Monday, December 30, 2024

वृत्त क्र. 1241

6 जानेवारीला लोकशाही दिन 

नांदेड दि. 30 डिसेंबर :  जिल्हा प्रशासनाच्यावतीने सोमवार 6 जानेवारी 2025 रोजी नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसर नांदेड येथे लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी लोकशाही दिनामध्ये आपल्या तक्रारीसह उपस्थित व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 


यादिवशी महसूल, गृह, जिल्हा परिषद, पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम, परिवहन, सहकार, कृषि विभाग व पाणी पुरवठा समन्वय अधिकारी इत्यादी जिल्हास्तरावरील प्रमुख अधिकारी व ज्या कार्यालयाकडे लोकशाही दिनातील प्रलंबित प्रकरणे आहेत असे अधिकारी बचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, परिसर येथे उपस्थित राहतील.

 निवेदन नोंदणीची सुरूवात दुपारी 12 वा. होणार आहे. त्यानंतर लगेच प्राप्त झालेल्या अर्जावर सुनावणी घेण्यात येणार आहे. नागरिकांनी दुपारी 1 ते 3 या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनात उपस्थित रहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी केले आहे.

00000

 वृत्त क्र. 1240

लोकसेवा हक्क आयोगाचे आयुक्त दिलीप शिंदे यांचा दौरा

नांदेड दि. 30 डिसेंबर :  छत्रपती संभाजी नगर महसूली विभाग महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे आायुक्त दिलीप शिंदे हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.


गुरुवार 3 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8.30 वाजता देवगिरी एक्सप्रेसने नांदेड येथे आगमन. सकाळी 11.30 ते 12.30 या कालावधीत जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, मनपा आयुक्त यांच्या समवेत बैठकीस उपस्थिती. दुपारी 1 ते 2 या कालावधीत राखीव. दुपारी 2 वाजता वसमत जि. हिंगोलीकडे प्रयाण करतील.

00000

 वृत्त क्र. 1239

बालविवाह मुक्त जिल्हा करण्यासाठी जनजागृतीवर भर द्या : जिल्हाधिकारी

बालविवाह निर्मूलन जिल्हा कृती दल आढावा बैठक संपन्न

नांदेड, दिनांक 30 डिसेंबर :- जिल्ह्यात बालविवाह होवू नये यासाठी महिला बाल विकास विभाग,  युनिसेफ एसबीसी 3 च्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. 18 वर्षाखालील मुला-मुलींचे लग्न लावू नयेत ते केल्यास काय शिक्षा होवू शकते हे सर्वांना माहिती पाहिजे. यासाठी कायदयाची जनजागृती व प्रबोधन करण्यावर भर द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिल्या.

आज जिल्हाधिकारी कार्यालयात अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली बालविवाह निर्मूलन जिल्हा कृती दल आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) प्रशांत थोरात,  मनपाचे उपायुक्त अजितपाल सिंघ संधु, उपशिक्षणाधिकारी प्राथमिक संतोष शेटकार, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक रामचंद्र पांचगे, डॉ. विद्या झिने, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी एस.डी. पवार, नेहरु युवा केंद्राच्या समन्वयक चंदा रावळकर, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापिठाचे डॉ. अमोल प्रभाकर काळे, युनिसेफ, एसबीसी 3 चे वरिष्ठ प्रकल्प समन्वयक विकास कांबळे, जिल्हा समन्वयक मोनाली धुर्वे आदींची उपस्थिती होती.

जिल्हृयात बालविवाह होवू नये यासाठी नागरिकांपर्यंत कायदेशीर कार्यवाहीबाबतची माहिती पोहचविणे अत्यंत आवश्यक असून या विषयावर जनजागृती व प्रबोधन करावे. तसेच यावर्षी कन्या दिवसाच्या निमित्ताने शपथ व मुलींचे बालविवाह न करणेबाबत पालकांना पत्र लिहून कळविण्याचे उपक्रम राबवावेत असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी यावेळी सांगितले. तसेच 18 वर्षाखालील मुला-मुलींचे बाल विवाह होणार नाहीत याबाबत शिक्षकांनी जागृती करण्यावर भर द्यावा असेही त्यांनी सांगितले.

जिल्हा महिला बाल विकास विभाग नांदेड युनिसेफ आणि एसबीसी 3 मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड जिल्हा बालविवाहमुक्त करण्याच्या दृष्टीने मागील 4 महिन्यात केलेल्या कार्यवाहीबाबत व पुढील महिन्यात करण्यात येणाऱ्या नियोजनाबाबतचा आढावा यावेळी सादर करण्यात आला. तसेच शाळेतील मुलांसाठी विद्यार्थी सत्र, पालक जागरुकता सत्र कार्यक्रम असे विविध कार्यक्रम मागील कालवधीत घेण्यात आले याबाबत सादरीकरण करण्यात आले.

00000







Sunday, December 29, 2024

 माळेगाव : देवस्वारी व पालखीने आज माळेगाव येथील प्रसिध्द यात्रेची सुरुवात झाली. पालखीचे दर्शन घेण्यासाठी यावेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून व देशभरातून आलेल्या भाविकांनी गर्दी केली होती.



 वृत्त क्र. 1238 

संगणकीकरणात जिल्हा दुसरा ; 64 संस्थांचे संगणीकरण

 

नांदेड दि. 29 डिसेंबर : सहकार चळवळीला बळकटी देण्यासाठी आणि तळागाळातील लोकांपर्यंत सहकार चळवळ पोहोचवण्यासाठी व त्याची उपयुक्तता वाढविण्यासाठी जिल्हा सहकार विकास समितीची (डीसीडीसी ) जिल्हास्तरावर स्थापना करण्यात आली आहे. जिल्ह्याला संगणीकरणात राज्यात दुसरा क्रमांक मिळाला आहे. तर डीसीडीसीच्या माध्यमातून जिल्ह्यात अनेक उपक्रम सुरू आहेत.

 

सदर योजनेच्या अंतर्गत जिल्ह्यातील 64 विविध सहकारी संस्थानची संगणकीकरण करण्यात आले आहे. यामध्ये आपला नांदेड जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याअनुषंगाने 64 विविध सहकारी संस्था या आता 'गो-लाईव्ह ' या स्टेजपर्यंत गेलेल्या आहेत.

 

आपल्या जिल्ह्यात 84 प्राथमिक कृषि पतपुरवठा सहकारी संस्था अर्थात पीएससीस अर्थात पॅक्स यांनी नागरी सुविधा केंद्र (सिटीजन सर्व्हिसेस, सीएससी ) सूरू केले आहे. गावामध्ये संगणकीय सेवा पुरवितात.

 

आपल्या जिल्ह्यात 11 पीएससी पॅक्स निवड प्रधानमंत्री जनऔषधी केंद्रासाठी झालेली आहे.तीन ठिकाणी प्रत्यक्ष केंद्र सुरू झालेले आहेत. त्याचप्रमाणे धान्य साठवणूक व प्रक्रिया प्रकल्प या अंतर्गत आपल्या जिल्हयातील 7 संस्थानी डिपीआर सादर केलेला आहे. सदर डिपीआर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे मान्यतेसाठी आहे.प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र हे चार संस्थानचे सुरू झालेले आहेत. त्याचप्रमाणे जिल्हयातील सर्व ग्रामपंचायती या कुठल्यातरी एका विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या अंतर्गत येतील. हे उद्दिष्ट सुद्धा आपले पुर्ण झालेले आहेत.

 

सगळ्या ग्रामपंचायती या कुठल्यातरी सहकारी संस्थेअंतर्गत जोडल्या गेल्या आहेत. आगामी टप्यामध्ये जिल्ह्यातील 5 संस्थामार्फत पेट्रोलपंप सुरू करण्याविषयी कार्यवाही सुरू आहे. त्याप्रमाणे जिल्हा एलपीजी गॅस वितरणाचे काम देण्याविषयी कार्यवाही सुरू आहे.या विषयी सहकार विभाग समन्वयक असून या कमिटीचे सर्व सदस्य अर्थात जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, उपायुक्त पशुसंवर्धन, दुग्धविकास अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय, जिल्हा व्यवस्थापक नाबार्ड, व्यवस्थापिक संचालक दुधसंघ, व्यवस्थापकिय संचालक मत्स्यपालन संघ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा मध्यवर्ती बँक हे सगळे या समितीचे सदस्य आहेत.  जिल्हा उपनिबंधक (डिडिआर) हे याचे निमंत्रक तथा सदस्य सचिव आहेत.

00000

 वृत्त क्र. 1237


दक्षिण भारताच्या महायात्रेला माळेगावात पारंपारिक उत्साहात सुरुवात

 

• पालखी दर्शनाला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची उपस्थिती

• जिल्हाधिकाऱ्यांनी सपत्नीक घेतले श्री खंडेरायाचे दर्शन

• श्री खंडोबारायावर बेल भंडारा खोबरे उधळून निघाली देवस्वारी व पालखी

• हजारोंची अलोट गर्दी ; भाविकांनी घेतले पालखीचे दर्शन

• प्लास्टिक मुक्त व कचरामुक्त यात्रेचा संकल्प

 

नांदेड, दिनांक 29 डिसेंबर :- दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या माळेगाव यात्रेला आज प्रारंभ झाला. दुपारी श्री खंडोबाची देवस्वारी निघाली. ‘यळकोट यळकोट’ जय मल्हारच्या गजरात बेल भंडारा, खोबऱ्याची उधळण करीत लाखो भाविकांनी देवस्वारीचे दर्शन घेतले. माळेगाव येथील श्री खंडोबाच्या यात्रेस पारंपारिक पद्धतीने सुरुवात झाल्यानंतर मुख्य रस्त्याने देवस्वारी निघाली. देवस्वारीचे विश्रामगृह येथे आगमन झाले होते.  

 

यावेळी पालखी दर्शनाला राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची उपस्थिती होती. त्यांच्यासोबत आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार आनंदराव पाटील बोंढारकर, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य राजकुमार मुक्कावार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत मंजूषा कापसे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगिता देशमुख, प्राथमिक शिक्षणाधिकारी सविता बिरगे, ग्रामीण पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता अमोल पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ, अमित राठोड, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. घुले, कृषी विकास अधिकारी सचिन कपाले, कार्यकारी अभियंता अशोक भोजराज, पंचायत समिती दशरथराव आडेराघो, सरंपच प्रतिनिधी हनुमंत हुलगंडे, ग्रामपंचायत अधिकारी बी. सी. देवकांबळे, ग्रामपंचायतचे पदाधिकारी व हजारो भाविकांची उपस्थिती होती.

 

यावेळी पालखीचे मानकरी गणपतराव मल्हारराव नाईक (रिसनगाव), गोविंदराव नागेशराव महाजन (कुरुळा), व्यंकटराव मारोतीराव पांडागळे (शिराढोण), खुशालराव भगवानराव भोसीकर (पानभोसी) व गोविंदराव बाबाराव नाईकवाडे (पानभोसी), पांडुरंग नारायण पाटील (माळेगाव), मल्हारी रावसाहेब पाटील (माळेगाव), विजयकुमार शंकरराव कनकदंडे (आष्टुर) व अंबादास खंडेराव जहागीरदार (माळेगाव) यांचा देवस्थानच्यावतीने मानाचा फेटा बांधून गौरव करण्यात आला.

 

यावर्षी मंदिराकडे जाणारा रहदारीचा मुख्य रस्ता मोकळा केल्याने भाविकांना दर्शनासाठी सहज जाणे शक्य झाले. याचबरोबर यावर्षी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून अधिक सुरक्षितता घेतली जात आहे. तसेच प्लास्टिक मुक्त व कचरा मुक्त होण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेने उत्तम नियोजन केलेले आहे. तसेच पार्किंग, सुरक्षा व्यवस्था याबाबत योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे.

 

यावेळी पालखी सोहळ्यात पारंपारिक वेशभूषा परिधान केलेले वाघ्या मुरळी, वासुदेव, पारंपारीक पध्दतीने कवड्याच्या माळी, लांब हळदीचा मळवट, हातापायावर चाबकाचे फटके मारत वाघ्या मुरळी सहभागी झाले होते. त्यांना पाहण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती.

जिल्ह्यातील महत्त्वाच्या उत्सवात सहकार मंत्र्यांसोबतच जिल्हाधिकारी अभिजीत राऊत कुटुंबासह सहभागी झाले होते. या यात्रेसाठी नांदेड जिल्हा परिषद, लोहा पंचायत समिती, माळेगाव ग्रामपंचायत मार्फत येणाऱ्या भाविकांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे.

 

आजपासून सुरू झालेली यात्रा  पुढे 5 तारखेपर्यत सुरू राहणार असून या यात्रेतील शासकीय कार्यक्रम राष्ट्रीय दुखवट्यामुळे पुढे ढकलण्यात आले आहे. दोन जानेवारीपासून कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. देशभरातील भाविक या ठिकाणी पुढील काळात येणार असून पशुधनाचा मोठा बाजार या ठिकाणी या कालावधीत सुरू होतो. तसेच पशुधन संदर्भातील आवश्यक वस्तू विक्रीचेही दुकाने मोठ्या प्रमाणात असतात. याशिवाय या यात्रेत देणाऱ्या भाविकांसाठी 2 जानेवारीला लावणी महोत्सव ही आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील अनेक सुप्रसिद्ध लावणी कलाकार व त्यांच्या अनेक चमू या ठिकाणी आपली कला साजरी करणार आहे.

 

या यात्रेला कुलदैवताची यात्रा समजणाऱ्या अनेक जमातीचे नागरिक आजपासून या ठिकाणी दाखल झाले आहे. आपल्या पारंपारिक पेहेरावात ते या ठिकाणी दाखल झाले आहेत. आजच्या यात्रेदरम्यान भारताच्या ग्रामीण भागातील अनेक कलांचे पालखी महोत्सव दरम्यान नागरिकांनी सादरीकरण केले.

 

या यात्रेदरम्यान पोलीस विभागाने चोख, बंदोबस्त ठेवला असून मोठ्या प्रमाणात पोलीस दल या ठिकाणी कार्यरत आहे. नागरिकांनी कोणत्याही अपवादात्मक परिस्थितीमध्ये पोलिसांची मदत घ्यावी, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

 

चौकट– उत्तम जागा पाहूनी मल्हाजरी, देव नांदे गड जेजुरी, उत्तुम रायाची जेजुरी गडाला नऊ लाख पायरी या जयघोषात माळेगावच्यात यात्रेत पारंपारीक वाद्याने खंडेरायाची सेवा अर्पण करायला सुरुवात केली. पारंपारीक गितासोबत डफ, तुनतुने आणि जयघोषाच्या गजरात अवघा परिसर दुमदुमला. उर्वरित नियोजित कार्यक्रम 2 ते 5 जानेवारी पर्यंत होतील.

00000



















Saturday, December 28, 2024

 यळकोट यळकोट जयमल्हारच्या जयघोषात आज माळेगावच्या यात्रेला प्रारंभ 

 आज देवस्वारी व पालखी पूजन 

नांदेड दि. २८ डिसेंबर : उद्या 29 डिसेंबर रोजी माळेगाव  येथे स्थानिक देवस्थानच्यावतीने तिथीनुसार देवस्वारी व पालखी पूजन होणार आहे. या सोबतच दक्षिण भारतातील प्रसिद्ध माळेगाव यात्रेचा शुभारंभ होणार आहे.

प्रशासनाने या ठिकाणी पायाभूत सुविधा उभारल्या असून नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्याची प्रसाधनगृहाची, स्वच्छतेची आणि पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. नागरिकांसाठी सुविधा संपर्क केंद्र ही उभारण्यात आले आहे. जिल्हा परिषद नांदेड, पंचायत समिती लोहा व स्थानिक ग्रामपंचायत माळेगावचे कर्मचारी या काळात यात्रेमध्ये आवश्यक सोयी सुविधा उपलब्धतेची खातरजमा करतील, गावकऱ्यांच्या मदतीने यात्रेकरूंना उत्तम सोयी सुविधा मिळेल यासाठी प्रयत्न करतील  अशा पद्धतीचे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी दिले आहेत.

या ठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून यावेळी यात्रेकरूच्या संरक्षणाची व सुरक्षेची अधिक कडक व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रेमध्ये साध्या वेषातील पोलीस दल मोठ्या प्रमाणात तैनात आहे. खिसेकापू ,अवैध दारू विक्री या दोन बाबींवर विशेष लक्ष ठेवण्यात आले असून नांदेड सोबतच आजूबाजूच्या ठिकाणावरून पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला आहे. नागरिकांनी कोणत्याही अपवादात्मक परिस्थितीत पोलिसांची मदत घ्यावी, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी केले आहे.

दूरून  येणारे भावीक, यात्रेकरू, दुकानदार तसेच बाहेर राज्यातून येणारे पशुपालक, व्यवसायिकांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जाणार असून पोलिसांना यात्रेच्या काळात विविध ठिकाणी तैनातीचे आदेश दिले गेले आहे.

 शासकीय कार्यक्रम पुढे ढकलले 

माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे 26 डिसेंबर ते 1 जानेवारी या काळात दुखवटा असल्यामुळे माळेगाव येथील यात्रेतील सर्व शासकीय कार्यक्रम २ जानेवारीपासून घेण्यात येणार आहे.

 जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी या संदर्भात जारी केलेल्या पत्रकामध्ये हा बदल जाहीर केला आहे.

दुखवटा एक जानेवारीला संपल्यानंतर 2 जानेवारीपासून नियमित नियोजित कार्यक्रम नव्या वेळापत्रकानुसार होतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. 

 आज पालखी महोत्सव 

तथापि, पारंपारिक पद्धतीने स्थानिक देवस्थान संस्थानमार्फत तिथीनुसार निघणारी 29 डिसेंबरची देव स्वारी व पालखीचे पूजन नियोजित वेळी म्हणजे 29 डिसेंबरला दुपारी दोन वाजता होणार आहे. त्यात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही.

 अन्य कार्यक्रम २ जानेवारीपासून 

दक्षिणेतील सुप्रसिद्ध माळेगाव यात्रेतील शासकीय कार्यक्रमांचे आयोजन नांदेड जिल्हा परिषद, लोहा पंचायत समिती व माळेगाव ग्रामपंचायत मार्फत केला जाते. तथापि दुखवटामुळे

29 तारखे नंतरच्या नियोजित कार्यक्रमांमध्ये बदल करण्यात आला असून आता सर्व कार्यक्रम 2 जानेवारीपासून होणार आहे. ( १ जानेवारी नंतर ) 29 तारखेपासून यात्रा नियमित सुरू असेल. मात्र जिल्हा प्रशासनामार्फत आयोजित काही कार्यक्रमांमध्ये उलटफेर करण्यात आला आहे.

 २ जानेवारीपासूनचे कार्यक्रम 

 जिल्हा परिषद प्रशासनाने नव्याने जाहीर केलेल्या कार्यक्रम पत्रिकेनुसार कार्यक्रम पुढील प्रमाणे आहेत.

2 जानेवारीला सकाळी दहा वाजता अश्व, श्वान, कुक्कुट प्रदर्शन व विविध स्पर्धांचे उद्घाटन होईल.

 महिला व बालकांसाठी विविध स्पर्धा सकाळी 11 वाजता दुपारी दोन वाजता कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन व कृषीनिष्ठ शेतकऱ्यांचा सत्कार होणार आहे.

 लावणी कार्यक्रम २ जानेवारीलाच 

 तर दुपारी ३ वाजता लावणी महोत्सवाचा कार्यक्रम होणार आहे. यापूर्वीच्या नियोजनातही लावणी महोत्सव हा दोन तारखेलाच होता. हे सर्व कार्यक्रम 2 जानेवारी रोजी एकाच दिवशी वेगवेगळ्या वेळी घेण्यात येणार आहे.

 3 जानेवारीला सकाळी 11 वाजता आरोग्य शिबिर होणार आहे. तर याच दिवशी जिल्हा परिषदेमार्फत पारंपारिक लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दुपारी दोन वाजता सुरू होईल.    

४ जानेवारी रोजी सकाळी दुपारी १२वाजता शंकर पटाचे ( बैल जोडी,बैलगाडा शर्यत ) आयोजित करण्यात आली आहे.

 5 जानेवारी रोजी दुपारी अकरा वाजता पशुप्रदर्शन व दुग्ध स्पर्धा बक्षीस वितरण समारोह होणार आहे. तर 5 जानेवारीला दुपारी बारा वाजता कुस्त्यांची दंगल होणार आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावरील कार्यक्रमाचे पुनर्नियोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमांच्या बदललेल्या तारखांना नागरिकांनी, भाविकांनी व श्रद्धाळूंनी लक्षात घ्यावे. राष्ट्रीय दुखवट्यानंतर होणाऱ्या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी केले आहे.

००००००

वृत्त क्रमांक   मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत दावे व हरकती दाखल करण्याच्या कालावधीत वाढ   वाढीव कालावधीचा ...