Friday, December 22, 2017

रब्बी हंगाम पाणी-पाळीसाठी
अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 22 :- सद्यस्थितीत उपलब्ध पाणीसाठ्यातून लाभक्षेत्रातील उभी हंगामी व बारमाही पिकांना संरक्षणात्मक एक पाणी-पाळी डिसेंबर 2017 अखेर देण्याचे प्रस्तावित आहे. त्यानुसार उर्ध्व पेनगंगा प्रकल्पाच्या (इसापूर धरण) लाभक्षेत्रातील बागायतदारानी नमुना 7 व 7 अमध्ये पाणी अर्ज करावीत, असे आवाहन कार्यकारी अभियंता, उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र. 1 नांदेड यांनी केले आहे.  
            उर्ध्व पेनगंगा प्रकल्पांतर्गत इसापूर उजवा कालवा कि.मी. 119 व इसापूर डावा कालवा कि.मी. 84 पर्यंतच्या वितरण व्यवस्थेअंतर्गत लाभक्षेत्रातील सर्व लाभधारकांना, सिंचन वर्ष 2017-18 मध्ये इसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस न झाल्याने रब्बी हंगामाच्या प्रारंभी धरणात केवळ 14 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. धरणात पुरेसा पाणीसाठा नसल्यामुळे उर्ध्व पेनगंगा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात रब्बी हंगामासाठी सिंचन कार्यक्रम पुर्णपणे राबविणे शक्य होणार नाही.
खालील दर्शविलेल्या शर्तीस व शासनाच्या प्रचलीत नियमास अनुसरुन पाणी अर्जास मंजूरी देण्यात येईल. हंगामाची मुदत 15 ऑक्टोंबर 2017 ते 28 फेब्रुवारी 2018 पिकाचे नाव- उभ्या पिकांना संरक्षणात्मक पाणी पाळी. पाणी अर्जाचा विहित नमुना क्र  7 व 7 अ संबंधीत शाखा कार्यालयात विनामुल्य मिळेल. सदर पाणी अर्जात पिकाची मागणी 20 आरच्या पटीत नोंदवावी. अर्जातील पूर्ण माहिती भरुन पाणी अर्ज कार्यालयीन वेळेत शाखा कार्यालयात दाखल करुन त्याची पोंच पावती घ्यावी. पाणी अर्ज भरतेवेळेस थकबाकीदार लाभधारकांनी मागील थकबाकी व चालु पिकांची अग्रीम पाणीपट्टी भरुन सहकार्य             करावे म्हणजे दिलेला पाणी अर्ज मंजूर होईल. नियमानुसार पाणीपट्टी भरणा न केल्यास पाणी अर्ज नामंजूर होईल तेंव्हा नामंजुर क्षेत्रास कालव्याद्वारे पाणी पुरवठा करणे बंधनकारक राहणार नाही. मंजुर क्षेत्रासच कालव्याचे पाणी अग्रक्रमाणे देण्यात येईल. नामंजुर व अनधिकृत क्षेत्रास कालव्याचे पाणी देण्याची जबाबदारी पाटबंधारे विभागावर राहणार नाही तेंव्हा मंजूरी घेवुनच पिकांचे नियोजन करावे. उडाप्याचे व वितरिका, मायनरच्या टेलच्या भागातील क्षेत्रास परवानगी दिली जाणार नाही. तेंव्हा कालव्याच्या पाण्यावर विसंबुन पिके घेवु नयेत याची नोंद घ्यावी या व्यतिरिक्त टेलच्या भागात पिके घेतल्यास व पाण्याअभावी पिके वाळल्यास त्यास पाटबंधारे विभाग जबाबदार राहणार नाही.
प्रत्येक लाभधारकांनी ठरवुन दिलेल्या तारखे प्रमाणेच पिकास पाणी घ्यावे. तसेच दिवसरात्र पाणी घेणे बंधनकारक  आहे. दिवसा किंवा रात्री जेंव्हा पाणी पाळी येईल तेंव्हा पाणी घेतले नाहीतर नदी / नाल्यास पाणी वाया जाते त्यामुळे सिंचनाचा कालावधी वाढतो पर्यायाने पाणी पाळी अंतरात वाढ होते. त्यामुळे असे पाणी वाया गेल्यास ठरावीक मुदतीत पाणी देणे शक्य होणार नाही व त्याची जबाबदारी या कार्यालयावर राहणार नाही याची सर्व लाभधारकांनी नोंद घ्यावी. सिंचन करतेवेळी मंजूर क्षेत्राचा पास जवळ ठेवावा. कमी पाण्यात व कमी वेळात सिंचन करुन राष्ट्रीय जलसंपत्तीचा काटेकोरपणे वापर करावा. पाणी नाश कटाक्षाने टाळावा.
नैसर्गीक आपत्ती व काही अपरिहार्य कारणास्तव किंवा तांत्रिक कारणास्तव पाणी पुरवठा करणे शक्य न झाल्यास व त्यामुळे पिकाचे नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी पाटबंधारे विभागावर राहणार नाही. तसेच महाराष्ट्र पाटबंधारे प्रचलीत नियमानुसार शर्ती व अटीचे उल्लंघन झाल्यास लाभधारकास अगाऊ सुचना न देता दिलेली मंजुरी रद्द करण्यात येईल व पाणी पुरवठा बंद करण्यात येईल. सिंचन नियमांचे पालन करणे प्रत्येक लाभधारकास बंधनकारक राहील. नियमाचे उल्लंघन केल्यास  संबंधीतावर शासन नियमाप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल. पाणी वापर संस्थानी पाणी पाळीतच संस्थेचे क्षेत्र भिजवुन घ्यावे, असेही आवाहन नांदेडचे उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.  

000000
वाहन नोंदणी प्रमाणपत्र
स्मार्ट कार्ड स्वरुपात
नांदेड, दि. 22 :-  सर्व संवर्गातील वाहनांना नोंदणी प्रमाणपत्र (आर.सी) हे स्मार्ट कार्ड स्वरुपात 26 डिसेंबर पासून देण्यात येणार आहे. या स्मार्ट कार्डसाठी दोनशे रुपये प्रमाणे आकारणी करण्यात येणार आहे. याबाबत संबंधीत वाहन वितरक व नागरीकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

000000
नूतन वर्ष स्वागताच्या करमणूक
 कार्यक्रमासाठी परवानगी आवश्यक
नांदेड, दि. 22 :- जिल्ह्यातील सर्व हॉटेल्स, क्लब, अथवा मॉटेल क्लब आणि अन्य करमणूक केंद्रे चालकांना व तत्सम करमणुकीचे कार्यक्रम आयोजित करणाऱ्या आयोजकांना नूतन वर्षाच्या आगमनानिमित्त करमणुकीचे कार्यक्रम आयोजित करावयाचे असल्यास त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक कर शाखेत अर्ज सादर करावा व रीतसर परवानगी मिळवावी. विनापरवाना आयोजित करमणुकीच्या कार्यक्रमावर शासन नियमानुसार करमणूक शुल्काची दंडासह आकारणी करण्यात येईल.
विनापरवाना करमणुकीचे कार्यक्रम आयोजित करणे मुंबई करमणुक शुल्क अधिनियम 1923 मधील कलम 5 (क) गुन्हा असून विनापरवाना करमणुकीचे कार्यक्रम आयोजित केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितावर सदर कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात येईल. याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
मुंबई करमणूक शुल्क अधिनियम 1923 व तदांतर्गत मुंबई करमणूक शुल्क नियम 1958 च्या अधिन राहून नांदेड जिल्ह्यातील सर्व हॉटेल्स, क्लब अथवा मॉटेल कल्ब आणि अन्य करमणूक केंद्रे येथे नुतन वर्षानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या ठिकाणी करमणुकीच्या कार्यक्रमावर मुंबई करमणूक शुल्क अधिनियम 1923 मधील कलम 3 (1) (बी) नुसार करमणूक कराची आकारणी करण्यात येते. 

000000
राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त रविवारी  
तहसिल कार्यालयात कार्यक्रम
नांदेड, दि. 22 :- ग्राहकांच्या हक्कांची व ग्राहक संरक्षण कायदा यांची जनजागृती व्हावी यासाठी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात येतो. जिल्हा पुरवठा विभागाच्यावतीने नांदेड तहसिल कार्यालय येथे रविवार 24 डिसेंबर 2017 रोजी सकाळी 11 वा. राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील राहणार आहेत.
प्रमुख वक्ते म्हणून ग्राहक पंचायतीचे देवगिरी प्रांत उपाध्यक्ष डॅा. बा. दा. जोशी व विभागीय संघटक आर. एस. कमटलवार हे राहतील. या कार्यक्रमास ग्राहक व नागरीकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर यांनी केले आहे.

000000

Thursday, December 21, 2017

वैद्यकीय शिक्षण मंत्री
गिरीष महाजन यांचा दौरा
नांदेड, दि. 21 :- राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री गिरीष महाजन हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शुक्रवार 22 डिसेंबर 2017 रोजी नागपूर येथून नंदीग्राम एक्सप्रेसने सायं 4.40 वा. नांदेड रेल्वे स्थानक येथे आगमन व शासकीय वाहनाने किनवटकडे प्रयाण. सायं. 6.30 वा. किनवट शासकीय विश्रामगृह येथे आगमन, राखीव व मुक्काम.
शनिवार 23 डिसेंबर सकाळी 11 किनवट येथील आरोग्य शिबिराच्या तयारीस्तव आढावा बैठक. रविवार 24 डिसेंबर रोजी सकाळी 10 वा. किनवट येथील आरोग्य शिबिरास उपस्थिती. दुपारी 3.30 वा. किनवट येथून शासकीय वाहनाने नांदेडकडे प्रयाण. सायं. 6.40 वा. नांदेड रेल्वे स्थानक येथुन PAU PNBE एक्सप्रेसने नागपूरकडे प्रयाण करीतल.

00000
भव्य ग्रामीण महाआरोग्य शिबिराच्या
यशस्वीतेसाठी समितीने समन्वयाने कार्य करावीत
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
            गरजू रुग्णांसाठी रविवारी किनवटला मोफत महाआरोग्य शिबीर
नांदेड, दि. 21 :- किनवट येथील भव्य ग्रामीण महाआरोग्य शिबिराच्या यशस्वीतेसाठी सर्व  समितीवर सोपविलेली कार्य समन्वय साधून पार पाडावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले. रविवार 24 डिसेंबर रोजी किनवट येथे होणाऱ्या भव्य ग्रामीण महाआरोग्य शिबिराचे सविस्तर नियोजन करण्यासाठी सर्व शासकीय समिती प्रमुखांची आढावा बैठक येथील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे संपन्न झाली. यावेळी अध्यक्षस्थानावरुन जिल्हाधिकारी श्री. डोंगरे बोलत होते.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, किनवटचे सहाय्यक जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, महाआरोग्य शिबिराचे समन्वयक डॉ. यशवंत पाटील, पोलीस उपअधीक्षक व्ही. पी. नांदेडकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिराणकर, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. पी. कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विठ्ठल मेकाने, जिल्हा महिला बाल कल्याण अधिकारी धर्मपाल शाहू, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. राजेंद्र पवार आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.  
जिल्हाधिकारी श्री. डोंगरे म्हणाले, महाआरोग्य शिबिरात 92 ओपीडी स्थापन करण्यात आल्या आहेत. रुग्णांना चांगली सेवा देण्यासाठी उपयुक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती संबंधीत विभागाने तातडीने करावी. समितीचे कार्य संबंधीत विभागाने सुक्ष्म नियोजन करुन पार पाडावीत. तसेच स्क्रीनिंग केलेले रुग्ण शिबीर स्थळी आणने व परत पोहचविण्यासाठी वाहन व्यवस्था तसेच व्यासपीठ, नावनोंदणी, ओपीडी, पाणी पुरवठा, अवयवदान, स्वच्छता, महिला नियोजन, आपत्कालीन परिस्थिती, औषधी पुरवठा, दक्षता, जनजागृती, रक्तदान, वाहन नियोजन, भोजन, रुग्ण, अतिथी व्यवस्था, आसन समिती, मैदान नियोजन समिती कार्याचा आढावा घेऊन उपयुक्त सुचना जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी दिल्या.

या महाआरोग्य शिबिरात माहूर, किनवट, हदगाव, हिमायतनगर व भोकर या पाच तालुक्यातील पुर्व तपासणी केलेल्या गरजू रुग्णांवर तज्ज्ञ डॉक्टरांच्यावतीने मोफत तपासणी व उपचार करण्यात येणार आहे. या शिबिरासाठी जवळपास चार ट्रक औषध साठा उपलब्ध करण्यात आला आहे. बाराशे डॉक्टर टिम येथील रुग्णांवर उपचार करणार असून त्यात दोनशे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर्स असून रोगानुसार  वर्गवारी करुन 80 मेडीकल उभारले जाणार आहेत. पुर्व तपासणी केलेल्या रुग्णांसाठी कार्डवर लिहिलेल्या आजारानुसार रविवार 24 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजेपासून ओपीडी सुरु होणार आहे. या शिबीरात जवळपास 5 हजार स्वयंसेवक कार्यरत राहणार आहेत. नांदेड येथील श्री गुरुगोबिंदसिंघजी गुरुद्वारा यांचेवतीने बाहेर गावावरुन आलेले रुग्ण, डॉक्टर, स्वयंसेवक यांना मोफत भोजन व पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. जैन ठिबक यांचेवतीने केळी, फिनोलेक्स आणि मायलॉन कंपनीमार्फत औषधी उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. पुणे व जळगाव येथील स्वयंसेवी संस्थेच्यावतीने मंडप उभारणीचे काम करण्यात आले आहे. तसेच आतापर्यंत जवळपास 17 हजार गरीब, गरजू रुग्णांची पूर्व तपासणी करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.                         
000000

Wednesday, December 20, 2017

महाआरोग्य शिबीराचे रविवारी किनवटला आयोजन 
गरजू रुग्णांनी शनिवार पर्यंत पूर्व तपासणी करावी
- प्र. जिल्हाधिकारी संतोष पाटील    
नांदेड, दि. 20 :- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून तसेच वैद्यकीय शिक्षण व जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांचे मार्गदर्शनाखाली विनामुल्य भव्य ग्रामीण महाआरोग्य शिबिराचे आयोजन जिल्हा प्रशासन व निरामय सेवा फाऊंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार 24 डिसेंबर 2017 रोजी किनवट येथील अटल मैदान, एमआयडीसी गोकूंदा रोड येथे करण्यात आले आहे. या शिबिराचा संबंधीत गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.
या शिबिरासाठी माहूर, किनवट, हदगाव, हिमायतनगर व भोकर या पाच तालुक्यातील गरजू व गरीब रुग्णांची पूर्व तपासणी शनिवार 23 डिसेंबर पर्यंत उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, नागरी रुग्णालय तसेच प्राथमिक उपकेंद्र येथे करण्यात येत आहे. या शिबिरासाठी 20 हजारा डिसेंबर पर्यंत रुग्णांची पूर्व तपासणी नोंदणी करण्यात आली आहे. शिबीराच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली विविध समितीचे गठन करण्यात आले आहे. या समित्या जिल्ह्याच्या विविध आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत.  
या शिबीरात माहूर, किनवट, हदगाव, हिमायतनगर व भोकर या तालुक्यातील गरजू व गरीब रुग्णांना मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, नाशिक येथील दोनशे तज्ज्ञ डॉक्टरांचा मोफत सल्ला व उपचार मिळणार आहे. या शिबीरात रुग्णांची मोफत तपासणी, चाचणी, औषधोपचार, शस्त्रक्रिया, लठ्ठपणा तपासणी, स्तन कर्करोग तपासणी केली जाणार आहे. तसेच या शिबीरातंर्गत रक्तदान शिबीर व अवयवदान अर्ज भरणे या सुविधा पुरविण्यात येणार आहेत. निदान झालेल्या नेत्ररोग, ह्दयरोग, अस्थिव्यंग रोग, जनरल सर्जरी, मेंदूरोग, बालरोग, मुत्ररोग, प्लास्टिक सर्जरी, स्त्रीरोग, कर्करोग, ग्रंथींचे विकार, लठ्ठपणा, मानसिक आरोग्य, श्वसन विकार, क्षयरोग, त्वचारोग, गुप्तरोग, अनुवांशिक आजार, कान, नाक, घसा यांचे आजार यासारख्या दुर्धर आजारांवर सुसज्ज व उच्चश्रेणीच्या रुग्णालयात सल्ला व उपचार सुविधा मोफत पुरविण्यात येणार आहेत, अशी माहिती नांदेड जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.
या शिबिरासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी आरोग्यदुत रामेश्वर नाईक, संदिप जाधव आणि महाआरोग्य शिबीर समन्वयक डॉ. यशवंत पाटील हे संयोजन करीत आहेत.  

00000    

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...