Monday, September 19, 2022

 महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य यांचा नांदेड दौरा

नांदेड, (जिमाका) दि. 19 :- महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य डॉ. गोविंद ह. काळे, लक्ष्मण सोपान हाके यांचा नांदेड दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. 

गुरूवार 22 सप्टेंबर रोजी  सायंकाळी 6 वाजता पुणे येथून नांदेडकडे प्रयाण. रात्री 11.30 वाजता शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व मुक्काम. शुक्रवार 23 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वा. प्र. कुलगुरू व उपकुलसचिव (आरक्षण कक्ष) स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड, विभागीय सहाय्यक आयुक्त (मागासवर्ग कक्ष) औरंगाबाद विभाग, औरंगाबाद समवेत बैठक. सायंकाळी 6 वा. खाजगी वाहनाने औरंगाबादकडे प्रयाण करतील.

00000

 जिल्ह्यात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर कालावधीत सेवा पंधरवडा

·        नागरिकांचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्याचे शासनाचे निर्देश 

नांदेड, (जिमाका) दि. 19 :- सामान्य नागरिकांच्या तक्रारी व अर्जावर कालमर्यादेत निपटारा होण्यासाठी  17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर 2022 या कालावधीत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा प्राधान्याने हाती घेतला आहे. या पंधरवाड्यात नागरिकांचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्याचे निर्देश उप आयुक्त जगदीश मिनीयार यांनी दिले आहेत. 

राज्य शासनाद्वारे 2015 मध्ये आपले सरकार पोर्टल सुरु केले होते. परंतु नागरिकांचे कामे मुदतीत होत नसल्याने सर्व प्रलंबित तक्रारी, अर्जाचे निपटारा करण्यासाठी सेवा पंधरवडा राबविण्यात येणार आहे. यामध्ये मदत आणि पुनर्वसन, कृषी, महसूल, अन्न व नागरी पुरवठा, ग्राम विकास, नगर विकास, आरोग्य विभाग, पाणी पुरवठा, महावितरण, आदिवासी विकास, सामाजिक न्याय या विभागातील विविध 14 सेवांचा समावेश आहे. 

सेवा पंधरवड्यात नमूद संकेतस्थळावर प्राप्त झालेल्या व दि. 10 सप्टेंबर 2022 रोजी प्रलंबित असलेल्या सर्व अर्जाचा मोहिम स्वरुपात निपटारा करणे अपेक्षित आहे. आपले सरकार वेबपोर्टल-392 सेवा, महावितरण पोर्टल-24 सेवा, डीबीटी पोर्टल-46 सेवा, नागरी सेवा केंद्रामार्फत देण्यात येणाऱ्या शासकीय सेवा, विभागाच्या स्वत:च्या योजनाशी संबंधित पोर्टलवरील प्रलंबित अर्ज, याव्यतिरिक्त अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत निधीचे वितरण, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना, प्रलंबित फेरफार नोंदीचा निपटारा करणे, पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिकांचे वितरण, विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे, मालमत्ता हस्तांतरण नोंद देणे, नळ जोडणी देणे, मालमत्ता हस्तांतरण नोंद घेणे, प्रलंबित घरगुती विद्युत जोडणीस मंजुरी देणे,  मालमत्ता हस्तांतरणानंतर विद्युत जोडणीमध्ये नवीन मालमत्ताधारकाचे नाव नोंदविणे, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत सिंचन विहिरीकरिता अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी करणे, अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना प्रलंबित वन हक्क पट्टे मंजूर करणे (अपिल वगळून), दिव्यांग प्रमाणपत्र देणे, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र देणे अशा एकूण 14 विभागनिहाय सेवांचा समावेश आहे.

00000 

 जेष्ठ नागरिकांच्या हक्कांचा प्रसार

या विषयावर कायदेविषयक शिबीर संपन्न 

नांदेड, (जिमाका) दि. 19 :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या वार्षीक सर्वसामान्य किमान कार्यक्रमांतर्गत प्रभारी प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस.ई.बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती डी.एम.जज यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयाच्या सभागृहात जेष्ठ नागरिक यांच्या हक्कांचा प्रसार करण्याबाबतचे कायदेविषयक शिबीर नुकतेच संपन्न झाले. 

या  शिबीरासाठी प्रमुख वक्ते म्हणून जेष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष अशोक तेरकर व रिटेनर लॉयर श्रीमती डोणगावकर हे उपस्थीत होते. यावेळी श्रीमती डी.डी.डोणगावकर यांनी जेष्ठ नागरीकांचे हक्क व राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या योजनेबाबत मार्गदर्शन केले. ॲड .व्ही.डी.पाटनुरकर, अॅड एम.झेड. सिद्यीकी यांनी जेष्ठ नागरीकांच्या समस्या मांडल्या. मुकुंद चौधरी यांनी सामाजीक कार्य करताना येणाऱ्या अडचणी मांडल्या. अशोक तेरकर यांनी जेष्ठ नागरीकांबद्दल मनोगत व्यक्त केले. श्रीमती डी.एम.जज यांनी जेष्ठ नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नाचे निराकरण केले. या शिबिरास 20 जेष्ठ नागरीकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्र संचालन व आभार रिटेनर लॉयर अॅड. नयुमखान पठाण यांनी केले.

0000

 नांदेड जिल्ह्यात 1 व्यक्ती कोरोना बाधित

 नांदेड (जिमाका) दि. 19 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या  30 अहवालापैकी आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड ग्रामीण 1 असे एकूण 1 अहवाल कोरोना बाधित आढळले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 3 हजार 462 एवढी झाली असून यातील 1 लाख 759  रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 693 एवढी आहे. जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृह विलगीकरण 1 असे एकूण 1 रुग्णाला उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण 8,  नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणातील 2 असे एकूण 10 व्यक्ती उपचार घेत आहेत.   

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 9 लाख 18 हजार 866
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 97 हजार 966
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 3 हजार 462
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 759
एकुण मृत्यू संख्या-2 हजार 693
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.38 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-00
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 00
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-10
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-00

00000

 हैदराबाद मुक्ती संग्राम : विजयगाथा माहितीपटाची

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत झाली निर्मिती    

नांदेड, (जिमाका) दि. 19 :- हैदराबाद मुक्ती संग्राम अर्थात मराठवाडा मुक्ती संग्रामाचे हे अमृत महोत्सवी वर्षे सुरू झाले आहे. या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 17 सप्टेंबर रोजी या संग्रामावर माहितीपट लोकांना उपलब्ध करून देता यावा अशी मनिषा विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी बाळगली होती. याची जबाबदारी नांदेड जिल्ह्यावर देण्यात आली. नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाने “हैदराबाद मुक्ती संग्राम : विजयगाथा” हा माहितीपट अत्यल्प काळात गुणवत्तेसह निर्मिती केला. 17 सप्टेंबर 2022 रोजी या माहितीपटाचे औरंगाबाद येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रातिनिधीक विमोचन करण्यात आले. 

माहितीपटाच्या माध्यमातून प्रभावीपणे माहिती पोहचावी, या मुक्तीचे मोल व ज्यांनी लढ्यामध्ये योगदान दिले आहे त्यांची व विविध लढ्यांची माहिती या माहितीपटात घेतली आहे. यासाठी जिल्हाधिकारी खुशालसिंह परेदशी यांनी स्वतंत्र समिती तयार केली. त्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीत उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, संपादक शंतनू डोईफोडे, प्रा. डॉ. अशोक सिदेवाड, डॉ. महेश जोशी, डॉ. पृथ्वीराज तौर, डॉ. पी. विठ्ठल, डॉ. दीपक शिंदे, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, अपर कोषागार अधिकारी निळकंठ पाचंगे, इनटॅच नांदेडचे सुरेश जोंधळे, तहसीलदार आर. के. कोलगने, नायब तहसिलदार स्नेहलता स्वामी यांचा समावेश होता. 

समितीतील सर्व सदस्यांनी उपलब्ध असलेले मनुष्यबळ व कमी कालावधीत ऐतिहासिक संदर्भ असलेला माहितीपट निर्माण करण्याचे आवाहन पेलून दाखविले. यात मुक्ती संग्रामाचा संपूर्ण इतिहास जरी नसला तरी मुक्ती लढ्याची यात माहिती घेण्यात आली आहे. प्रा. डॉ. महेश जोशी यांनी अभ्यासपूर्ण संहिता यासाठी लिहून दिली. समितीतील सर्व सदस्यांची सहमती घेऊन हा माहितीपट अंतिम करण्यात आला. हा माहितीपट https://youtu.be/XYPXTZvWeek  या लिंकवर सर्वांसाठी मोफत उपलब्ध असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी दिली.  

00000 

Saturday, September 17, 2022

 नायगाव तालुक्यातील बरबडा व सोमठाणा गावे बाधीत क्षेत्र म्हणून घोषित

·  लम्पी आजाराबाबत जिल्हा प्रशासन दक्ष

नांदेड (जिमाका) दि. 17 :- जिल्ह्यात उद्भवलेल्या लम्पी आजारावर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासन दक्ष आहे. नायगाव तालुक्यातील मौजे बरबडा व सोमठाणा या गावात लम्पी आजाराचा प्रादुर्भाव दिसून आल्याने ही गावे बाधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत.

 

प्राण्यामधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 अन्वये जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील कुंचेली येथील पशुधनामध्ये लम्पी स्किन डिसीजची लागण झाल्याचा रोग निदान अहवाल सहआयुक्त पशुसंवर्धन, रोग अन्वेषण विभाग, औंध पुणे यांच्याकडून प्राप्त झाला आहे.

 

भारत सरकारचा पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभाग तसेच पशुसंवर्धन आयुक्त पुणे यांनी रोग प्रतिबंध व नियंत्रणासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत.  याअनुषंगाने जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष खुशालसिंह परदेशी यांनी पुढीलप्रमाणे आदेश निर्गमित केले आहेत. लम्पी स्किन रोग प्रादुर्भावग्रस्त व बाधीत झालेली नायगाव तालुक्यातील मौजे बरबडा व सोमठाणा ही गावे बाधीत क्षेत्र म्हणून घोषित केली आहेत. रोग प्रादुर्भावाच्या ठिकाणापासून 5 कि.मी. त्रिज्येचा परिसर सतर्कता क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. या परिसरातील गावांमध्ये बाधीत जनावरे वगळता इतर जनावरांचे प्रतिबंधात्मक लसीकरण करावे. साथीच्या काळात बाधीत भागातील जनावरे व मानवाचा निरोगी भागात प्रवेश प्रतिबंधित करण्यात येत आहे. बाधीत गावामध्ये जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी व चराई करिता पशुपालकांनी स्वतंत्र व्यवस्था करावी. रोग प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रामध्ये गाई व म्हशींना स्वतंत्र ठेवणे, बाधीत व अबाधीत जनावरे वेगळी बांधणे तसेच या रोगानेग्रस्त पशुधनाचा मृत्यु झाल्यास मृतदेहाची शास्त्रीय पद्धतीने पशुपालकांनी विल्हेवाट लावावी, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

 

बाधीत परिसरामध्ये स्वच्छता व निर्जंतूक द्रावणाची फवारणी, रोग प्रसारास कारणीभूत असलेल्या डास, माश्या, गोचीड इत्यादीच्या नियंत्रणासाठी औषधांची फवारणी, लम्पी स्किन रोगांचा प्रादुर्भाव व प्रसार थांबविण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, नगरपरिषद, नगरपंचायत व महानगरपालिका यांचेमार्फत त्यांचे कार्यक्षेत्रातील भटक्या पशुधनाचे नियमित निरीक्षण करण्यात यावे. तसेच बाधीत पशुधनाची काळजी घ्यावी असे सांगितले आहे.  कायद्याशी सुसंगत कृती न करणाऱ्या आणि कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या पशुपालक, व्यक्ती, संस्था प्रतिनिधी यांचेविरुध्द नियमानुसार गुन्हा दाखल करणे. तसेच कार्यवाही प्रस्तावित करण्यासाठी त्या-त्या क्षेत्रातील पशुधन विकास अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. सर्व खाजगी पदविकाधारकांनी / पशुपालकांनी लम्पी स्किन रोगांची माहिती शासकीय पशुवैद्यकीय संस्थेस देणे बंधनकारक आहे. लम्पी स्किन रोगाचा उपचार पशुधन विकास अधिकारी किंवा त्यांचे मार्गदर्शनानुसार करण्यात यावा. खाजगी पदविकाधारकांनी लम्पी स्किन रोगांचा परस्पर उपचार केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नांदेड जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय संस्थांनी लम्पी स्किन रोगांच्या उपचारासाठी आवश्यक सर्व औषधी वरिष्ठांशी चर्चा करुन उपलब्ध करुन घ्याव्यात, असेही आदेशात जिल्हाधिकारी खुशालसिंह परेदशी यांनी स्पष्ट केले आहे

Friday, September 16, 2022

 पशुधनातील लम्पी आजाराबाबत पशुपालकांनी गोठ्याची स्वच्छता व

दक्षता घेणे आवश्यक
- खासदार प्रताप पाटील चिखलीकर
▪️जिल्ह्यातील पशुसंवर्धन व प्रशासकीय या यंत्रणांना दक्षतेचे आदेश

नांदेड, (जिमाका)दि. 16 :- पशुधनामध्ये विशेषत: गोवंशीय प्राण्यामध्ये लम्पी साथरोगाचा प्रादुर्भाव जिल्ह्यातील काही गावांमध्ये आढळून आला आहे. जिल्हा प्रशासन व पशुवैद्यकीय विभागामार्फत मोठया प्रमाणात लम्पी आजारावर नियत्रंण मिळविण्यासाठी उपाययोजना व दक्षता घेतली जात आहे. पशुपालक व शेतकऱ्यांनी याबाबत शासनाने आवाहन केल्याप्रमाणे गोठयातील स्वच्छता व बाधित असलेल्या जनावरांना गोठयापासून वेगळे करुन त्यांच्यावर तात्काळ औषधोपचार सुरु करावेत, असे आवाहन खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे आयोजित केलेल्या लम्पी आजाराच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, जिल्हा परीषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मधुसुदन रत्नपारखी, महा वितरण नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर, अधिक्षक अभियंता सुधाकर जाधव, जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. भुपेंद्र बोधनकर, सहाय्यक आयुक्त प्रविण कुमार घुले, डॉ. अरविंद गायकवाड आदीची उपस्थिती होती.

जनावरातील साथीच्या आजाराबाबत रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे. विशेषत: नांदेड शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न अधिक गंभीर आहे. मनपाने यात तातडीने लक्ष घालून उपाययोजना कराव्यात असे निर्देश खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिले. याचबरोबर गावपातळीवर दंवडी व इतर संपर्काची माध्यमे प्रभावीपणे उपयोगात घ्यावीत, असे त्यांनी स्पष्ट केले.

साथरोगावर नियंत्रणासाठी सर्व ग्रामपंचायत पातळीवर स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. जिल्हा परिषद पशुवैद्यकीय विभाग संबंधित यंत्रणाशी समन्वय साधून आहे. यासाठी औषधोपचाराची कुठलीही कमतरता नसून राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे योग्य ती खबरदारी घेतल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी दिली. पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रविण कुमार घुले यांनी लम्पी आजाराबाबत जिल्ह्यातील आढावा सादर केला आहे.
0000


केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...