Friday, July 19, 2024

 वृत्त क्र. 611 

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू


नांदेड, दि. 19 जुलै :- नांदेड जिल्ह्यात 21 जुलै 2024 चे सकाळी 6 वाजेपासून ते 5 ऑगस्ट 2024 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

 
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 21 जुलै चे सकाळी 6 वाजेपासून ते 5 ऑगस्ट 2024 रोजी मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहील. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

 
अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.
00000

 वृत्त क्र. 610

 वृत्त क्र. 609

सैनिकी मुलांचे वसतीगृह विष्णुपुरी येथे प्रवेश प्रक्रिया सुरु


नांदेड, दि. 19 जुलै :- माजी सैनिक, माजी सैनिक विधवा व सेवारत सैनिक आणि इतर नागरीकांच्या महाविद्यालयीन पाल्यांसाठी अत्यल्प दरामध्ये सर्व सोयीयुक्त सैनिकी मुलांच्या वसतिगृहामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. जिल्हयातील सर्व माजी सैनिक/माजी सैनिक विधवा व सेवारत सैनिक आणि इतर नागरीकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी वसतीगृह अधिक्षक यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 8918774880 व 8707608283 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

 

सैनिकी मुलांचे वसतिगृह विष्णुपुरी हे जिल्हा सैनिक कार्यालयांतर्गत चालविण्यात येते.  प्रवेश  सैनिक/ माजी सैनिकांच्या विधवा व सेवारत सैनिक आणि इतर नागरिक पाल्यांना सुद्धा उपलब्ध आहेत.  प्रवेशासाठी प्रवेश अर्ज सैनिकी मुलांचे वसतीगृह, विष्णुपुरी, नांदेड येथे उपलब्ध आहेत. या वसतीगृहात उत्तम जेवणाची सोय (आठवड्यातून तीन वेळा नॉन-वेज/वेज व नाश्त्यामध्ये अंडी), स्वतंत्र अभ्यासिका, जिमखाना, भोजनालय कक्ष तसेच सकाळी पीटी आणि सायंकाळी रोल कॉल या सर्व सोयींनी सज्ज आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाशी संपर्क करावा. तसेच संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असेही आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्यावतीने केले आहे.

0000

 विशेष लेख

मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण

महिलांच्या सक्षमीकरणाला मिळेल चालना


महाराष्ट्र हे देशाला दिशा देणारे राज्य. महाराष्ट्राने सुरू केलेल्या अनेक योजना,उपक्रम व अभियानाचे अनुकरण देशातील अनेक राज्यांनी केले आहे. स्त्री आणि पुरुष ही संसाररूपी जीवनाची दोन चाके आहे. कुटुंबाच्या अर्थार्जनात महिलाही आपला सहभाग देत आहे.महिलांच्या विकासाला चालना मिळाली पाहिजे म्हणून महिला धोरण ठरविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. माझी कन्या भाग्यश्री,लेक लाडकी या मुलींसाठी योजना सुरू केल्या.एवढ्यावरच न थांबता आता महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण ही महत्वकांक्षी योजना सुरू केली आहे.या योजनेमुळे महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य,त्यांच्या आरोग्य व पोषणात सुधारणा होण्यासोबतच कुटुंबात त्यांची निर्णायक भूमिका मजबूत होण्यास मदत होणार आहे.

 

" मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण " या योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करून त्याची व्याप्ती देखील वाढविली आहे.महानगरपालिका क्षेत्राकरिता वार्ड स्तरीय समित्या गठित करण्यात येत आहे. जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळावा,यासाठी अनेक अटी शिथिल करून प्रक्रिया अधिक सुलभ केली आहे. 21 वर्षे ते 65 वर्षे वयोगटातील विवाहित असलेल्या विधवा,घटस्फोटीत,परितक्त्या, निराधार महिला त्याचप्रमाणे कुटुंबातील एका अविवाहित महिलेला दर महिन्याला पंधराशे रुपये त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात थेट डीबीटी प्रणालीच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे.वर्षाकाठी 18 हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.हा पैसा महिलांच्या अडीअडचणीच्या कामी तसेच त्यांच्या आरोग्यविषयक बाबीसाठी खर्च करण्यात कामी पडणार असून त्यांना आत्मनिर्भर,स्वावलंबी व त्यांच्या सशक्तिकरणाला हातभार लागणार आहे.


 योजनेच्या लाभासाठी लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लक्ष 50 हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे.एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.ज्या पात्र महिला स्वतः ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात त्यांच्यासाठी नारी शक्ती दूत हे मोबाईल ॲप्लिकेशन कार्यान्वित करण्यात आले आहे.नवविवाहित महिलेचे नाव रेशनकार्डवर लवकर लावणे शक्य होत नाही,त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे.

महिलेचा जन्म परराज्यात झाला असेल आणि ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यास असेल व त्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत विवाह केला असेल तर अशा बाबतीत तिच्या पतीचा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्याशिवाय महिलेच्या पतीचे पंधरा वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड व पंधरा वर्षांपूर्वीचे मतदान कार्ड देखील ग्राह्य धरण्यात येणार आहे.


आता योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेचे पोस्टातील बँक खातेसुद्धा ग्राह्य धरण्यात येणार आहे. तसेच ऑफलाइन अर्जावरील लाभार्थी महिलेचा फोटो काढून तो ऑनलाइन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात येईल.जिल्ह्यात जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळाला पाहिजे यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे कक्ष सुरू करण्यात आले आहे.या कक्षातून महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात त्याची माहिती देऊन त्यांचे अर्ज भरून घेण्यात येत आहे.जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवर या योजनेचा जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळावा यासाठी आढावा बैठका देखील घेण्यात येत आहे.समित्या गठित करून समितीची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांचे ग्रामीण व शहरी भागात अर्ज भरून घेण्यासाठी बालवाडी सेविका,अंगणवाडी सेविका, नागरी उपजीविका अभियानाचे समूह संघटक,मदत कक्ष प्रमुख,नागरी उपजीविका अभियानाचे समूह संघटक, मदत कक्ष प्रमुख,नागरी अभियानाचे व्यवस्थापक, आशा सेविका,सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. ज्या महिला लाभार्थी " मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" या योजनेच्या लाभासाठी पात्र असतील त्या लाभार्थी महिलांचे केवळ ऑफलाइन अर्ज भरून घेऊन त्यांनाच या योजनेचा लाभ देण्यात येईल मात्र पात्र लाभार्थी महिलांकडून या योजनेचे अर्ज भरून घ्यावे लागणार आहे.


ग्रामस्तरीय समिती ही गाव पातळीवर स्थापन करण्यात येत आहे.या समितीमध्ये ग्रामसेवक,कृषी सहाय्यक,तलाठी,अंगणवाडी सेविका, आशा सेविका,ग्रामरोजगार सेवक व अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी असतील. या समितीचे संयोजक हे ग्रामसेवक तर सदस्य सचिव अंगणवाडी सेविका असतील. ही समिती गाव पातळीवर जास्तीत जास्त महिलांना लाभ देण्यासाठी शिबिराचे आयोजन करून ऑनलाईन व ऑफलाइन पद्धतीने लाभार्थी महिलांची नोंदणी करणार आहे. ऑफलाइन अर्ज लगेच ॲप/ पोर्टलवर भरावे लागणार आहे. या समितीकडून गावातील अंतिम लाभार्थी महिलांची यादी प्रत्येक शनिवारी आणि आवश्यकतेनुसार गाव चावडीवर वाचन करण्यात येणार आहे.ही यादी गावातील ग्रामपंचायत कार्यालय आणि अंगणवाडी केंद्र येथे प्रसिद्ध करण्यात येणार आहे.या यादीवर कोणी आक्षेप घेतले तर त्याचे निराकरण करण्यात येणार आहे तसेच द्विवृत्ती (डुप्लिकेशन) टाळण्यात येईल.लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे आणि ऑनलाईन पोर्टलवर पात्र लाभार्थ्यांची नोंद झाल्यावर नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाचे समूह संघटक,मदत कक्ष प्रमुख,शहर अभियानाचे व्यवस्थापक,आशा सेविका,सेतू सुविधा केंद्र,अंगणवाडी  पर्यवेक्षिका,ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र यांना प्रति लाभार्थी 50 रुपये याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे.


मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्र देणे,अर्ज भरून घेणे यासह संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक केल्यास,या प्रक्रियेत दिरंगाई केल्यास किंवा योजनेच्या लाभासाठी महिलांकडून पैशाची मागणी करण्यात येत असल्याचे निदर्शनास आल्यास अशा अधिकारी,कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. या योजनेतील पात्र महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये म्हणजेच वर्षाला 18 हजार रुपये राज्य सरकार देणार आहे.

 

विवेक खडसे

जिल्हा माहिती अधिकारी,

धाराशिव

 वृत्त क्र. 608

 

जिल्हा उद्योग केंद्राची एमएसएमई क्षेत्रासंदर्भात

सरकारची धोरणे-उपक्रमाबाबत सोमवारी कार्यशाळा 

 

नांदेड, दि. 19 जुलै :- जिल्हा उद्योग केंद्र या कार्यालयाची एमएसएमई क्षेत्रासंदर्भात राज्य व केंद्र सरकारची धोरणे आणि उपक्रम याबाबत एक दिवशीय कार्यशाळा सोमवार 22 जुलै रोजी उद्योग भवन नांदेड येथे सकाळी 9.30 वा. आयोजित करण्यात आली आहे.

 

 ही कार्यशाळा पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली आहे.  या कार्यशाळेस जिल्ह्यातील सर्व औद्योगिक संघटना, नामांकित उद्योजक, उद्योजक व्यवसायाशी संबंधीत सर्व शासकीय विभाग व संस्थांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे.

 

या कार्यशाळेचा उद्देश हा नांदेड जिल्ह्यातील उद्योजकांचे उत्पादन जागतिक बाजारात नेणे हा असून सदर कार्यशाळेत स्थानिक उत्पादनांची गुणवत्ता वाढविणे, निर्यात प्रक्रिया, खरेदीदार आणि विक्रेते शोधणे, निर्यात कर्ज आणि अनुदान योजना, पॅकिंग व ब्रेडींग, आवश्यक चाचण्या या विषयांवर चर्चा होणार आहे. सर्व योजनांची माहिती उद्योजकांना एकाच व्यासपिठावर उपलब्ध होण्याच्या दृष्टीने, जागरुकता वाढविण्यासाठी भागधारकासोबत एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन "IGNITE Maharashtra-2024" या अंतर्गत करण्यात आले आहे. या कार्यशाळेसाठी तज्ज्ञ मान्यवर मार्गदर्शन करतील. जिल्ह्यातील औद्योगिक संघटना, निर्यातदार, नामांकित उद्योजक, उद्योजक व्यवसायाशी संबंधीत सर्व शासकीय विभाग, निर्यातीशी संबंधीत अधिकारी व केंद्र व राज्य शासनाच्या अनुदान योजनेचा लाभ घेतलेल्या यशस्वी उद्योजक यांचा सहभाग राहणार आहे.

 

राज्यासाठी महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या एमएसएमई क्षेत्रावर अधिक भर देऊन त्यांची कार्यक्षमता व उत्पदकता वाढविणे, राज्यात उद्योजकीय वातावरण अधिक व्यापक करून रोजगार, स्वंयरोजगार संधी मोठ्या प्रमाणात निर्माण करणे, एक जिल्हा उत्पादन उपक्रम व निर्यातवद्धीस चालना देण्यासाठी तसेच उद्योगाच्या विकासाकरिता राज्य तसेच केंद्र शासनाचे विविध विभाग त्यांचे उपक्रम व योजना संचालनालयामार्फत राज्यात राबविण्यात येत आहेत, असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी कळविले आहे.

0000

 वृत्त क्र. 607


प्रधानमंत्री पीक विमा योजनेत

सहभागी होण्यासाठी 31 जुलै पर्यंत मुदतवाढ

 

नांदेड दि. 19 जुलै : "प्रधानमंत्री पीक विमा योजना" खरीप हंगाम-२०२४ मध्ये शेतकऱ्यांना ऑनलाइन विमा अर्ज भरण्यास 31 जुलै 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. नांदेड जिल्हयातील  जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केली आहे.

 

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2023 ते रब्बी हंगाम 2025-26 मध्ये अधिसूचित क्षेत्रातील पिकांसाठी राज्यात राबविण्यास 26 जून 2023 च्या शासन निर्णयाद्वारे राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. या योजनेंतर्गत खरीप हंगाम 2024 करिता ऑनलाइन स्वरूपात विमा अर्ज भरण्याची सुविधा 16 जून 2024 पासून सुरू केली असून सहभागाची अंतिम मुदत 15 जुलै 2024 अशी निश्चित करण्यात आली होती.

 

शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होण्यासाठी येणाऱ्या अडचणी विचारात घेऊन योजनेत सहभागासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने 'प्रधानमंत्री पीक विमा योजना' खरीप हंगाम ऑनलाईन विमा भरण्यास 31 जुलै पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

०००००

  वृत्त क्र. 606 


प्रत्येक शाळेत शिक्षण सप्ताह साजरा करण्याचे आवाहन

 

नांदेड, दि. 19 जुलै :- राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त 22 ते 28 जुलै या कालावधीत “शिक्षण सप्ताह” साजरा करण्यात येणार आहे. या शिक्षण सप्ताहात आठवड्याचा प्रत्येक दिवस एका विशिष्ट उपक्रमासाठी नियोजित करण्यात आला आहे. ज्यात शिक्षण व विकासाच्या विविध पैलूंचा समावेश आहे. हा शिक्षण सप्ताह विद्यार्थी, शिक्षक, धोरणकर्ते व भागधारक यांच्यामध्ये सहकार्य वाढविणारा ठरणारा आहे. शिक्षण सप्ताहामध्ये पुढीलप्रमाणे उपक्रम राबविण्याबाबत आयुक्त (शिक्षण) पुणे यांनी सूचित केले आहे. त्यानुसार शिक्षण सप्ताहातील उपक्रम पुढील वेळापत्रकाप्रमाणे शाळेत राबवून व तसा अहवाल शिक्षणाधिकारी (मा.) जिल्हा परिषद कार्यालयास पाठवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेमार्फत करण्यात आले आहे.    

 

सोमवार 22 जुलै रोजी अध्ययन-अध्यापन साहित्य दिवस. मंगळवार 23 जुलै रोजी मुलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस. बुधवार 24 जुलै रोजी क्रीडा दिवस. गुरुवार 25 जुलै रोजी सांस्कृतिक दिवस. शुक्रवार 26 जुलै रोजी कौशल्य व डिजीटल उपक्रम दिवस. शनिवार 27 जुलै रोजी मिशन लाईफच्या दृष्टीक्षेपात एकोक्लब उपक्रम,शालेय पोषण दिवस. रविवार 28 जुलै रोजी समुदाय सहभाग दिवस याप्रमाणे उपक्रमांची नांदेड जिल्ह्यामध्ये शिक्षण सप्ताहाची यशस्वीरित्या अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनांच्या सर्व माध्यमांच्या मुख्याध्यापकांनी जास्तीत जास्त संख्येनी सहभागी व्हावे, असेही आवाहन केले आहे.

000

वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...