Friday, August 4, 2023

 वृत्त क्र. 471

पीएम किसान योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना

ई-केवायसी प्रमाणीकरण करण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 4 :-  पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कुटूंबनिहाय प्रति वर्ष 6 हजार रुपये इतके आर्थिक सहाय्य 3 टप्प्यामध्ये उपलब्ध करुन देण्यात येते. या योजनेअंतर्गत चुकीने मयत मार्क केलेल्या तथापि पात्र असलेल्या लाभार्थ्यानी पी.एम. किसान जीओआय (PMKISAN GOI) या ॲपचा वापर करुन पात्र करण्याच्या सुविधेचा वापर करावा. तसेच फेस ऑथेंटीफिकेशन द्वारे ई-केवायसी प्रमाणिकीकरण करुन पीएम किसान योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.


शासन, कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग यांचे परिपत्रकानुसार केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु करण्यात आली आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पोर्टलवर चुकीने मयत मार्क केलेल्या लाभार्थ्यांना केंद्र शासनाने विकसित केलेल्या पीएम किसान जीओआय (PMKISAN GOI)या ॲपचा वापर करुन पात्र करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. चुकीने मयत मार्क केलेल्या तथापी पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे या ॲपद्वारे फेस आर्थटीफिकेशन मोडयुलचा वापर करुन ई-केवायसी प्रमाणिकरण करता येईल. याप्रमाणे मयत ठरविलेल्या लाभार्थ्याचे फेस ऑथेंटीफिकेशन द्वारे ई-केवायसी प्रमाणीकरण केल्यावर सदरचा लाभार्थी पीएम किसान योजनेच्या लाभासाठी पात्र ठरेल. याशिवाय अशा लाभार्थीचे ई-केवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी सामाईक सुविधा केंद्राकडील बायोमेट्रीक पध्दतीचा सुध्दा वापर करता येईल. जेणेकरुन असे लाभार्थी पीएम किसान योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाहीत. सद्यस्थितीत पीएम किसान योजनेच्या 14 व्या हप्त्याचे वितरण माहे जुलै 2023 पासून सुरू आहे.

00000

 जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 

नांदेड (जिमाका) दि. 4 :- नांदेड जिल्ह्यात 11 ऑगस्ट 2023 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

 

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 11 ऑगस्ट 2023 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहील. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

00000

वृत्त

 जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध

 नांदेड (जिमाका), दि. 4 :-  जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड येथील जुन्या वर्तमानपत्राची रद्दी, कालबाह्य अन्य नियतकालिके इत्यादींची आहे त्या परिस्थितीत विक्री करावयाची आहे. ज्यांना रद्दी घ्यावयाची असेल त्यांना कार्यालयीन वेळेत रद्दी पाहावयास मिळेल. त्यासाठी खरेदीदार संस्थाकडून प्रती किलो प्रमाणे खरेदी दरपत्रकाची निविदा गुरुवार दि. 17 ऑगस्ट, 2023 पर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दाखल करावीत. इच्छूकांनी आपले लिफाफा बंद दरपत्रक ‘जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, पार्वती निवास, खुरसाळे हॉस्पिटल, यात्री निवास रोड, बडपूरा, नांदेड -431601’ या पत्यावर कार्यालयीन वेळेत दाखल करावेत. या संदर्भातील अटी व शर्ती या कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रदर्शित करण्यात आल्या आहेत, असे जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड यांनी कळविले आहे.

      रद्दी विक्रीचे दरपत्रक मंजूर करणे अथवा रद्द करणे हे सर्व अधिकार जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड यांना राहतील. 

000000

Thursday, August 3, 2023

 विशेष लेख

 

“मेरी माटी मेरा देश” अभियानासाठी

नांदेड जिल्हा प्रशासकिय यंत्रणा सज्ज

 

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त “हर घर तिरंगा” अभियानाने सारा देश देशभक्तीने जागा झाला. या अमृत महोत्सवी वर्षाची सांगता येत्या 15 ऑगस्ट 2023 रोजी होत आहे. याचे औचित्य साधून यावर्षी “मेरी माटी मेरा देश” या संकल्पनेला जनमाणसापर्यंत विविध उपक्रमाच्या माध्यमातून पोहोचविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यानुसार महाराष्ट्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार “मेरी माटी मेरा देश” नांदेड जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा होण्यासाठी सर्व प्रशासकिय यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सर्व विभाग प्रमुखांची व्यापक बैठक घेऊन हा लोकोत्सव व्हावा यादृष्टिने नियोजन केले आहे.

 

गावातील शहीद व्यक्तींचे उभारले जाणार शिलाफलक

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतांना ज्यांनी या स्वातंत्र्यासाठी आपले जीवन दिले असा विरांच्या बलिदानाला आणि योगदानाला नव्या पिढीपर्यंत पोहोचविता यावे यादृष्टिने ग्रामपंचायत अंतर्गत शिलाफलक उभारण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. याचबरोबर ज्या व्यक्तींनी निस्वार्थपणे देशाची सेवा केली आहे व ज्यांनी बलिदान दिले त्यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करून 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत श्रद्धांजलीही अर्पण केली जाणार आहे. शिलाफलकाच्या उभारणीसाठी जागेची निवड अमृत सरोवर, शाळा, ग्रामपंचायत अथवा गावातील प्रेरणा स्थान आदी ठिकाणी करण्यात यावी, असे निर्देश असून जागा निवड व बांधकामाकरीता ग्रामपंचायतीचा ठराव करून पंचायत समिती स्तरावरून पुढील कार्यवाही तात्काळ करण्यास सांगण्यात आले आहे. यासाठी 5 बाय 3 फुट आकार निश्चित करण्यात आला आहे.

 

गावोगावी घेतली जाणार पंच प्रण प्रतिज्ञा

जन्मभूमी आणि स्वातंत्र्याचा अत्यंत भावनिक संबंध आपण जपत आलो आहोत. विकसित भारताचे आपण लक्ष ठेवले आहे. गुलामीच्या प्रत्येक अंशापासूनची मुक्ती, आपल्या समृद्ध वारसेचा अभिमान, एकता आणि एकजूटता व नागरिकांमध्ये कर्तव्याची भावना हे देशाच्या समृद्धीचे अत्यंत महत्वाचे लक्षण म्हणून समजले जाते. देशाचा स्वाभिमान जपण्यासमवेत नागरिक म्हणून आपली कर्तव्य भावना व जागरूकता वृद्धींगत व्हावी यासाठी पंच  प्रण प्रतिज्ञा गावोगावी घेतली जाणार आहे. या संदर्भात प्रत्येक ग्रामपंचायतींना कळविण्यात आले आहे.

 

वसुधा वंदन

ज्या गावकुसात, पंचक्रोशीत आपण राहतो त्या परिसरात या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून पुढील पिढ्यांसाठी साक्षीदार ठरतील अशी दीर्घकाळ टिकणारी 75 झाडांचे वृक्षारोपन करून एक वेगळा संदेश गावोगावी दिला जाणार आहे. सदर रोपाचे जतन व्हावे यादृष्टीने ग्राम रोजगार सेवक यासाठी योगदान देईल. याचबरोबर गावातील नागरिकही दक्षता घेतील. सामाजिक वनीकरणाच्या रोपवाटिकेद्वारे ही रोपे ग्रामपंचायतींना घेता येतील.

 

विरांनाही केले जाईल वंदन

ज्यांनी निस्वार्थपणे देशाची सेवा करून आपले बलिदान दिले त्यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याकरीता स्वातंत्र्य सैनिक, सेवानिवृत्त संरक्षण कर्मचारी, केंद्रीय शसस्त्र पोलीस दलाचे कर्मचारी, राज्य पोलीस दलाचे कर्मचारी यांना याअंतर्गत सन्मानित करून कृतज्ञता व्यक्त केली जाईल.

 

गावोगावी होणार ध्वजारोहण व राष्ट्रगान

भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त नित्यराजशिष्टाचाराप्रमाणे गावोगावी ध्वजारोहण व राष्ट्रगान गायले जाईल. याचबरोबर गतवर्षी प्रमाणे घरोघरी तिरंगा अभियानाचे नियोजन करून यासंदर्भात ग्रामपंचायत पातळीवर समन्वय साधण्याचे निर्देश ग्रामपंचायतींना दिलेले आहेत.

 

राजधानीतील कर्तव्य पथावर अमृतवाटिकेसाठी

प्रत्येक गावातील असेल मातीचे अंश

या अभियानांतर्गत राष्ट्रप्रेमासह सद्भावना व निसर्गाप्रती कृतज्ञता अभिव्यक्त व्हावी यावर भर देण्यात आला आहे. यादृष्टिने प्रत्येक गावातील माती एका कलशातून एकत्र करून ती राजधानी दिल्ली येथे कर्तव्यपथावर अमृतवाटिकेसाठी पाठविण्यात येणार आहे. प्रत्येक गावातील मुठभर मातीतून हा अखंडतेचा संदेश यातून रुजला जाईल. 27 ते 30 ऑगस्ट या कालावधीत हा कलश प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थित होणाऱ्या विशेष कार्यक्रमासाठी तालुकास्तरावरील प्रथीतयश युवकाच्या हस्ते पाठविण्यात येणार आहे.

 

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल व इतर शासकीय विभागाच्या समन्वयातून हा उपक्रम अधिक व्यापक करण्यावर भर दिला जात आहे. नागरिकांनीही यासाठी उत्स्फूर्त सहभाग घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

 

-   विनोद रापतवार,

जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड  

Wednesday, August 2, 2023

 मतदार जागृतीसाठी

“अभिव्यक्ती मताची” स्पर्धेचे आयोजन

 

नांदेड (जिमाका) दि. 2 :- विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलतेचा मतदार जागृतीसाठी उपयोग करून घेण्याच्या दृष्टीने मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे “अभिव्यक्ती मताची” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. “अभिव्यक्ती मताची” या विषयांतर्गत जाहिरात निर्मिती, भित्तिपत्रक (पोस्टर) आणि घोषवाक्य या तीन स्पर्धा आयोजित केल्या आहेत. या स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातील जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या (मास मीडिया व जर्नलिजम) महाविद्यालयाचे आणि सर्जनशील कलाशिक्षण महाविद्यालये (Art collegs) येथील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. या स्पर्धेचा कालावधी 1 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर 2023 हा आहे. तीनही स्पर्धांचे विषय आणि नियमावल्या मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. महाराष्ट्रातील जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या आणि सर्जनशील कलाशिक्षण महाविद्यालयांच्या अधिकाधिक विद्यार्थ्यांना या स्पर्धांमध्ये भाग घ्यावा, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले आहे.

 

या स्पर्धेसाठी विषय पुढीलप्रमाणे आहेत. युवा वर्ग आणि मताधिकारी, मताधिकार लोकशाहीचा स्तंभ, एका मताचे सामर्थ्य, सक्षम लोकशाहीतील मतदाराची भूमिका / जबाबदारी, लोकशाहीतील सर्वसमावेशकता आणि मताधिकार, तीनही स्पर्धाचे माध्यम मराठी, हिंदी आणि इंग्रजी आहे. या स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आलेली आहेत. या बक्षिसांचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे. जाहिरात निर्मिती स्पर्धेसाठी पहिले पारितोषिक 1 लाख रुपये, दुसरे पारितोषिक 75 हजार, तिसरे पारितोषिक 50 हजार रुपये आणि दोन उत्तेजनार्थ पारितोषिक 10 हजार रुपयांची आहेत. भित्तिपत्रका (पोस्टर) स्पर्धेसाठी पहिले पारितोषिक 50 हजार रुपये, दुसरे पारितोषिक 25 हजार रुपये आणि तिसरे पारितोषिक 10 हजार रुपये आणि दोन उत्तेजनार्थ पारितोषिक प्रत्येकी 5 हजार रुपयांची आहेत. घोषवाक्य स्पर्धेसाठी पहिले पारितोषिक 25 हजार रुपये, दुसरे पारितोषिक 15 हजार रुपये, तिसरे पारितोषिक 10 हजार रुपये आणि दोन उत्तेजनार्थ पारितोषिक प्रत्येकी 5 हजार रुपयांची आहेत, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

0000 

 नवमतदारांनी मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी घ्यावा पुढाकार

- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
▪️1 जानेवारी 2024 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्यांचा मतदार यादीत होणार समावेश
▪️मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेट देऊन करणार पडताळणी
▪️एकत्रीत प्रारूप मतदार यादी 17 ऑक्टोंबर रोजी होणार प्रसिद्ध
नांदेड (जिमाका) दि. 2 :- भारत निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार छायाचित्रासह मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कामास जिल्हा निवडणूक विभागाने गती दिली आहे. पुनरिक्षण पूर्व उपक्रम व पुनरिक्षण उपक्रम या दोन विभागात कार्यक्रमांच्या तारखा जाहीर केल्या असून लोकशाहीच्या या पवित्र मतदान प्रक्रियेत अधिकाधिक मतदारांनी आपले कर्तव्य बजावण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) संगिता चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपजिल्हाधिकारी संदिप कुलकर्णी व विविध माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
महिला मतदारांना अधिकाधिक मतदान प्रक्रियेत सहभाग घेता यावा यावर आम्ही भर देत आहोत. याचबरोबर प्रत्येक मतदान केंद्रावर मुलभूत सुविधा पडताळून घेतल्या जात आहेत. ज्या-ज्या ठिकाणी उणीवा आहेत त्याची पूर्तताही केली जात आहे. दिव्यांग मतदारांसाठी आयोगानी निर्धारीत केलेल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासमवेत प्रत्येक मतदार केंद्रनिहाय दिव्यांग मतदारांची संख्या पडताळून घेत असल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले. समाजातील प्रत्येक घटकासह तृतीयपंथीयांना मतदानाचा हक्क बजावता यावा यादृष्टिने नियोजन करून मतदारांमध्ये जागृती केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील मतदार यादी संदर्भातील सर्व कायदे आणि मार्गदर्शक सूचना तसेच नविनतम, नवीन तंत्रज्ञान याबाबत मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी या सर्वांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. 21 जुलै ते 21 ऑगस्ट 2023 या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या द्वारा प्रत्येक घरोघरी भेट देऊन मतदारांची पडताळणी केली जाणार आहे. या पडताळणीत नवीन मतदारांना आपले नाव नोंदविता येईल. याचबरोबर दि. 22 ऑगस्ट ते 29 सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यातील मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणिकरण केले जाईल. यासमवेत मतदार यादीतील अथवा मतदार ओळखपत्रातील त्रुटी दूर करणे, आयोगाच्या मानकानुसार छायाचित्र प्राप्त करून सुधारणा करणे, अस्पष्ट / अंधुक छायाचित्र बदलून त्याऐवजी मतदाराचे योग्य छायाचित्र दुरूस्त करणे, मतदान केंद्राच्या सीमांची पूनर्रचना करणे, मतदान केंद्राच्या यादीस मान्यता घेणे, कालबद्ध योजना आखणे, नियंत्रण कक्ष, कंट्रोल टेबल अद्ययावत करणे आदी कामे प्राधान्याने पूर्ण केले जातील, असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी स्पष्ट केले. नमुना 1 ते 8 तयार करण्यासह 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित पुरवणी व एकत्र प्रारूप यादी 30 सप्टेंबर ते 16 ऑक्टोंबर 2023 या कालावधीत तयार केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दिनांक 17 ऑक्टोंबर रोजी एकत्रीकृत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. यात दिनांक 17 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2023 या कालावधीत दावे व हरकती स्विकारल्या जातील. याचबरोबर पुन्हा एकदा मतदार नोंदणीसाठी / दुरूस्तीसाठी मतदारांना आवाहन केले जाईल. दिनांक 26 डिसेंबर 2023 पर्यंत दावे व हरकती निकालात काढल्या जातील. 1 जानेवारी 2024 रोजी पर्यंत अंतिम प्रसिद्धीसाठी आयोगाची परवानगी मागण्यासह डाटाबेस अद्यावत करण्यासह पुरवणी याद्यांची छपाई केली जाईल. शुक्रवार 5 जानेवारी 2024 रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी केली जाईल, असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले.
000000





बीज प्रक्रिया संच अनुदानासाठी शेतकरी उत्पादक संघ व कंपन्याना अर्ज करण्याचे आवाहन

 वृत्त क्र. 469

बीज प्रक्रिया संच अनुदानासाठी

शेतकरी उत्पादक संघ व कंपन्याना अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 2 :-  कृषि विभागाच्यावतीने नांदेड जिल्ह्यासाठी अन्न आणि पोषण सुरक्षा अन्नधान्य पिके सन 2023-24 मध्ये स्थानिक पुढाकाराच्या बाबी अंतर्गत फ्लेक्झी फंडामध्ये बीज प्रक्रिया संचाचा लक्षांक प्राप्त झाला आहे. या योजनेत अटी व शर्तीच्या अधीन राहून शेतकरी उत्पादक संघ/कंपनी यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. शेतकरी उत्पादक संघ/कंपनी यांनी 30 सप्टेंबर 2023 पर्यत संबंधित तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करावेत.

या योजनेअंतर्गत प्रमाणित बियाणे उत्पादन करणाऱ्या शेतकरी उत्पादक संघ/कंपनी यांना बीज प्रक्रिया प्रकल्प उभारणी करण्यासाठी यंत्र सामुग्री व बांधकामासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के किंवा 10 लाख रुपये यापैकी जे कमी असेल ते अनुदान देय आहे. सदर प्रस्ताव राष्ट्रीयकृत बँकेशी निगडित असून लाभार्थ्यांने शेतकरी उत्पादक संघ/कंपनी बँकेकडे प्रस्ताव सादर करावा. बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर संबंधित शेतकरी उत्पादक संघ/कंपनी अनुदानास पात्र राहील. लक्षांकाच्या तुलनेत जास्त अर्ज प्राप्त झाल्यास सोडत पध्दतीने निवड करण्यात येईल. या योजनेचा लाभ एकदाच देण्यात येईल. तरी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.

0000

वृत्त क्रमांक   मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत दावे व हरकती दाखल करण्याच्या कालावधीत वाढ   वाढीव कालावधीचा ...