Friday, March 23, 2018


अमरावती, वाशीम, अकोला, नांदेड जिल्हयांचा सन्मान
स्वच्छतेची शाश्वतता टिकवण्यासाठी
प्रबोधनपर चळवळ राबविणे गरजेचे
- बबनराव लोणीकर
मुंबई. दि. 23. कोणत्याही चांगल्या कामाची सुरूवात स्वत:पासून करणे गरजेचे असते, त्यामुळे स्वच्छतेची सुरूवात प्रत्येकाने स्वत:पासून करणे गरजेचे आहे. राज्यात सध्या स्वच्छता अभियान मोठया प्रमाणावर राबविले जात आहे, त्या अनुषंगाने आजतागायत 25 जिल्हे हागणदारीमुक्त झाले आहे परंतु जिल्हे हागणदारीमुक्त करून चालणार नाही तर स्वच्छतेची शाश्वतता टिकवण्यासाठी राज्यात प्रबोधन पर चळवळ राबविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.
पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत हागणदारीमुक्त झालेल्या चार जिल्ह्यांचा श्री. लोणीकर यांच्या हस्ते मंत्रालयीन दालनात सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी अपर मुख्य सचिव श्याम लाल गोयल तसेच अमरावती, अकोला, वाशीम, नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक तसेच संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
श्री. लोणीकर पुढे म्हणाले, स्वच्छता ही चळवळ आज उदयास आली नसुन ही चळवळ पुर्वीपासुनच चालत आलेली आहे. यासाठी संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराजांनी स्वच्छतेसाठी आपले जीवन व्यतीत केले. त्यांचेच हे मोलाचे कार्य आपण पुढे नेत आहोत. अगदी अल्पशा कालावधीमध्येच स्वच्छतेसाठी सर्वानी मोठे बहुमोलाचे योगदान देऊन राज्य हगणदारीमुक्तीच्या अंतिम टप्प्यात आहे. राहिलेले जिल्हे ही लवकरच हागणदारीमुक्त होतील, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच सध्या देशातील महाराष्ट्र राज्य हे क्रमांक एक वर असणे हे कौतुकास्पद असुन स्वच्छतेची शाश्वतता टिकवण्यासाठी सर्वानी पुढाकार घेणे आवश्यक आहे, यासाठी प्रबोधनपर जनजागृतीकरणे गरजेचे आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
राज्यातील अमरावती अकोला, वाशीम, नांदेड हे जिल्हे दि. 23 मार्च 2018 रोजी हागणदारीमुक्त जाहीर करण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने आयोजित केलेल्या सत्कार समारंभास अमरावती जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय इंगळे, गटविकास अधिकारी भास्कर रेंगळे, प्रकल्प व्यवस्थापक प्रशांत सातव तसेच अकोला जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी एस. राममुर्ती, जि.प. अध्यक्षा संध्या वाघोडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी उत्तम मानकर, गटविकास अधिकारी संदीप भंडारे, ग्रामसेवक रवि कोट, व वाशिम जि.प. चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस.व्ही. इस्कापे, गटविकास अधिकारी डी.बी.पवार, ग्रामसेवक एस.पी. राउत तसेच नांदेड जि.प चे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकरी  यांच्यासह पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी चारही जिल्ह्यातील हागणदारीमुक्त करण्याच्या चळवळीमध्ये सहभागी झालेल्या सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्यासह प्रतिनिधींचा स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
००००


शांतता समितीची बैठक संपन्न
सण-उत्सवातून सलोखा वृद्धींगत व्हावा
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
नांदेड, दि. 23 :- आगामी काळातील सण-उत्सव सजगपणे आणि समन्वयातून शांतता अबाधित राहील तसेच सलोखा वृद्धींगत होईल अशारितीने साजरे करावेत, असे आवाहन जिल्हास्तरीय शांतता समितीचे अध्यक्ष तथा  जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले. रामनवमी उत्सव व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील बचत भवन येथे नांदेड जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांचे अध्यक्षस्थेखाली संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते.    
 बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई पवार, महापौर शिलाताई भवरे, मनपा आयुक्त गणेश देशमुख, पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मिना, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, तहसिलदार किरण अंबेकर, गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक ठाणसिंघ यांच्यासह नांदेड शहर आणि जिल्ह्यातील शांतता समितीचे मान्यवर सदस्य उपस्थित होते.  
रामनवमी उत्सव व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त जिल्हा प्रशासनाच्यावतीने चोख बंदोबस्त तसेच काटेकोर नियोजन करण्यात आल्याचे सांगून जिल्हाधिकारी डोंगरे म्हणाले, अप्रिय घटना टाळण्यासाठी सर्वच घटकांनी प्रयत्न करावेत. सार्वजनिक शांततेचे भान बाळगून उत्सव साजरे करावेत. याकाळात शांतता व सुव्यवस्था तसेच सामाजिक सलोखा कायम रहावा, असेही आवाहन केले.   
या बैठकीत पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी गैरप्रकारांवरील कारवाईबाबत सज्जतेची माहिती दिली. मनपा आयुक्त गणेश देशमुख यांनी मनपातर्फे देण्यात येणाऱ्या विविध सुविधांची माहिती दिली. तसेच शहरात स्वच्छतेविषयक तत्पर सुविधा व उपाययोजना करण्यात येणार असल्याचेही सांगितले.  
बैठकीस उपस्थित विविध समाज घटकांचे प्रतिनिधी आदीनी मत मांडून महत्वपूर्ण सूचना केल्या. निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांनी या बैठकीचे संयोजन केले. तर आभार अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांनी मानले.                               
00000




दारु दुकाने रविवारी बंद  
नांदेड, दि. 23 :- जिल्ह्यात श्री रामनवमी उत्सव रविवार 25 मार्च 2018 रोजी मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे. यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जिल्ह्यात मद्य विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले आहे.
या उत्सवादरम्यान जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये जिल्हाधिकारी नांदेड यांनी रविवार 25 मार्च रोजी रामनवमी निमित्त जिल्ह्यातील सर्व सीएल-3, एफएल-2, एफएल-3 ( परवाना कक्ष ), एफएल-4 व एफएल / बिआर-2 अनुज्ञप्त्याचे अंतर्गत व्यवहार पुर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत. या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुद्ध दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, असेही आदेशात नमूद केले आहे.
000000


कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांना
31 मार्चपर्यंत अर्ज करण्याची संधी ;
एकवेळ समझोता योजनेचा लाभ घ्यावा
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे 
नांदेड, दि. 23 :- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत अर्ज करण्यापासून वंचित शेतकऱ्यांनी “आपले सरकार” सेवा केंद्रावर किंवा https://csmssy.mahaonline.gov.in पोर्टलवर शनिवार 31 मार्च 2018 पर्यंत ऑनलाईन अर्ज नोंदणी करावी. तसेच दीड लाखापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या पात्र शेतकऱ्यांनी एकवेळ समझोता योजनेंतर्गत हिश्याची दीड लाखावरील रक्कम शनिवार 31 मार्च 2018 पूर्वी बॅंकेत जमा करुन या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.  
या योजनेंतर्गत जे शेतकरी वैयक्तिक कारणाने किंवा तांत्रिक अडचणीमुळे कर्जमाफी योजनेत सहभागी होऊ शकले नाहीत त्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. त्यानुसार 31 मार्च 2018 पर्यंत आपले सरकार पोर्टलवर किंवा शेतकऱ्यांनी स्वत: मोबाईल ओटीपीद्वारे केल्यानंतरच संबंधीत अर्ज अपलोड करण्यात येणार आहे.  आपले सरकार पोर्टलवर माहिती भरुन ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा नि:शुल्क आहे. किंवा https://csmssy.mahaonline.gov.in या पोर्टलवर स्वत:  नोंदणी करुन युजर आयडी व पासवर्डच्या आधारे ऑनलाईन अर्ज करावीत, असेही आवाहन करण्यात आले आहे. 
000000

Thursday, March 22, 2018


जलजागृती सप्ताहाचा
समारोप समारंभ संपन्न
नांदेड, दि. 23 :-  जलजागृती सप्ताह 16 ते 22 मार्चचा समारोप समारंभ जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते जलपुजन व दिपप्रज्वलन करुन गुरुवार 22 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे संपन्न झाला.
यावेळी प्रा. यु. डी. कुलकर्णी, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, नाम फाउँडेशनचे बालाजी कोंपलवार, सामाजिक कार्यकर्त्या  सौ. सुषमा गहीरवार, सौ. जयश्री जयस्वाल, पंजाबराव कल्याणकर, रामराव कदम, श्री मोरे, डॉ. परमेश्वर पौळ जलसंपदा विभाग, नांदेड पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता समाधान सब्बीनवार, कार्यकारी अभियंता सर्वश्री. बारडकर, श्री. मठपती , विजय कुरुंदकर, नंदकुमार पत्तेवार, मुकुंद कहाळेकर, आर.एम. देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.  
प्रास्ताविकात नांदेड पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता श्री सब्बीनवार यांनी जलजागृती सप्ताह साजरा करण्याची निकड भासली याबाबत विस्तृतपणे विवेचन केले. पाणी जागरुकतेसाठी यशदा पुणे येथे कायमस्वरुपी केंद्र यावर्षी स्थापन केल्याचे त्यांनी सांगितले. पाण्याचे महत्व व बचत याबाबत डॉ. परमेश्वर, पंजाबराव कल्याणकर, बालाजी कोंपलवार, जयश्री जयस्वाल, सुषमा गहीरवार, रामराव कदम, मोरे यांची समायोचित भाषणे झाली.
यावेळी जलजागृती सप्ताहाचे आयोजित निबंध स्पर्धेतील विजेते स्पर्धकास पारितोषीक प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. जलजागृती समारोप कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपकार्यकारी अभियंता सुधीर संतान, उपअभियंता निळकंठ गव्हाणे, जी. एस. गायकवाड, विजयकुमार पुय्यड, सौ. रोहिणी वडजे, श्रीमती आलुरकर  व कर्मचारी एस.व्ही. चव्हाण, ए. ए. पंडागळे, एस. एस. मस्के, एस. एस. शिंदे, फिरोज पठाण,  इसाक, गुडेवार, शिवाजी देशमुख आदीने परिश्रम घेतले. या कार्यक्रमाप्रसंगी जलसंपदा विभागातील जवळपास 350 कर्मचारी उपस्थित होते.
बाल किर्तनकार कु. ईशा देशपांडे व त्यांच्या समुहांनी भारुड गायनातुन पाण्याचे महत्व विषद केले. सुत्रसंचालन उपअभियंता संजय पवार यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. प्रमोद देशपांडे यांच्या संचानी स्वागत गिताने केली. आभार कार्यकारी अभियंता आर.एम. देशमुख यांनी मानले.
000000


महिला बचतगटांच्या कापडी पिशवीचे
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचे हस्ते अनावरण
नांदेड, दि. 22:- सीएसआरमधून प्राप्त झालेल्या कॉटन कापडाचे माविम मार्फत स्थापित महिला बचतगटाने तयार केलेल्या कापडी पिशवीचे अनावरण जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी यांचे कक्षात करण्यात आले.   
यावेळी जिल्हाधिकारी श्री डोंगरे म्हणाले, प्लास्टिक पिशवी न वापरता नागरिकांनी कॉटन कापडी पिशवीचा वापर करावा. माविम टिम आणि बचत गटातील महिलांचे मनोबल वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्लास्टिकला पर्याय म्हणून या कापडी पिशव्या बाजारात वापरण्यासाठी खूप उपयोगी आहेत. ही पिशवी बाजारात जाताना वापरु शकतो. बचत गटातील महिला दहा मिनिटात एक कापडी पिशवी तयार करतात. यातून महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार आहे. या कापडी पिशव्या तयार करण्यास इंडिया मेगा ॲग्रो अनाज लि. एमआयडीसी, कृष्णूर नांदेड यांनी  अर्थसहाय्य केले आहे.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, वन विभागाचे उपवनसंरक्षक अशिष ठाकरे, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर, उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तुकाराम मोटे, तहसीलदार (संगायो) विजय अवधाने, जिल्हा समन्वय अधिकारी (माविम) चंदनसिंग राठोड, प्रविणकुमार घुले यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.  
000000


जिल्ह्यातील 1 हजार 168 गावात  
दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर
दुष्काळसदृश्य गावात विविध सवलती लागू
नांदेड, दि. 22 :-  सन 2017-18 च्‍या खरीप हंगामातील हंगामी पैसेवारी 50 पैसे किंवा त्यापेक्षा कमी आलेल्या कंधार, लोहा, हदगाव, हिमायतनगर, किनवट, माहूर, देगलूर, मुखेड, बिलोली, नायगाव या तालुक्यातील 1 हजार 168 गावात दुष्‍काळसदृश्‍य परिस्थिती जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी जाहीर केली आहे. त्‍याअनुषंगाने दुष्‍काळसदृश्‍य परिस्थितील गावात विविध सवलती लागू केल्या आहेत.
महसूल व वन विभागाचा शासन निर्णय 28 फेब्रुवारी 2018 अन्वये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यात खरीप पिकांची हंगामी पैसेवारी 50 पैसे किंवा त्‍यापेक्षा कमी आलेल्‍या गावांची संख्‍या तालुकानिहाय पुढील प्रमाणे आहे. कंधार- 126, लोहा- 127, हदगाव- 145, हिमायतनगर- 64, किनवट- 191, माहूर- 92, देगलूर- 108, मुखेड- 135, बिलोली- 91, नायगाव- 89 याप्रमाणे एकुण 1 हजार 168 गावात दुष्‍काळसदृश्‍य परिस्थिती जाहीर केली आहे. या गावांमध्‍ये पुढील सवलती लागू राहतील. जमीन महसूलात सूट. सहकारी कर्जाचे पुनर्गठन. शेतीशी निगडीत कर्जाच्‍या वसूलीस स्‍थगिती. कृषीपंपाच्‍या चालू विजबिलात 33.5 टक्‍के सूट. शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्‍यांच्‍या परिक्षा शुल्‍कात माफी. रोहयोअंतर्गत कामाच्‍या निकषात काही प्रमाणात शिथिलता. आवश्‍यक तेथे पिण्‍याचे पाणी पुरविण्‍यासाठी टॅंकर्सचा वापर. टंचाई जाहीर केलेल्‍या गावात शेतकऱ्यांच्‍या शेतीच्‍या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे. या सवलतीचा यात समावेश आहे. याबाबत संबंधीत विभाग प्रमुखांना दुष्‍काळसदृश्‍य परिस्थिती जाहीर करण्‍यात आलेल्‍या तालुक्‍यातील गावातील खातेदारांना टंचाईसंदर्भात शासनाच्‍या प्रचलीत धोरणानुसार अनुज्ञेय सवलती देण्‍याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले आहेत.  
0000

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...