Tuesday, November 22, 2022

 उर्ध्व पेनगंगा प्रकल्प (इसापूर धरण) अंतर्गत

रब्बी हंगाम पाणी-पाळीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

नांदेड, (जिमाका) दि. 22 :- यावर्षी इसापूर धरणात 100 टक्के पाणीसाठा उपलब्ध असुन त्यानुसार रब्बी हंगामात चार पाणीपाळ्या देण्याचे अपेक्षित आहे. त्यानुसार रब्बी हंगामातील हंगामी, दुहंगामी असेच दुहंगामातील इतर उभी पिके या पिकांसाठी कालव्याचे प्रवाही / कालव्यावरील उपसा, नदी-नाल्यावरील मंजूर उपसा सिंचन योजनेद्वारे सिंचनासाठी पाणी घ्यायचे असल्यास मागणी अर्ज नमुना 7, 7-अ मध्ये भरून बुधवार दि. 30 नोव्हेंबर 2022 पुर्वी संबंधित शाखा कार्यालयात सादर करावेत. हंगामी व दुहंगामी पिकांसाठी स्वतंत्र अर्ज सादर करावेत. उर्ध्व पैनगंगा प्रकल्पांतर्गत इसापूर डावा कालवा व इसापूर उजवा कालवाच्या लाभक्षेत्रातील लाभधारकांना व इसापूर धरण जलाशय, अधिसुचित नदी-नाल्यावरील तसेच मुख्य कालव्यावरील प्रवाही व मंजूर उपसा सिंचन योजनाधारकांना याची नोंद घ्यावी, असे आवाहन उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र. 1 चे कार्यकारी अभियंता अ. बा. जगताप यांनी केले आहे.  

 

सिंचनासाठी पाण्याची गरज तसेच मागणी लक्षात घेता प्रत्यक्ष सिंचनासाठी पहिली पाणीपाळी दिनांक 22 नोव्हेंबर 2022 रोजी सुरू करण्याचे अपेक्षित नियोजन आहे. तथापि इतर पाणीपाळ्याचे नियोजन कालवा सल्लागार समितीच्या बैठकीतील होण्याच्या निर्णयाच्या अधीन राहून करण्यात येईल. उर्ध्व पेनगंगा प्रकल्पांतर्गत इसापूर डावा कालवा व इसापूर उजवा कालवा व त्याअंतर्गत असलेल्या वितरण व्यवस्थेद्वारे प्रत्येक पाणीपाळीच्या कालवा संचलनाच्या प्रस्तावीत कार्यक्रमानुसार सिंचनासाठी पाणी सोडण्यात येईल. रब्बी हंगाम सन 2022-23 मधील पहिल्या पाणीपाळीचा प्रस्तावित कार्यक्रम. अवर्तन क्रमांक 1 चा  कालावधी 22 नोव्हेंबर 2022 ते 14 डिसेंबर 2022 पर्यंत असे एकुण 22 दिवस पहिल्या पाणीपाळीचा प्रस्तावित कार्यक्रम आहे.

 

पाऊस किंवा आकस्मिक घटनांमुळे आवर्तनाच्या दिनांकात बदल होऊ शकतो. नमुना नं.7, 7-अ प्राप्त झालेल्या पाणी अर्जास पुढील अटी व शर्तींचे अधीन राहुन मंजुरी देण्यात येईल. लाभधारकांना त्यांच्याकडील संपुर्ण थकबाकी पाणीपट्टी भरावी लागेल. पिकांचे मागणी क्षेत्र 20 आर च्या पटीत असावे. रब्बी हंगामी , दुहंगामी व इतर बारमाही पिकांसाठी कालव्याचे प्रवाही / मंजूर उपसा/ मंजूर जलाशय उपसा व मंजूर नदि/नाले उपसा सिंचनासाठी ज्यांना पाणी घ्यावयाचे आहे त्यांनी आपले पाणी मागणी अर्ज विहीत नमुन्यात सादर करावे व अर्जासोबत उपसा सिंचन परवानगीची प्रत जोडावी. तसेच पाणी अर्जासोबत अपत्याबाबतचे प्रमाणपत्र व अल्प अत्यल्प भुधारक असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करावे. कालव्याचे पाणी शेतात नेण्यासाठी असलेली शेतचारी स्वच्छ व व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी संबंधित लाभधारकाची आहे. काही अपरिहार्य कारणास्तव किंवा तांत्रीक कारणास्तव पाणी पुरवठा करणे शक्य न झाल्यास होणा-या नुकसानीस हे कार्यालय जबाबदार राहणार नाही. तसेच महाराष्ट्र पाटबंधारे प्रचलित नियमांचे लाभधारकांकडून उल्लंघन झाल्यास, कोणतीही आगाऊ सुचना न देता दिलेली मंजुरी रद्द करण्यात येईल व पाणीपुरवठा रद्द करण्यात येईल.

 

सिंचन पाणीपाळी दरम्यान कालव्याची काही तुटफूट झाल्यास, त्याची दुरूस्ती झाल्यानंतरच कालव्यात पाणी सोडण्यात येईल. महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम 1976, कालवे नियम 1934, म. सिं. प. शे. व्य. कायदा 2005 तसेच महाराष्ट्र जलसंपदा विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या तरतुदीनुसार सर्व शर्ती व अटी बंधनकारक राहतील याची सर्व लाभधारकांनी नोंद घ्यावी. कालवा संचलन कार्यक्रमानुसारच पाणी घेणे बंधनकारक राहील. पाणीपट्टी न भरणा-या व पाणी अर्ज नामंजुर असलेल्या लाभधारकास सिंचनासाठी पाणी देणे या कार्यालयास बंधनकारक राहणार नाही. लाभधारकांनी दिवस व रात्रीच्या वेळेस पाणी घेणे बंधनकारक आहे. रात्रीच्या वेळेस पाणी न घेतल्यामुळे पाणी नदीनाल्यास वाया जावून ठराविक मुदतीत पाणी न मिळाल्यास या कार्यालयाची जबाबदारी राहणार नाही.

 

शासन निर्णयातील प्रचलित दरानुसार पाणीपट्टीचे दर आकरण्यात येतील. उडाप्याच्या/ अंतिम क्षेत्रास पाणी पुरवठा करणे बंधनकारक राहणार नाही. पाणी पाळी सुरू असताना जबरदस्तीने अथवा विनापरवानगी विद्युत मोटारी, ट्रॅक्टर द्वारे पाणी उपसा करणे अथवा गेट उघडल्यास नियमानुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल.

जे लाभक्षेत्र पाणी वापर संस्थेस हस्तांतरीत करण्यात आले आहे त्या लाभक्षेत्रावर नियमानुसार पाणी मागणी, वसुली आणि सिंचनाचे नियंत्रण पाणी वापर संस्थेने करावे, अन्यथा पाणी पुरवठा केला जाणार नाही. उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रांतर्गत वितरण व्यवस्था व कालवे हे फार जुने असल्यामुळे सदर कालवे केवळ 50 ते 70 टक्के क्षमतेनेच वाहतात. त्या कारणास्तव लाभक्षेत्रातील अतिपुच्छ भागातील लाभधारकांना तुर्त पाणी मिळेल याची हमी देता येणार नाही. या विभागामार्फत सर्व लाभधारकांना पाणी मिळेल या दृष्टीने पुरेपूर प्रयत्न करण्यात येत आहेत. याची संबंधित लाभधारकांनी नोंद घ्यावी. वरील सर्व अटी व नियमांचे पालन करून विभागास सहकार्य करावे, असेही आवाहन उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र. 1 चे कार्यकारी अभियंता अ. बा. जगताप यांनी केले आहे. 

00000

 आगरतळा येथील अखिल भारतीय स्पर्धेत

मिना सोलापुरे द्वितीय पुरस्काराने सन्मानित

 

नांदेड (जिमाका) दि. 22 :- केंद्र शासन व त्रिपुरा राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आगरतळा येथे नुकत्याच संपन्न झालेल्या अखिल भारतीय नागरी सेवा, संगीत व नृत्य स्पर्धेत नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील अव्वल कारकुन मिना अंबादासराव सोलापुरे यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. त्यांच्या या यशाबद्दल नांदेड जिल्हा प्रशासनाच्या सर्व विभाग प्रमुखांनी अभिनंदन केले आहे.

 

महाराष्ट्र राज्य संघाकडून त्यांची निवड करण्यात आली होती. महाराष्ट्राच्या शासकिय संघात त्यांची निवड झाली होती. समूह गायन स्पर्धेत मिना सोलापुरे यांच्यासमवेत सुधीर पलांडे, जितेंद्र धनु, अजिम शेख, दिलीप मोहरी, योगेंद्र केजळे व उषा धनु हे सहभागी झाले होते. त्यांनी गायलेल्या समूह गिताला भरत लब्दे यांनी हार्मोनियमवर साथ दिली. अरुण साळुंके व विशार्म कुलकर्णी यांनी तबल्यासाठी साथ दिली. या स्पर्धेचे व्यवस्थापक श्रीमती मंगल नाखवा व प्रविण राणे यांनी नियोजन केले.

00000



Monday, November 21, 2022

 वेतन पडताळणी पथक औरंगाबाद कार्यालयात वेतन पडताळणीचा दौरा

 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- वेतन पडताळणी  पथकाने माहे नोव्हेंबर 2022 मध्ये वेतन पडताळणी पथक कार्यालय औरंगाबाद येथे दौरा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, असे सहसंचालक लेखा व कोषागारे औरंगाबाद यांनी कळविले आहे. हे पथक शनिवार 26 नोव्हेंबर ते बुधवार 30 नोव्हेंबर 2022 या कालावधीत लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्हा व तालुका स्तरावरील सर्व कार्यालयाच्या सेवापुस्तकाची वेतन पडताळणी करील. 

 

सर्व कार्यालय प्रमुखांनी त्यांचे कार्यालयातील 31 मार्च 2023 पर्यंत सेवानिवृत्त होणारे व झालेले अधिकारी/कर्मचारी यांची मूळ सेवापुस्तके पडताळणीसाठी प्राधान्याने दाखल करावीत. वेतन पडताळणीस सेवापुस्तके सादर करण्यापुर्वी शासन निर्णय वित्त विभाग दि. 20 जानेवारी 2001 चे सोबत जोडलेले विवरणपत्र (चेक लिस्ट) प्रमाणे परीपूर्ण पुर्तता करुन संबंधितांच्या सेवा पुस्तकात लावून त्याप्रमाणे सेवा पुस्तके पडताळणीस सादर करावीत. सेवा पुस्तके पडताळणीस सादर करताना शा.नि.वि.वि.दि.14.05.2019 नुसार वेतनिका प्रणाली मार्फत वेतन पडताळणी पथकाकडे सादर करावे. त्याशिवाय मूळ सेवापुस्तके स्विकारली जाणार नाहीत यांची नोंद घ्यावी. अधिकारी/कर्मचारी यांनी सेवाजेष्ठतेनुसार मिळालेली प्रत्यक्ष पदोन्नती नाकारली असल्यास तसेच कालबध्द /आप्रयोचा लाभ दिलेल्या अधिकारी/कर्मचारी यांनी त्यानंतर प्रत्यक्ष दिलेली पदोन्नती नाकारली असल्यास त्याबाबतची नोंद त्यांचे मुळ सेवापुस्तकात घेणे आवश्यक आहे.

 

0000

 रस्ते अपघातातून सुरक्षिततेसाठी

जबाबदारीने वाहन चालविणे आवश्यक

-         शैलेश कामत

§  जागतिक स्मरण दिनानिमित्त बसस्थानकात विशेष कार्यक्रम

 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- रस्ते अपघाताची वाढती संख्या व यात होणारी जीवीत हानी चिंताजनक झाली आहे. रस्त्यावर होणारे  अपघात हे मानवी चुकामुळे अधिक प्रमाणात होतात. अति घाई करणे, वाहनाची वेग मर्यादा न पाळणे, सूचनाचे पालन न करणे आदी कारणामूळे अपघात झाल्याचे अनेक उदाहरणे आहेत.   वाहन चालवितांना वाहन चालकांनी रस्ते नियमावलीचे पालन केल्यास अपघाताची संख्या आपण कमी करु शकतो, असे प्रतिपादन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले.

 

नांदेड येथील मध्यवर्ती बसस्थानक मध्ये आयोजित रस्ते अपघातामध्ये जीव गमावलेल्या व्यक्तींचा जागतिक स्मरण दिन कार्यक्रमात ते बोलत होते. दरवर्षी नोंव्हेबर महिण्याचा तिसरा रविवार हा रस्ते अपघातात जीव  गमावलेल्या व्यक्तींसाठी जागतिक स्मरण दिन पाळण्यात येतो.  

अपघाताचे प्रमाण कमी व्हावे यादृष्टीने प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत नियमित शाळा, महाविद्यालय व कॉलेजमध्ये रस्ता सुरक्षिततेबाबत जनजागृतीच्या विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे, असेही शैलेश कामत यांनी सांगितले. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी रस्ते सुरक्षेबाबत शपथेचे वाचन केले. अपघातग्रस्तांना आपण स्वत: जीवरक्षक म्हणून स्वयंस्फुर्तीने मदत करण्याबाबत माहिती दिली.

 

यावेळी फकीरा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्यावतीने रस्ता सुरक्षेबाबत बसस्थानक व माता गुजरीजी विसावा उद्यान येथे पथनाटयाचे आयोजन करण्यात आले होते. प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी, बसस्थानाकातील वाहतूक विभागाचे अधिकारी, वाहनचालक, वाहक, प्रवासी आदींची उपस्थिती होती.


महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे वाहतूक निरिक्षक यासीन अहमद, आकाश गिते, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल श्रीवास्तव, मोटार वाहन निरीक्षक अमोल आवाड, मंगेश इंगळे, मनोज चव्हाण, सहा. मोवानि श्री. टिळेकर, श्री. रहाणे, श्री. राजूरकर उपस्थित होते. प्रारंभी मेणबत्ती प्रज्वलित करुन रस्ते अपघातात जीव गमावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

0000

 गहू, ज्वारी, हरभरा पिकासाठी पिक विमा भरण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- प्रधानमंत्री पिक विमा योजना महाराष्ट्र राज्यात रब्बी हंगाम सन 2022-23 मध्ये राबविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे. या योजनेअंतर्गत वास्तवदर्शी विमा हप्ता आकारण्यात येणार असुन, रब्बी हंगामातील पिकांसाठी 1.5 टक्के असा मर्यादीत आहे. पिक पेरणीपासुन काढणीपर्यतचा कालावधी नैसर्गिक आग,  विज कोसळणे,  गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पुर, क्षेत्र जलमय होणे, भुस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, किड व रोग इ. बाबीमुळे पिकांच्या उत्पादनात येणारी घट काढणीपश्चात नुकसान इ. जोखीम यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. नांदेड जिल्हयातील गहु (बा), ज्वारी (जि), हरभरा या पिकांसाठी ही योजना लागु आहे. 


या योजनेअंतर्गत विमा संरक्षित रक्कम व विमा हप्ता पुढील प्रमाणे राहणार आहे. पिक विमा संरक्षित रक्कम रु./ हेक्टर व शेतकऱ्यांनी भरावयाचा पिक विमा हप्ता रुपये / हेक्टरी तर विमा लागु असलेले तालुके व पिक विमा ऑनलाईन करण्याची अंतिम तारीख पुढील प्रमाणे आहे. 

गहु (बा.) या पिकासाठी पिक विमा संरक्षित रक्कम रु./ हेक्टर 42 हजार 500 रुपये. शेतकऱ्यांनी भरावयाचा पिक विमा हप्ता रुपये / हेक्टरी  637.50 आहे. विमा लागू असलेले तालुके नांदेड, अर्धापूर, मुदखेड, बिलोली, लोहा, कंधार, नायगाव, धर्माबाद, किनवट, हिमायतनगर, भोकर, हदगाव आहेत. पिक विमा ऑनलाईन करण्याची अंतिम तारीख 15 डिसेंबर 2022 राहिल. 


ज्वारी (जि) या पिकासाठी पिक विमा संरक्षित रक्कम रु./ हेक्टर 33 हजार 750 रुपये. शेतकऱ्यांनी भरावयाचा पिक विमा हप्ता रुपये / हेक्टरी 506.25 आहे. विमा लागू असलेले तालुके नांदेड, देगलूर, नायगाव, बिलोली, मुखेड, धर्माबाद, किनवट, हदगाव हे आहेत. पिक विमा ऑनलाईन करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2022 राहिल. 

हरभरा या पिकासाठी पिक विमा संरक्षित रक्कम रु./ हेक्टर 37 हजार 500 रुपये. शेतकऱ्यांनी भरावयाचा पिक विमा हप्ता रुपये / हेक्टरी 562.50 आहे. विमा लागू असलेले तालुके नांदेड, अर्धापूर, मुदखेड, बिलोली, लोहा, कंधार, देगलूर, नायगाव, धर्माबाद, मुखेड, किनवट, माहूर, हिमायतनगर, भोकर, हदगाव, उमरी ही आहेत. पिक विमा ऑनलाईन करण्याची अंतिम तारीख 15 डिसेंबर 2022 राहिल. 


ही योजना युनाईटेड इंडिया जनरल इंशुरन्स कंपनीमार्फत राबविण्यात येणार आहे. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना पिक विमा उतरवण्याची अंतिम तारीख या ज्वारी जि. पिकासाठी 30 नोव्हेंबर 2022 असून गहू बा. व हरभरा पिकासाठी  15 डिसेंबर 2022 ही आहे. अधिकच्या माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या तालुका कृषि अधिकारी किंवा जवळच्या बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

Sunday, November 20, 2022

 माणुसकीच्या संस्काराचे बळ ग्रंथातच 

-   जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे

 ·         शालेय विद्यार्थ्यांच्या वक्तृत्त्व स्पर्धेने ग्रंथोत्सवाचा समारोप   

नांदेड (जिमाका) दि. 20 :- वाचनाची गोडी ही शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांच्या अंगी लावता आली पाहिजे. यासाठी पालक आणि शिक्षकांनी अधिक डोळसपणे मुलांना त्यांच्या आवडीची पुस्तके उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. यासाठी पुस्तकाच्या दुकानासमवेत शाळेतील ग्रंथालय व गावातील ग्रंथालयांशी जेवढी जवळीकता साधून देता येईल त्यासाठी प्रयत्नरत राहण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले. 

ग्रंथोत्सवानिमित्त आयोजित शालेय विद्यार्थ्यांच्या वक्तृत्त्व स्पर्धेच्या बक्षिस वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी मसापचे अध्यक्ष प्रभाकर कानडखेडकर, कवी देविदास फुलारी, डॉ. शेंदारकर, धर्मादाय उपायुक्त किशोर मसने, जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रताप सुर्यवंशी, परभणी येथील अप्पर कोषागार अधिकारी निळकंठ पाचंगे, प्रकाशक निर्मलकुमार सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. या स्पर्धेत 23 विद्यार्थी सहभागी झाले होते, यात 16 विद्यार्थींनी होत्या हे विशेष. 

चांगली पुस्तके, ग्रंथ केवळ ज्ञानच देतात असे नाही तर माणुस म्हणून ज्या संवेदना आवश्यक असतात त्या संवेदनाचे पोषणभरणही ग्रंथ करतात. श्रीमान योगी सारखा ग्रंथ मुलांना वाचून दाखवला पाहिजे. जातीय सलोखा, सर्वधर्म समभाव ही भावना नव्या पिढीमध्ये वाचन चळवळीतूनच अधिक समृद्ध होईल, असे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगून स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धक व विजेत्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. 

यावेळी प्रभाकर कानडखेडकर, डॉ. शेंदारकर, किशोर मसने, निळकंठ पाचंगे यांची समयोचित भाषणे झाली. विद्यार्थ्यांशी त्यांनी सुसंवाद साधला. कार्यक्रमाचा समारोप व आभार जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रताप  सुर्यवंशी यांनी मानले. 

हे विद्यार्थी आहेत स्पर्धेतील विजेते

या स्पर्धेत सहभागी स्पर्धकातून 3 उत्तेजनार्थ व 3 अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय असे विजेत निवडण्यात आले. प्रथम पारितोषिक कु. क्रांती पलेवाड, द्वितीय वालुताई कुडकेकर आणि तृतीय पठाण महेक अश्रफ यांना देण्यात आले. उत्तेजनार्थ पारितोषिक कु. श्रेया जाधव, कु. सुवर्णरेखा पांचाळ, निलोफर शेख यांना देण्यात आले. परिक्षक म्हणून दिगंबर कदम, निळकंठ पांचगे यांनी काम पाहिले.

00000




 मराठवाडा मुक्तीच्या लढ्यात वैचारिकतेचा

पाया भक्कम करण्यात ग्रंथालय चळवळीचे योगदान

- प्रा. डॉ. महेश जोशी

 

·  मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त

ग्रंथोत्सवात विशेष परिसंवाद

·  मराठवाडा मुक्ती लढ्याचे मोल युवकांपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार        

 

नांदेड (जिमाका) दि. 20 :- कोणत्याही मुक्तीच्या चळवळीत विचाराचा गाभा हा खूप मोलाचा असतो. त्यादृष्टिने विचार करता मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या चळवळीचा पाया हा समृद्ध वैचारिकतेवर मजबुत झालेला आहे. मराठवाड्यातील बलवंत वाचनालयासारख्या ग्रंथालयांनी व याचबरोबर भूमिगत राहून असंख्य लोकांनी ग्रंथाच्या माध्यमातून मुक्तीचा विचार गावोगावी पोहोचविल्याचे प्रतिपादन प्रा. डॉ. महेश जोशी यांनी केले. 

 

‘नांदेड ग्रंथोत्सव 2022’ उपक्रमाअंतर्गत "मराठवाडा मुक्ती संग्रामातील संवेदनांचे काठ"या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. या चर्चासत्रात डॉ. पृथ्वीराज तौर, प्रा. प्रतिक्षा गौतम तालंखेडकर यांनी सहभाग घेतला. माजी आमदार गंगाधर पटने यांची यावेळी विशेष उपस्थिती होती. जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी या चर्चासत्राचा अध्यक्षीय समारोप केला.   

 

मुक्तीच्या लढ्यामध्ये लोकशाहीला अभिप्रेत असलेल्या सशक्ती करणाचे बिजे महत्वाची असतात. त्यादृष्टीने स्वामी रामानंद तीर्थ यांनी निझामाच्या विरोधासह लोकशाहीच्या सार्वभौमत्वाला अधिक प्राधान्य दिले. मराठवाडा मुक्तीच्या इतिहासाकडे पाहतांना जहाल, मवाळ, आर्य समाज व इतर विविध संस्थांच्या योगदानाला समजून घेतले पाहिजे, असे प्रा. डॉ. महेश जोशी यांनी स्पष्ट केले.

 

निझामाची भाषिक दडपशाही हा सुद्धा अत्याचारच

-         प्रा. डॉ. पृथ्वीराज तौर 

 

मराठवाडा मुक्तीच्या लढ्याकडे पाहतांना निझामाने उर्दूच्या नावाखाली मराठी, तेलगू, कन्नड व इतर बोली आणि मातृ भाषेला दुर्लक्षीत करून केवळ उर्दू भाषेतूनच शिक्षणाची केलेली शक्ती ही दडपशाहीचाच एक भाग होता, असे प्रतिपादन प्रा. डॉ. पृथ्वीराज तौर यांनी केले. एकाबाजुला शिक्षणापासून ते त्याच्या शासकिय कामकाजात उर्दूची सक्ती करायची, लोकांच्या शेतजमिनीसह इतर कागदपत्रांची उर्दू भाषेतून नोंद करायची, ही एक प्रकारची दमनशाही होती, असे त्यांनी सांगितले. त्या काळी जिथे कुठे छोटी मोठी ग्रंथालय असो, साहित्यिकांच्या संस्था असतो, या सर्वांनी मराठवाड्याच्या मुक्तीसमवेत भाषिक हक्कासाठी दिलेले योगदान आपण समजून घेतले पाहिजे, असे तौर यांनी सांगितले.

 

मुक्ती लढ्याच्या भरण-पोषणात महिलांचे योगदान

-         प्रा. प्रतिक्षा गौतम तालंखेडकर

 

समाजातील सर्वच घटकांनी त्याग दिल्यामुळे स्वातंत्र्य मिळू शकले. यात महिलांनी आपल्या कर्तव्याला प्रथम प्राधान्य देऊन मराठवाडा मुक्तीच्या लढ्यात शस्त्र पुरविणे आणि ने-आण करणे सारखी महत्वपूर्ण जबाबदारीही पार पाडल्याचे प्रा. प्रतिक्षा गौतम तालंखेडकर यांनी सांगितले. दगडाबाई शेळके या लष्करी वेषात हातात बंदुका घेऊन फिरल्या. सहकाऱ्यांना धीर देण्याचे काम त्यांनी केले. गंगुबाई देव ही महिला आपल्या मुलीचा मृत्यू झालेले असतांनाही तिचे प्रेत झाकुण ठेवत कार्यक्रत्यांच्या व्यवस्थेसाठी पुढे सरसावली. नांदेड जिल्ह्यातल्या असंख्य महिलांनी पुरुषांना खंबीर साथ दिल्यामुळे हा लढा अधिक व्यापक झाला, असे त्या म्हणाल्या.  

 

लोकशाहीच्या सशक्तीकरणासाठी

युवकांपर्यंत लढ्याचे मोल पोहोचणे आवश्यक

-         जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार

 

आज जे पन्नाशीच्या उंबरठ्यावर आहेत त्यांनी कधीकाळी त्यांच्या लहानपणी अंगाई गितासमवेत रझाकाराने केलेल्या अत्याचाराच्या अनेक गोष्टी ऐकलेल्या आहेत. पिढ्या बदलल्या. नव्या पिढी पर्यंत आपल्या पूर्वजांनी जे कष्ट, हाल-अपेष्टा सहन करून स्वातंत्र्य मिळवून दिले त्याचे मोल पोहचविणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी केले. मराठवाडा मुक्ती संग्रामच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शासनस्तरावरून यासाठी विशेष भर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.  

 

भारताला स्वातंत्र्य मिळूनही केवळ निझामाच्या हट्टापायी 11 महिने विलंबाने आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. यासाठी आपल्या पूर्वजांना वेगळा संघर्ष करावा लागला. रझाकाराच्या सैन्याला वाकून नमस्कार केला नाही म्हणून अनेकांनी त्यांचे फटके अंगावर घेतल्याचे वयोवृद्ध आपल्या बोलण्यात सहज सांगून जातात. हा लढा व यातील बारकावे युवकांपर्यंत पोहचावे यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपक्रम हाती घेतले आहेत. प्रत्येक तालुका पातळीवर मराठवाडा मुक्तीचा लढा विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावा यासाठी विविध संस्थांनी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले. सशक्त लोकशाहीसाठी, स्वातंत्र्यासाठी दिलेल्या या लढ्यात उमरी बँक लुटीचे अनन्य साधारण महत्व आहे. ही घटना भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर म्हणजेच 1948 ची आहे. ही बँक निझामाविरुद्ध लढा देता यावा, लढण्यासाठी शस्त्र मिळावी, त्याला बळ मिळावे यादृष्टीने ही बँक लुटली. यातील प्रत्येक पैशाचा हिशेब देऊन, याची पडताळणी निझामाच्या नोंदीसह करून दिल्यानंतरच खऱ्या अर्थाने उमरी बँकेच्या लढ्यातील स्वातंत्र्य सैनिकांनी मुक्त श्वास घेतल्याचे त्यांनी सांगितले.

 

प्रारंभी जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रताप सुर्यवंशी यांनी चर्चासत्रात सहभागी झालेल्या सर्वांचे स्मृतीचिन्ह व पुस्तक देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अर्जुन सुर्यवंशी यांनी केले. तगडपल्ले यांनी लक्ष्मीकांत तांबोळी लिखीत मराठवाडा गीत सादर केले.

00000 








केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...