Friday, December 22, 2023

 वृत्त क्र. 883 

सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी

27 डिसेंबर रोजी अर्धापूर, मुदखेड येथे मेळावा 

नांदेड (जिमाका) दि. 22 :- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाद्वारे स्वयंरोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी  बुधवार 27 डिसेंबर 2023 रोजी पंचायत समिती सभागृह अर्धापूर व पंचायत समिती सभागृह मुदखेड येथे सकाळी 10 वा. मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या तालुक्यातील पात्र व होतकरु सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे.

या मेळाव्यात कर्ज मंजुरीचे प्रस्ताव, अर्ज अपलोड करणे, मंजुरीच्या प्रक्रियेबाबत जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयाचे अधिकारी तसेच बँकेचे अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. या योजनेचा  लाभ घेण्यासाठी सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी अनुषंगिक व आवश्यक त्या कागदपत्रांसह या मेळाव्यास उपस्थित रहावे. तसेच कर्ज प्रस्ताव प्रलंबित असलेल्या अर्जदारांनीही आवश्यक त्या कागदपत्रासह/कारणासह पूर्ततेसाठी उपस्थित रहावे, असे कळविले आहे.

सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींची वाढती संख्या व उद्योग व्यवसाय क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या विविध संधी विचारात घेऊन उद्योजकतेला चालना देणारी व सर्जनशिलतेला कालानुरुप वाव देणारा सर्वसमावेश कार्यक्रम शासनाने ऑगस्ट-2019 पासून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम सुरु केलेला आहे. सन 2023-24 नांदेड जिल्हयास एकुण 900 युवक युवतींना वित्तीय संस्थेच्या माध्यमातून लाभ देण्याचे महाराष्ट्र शासनाचे लक्षांक आहे. 

मेळाव्यास येताना आधार कार्ड. पॅन कार्ड,रहिवासी दाखला,शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र,दोन फोटो,व्यवसायाचा प्रकल्प अहवाल,जातीचा दाखला, व्यवसायानुंषिक इतर परवाने ही आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत.  ही योजना ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत असून अधिक माहितीसाठी सदर योजनेचे https://maha-cmegp.gov.in या संकेतस्थळ आहे. तालुक्यातील व परिसरातील पात्र-होतकरु सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी या मेळाव्यास उपस्थित राहून या योजनेचा लाभ घ्यावा, असेही आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे.

000000

वृत्त क्र. 882 

सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी

26 डिसेंबर रोजी नायगाव, बिलोली येथे मेळावा 

नांदेड (जिमाका) दि. 22 :- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाद्वारे स्वयंरोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी  मंगळवार 26 डिसेंबर 2023 रोजी पंचायत समिती सभागृह नायगाव व पंचायत समिती सभागृह बिलोली येथे सकाळी 10 वा. मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या तालुक्यातील पात्र व होतकरु सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे.

या मेळाव्यात कर्ज मंजुरी प्रस्ताव, अर्ज अपलोड करणे, मंजुरीच्या प्रक्रियेबाबत जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयाचे अधिकारी तसेच बँकेचे अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. या योजनेचा  लाभ घेण्यासाठी सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी अनुषंगिक व आवश्यक त्या कागदपत्रांसह या मेळाव्यास उपस्थित रहावे. तसेच कर्ज प्रस्ताव प्रलंबित असलेल्या अर्जदारांनीही आवश्यक त्या कागदपत्रासह/कारणासह पूर्ततेसाठी उपस्थित रहावे, असे कळविले आहे.

सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींची वाढती संख्या व उद्योग व्यवसाय क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या विविध संधी विचारात घेऊन उद्योजकतेला चालना देणारी व सर्जनशिलतेला कालानुरुप वाव देणारा सर्वसमावेश कार्यक्रम शासनाने ऑगस्ट-2019 पासून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम सुरु केलेला आहे. सन 2023-24 नांदेड जिल्हयास एकुण 900 युवक युवतींना वित्तीय संस्थेच्या माध्यमातून लाभ देण्याचे महाराष्ट्र शासनाचे लक्षांक आहे. 

मेळाव्यास येताना आधार कार्ड. पॅन कार्ड,रहिवासी दाखला,शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र,दोन फोटो,व्यवसायाचा प्रकल्प अहवाल,जातीचा दाखला, व्यवसायानुंषिक इतर परवाने ही आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत.  ही योजना ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत असून अधिक माहितीसाठी सदर योजनेचे https://maha-cmegp.gov.in या संकेतस्थळ आहे. तालुक्यातील व परिसरातील पात्र-होतकरु सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी या मेळाव्यास उपस्थित राहून या योजनेचा लाभ घ्यावा, असेही आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे.

000000

 वृत्त क्र. 881

 

पीक कापणी प्रयोगानुसार

नांदेड जिल्ह्याची आणेवारी 50 पैशापेक्षाही कमी

 

नांदेड (जिमाका) दि. 22 :- नांदेड जिल्ह्यातील 1562 महसूल गावांमध्ये 15 डिसेंबर 2023 रोजी खरीप हंगाम 2023 अन्वये अंतिम पैसेवारी ही 50 पैसे पेक्षा कमी जाहीर करण्यात आली आहे. आणेवारी काढण्याची पद्धत शासनाने निश्चित करून दिलेली आहे. आणेवारी ही केवळ पर्जन्यमानावर अवलंबून नसते. पीक कापणी प्रयोगानुसार ही पैसेवारी जाहीर केली जाते.

 

यंदा नांदेड जिल्ह्यात 99 टक्के पर्जन्यमान झाले असले तरी पावसाळ्याच्या पहिल्या कालखंडात काही तालुक्यातील महसुली मंडळात अतिवृष्टी झालेली आहे. या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. काही मंडळांमध्ये पर्जन्यमानाच्या कालावधीत 15 ते 21 दिवसांचा खंड पडलेला होता. खंड पडलेल्या पावसामुळे हलक्या जमिनीवर असलेले सोयाबीन पीक करपून गेल्याचे प्रशासनाच्या पाहणीत आढळून आले आहे.  मध्यम आणि भारी जमिनीमध्ये असलेल्या सोयाबीन पिकांची वाढ खुंटलेली जाणवली. परिणामी पिकांच्या उत्पन्नात घट देखील झाल्याच्या नोंदी आहेत. शेतीचे उत्पन्न कमी झाल्यामुळे पैसेवारी हा कृषी उत्पादनाचा इंडिकेटर कमी होतो. पिक विमा कंपनीने  स्वतंत्र सर्वेक्षण करून अतिवृष्टी हा ट्रिगर लक्षात घेऊन मध्यावधी नुकसान जाहीर केले आहे.

 

मध्यम किंवा गंभीर दुष्काळ

ज्या तालुक्यांमध्ये मध्यम किंवा गंभीर दुष्काळ असल्याचे सूचित करणारा ट्रिगर- 2 लागू होतो त्या तालुक्यांमध्ये पिकांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण अर्थात ग्राउंड ट्रुथींग  केली जाते. या ग्राउंड ट्रुथींग  नुसार मध्‍यम किंवा  गंभीर स्‍वरुपाचा दुष्‍काळ जाहिर केला जातो. नांदेड जिल्ह्याची आणेवारी 50 पैशांपेक्षा कमी आलेली असली तरी देखील जिल्ह्यात अद्यापही दुष्काळ व्यवस्थापन संहिते मधील तरतुदीनुसार दुष्काळ जाहीर करण्यात आलेला नाही.जून ते सप्टेंबर 2023 या कालावधीत 75 टक्के पेक्षा कमी व एकूण पर्जन्यमान साडेसातशे मि.मी पेक्षा कमी झाले आहे अशा जिल्ह्यातील 8 तालुक्यातील 25 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आलेली आहे.जिल्ह्याची पैसेवारी कमी असणे म्हणजे कोरडा दुष्काळ नव्हे.पैसेवारी ही पर्जन्यमानासोबतच पर्जन्याचे असमान वितरण, पिकांवरील रोगराई, कीटकांचा प्रादुर्भाव आदी घटकांवर आधारित असते. सोयाबीन हे नांदेड जिल्ह्याचे  मुख्य खरीप पीक आहे. या पिकावर यल्लो मोजॅक व्हायरस, खोडकुज, मूळकूज या बुरशीजन्य आजारांमुळे देखील मुख्य उत्पन्न असलेल्या सोयाबीनची उत्पादकता घटली आहे. नांदेड जिल्ह्याची पीक पैसेवारी 50 पैसे पेक्षा कमी असली तरी दुष्काळ व्यवस्थापन संहिते मधील तरतुदीनुसारच दुष्काळ जाहीर केला जातो. 

0000

वृत्त क्र. 880

माळेगाव यात्रेच्या यशस्वीतेसाठी सर्व स्तरातून सहकार्याची भूमिका आवश्यक

नांदेड (जिमाका) दि. 22 :- आपल्या नांदेड जिल्ह्यासह शेजारील कर्नाटक, तेलंगणा राज्यातील अनेक भक्तांचा ओढा हा माळेगावकडे असतो. असंख्य लोकांचे माळेगाव येथील खंडोबा कुलदैवत असून येथील जत्रा ही मागील अनेक वर्षांपासून भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र म्हणून ओळखल्या गेले आहे. याचबरोबर येथील यात्रेत असंख्य भक्तांना करमणुकीसह वेगळा विरंगुळाही मिळतो. लहान-मोठे सर्वच यात्रेत आनंद घेतात. पूर्वापार परंपरेने ही यात्रा सुरू असून या यात्रेतील विविध उत्सवाला सकारात्मकतेने प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्याची प्रशासकीय भूमिका अधिक महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केले. 

श्री क्षेत्र माळेगाव येथील यात्रेच्या पूर्वतयारीसाठी स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घेवून नियोजनाच्या दृष्टीने आज माळेगाव येथे बैठक संपन्न झाली. या बैठकीस खासदार सुधाकर श्रृंगारे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, उपविभागीय अधिकारी शरद मंडलीक, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, माळेगावच्या सरपंच कमलाबाई रुस्तुमराव धुळगंडे, प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, उप मुख्य कार्यकारी अधिकारी मंजूषा कापसे, पशुवैद्यकिय विभागाचे उपायुक्त डॉ. राजकुमार पडिले, जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. भुपेंद्र बोधनकर व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

यात्रेच्या परंपरेप्रमाणे येथील पशुप्रदर्शन, शंकरपट याकडे भाविकांचा अधिक ओढा असतो. यासाठी खासदार सुधाकर श्रृंगारे व माझी सहमती आहे. पशुधनाच्या विविध स्पर्धेसह पशुपालकांचा, प्रगतशील शेतकऱ्यांचा, यात्रेत आपले कौशल्य दाखविणाऱ्या कलावंतांची अपेक्षा ही यात्रेच्या माध्यमातून खंडेरायाच्या दरबारात योग्य तो सन्मान व्हावा एवढीच अपेक्षा असते. यासाठी जिल्हा परिषदेने विशेष खबरदारी घेऊन प्रत्येकाच्या हक्काचे सन्मान हे त्या-त्या कार्यक्रमातच दिले जावेत याची विशेष काळजी घ्यावी, असे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी स्पष्ट केले. 

येथील घोड्यांचा बाजार हे या यात्रेचे वैशिष्ट्ये आहे. यात्रेकरूंना त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. कोरोनाचा एक दुसरा व्हेरिएंट आला असून त्याबाबत देशपातळीवर खबरदारी व काळजी घेतली जात आहे. अशा स्थितीत आरोग्याशी तडजोड नको. यात्रेतील भाविकांसह सर्वांना पिण्याचे पाणी हे तपासणी करूनच दिले पाहिजे. याचबरोबर बाजारात विकल्या जाणाऱ्या अन्न पदार्थांची वेळोवेळी तपासणी करून कसल्याही प्रकारची विषबाधा अथवा अनुचीत प्रकार होणार नाही याची खबरादारी घेण्याचे निर्देश खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी दिले. माळेगावसह माझ्या मतदारसंघातील असलेल्या गावांच्या विकास कामांना आजवर 50 कोटी रूपये एवढा निधी उपलब्ध करून देता आला याचे समाधान असल्याचे त्यांनी सांगितले. 

यात्रेतील पावित्र्य, सामाजिक सलोखा, शांतता याबाबत कोणतीही तडजोड जिल्हा प्रशासनातर्फे केली जाणार नाही. यात्रेत कोणतेही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, पोलीस विभाग दक्ष आहे. याचबरोबर माळेगावच्या ग्रामस्थही अधिक दक्षता घेतील, असा विश्वास प्रशासनातर्फे व्यक्त करण्यात आला. 

यात्रेच्या सुरक्षेच्यादृष्टीने सुमारे 1 हजार 338 पोलीस कर्मचारी पोलीस विभागातर्फे नेमण्यात आले आहेत. यात 400 होमगार्ड आहेत. यात्रेतील महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षतेच्यादृष्टिने सीसीटीव्ही लावले जाणार आहेत. याचबरोबर अशा ठिकाणी हायमास्क लावले जाणार असून सीसीटीव्हीचे नियंत्रण हे पोलीस कक्षात ठेवण्यात आले आहे. यात्रेतील भक्ताच्या आनंद उत्सवाला सर्वाधिक प्राधान्य दिले गेले असून यात जर कोणी अडथळा अथवा गैरकृत्य केल्यास अशा संबंधीत व्यक्तींविरूद्ध तातडीने कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. 

10 जानेवारी ते 14 जानेवारी 2024 या पाच दिवसांच्या कालावधीत विविध महोत्सव व उपक्रमाचे आयोजन केले आहे. यात 10 जानेवारी रोजी देवस्वारी-मिरवणूक व विविध स्टॉल्सचे उद्घाटन, 11 जानेवारी रोजी कृषी प्रदर्शन, विविध स्पर्धा, पशु प्रदर्शन, 12 जानेवारी रोजी कुस्त्यांची दंगल, 13 जानेवारी रोजी लावणी व कलामहोत्सव, 14 जानेवारी कला महोत्सव व समारोप असे प्राथमिक नियोजन असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्यावतीने देण्यात आली. 

पशुपक्षी बाजार व खरेदी विक्री

सदर यात्रा ही जवळपास एक महिनाभर चालते. यात इथला जनावराचा बाजार हा सर्वदूर ओळखला जातो. यात घोडे, उंट, गाय, बैल, म्हैस, रेडे, गाढव, शेळया, मेंढया, कुत्रे आदी पशु पक्षी इतर राज्यातूनही लोक घेवून येतात. शासनाचा वन्य पशुपक्षांचा कायदा अंमलात आणल्यापासून कायद्याप्रमाणेच आता हा बाजार भरतो. कायद्यातील तरतुदीप्रमाणे या यात्रेतील इतर सर्व उपक्रम यशस्वी घेण्यासाठी योग्य ते नियोजन केले जाईल असे जिल्हा परिषदेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले.

0000













Thursday, December 21, 2023

वृत्त क्र. 879

 एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कूलमध्ये

प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन 

नांदेड, (जिमाका) दि. 21 :- एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, किनवट अंतर्गत इंग्रजी माध्यमाच्या एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कुलमध्ये प्रवेशासाठी  स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. ही प्रवेश परीक्षा शासकीय आश्रमशाळा बोधडी ता. किनवट जि. नांदेड व एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कूल, सहस्त्रकुंड ता. किनवट जि. नांदेड येथे रविवार 25 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेत घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी विहित नमुन्यातील प्रवेश अर्ज किनवट प्रकल्प कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या सर्व शासकीय अनुदानीत आश्रमशाळा व एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कुल, सहस्त्रकुंड मुख्याध्यापकाकडे विनामुल्य उपलब्ध आहेत.

आदिवासी विकास विभागाच्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळा जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगर पालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच सर्व शासनमान्य अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळेतील सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 5 वी, 6 वी, 7 वी, व 8 वी मध्ये शिकत असलेल्या अनुसूचित/आदिम जमातीचे विद्यार्थी इंग्रजी माध्यमाच्या एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कुलमध्ये प्रवेश परिक्षेसाठी पात्र राहणार आहेत. 

पात्र विद्यार्थ्यांचे पूर्ण भरलेले विहित नमुन्यातील प्रवेश अर्ज संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी 17 फेब्रुवारी, 2024 पर्यंत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, किनवट जि. नांदेड यांच्याकडे सादर करावेत, असे प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी एस कार्तीकेयन यांनी  प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

0000 

सुधारित वृत्त क्र. 878

हॉटेल, खानावळ, ढाब्यावर अवैधरित्या दारु विक्रीचे गुन्हे दाखल

 ·         मद्यसेवन करणाऱ्या ग्राहकांना अटक

·         राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- नांदेड येथील नमस्कार चौक परिसरातील हॉटेल, खानावळ व ढाब्यावर परवाना नसतांना दारूची विक्री केल्याप्रकरणी छापा टाकून कायदेशीर कारवाई करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अतुल कानडे यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथकाने दि. 19 व 20 डिसेंबर रोजी अचानकपणे दारुच्या गुत्त्यावर छापे टाकले.

 

नमस्कार चौक येथील रानाजी हॉटेल, राजवाडा ढाबा, स्वागत ढाबा येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 68 व 84 प्रमाणे कारवाई करून चालक व मद्यपींवर गुन्हे दाखल केले. यात चालकांशिवाय एकुण 7 मद्यसेवन करणाऱ्या व्यक्तींविरूद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 84 प्रमाणे कारवाई करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ढाबाचालकास प्रत्येकी 35 हजार रूपये व मद्यसेवन करणाऱ्या ग्राहकांना प्रत्येकी 500 रुपयाप्रमाणे दंड ठोठावला. वरील तीनही कारवाईमध्ये धाबा मालक आरोपींना एकुण 1 लाख 5 हजार रुपये व 7 मद्यसेवन करणाऱ्या आरोपींना 3 हजार 500 रुपये एवढा दंड ठोठावला.

 

अनुज्ञप्ती नसतांना मद्यसेवनास परवानगी द्याल

तर दंडासह 5 वर्षांपर्यंत होईल कारवाई

- राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक अतुल कानडे

 

शासनमान्य अनुज्ञप्ती नसतांना कोणत्याही हॉटेलमध्ये / ढाबा येथे जर ग्राहकांना मद्यसेवनास परवानगी दिली तर यात परवानगी देणारे आणि पिणारे या दोघांवर कायदेशीर कारवाई होईल. यात 3 ते 5 वर्षांपर्यंत कारवासाची शिक्षा असून महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 68 (क), (ख) अन्वये ही कारवाई होईल. आर्थीक दंडाचीही यात कारवाई असून 25 हजार ते 50 हजार रुपयांपर्यंतचा दंड अथवा दोन्ही प्रकारची कारवाई केली जाईल, असा इशारा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक अतुल कानडे यांनी दिली. महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 84 अन्वये कोणत्याही अनुज्ञप्ती नसलेल्या ठिकाणी मद्य पिल्यास तर त्यांना 5 हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. नागरिकांनी कुठल्याही अवैध ढाब्यावर किंवा अवैध ठिकाणी दारू पितांना आढळून आल्यास ढाबा मालकासह मद्यसेवन करणाऱ्या व्यक्तीविरूद्ध कडक कारवाई करू, असे त्यांनी स्पष्ट केले. अवैध मद्यनिर्मिती, विक्री, वाहतूक यासंदर्भात कोणाचीही तक्रार असल्यास विभागाचा टोल फ्री क्रमांक 18002339999, व्हॉटसॲप क्र. 8422001133 तसेच दूरध्वनी क्र. 02462-287616 या क्रमांकावर संपर्क करावा.

00000





वृत्त क्र. 877

 तुर खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन

नांदेड, (जिमाका) दि. 21 :-  नाफेडच्या वतीने पीएसएफ योजनेअंतर्गत हंगाम 2023-24 मध्ये बाजार भावाने तुर खरेदी करण्यासाठी पणन महासंघाच्या संस्थाकडून शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी सुरु झाली आहे. अर्धापूर, हदगाव, कासराळी, देगलूर येथील केंद्राना असे निर्देश देण्यात आले आहेत. नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांना आधार कार्ड, अचुक बँक खाते आणि ऑनलाईन पिक पेरा असलेला सातबारा आवश्यक आहे. तरी या योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी राजेश हेमके यांनी केले आहे.  

0000

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...