगस प्रकरणे करणे, दुसऱ्या शेतकऱ्याचे शेतीवर परस्पर अधिकृत भाडेकरार न करता विमा काढणे, उत्पादनक्षमता वयाची फळबाग नसताना विमा काढणे अशा बाबी निदर्शनास आल्यास अशा प्रकरणात संबंधित दोषींवर कायदेशीर कार्यवाही करण्याची जबाबदारी जिल्हा संनियत्रंण समितीच्या मार्गदर्शनानुसार संबंधित विमा कंपनीची राहील.

 

पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना सन 2025-26 अंतर्गत व मृग बहारातील अधिसुचित फळपिकांसाठी शासननिर्णय समजून घेऊन उपरोक्त अंतिम दिनांकापूर्व जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी व्हावे, असेही आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.

00000


 वृत्त क्र. 666


अन्न व औषध प्रशासन विभागाची कार्यवाही


१६ लाख २८ हजार किंमतीचा प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा जप्त 


नांदेड, दि.२६ जून:- सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन कार्यालयास आज मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सहायक आयुक्त संजय चट्टे व सहायक आयुक्त राम भरकड यांचे मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी सर्वश्री संतोष कनकावाड, ऋषिकेश मरेवार, अनिकेत मिसे, अरूण तम्मडवार तसेच प्रशिक्षणार्थी अन्न सुरक्षा अधिकारी अविनाश गिरी, श्रीमती शिल्पा श्रीरामे, श्रीमती अमृता दुधाटे नमुना सहायक बालाजी सोनटक्के व पोलिस स्टेशन इतवाराचे पो कॉ हरप्रीतसिंग सुकई यांचे पथकाने मे. डायमंड ट्रेडर्स, अमेर फंक्शन हॉलजवळ, देगलूर नाका, नांदेड या पेढीची तपासणी केली. 


तपासणीवेळी पेढीमध्ये सयद मुबीन सयद गनी वय वर्ष ५१ व अजमोदिदन अब्दुल हमीद वय वर्ष ४० या व्यक्ती पेढीमध्ये हजर होते. पेढीच्या तपासणीमध्ये राजनिवास सुगंधीत पानमसाला, विमल पानमसाला, डायरेक्टर स्पेशल पानमसाला, AAA पानमसाला, मुसाफीर पानमसाला, आरएमडी पानमसाला, रजनीगंधा पानमसाला, सिग्नेचर पानमसाला, सितार गुटखा, विविध प्रकारचे सुंगधीत तंबाखू इत्यादी प्रतिबंधित अन्न पदार्थाचा एकूण १६ लाख २८ हजार ४९ रुपये एवढ्या किंमतीचा साठा जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेला प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा पोलिस स्टेशन इतवारा, नांदेड यांचे ताब्यात देण्यात येवून संबंधित हजर व्यक्ती सयद मुबीन सयद गनी वय वर्ष ५१ व अजमोदिदन अब्दुल हमीद वय वर्ष ४० यांचेविरूध्द अन्न सुरक्षा अधिकारी संतोष कनकावाड यांनी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ व भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमानुसार फिर्याद दाखल केली आहे ,अशी माहिती सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

०००००



केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...