Wednesday, December 20, 2017

महाआरोग्य शिबीराचे रविवारी किनवटला आयोजन 
गरजू रुग्णांनी शनिवार पर्यंत पूर्व तपासणी करावी
- प्र. जिल्हाधिकारी संतोष पाटील    
नांदेड, दि. 20 :- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून तसेच वैद्यकीय शिक्षण व जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांचे मार्गदर्शनाखाली विनामुल्य भव्य ग्रामीण महाआरोग्य शिबिराचे आयोजन जिल्हा प्रशासन व निरामय सेवा फाऊंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार 24 डिसेंबर 2017 रोजी किनवट येथील अटल मैदान, एमआयडीसी गोकूंदा रोड येथे करण्यात आले आहे. या शिबिराचा संबंधीत गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.
या शिबिरासाठी माहूर, किनवट, हदगाव, हिमायतनगर व भोकर या पाच तालुक्यातील गरजू व गरीब रुग्णांची पूर्व तपासणी शनिवार 23 डिसेंबर पर्यंत उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, नागरी रुग्णालय तसेच प्राथमिक उपकेंद्र येथे करण्यात येत आहे. या शिबिरासाठी 20 हजारा डिसेंबर पर्यंत रुग्णांची पूर्व तपासणी नोंदणी करण्यात आली आहे. शिबीराच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली विविध समितीचे गठन करण्यात आले आहे. या समित्या जिल्ह्याच्या विविध आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत.  
या शिबीरात माहूर, किनवट, हदगाव, हिमायतनगर व भोकर या तालुक्यातील गरजू व गरीब रुग्णांना मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, नाशिक येथील दोनशे तज्ज्ञ डॉक्टरांचा मोफत सल्ला व उपचार मिळणार आहे. या शिबीरात रुग्णांची मोफत तपासणी, चाचणी, औषधोपचार, शस्त्रक्रिया, लठ्ठपणा तपासणी, स्तन कर्करोग तपासणी केली जाणार आहे. तसेच या शिबीरातंर्गत रक्तदान शिबीर व अवयवदान अर्ज भरणे या सुविधा पुरविण्यात येणार आहेत. निदान झालेल्या नेत्ररोग, ह्दयरोग, अस्थिव्यंग रोग, जनरल सर्जरी, मेंदूरोग, बालरोग, मुत्ररोग, प्लास्टिक सर्जरी, स्त्रीरोग, कर्करोग, ग्रंथींचे विकार, लठ्ठपणा, मानसिक आरोग्य, श्वसन विकार, क्षयरोग, त्वचारोग, गुप्तरोग, अनुवांशिक आजार, कान, नाक, घसा यांचे आजार यासारख्या दुर्धर आजारांवर सुसज्ज व उच्चश्रेणीच्या रुग्णालयात सल्ला व उपचार सुविधा मोफत पुरविण्यात येणार आहेत, अशी माहिती नांदेड जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.
या शिबिरासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी आरोग्यदुत रामेश्वर नाईक, संदिप जाधव आणि महाआरोग्य शिबीर समन्वयक डॉ. यशवंत पाटील हे संयोजन करीत आहेत.  

00000    

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...