Thursday, December 21, 2023

सुधारित वृत्त क्र. 878

हॉटेल, खानावळ, ढाब्यावर अवैधरित्या दारु विक्रीचे गुन्हे दाखल

 ·         मद्यसेवन करणाऱ्या ग्राहकांना अटक

·         राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- नांदेड येथील नमस्कार चौक परिसरातील हॉटेल, खानावळ व ढाब्यावर परवाना नसतांना दारूची विक्री केल्याप्रकरणी छापा टाकून कायदेशीर कारवाई करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अतुल कानडे यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथकाने दि. 19 व 20 डिसेंबर रोजी अचानकपणे दारुच्या गुत्त्यावर छापे टाकले.

 

नमस्कार चौक येथील रानाजी हॉटेल, राजवाडा ढाबा, स्वागत ढाबा येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 68 व 84 प्रमाणे कारवाई करून चालक व मद्यपींवर गुन्हे दाखल केले. यात चालकांशिवाय एकुण 7 मद्यसेवन करणाऱ्या व्यक्तींविरूद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 84 प्रमाणे कारवाई करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ढाबाचालकास प्रत्येकी 35 हजार रूपये व मद्यसेवन करणाऱ्या ग्राहकांना प्रत्येकी 500 रुपयाप्रमाणे दंड ठोठावला. वरील तीनही कारवाईमध्ये धाबा मालक आरोपींना एकुण 1 लाख 5 हजार रुपये व 7 मद्यसेवन करणाऱ्या आरोपींना 3 हजार 500 रुपये एवढा दंड ठोठावला.

 

अनुज्ञप्ती नसतांना मद्यसेवनास परवानगी द्याल

तर दंडासह 5 वर्षांपर्यंत होईल कारवाई

- राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक अतुल कानडे

 

शासनमान्य अनुज्ञप्ती नसतांना कोणत्याही हॉटेलमध्ये / ढाबा येथे जर ग्राहकांना मद्यसेवनास परवानगी दिली तर यात परवानगी देणारे आणि पिणारे या दोघांवर कायदेशीर कारवाई होईल. यात 3 ते 5 वर्षांपर्यंत कारवासाची शिक्षा असून महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 68 (क), (ख) अन्वये ही कारवाई होईल. आर्थीक दंडाचीही यात कारवाई असून 25 हजार ते 50 हजार रुपयांपर्यंतचा दंड अथवा दोन्ही प्रकारची कारवाई केली जाईल, असा इशारा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक अतुल कानडे यांनी दिली. महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 84 अन्वये कोणत्याही अनुज्ञप्ती नसलेल्या ठिकाणी मद्य पिल्यास तर त्यांना 5 हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. नागरिकांनी कुठल्याही अवैध ढाब्यावर किंवा अवैध ठिकाणी दारू पितांना आढळून आल्यास ढाबा मालकासह मद्यसेवन करणाऱ्या व्यक्तीविरूद्ध कडक कारवाई करू, असे त्यांनी स्पष्ट केले. अवैध मद्यनिर्मिती, विक्री, वाहतूक यासंदर्भात कोणाचीही तक्रार असल्यास विभागाचा टोल फ्री क्रमांक 18002339999, व्हॉटसॲप क्र. 8422001133 तसेच दूरध्वनी क्र. 02462-287616 या क्रमांकावर संपर्क करावा.

00000





No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...