Wednesday, December 21, 2022

 बाळाच्या जीवनातील पहिले हजार दिवस महत्त्वाचे 

- जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे

 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- बाळाच्या जीवनातील पहिले हजार दिवस हे शारिरीक, मानसिक व बौद्धिक वाढीसाठी महत्त्वाचे असतात. बाळाच्या जीवनातील हा सुवर्णकाळ आहे.  स्तनपानासंबंधी समाजातील गैरसमजुती व चुकीच्या प्रथा दूर करण्यासाठी जनजागृती करावी, असे प्रतिपादन नांदेड जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी केले.

 

महिला व बालविकास विभागाच्यावतीने नांदेड जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात आज स्तनपान व शिशु पोषण या विषयावर जिल्हास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी  रेखा काळम-कदम, युनिसेफचे राज्य सल्लागार पी. डी. सुदामे यांची उपस्थिती होती. स्तनपानामुळे बाळाच्या पोषणासह बाळाची रोगप्रतिकारशक्ती ही वाढते, असे मत संदीप माळोदे यांनी व्यक्त केले.

 

यावेळी युनिसेफचे पी. डी. सुदामे ह्यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले बाळ दोन वर्षाचे होईपर्यंत त्याची लांबी 86 सेंटीमीटर होऊ शकते, बाळ 75 टक्के हुशार होऊ शकते, बाळाचे वजन 12 कि.ग्रॅ. पर्यंत वाढू शकते. यासाठी गरोदर माता व स्तनदा माता यांनी गरोदरपणात दिवसातून चार वेळेस आहार घेणे आवश्यक आहे. कुटुंबातून यासाठी मातेला मदत, प्रोत्साहन व संरक्षण प्रत्येक सदस्याने द्यावे. बाळंतपण दवाखान्यातच करावे. जन्म झाल्यावर आईचा व बाळाचा एकमेकाला स्पर्श करून स्तनपानाची सुरुवात करावी, पहिले सहा महिने बाळाला निव्वळ स्तनपान करावे, सहा महिने पूर्ण झाल्यावर घरगुती स्वच्छतापूर्वक बनवलेला पुरेसा व मऊसर आहार बाळास सुरू करून किमान दोन वर्षे आपले दूध बाळाला पाजावे. 


स्तनपान देताना व भरवताना बाळाशी संवाद साधावा. स्तनपान व योग्य पूरक आहारामुळे 20 टक्के बालमृत्यू टाळता येतात हा संदेशही उदाहरणांद्वारे त्यांनी पटवून दिला. जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. पर्यवेक्षिका यांनी सदर प्रशिक्षण त्यांच्या विभाग स्तरावर राबवून अंगणवाडी सेविका यांना या ज्ञानाचे दूत करून घरोघरी हे ज्ञान पोहोचवण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर सोनवणे तर उपस्थितांचे आभार विशालसिंग चव्हाण यांनी केले. या कार्यशाळेत जिल्ह्यातील सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी व पर्यवेक्षिका ह्यांची उपस्थिती होती.

00000




Tuesday, December 20, 2022

 पंजाब विधानसभा अध्यक्ष सरदार कुलतार सिंघ संधवान

व उपाध्यक्ष जय किशन राऊरी यांचा नांदेड दौरा


नांदेड (जिमाका) दि. 20 :- पंजाब विधानसभा अध्यक्ष सरदार कुलता सिंघ संधवान व उपाध्यक्ष जय किशन सिंह राऊरी व इतर चार यांचा नांदेड दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. शनिवार 24 डिसेंबर 2022 रोजी निजामाबाद येथून वाहनाने रात्री 8 वा. नांदेड येथे आगमन व मुक्काम. रविवार 25 डिसेंबर 2022 रोजी तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा नांदेड येथे दर्शन व राखीव. दुपारी 4 वा. नांदेड येथून वाहनाने बिदर कर्नाटककडे प्रयाण करतील.
0000
योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणाबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आवाहन
नांदेड (जिमाका) दि. 20 :- नांदेड जिल्ह्यात माळेगाव यात्रेनिमित्ताने गुरूवार 22 डिसेंबर 2022 रोजी स्थानिक सुट्टी जाहिर करण्यात आली आहे. योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी 22 डिसेंबर रोजी अपॉईंटमेंट घेतलेल्या वाहनांची तपासणी करण्यात येणार नाही. या तपासणी बाबत दिनांक मेसेजद्वारे देण्यात येणार आहे. दिनांक 22 डिसेंबर 2022 रोजी अपॉईंटमेंट घेतलेल्या वाहनांची तपासणी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी पुढील एक आठवडयापर्यंत स्विकारण्यात येणार आहे. याबाबत जिल्ह्यातील सर्व वाहन मालक-चालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी केले आहे.
00000

 माळेगाव यात्रेत बहुमाध्यम प्रदर्शनाचे आयोजन

नांदेड (जिमाका) दि. 20 :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त (आझादी का अमृत महोत्सव) तसेच केंद्र  सरकारच्या 8 वर्ष सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण सेवा या विषयांवर अधारीत भव्य बहूमाध्यम प्रदर्शानाचे आयोजन लोहा तालुक्यातील माळेगाव यात्रा येथे करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन दिनांक 22 डिसेंबर 2022 रोजी  दुपारी 2.00 वा. नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्राम विकास, पंचायत राज, वैद्यकिय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार आहे.

 

हे प्रदर्शन दिनांक 22 ते 26 डिसेंबर 2022 कालावधी सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यत सर्वांसाठी विनामुल्य खूले राहणार आहे.  या प्रदर्शनाचे आयोजन माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो नांदेडच्यावतीने करण्यात आले आहे. या प्रदर्शनात भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील विविध महत्त्वाच्या घटना-घडामोडी, बहुमाध्यमातून प्रदर्शित करण्यात येणार आहे. यात 1857 ते 1947 या कालखंडातील भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महत्वाच्या घडामोडी आणि महान स्वातंत्र्यसेनानी यांची जीवनगाथा छायाचित्र आणि माहिती स्वरुपात मांडण्यात येणार आहे.

 

केंद्र सरकारच्या 8 वर्ष सेवा, सुशासन व गरीब कल्याण सेवा निमित्त सरकारने राबविलेल्या विविध योजना आणि उपक्रमांची माहिती  या बहूमाध्यम प्रदर्शानातून दर्शवण्यात येणार आहेत. या प्रदर्शनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात येणार आहे. या उद्घाटन कार्यक्रमास खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, खासदार सुधाकर श्रृंगारे, आमदार शामसुंदर शिंदे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार आदींची उपस्थिती राहणार आहे. या बहुमाध्यम  प्रदर्शनास  भाविकांनी  भेट द्यावी, असे आवाहन नांदेड येथील केंद्रीय संचार ब्युरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये, सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी सुमित दोडल यांच्यावतीने करण्यात आले आहे.

000000

Monday, December 19, 2022

सकाळी 9 पासून ग्रामपंचायत

सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी

 

नांदेड (जिमाका) दि. 19 :- जिल्ह्यात ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी दिनांक 20 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 9 वाजेपासून पुढे सुरू केली जाईल. जिल्हा प्रशासनाने मतमोजणीच्या दृष्टीने काटेकोर नियोजन केले आहे. नांदेड येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे सभागृह, प्रशासकिय इमारत येथे सकाळी 9 वा. मतमोजणी सुरू होईल. अर्धापूर येथे तहसिल कार्यालयात सकाळी 11 वा., भोकर येथे तहसिल कार्यालय तळमजला येथे सकाळी 10 वा. हदगाव येथे तहसिल कार्यालयात सकाळी 10 वा. मतमोजणीला प्रारंभ होईल.

 

हिमायतनगर तहसिल कार्यालय येथे सकाळी 11 वा., किनवट येथे तहसिल कार्यालय येथे सकाळी 10 वा., माहूर येथे तहसिल कार्यालयात सकाळी 10 वा., धर्माबाद येथे तहसिल कार्यालयात सकाळी 10 वा. मतमोजणी सुरू होईल. उमरी येथे तहसिल कार्यालयात सकाळी 10.30 वा., बिलोली येथे तहसिल कार्यालयात सकाळी 10 वा., नायगाव येथे तहसिल कार्यालयात सकाळी 10 वा., मुखेड येथे तहसिल कार्यालयात सकाळी 10 वा., कंधार येथे तहसिल कार्यालयात सकाळी 10 वा., लोहा येथे तहसिल कार्यालयात सकाळी 10 वा. तर देगलूर येथे तहसिल कार्यालयात सकाळी 10.30 वा. मतमोजणीला प्रारंभ होईल.

 

भोकर तालुक्यात सर्वाधिक 89.34 टक्के मतदान

दिनांक 18 डिसेंबर 2022 रोजी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत भोकर तालुक्यात सर्वाधिक म्हणजे 89.34 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. नांदेड तालुक्यात 71.19 टक्के, अर्धापूर तालुक्यात 88.01 टक्के, हदगाव तालुक्यात 84.12 टक्के, हिमायतनगर तालुक्यात 88.06 टक्के, किनवट तालुक्यात 82.25 टक्के, माहूर तालुक्यात 81.96 टक्के, धर्माबाद तालुक्यात 83.63 टक्के, उमरी तालुक्यात 88.84 टक्के, बिलोली तालुक्यात 85.84 टक्के, नायगाव तालुक्यात 86.82 टक्के, देगलूर तालुक्यात 86.68 टक्के, मुखेड तालुक्यात 73.39 टक्के, कंधार तालुक्यात 81.69 टक्के, लोहा तालुक्यात 86.57 टक्के एवढे मतदान झाले आहे.

 

सार्वत्रिक निवडणूक 160 ग्रामपंचायतीसाठी घेण्यात आली. यामध्ये नांदेड तालुक्यात 6 ग्रामपंचायती, अर्धापूरमध्ये 2, भोकर 3, हदगाव 4, हिमायतनगर 1, किनवट 50, माहूर 26, धर्माबाद 2, उमरी 1, बिलोली 8, नायगाव 8, देगलूर 1, मुखेड 14, कंधार 12, लोहा 22 अशा एकुण 160 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक कार्यक्रम राबविला गेला. यातील 160 ग्रामपंचायतीसाठी एकुण 489 मतदान केंद्रांवर प्रत्यक्ष मतदान झाले. यात एकुण 77 हजार 467 स्त्री मतदार तर 84 हजार 563 पुरूष मतदार व इतर दोन मतदार अशी एकुण 1 लाख 62 हजार 32 मतदार संख्या होती. यापैकी 62 हजार 999 स्त्री मतदार, 70 हजार 179 पुरूष मतदार असे एकुण 1 लाख 33 हजार 178 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. याची सरासरी टक्केवारी 82.19 एवढी होते.

0000

 जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयात

26 डिसेंबर रोजी पेन्शन अदालतीचे आयोजन   

नांदेड (जिमाका) दि. 19 :- नांदेड जिल्ह्यातील भूमि अभिलेख कार्यालयातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पेन्शनची समस्या मार्गी लावण्यासाठी सोमवार 26 डिसेंबर 2022 रोजी जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख नांदेड यांच्या कार्यालयात पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे. ही अदालत सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत होणार आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख श्रीमती एस. पी. सेठीया यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. 

भूमि अभिलेख विभागातून दिनांक 1 जानेवारी 2016 नंतर सेवानिवृत्त झालेल्या ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती योजनेशी संबंधीत लाभाच्या काही समस्या असतील, त्या सोडविण्यासाठी ही पेन्शन अदालत आयोजित केली आहे. या पेन्शन अदालतमध्ये येणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी त्यांच्या समस्या बद्दल लेखी म्हणणे आवश्यक त्या कागदपत्रांसह जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख नांदेड यांच्या कार्यालयात उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख श्रीमती एस. पी. सेठीया यांनी केले आहे.

00000

 मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या

पात्र परिसरात कलम 144 लागू   

नांदेड (जिमाका) दि. 19 :-  मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून 20 डिसेंबर 2022 ते 19 जानेवारी 2023 पर्यंत घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमित केले आहेत.   

याबंदी आदेशात म्हटले आहे की, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पुर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूरकडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा 20 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 19 जानेवारी 2023 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे.   

हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.

00000

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...