Thursday, December 21, 2017

भव्य ग्रामीण महाआरोग्य शिबिराच्या
यशस्वीतेसाठी समितीने समन्वयाने कार्य करावीत
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
            गरजू रुग्णांसाठी रविवारी किनवटला मोफत महाआरोग्य शिबीर
नांदेड, दि. 21 :- किनवट येथील भव्य ग्रामीण महाआरोग्य शिबिराच्या यशस्वीतेसाठी सर्व  समितीवर सोपविलेली कार्य समन्वय साधून पार पाडावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले. रविवार 24 डिसेंबर रोजी किनवट येथे होणाऱ्या भव्य ग्रामीण महाआरोग्य शिबिराचे सविस्तर नियोजन करण्यासाठी सर्व शासकीय समिती प्रमुखांची आढावा बैठक येथील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे संपन्न झाली. यावेळी अध्यक्षस्थानावरुन जिल्हाधिकारी श्री. डोंगरे बोलत होते.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, किनवटचे सहाय्यक जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, महाआरोग्य शिबिराचे समन्वयक डॉ. यशवंत पाटील, पोलीस उपअधीक्षक व्ही. पी. नांदेडकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिराणकर, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. पी. कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विठ्ठल मेकाने, जिल्हा महिला बाल कल्याण अधिकारी धर्मपाल शाहू, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. राजेंद्र पवार आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.  
जिल्हाधिकारी श्री. डोंगरे म्हणाले, महाआरोग्य शिबिरात 92 ओपीडी स्थापन करण्यात आल्या आहेत. रुग्णांना चांगली सेवा देण्यासाठी उपयुक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती संबंधीत विभागाने तातडीने करावी. समितीचे कार्य संबंधीत विभागाने सुक्ष्म नियोजन करुन पार पाडावीत. तसेच स्क्रीनिंग केलेले रुग्ण शिबीर स्थळी आणने व परत पोहचविण्यासाठी वाहन व्यवस्था तसेच व्यासपीठ, नावनोंदणी, ओपीडी, पाणी पुरवठा, अवयवदान, स्वच्छता, महिला नियोजन, आपत्कालीन परिस्थिती, औषधी पुरवठा, दक्षता, जनजागृती, रक्तदान, वाहन नियोजन, भोजन, रुग्ण, अतिथी व्यवस्था, आसन समिती, मैदान नियोजन समिती कार्याचा आढावा घेऊन उपयुक्त सुचना जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी दिल्या.

या महाआरोग्य शिबिरात माहूर, किनवट, हदगाव, हिमायतनगर व भोकर या पाच तालुक्यातील पुर्व तपासणी केलेल्या गरजू रुग्णांवर तज्ज्ञ डॉक्टरांच्यावतीने मोफत तपासणी व उपचार करण्यात येणार आहे. या शिबिरासाठी जवळपास चार ट्रक औषध साठा उपलब्ध करण्यात आला आहे. बाराशे डॉक्टर टिम येथील रुग्णांवर उपचार करणार असून त्यात दोनशे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर्स असून रोगानुसार  वर्गवारी करुन 80 मेडीकल उभारले जाणार आहेत. पुर्व तपासणी केलेल्या रुग्णांसाठी कार्डवर लिहिलेल्या आजारानुसार रविवार 24 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजेपासून ओपीडी सुरु होणार आहे. या शिबीरात जवळपास 5 हजार स्वयंसेवक कार्यरत राहणार आहेत. नांदेड येथील श्री गुरुगोबिंदसिंघजी गुरुद्वारा यांचेवतीने बाहेर गावावरुन आलेले रुग्ण, डॉक्टर, स्वयंसेवक यांना मोफत भोजन व पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. जैन ठिबक यांचेवतीने केळी, फिनोलेक्स आणि मायलॉन कंपनीमार्फत औषधी उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. पुणे व जळगाव येथील स्वयंसेवी संस्थेच्यावतीने मंडप उभारणीचे काम करण्यात आले आहे. तसेच आतापर्यंत जवळपास 17 हजार गरीब, गरजू रुग्णांची पूर्व तपासणी करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.                         
000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...