Thursday, August 3, 2023

 विशेष लेख

 

मेरी माटी मेरा देश अभियानासाठी

नांदेड जिल्हा प्रशासकिय यंत्रणा सज्ज

 

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा अभियानाने सारा देश देशभक्तीने जागा झाला. या अमृत महोत्सवी वर्षाची सांगता येत्या 15 ऑगस्ट 2023 रोजी होत आहे. याचे औचित्य साधून यावर्षी मेरी माटी मेरा देश या संकल्पनेला जनमाणसापर्यंत विविध उपक्रमाच्या माध्यमातून पोहोचविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यानुसार महाराष्ट्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार मेरी माटी मेरा देश नांदेड जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा होण्यासाठी सर्व प्रशासकिय यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सर्व विभाग प्रमुखांची व्यापक बैठक घेऊन हा लोकोत्सव व्हावा यादृष्टिने नियोजन केले आहे.

 

गावातील शहीद व्यक्तींचे उभारले जाणार शिलाफलक

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतांना ज्यांनी या स्वातंत्र्यासाठी आपले जीवन दिले असा विरांच्या बलिदानाला आणि योगदानाला नव्या पिढीपर्यंत पोहोचविता यावे यादृष्टिने ग्रामपंचायत अंतर्गत शिलाफलक उभारण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. याचबरोबर ज्या व्यक्तींनी निस्वार्थपणे देशाची सेवा केली आहे व ज्यांनी बलिदान दिले त्यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करून 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत श्रद्धांजलीही अर्पण केली जाणार आहे. शिलाफलकाच्या उभारणीसाठी जागेची निवड अमृत सरोवर, शाळा, ग्रामपंचायत अथवा गावातील प्रेरणा स्थान आदी ठिकाणी करण्यात यावी, असे निर्देश असून जागा निवड व बांधकामाकरीता ग्रामपंचायतीचा ठराव करून पंचायत समिती स्तरावरून पुढील कार्यवाही तात्काळ करण्यास सांगण्यात आले आहे. यासाठी 5 बाय 3 फुट आकार निश्चित करण्यात आला आहे.

 

गावोगावी घेतली जाणार पंच प्रण प्रतिज्ञा

जन्मभूमी आणि स्वातंत्र्याचा अत्यंत भावनिक संबंध आपण जपत आलो आहोत. विकसित भारताचे आपण लक्ष ठेवले आहे. गुलामीच्या प्रत्येक अंशापासूनची मुक्ती, आपल्या समृद्ध वारसेचा अभिमान, एकता आणि एकजूटता व नागरिकांमध्ये कर्तव्याची भावना हे देशाच्या समृद्धीचे अत्यंत महत्वाचे लक्षण म्हणून समजले जाते. देशाचा स्वाभिमान जपण्यासमवेत नागरिक म्हणून आपली कर्तव्य भावना व जागरूकता वृद्धींगत व्हावी यासाठी पंच  प्रण प्रतिज्ञा गावोगावी घेतली जाणार आहे. या संदर्भात प्रत्येक ग्रामपंचायतींना कळविण्यात आले आहे.

 

वसुधा वंदन

ज्या गावकुसात, पंचक्रोशीत आपण राहतो त्या परिसरात या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून पुढील पिढ्यांसाठी साक्षीदार ठरतील अशी दीर्घकाळ टिकणारी 75 झाडांचे वृक्षारोपन करून एक वेगळा संदेश गावोगावी दिला जाणार आहे. सदर रोपाचे जतन व्हावे यादृष्टीने ग्राम रोजगार सेवक यासाठी योगदान देईल. याचबरोबर गावातील नागरिकही दक्षता घेतील. सामाजिक वनीकरणाच्या रोपवाटिकेद्वारे ही रोपे ग्रामपंचायतींना घेता येतील.

 

विरांनाही केले जाईल वंदन

ज्यांनी निस्वार्थपणे देशाची सेवा करून आपले बलिदान दिले त्यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याकरीता स्वातंत्र्य सैनिक, सेवानिवृत्त संरक्षण कर्मचारी, केंद्रीय शसस्त्र पोलीस दलाचे कर्मचारी, राज्य पोलीस दलाचे कर्मचारी यांना याअंतर्गत सन्मानित करून कृतज्ञता व्यक्त केली जाईल.

 

गावोगावी होणार ध्वजारोहण व राष्ट्रगान

भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त नित्यराजशिष्टाचाराप्रमाणे गावोगावी ध्वजारोहण व राष्ट्रगान गायले जाईल. याचबरोबर गतवर्षी प्रमाणे घरोघरी तिरंगा अभियानाचे नियोजन करून यासंदर्भात ग्रामपंचायत पातळीवर समन्वय साधण्याचे निर्देश ग्रामपंचायतींना दिलेले आहेत.

 

राजधानीतील कर्तव्य पथावर अमृतवाटिकेसाठी

प्रत्येक गावातील असेल मातीचे अंश

या अभियानांतर्गत राष्ट्रप्रेमासह सद्भावना व निसर्गाप्रती कृतज्ञता अभिव्यक्त व्हावी यावर भर देण्यात आला आहे. यादृष्टिने प्रत्येक गावातील माती एका कलशातून एकत्र करून ती राजधानी दिल्ली येथे कर्तव्यपथावर अमृतवाटिकेसाठी पाठविण्यात येणार आहे. प्रत्येक गावातील मुठभर मातीतून हा अखंडतेचा संदेश यातून रुजला जाईल. 27 ते 30 ऑगस्ट या कालावधीत हा कलश प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थित होणाऱ्या विशेष कार्यक्रमासाठी तालुकास्तरावरील प्रथीतयश युवकाच्या हस्ते पाठविण्यात येणार आहे.

 

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल व इतर शासकीय विभागाच्या समन्वयातून हा उपक्रम अधिक व्यापक करण्यावर भर दिला जात आहे. नागरिकांनीही यासाठी उत्स्फूर्त सहभाग घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

 

-   विनोद रापतवार,

जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड  

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...