Thursday, March 22, 2018


जिल्ह्यातील 1 हजार 168 गावात  
दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर
दुष्काळसदृश्य गावात विविध सवलती लागू
नांदेड, दि. 22 :-  सन 2017-18 च्‍या खरीप हंगामातील हंगामी पैसेवारी 50 पैसे किंवा त्यापेक्षा कमी आलेल्या कंधार, लोहा, हदगाव, हिमायतनगर, किनवट, माहूर, देगलूर, मुखेड, बिलोली, नायगाव या तालुक्यातील 1 हजार 168 गावात दुष्‍काळसदृश्‍य परिस्थिती जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी जाहीर केली आहे. त्‍याअनुषंगाने दुष्‍काळसदृश्‍य परिस्थितील गावात विविध सवलती लागू केल्या आहेत.
महसूल व वन विभागाचा शासन निर्णय 28 फेब्रुवारी 2018 अन्वये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यात खरीप पिकांची हंगामी पैसेवारी 50 पैसे किंवा त्‍यापेक्षा कमी आलेल्‍या गावांची संख्‍या तालुकानिहाय पुढील प्रमाणे आहे. कंधार- 126, लोहा- 127, हदगाव- 145, हिमायतनगर- 64, किनवट- 191, माहूर- 92, देगलूर- 108, मुखेड- 135, बिलोली- 91, नायगाव- 89 याप्रमाणे एकुण 1 हजार 168 गावात दुष्‍काळसदृश्‍य परिस्थिती जाहीर केली आहे. या गावांमध्‍ये पुढील सवलती लागू राहतील. जमीन महसूलात सूट. सहकारी कर्जाचे पुनर्गठन. शेतीशी निगडीत कर्जाच्‍या वसूलीस स्‍थगिती. कृषीपंपाच्‍या चालू विजबिलात 33.5 टक्‍के सूट. शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्‍यांच्‍या परिक्षा शुल्‍कात माफी. रोहयोअंतर्गत कामाच्‍या निकषात काही प्रमाणात शिथिलता. आवश्‍यक तेथे पिण्‍याचे पाणी पुरविण्‍यासाठी टॅंकर्सचा वापर. टंचाई जाहीर केलेल्‍या गावात शेतकऱ्यांच्‍या शेतीच्‍या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे. या सवलतीचा यात समावेश आहे. याबाबत संबंधीत विभाग प्रमुखांना दुष्‍काळसदृश्‍य परिस्थिती जाहीर करण्‍यात आलेल्‍या तालुक्‍यातील गावातील खातेदारांना टंचाईसंदर्भात शासनाच्‍या प्रचलीत धोरणानुसार अनुज्ञेय सवलती देण्‍याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले आहेत.  
0000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...