Saturday, July 22, 2017

मदर युनीटधारक निवडीसाठी
अर्ज करण्याचे पशुसंवर्धनचे आवाहन
नांदेड, दि. 22 :- आदिवासी ग्रामीण भागात परसातील कुक्कुट पालनाद्वारे अंगणवाड्यांमधील मुलांच्या आहारामधून अंडी पुरवठा करण्यासाठी व स्वयंरोजगार निर्मितीसाठी "स्वयंम प्रकल्प" किनवट व माहूर तालुक्यातील आदिवासी क्षेत्रामध्ये राबविण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत मदर युनीट लाभार्थी निवडीसाठी अर्ज करावे असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपाआयुक्त तथा सदस्य सचिव स्वयम प्रकल्प नांदेड यांनी केले आहे.   
मदर युनीट लाभार्थी निवडीसाठी निकष पुढील प्रमाणे राहतील. युनिटधारक हा स्थानीक आदिवासी असावा. शासकीय सधन विकास कुक्कुटगट, नव्याने स्थापीत होणारे खाजगी भागीदारी तत्वावरील सधन विकास कुक्कुटगट, कृषि विज्ञान केंद्र यांच्यामधून करण्यात येणार आहे. अपवादात्मक वेळी आदिवासी प्रवर्गातून मदर युनीटधारक न मिळाल्यास इतर प्रवर्गातून त्यांची निवड करण्यात येईल. मदर युनीट धारकास कुक्कुट पालन व्यवसाचा अनुभव, पक्षी संगोपनाची सुविधा, पक्षीगृह असलेला आणि निवडलेल्या लाभधारकाच्या गावाजवळील असावा. मदर युनीट धारकांची निवड ही जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली प्रकल्प समन्वय समितीमार्फत करण्यात येणार आहे.
निवडलेल्या मदर युनीट धारकाला 1 लाख 50 हजार रुपये युनीट स्थापनेसाठी उभारावे लागतील. यापैकी 60 हजार रुपयाचे अनुदान देय राहील. मदर युनीटमध्ये एक दिवसीय पिल्लांचे चार आठवड्यापर्यंत संगोपन करुन निवडलेल्या लाभार्थ्यांना पक्षांचे वाटप तीन टप्प्यात ( 20 / 15 / 10 एकूण 45 पक्षी ) करण्यात येणार आहे. प्रती पक्षी मदर युनीट धारकास 55 रुपये, 58 रुपये 60 रुपये याप्रमाणे पक्षांची खरेदी किंमत अदा करण्यात येणार आहे.  या योजनेचे अंमलबजावणी क्षेत्र प्रकल्प कार्यालय एकात्मीक आदिवासी विकास विभाग यांच्याकडून निश्चित करुन एक मदर युनीट स्थापन करण्यात येणार आहे. मदर युनीटमार्फत  चार आठवड्याचे पक्षी निवडलेल्या लाभार्थ्यांना तीन टप्प्यात प्रती लाभार्थी 45 पक्षी प्रमाणे वाटप करण्यात येतील.  
स्वयम प्रकल्प अंतर्गत मदर युनीट स्थापनेच्या अधिक माहितीसाठी इच्छुकांनी पशुधन विकास अधिकारी (वि) पंचायत समिती किनवट व माहूर यांचेशी संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपाआयुक्त केले आहे.  
000000

Friday, July 21, 2017

जलयुक्त शिवार अभियान, नरेगा कामांच्या
नियोजनाकडे लक्ष द्या - जिल्हाधिकारी डोंगरे
नांदेड दि. 21 :- जलयुक्त शिवार अभियान, नरेगा, मागेल त्याला शेततळे या कामासाठी व्यवस्थित नियोजन करुन ही योजना गरजु पर्यंत पोहचवण्याचे काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले.  जलयुक्त शिवार अभियान, नरेगा, मागेल त्याला शेततळे, वृक्ष लागवड या योजनांचा जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे आज आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, वन विभागाचे उपवनसंरक्षक आशिष ठाकरे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) बी. एन. कांबळे, कार्यकारी अभियंता (जलसंधारण) व्ही. पी. शाहू यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्री. डोंगरे म्हणाले की, जलयुक्त शिवार अभियानांतर्गत साठलेल्या पाण्याचा पुरेपुर वापर झाला पाहिजे. यासाठी जनजागृती करण्याचे आवाहन त्यांनी केले. सन 2017-18 मधील गावामध्ये पुढील काळात काम करण्यासाठी आतापासून नियोजन करण्याचे त्यांनी निर्देश दिले. तसेच नरेगाअंतर्गत अकरा कलमी कार्यक्रम, अहिल्यादेवी सिंचन विहिर, अमृतकुंड शेततळे, फळबाग लागवड, भुसंजीवन गांडुळ खत, नाडेप व वृक्ष लागवड, निर्मल शौचालय याबाबत वनविभाग, गटविकास अधिकारी यांच्याकडून आढावा घेतला.
बैठकीस जिल्हयातील सर्व उपविभागीय अधिकारी, उप विभागीय कृषि अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, आरएफओ, लागवड अधिकारी, उपकार्यकारी अभियंता, उपमुख्य कार्यकारी अभियंता (नरेगा) उपस्थित होते.

000000
मतदार नोंदणीसाठी आज विशेष मोहीम
   सर्व केंद्रावर बीएलओ उपस्थित राहणार
            नांदेड दि. 21 :- जिल्‍ह्यातील सर्व 2 हजार 831 मतदान केंद्रावर शनिवार 22 जुलै 2017 रोजी विशेष शिबीर आयोजित करण्‍यात आले आहे. या केंद्रावर बीएलओ उपस्थित राहून अर्ज स्‍वीकारणार आहेत. दिनांक 1 जानेवारी 2017 रोजी ज्‍यांचे वयाची 18 वर्षे पूर्ण झाली आहेत अशा सर्व पात्र मतदारांनी नाव नोंदणीसाठी अर्ज करावे, असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणुक अधिकारी अरुण डोंगरे  यांनी केले आहे.
             जिल्‍हयातील सर्व तहसिल कार्यालयातील मतदार मदत केंद्र व संबंधीत बीएलओ यांचेकडे दिनांक 31 जुलै 2017 पर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज करता येतील. मतदारांनी अर्ज करताना आवश्‍यक ते पुरावे तसेच विहित नमुन्‍यातील प्रतिज्ञापत्र जोडूनच अर्ज करावेत.  तसेच कुटूंबातील व्‍यक्‍तींनीच अर्ज जमा करावा.  त्रयस्‍त व्‍यक्‍तीमार्फत गठ्ठयांनी अर्ज स्‍वीकरले जाणार नाहीत.
भारत निवडणुक आयोगाने दिनांक 1 जानेवारी 2017 या अर्हता दिनांकावर आधारित विधानसभा मतदार यादयाच्‍या विशेष पुर्नरिक्षणाचा कार्यक्रम जाहीर केला आहे.  मतदार यादीत नाव नोंदणी, नावात दुरुस्‍ती, आक्षेप नोंदविण्‍यासाठी दिनांक 1 जुलै ते 31 जुलै 2017 हा कालावधी आयोगाने निश्‍चीत केला आहे. जिल्‍हयात 23 लाख 74 हजार 303 इतकी मतदार संख्‍या असून त्‍यापैकी 12 लाख 41 हजार 470 पुरुष 11 लाख 32 हजार 780 स्‍त्री व 53 इतर मतदार आहेत.
          
PVC EPIC चे वितरण
ज्‍या मतदारांनी दिनांक 5 जानेवारी 2017 नंतर ज्‍या मतदारांची नाव नोंदणी करण्‍यात आलेली आहे किंवा ज्‍यांनी दुरुस्‍तीबाबतचे अर्ज दिलेले आहे अशा एकूण 9 हजार 158  मतदारांना त्‍या-त्‍या मतदान केंद्रावर PVC EPIC (मतदान ओळखपत्र ) वाटप करण्‍यात येणार आहे.
मतदार नोंदणी अधिकारी विविध केंद्रांना भेट देणार
दिनांक 22 जुलै 2017 रोजी आयोजित करण्‍यात आलेल्‍या विशेष कॅम्‍पच्‍या अनुषंगाने मतदान नोंदणी अधिकारी तसेच सहा. मतदार नोंदणी अधिकारी हे विविध मतदान केंद्रांना भेटी देणार आहेत.  यावेळी अनुपस्थित आढळून आलेल्‍या बीएलओ यांचेवर नियमानुसार कार्यवाही करण्‍यात येईल.
फोटो जमा करावेत
ज्‍या मतदारांचे यादीमध्‍ये फोटो नाहीत अशा मतदारांनी संबंधित बीएलओकडे फोटो जमा करावेत जेणे करुन त्‍यांना ओळखपत्र देण्‍यात येतील.
दुबार नावे वगळणे
मतदार यादीत एकापेक्षा जास्‍त ठिकाणी नांव नोंदविणे बेकायदेशिर आहे. त्‍यामुळे ज्‍या मतदारांनी यापुर्वी एकापेक्षा जास्‍त ठिकाणी नोंदविलेली असतील त्‍यांनी एका ठिकाणावरुन नांव वगळण्‍यासाठी नमुना 7 मध्‍ये अर्ज सादर करावेत.
मयत / स्‍थलांतरित मतदारांची नावे वगळणे
मयत व्‍यक्‍तींची नावे मतदार यादीत असू नये या करीता मयत व्‍यक्‍तींच्‍या नातेवाईकांनी आवश्‍यक त्‍या पुराव्‍यासह मयतांची नावे मतदार यादीतून वगळण्‍यासाठी नमुना नं. 7 भरून दयावा, असेही आवाहन जिल्हा निवडणूक कार्यालयाच्यावतीने केले आहे.

000000
कर्करोगाविषयी जनजागृती आवश्यक
- जयराज कारभारी
           नांदेड, दि. 21 :- कर्करोगाविषयी नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांनी केले. मौखिक, डोके, मान व चेहरा कर्करोग दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी श्री कारभारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते.   
जिल्हा रुग्णालयातील दंत शल्यचिकित्सक डॉ. रोशणी चव्हाण यांनी  विविध प्रकारच्या कर्करोगाबद्दल माहिती दिली. जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालय दर्शनी भागात तंबाखू मुक्त झाल्याबाबत फलक लावून कोटपा कायदाचे उलंघन होत असल्यास 1800 110 456 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले.
बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. पी. कदम, अति. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एच. आर. गुंटूरकर, सहाय्यक आयुक्त (अन्न व औषध प्रशासन) प्र. दे. यादमवार, सहाय्यक कामगार आयुक्त भास्कर मोराडे, डॉ. एस. डी. शिंदे, यशवंत महाविद्यालयाचे प्राध्यापक  ए. एन. जाधव, आदी उपस्थित होते.

0000000
शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी)
केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश
नांदेड, दि. 21 :- महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) 2017 शनिवार 22 जुलै 2017 रोजी नांदेड जिल्ह्यातील 28 परीक्षा  केंद्रावर  पहिले सत्र सकाळी 10.30 ते दुपारी 1 वा. व दुसरे सत्र दुपारी 2.30 ते सायं. 5 वाजेपर्यंत दोन सत्रात होणार आहे. या परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश  लागू  केल्याचे   जिल्हादंडाधिकारी  नांदेड  यांनी कळवले आहे. 
या परीक्षेचे कामकाज सुरळीत व शांततेत पार पडावे यासाठी परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी व कर्मचारी या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच या वेळेत परीक्षा केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे. 

000000

Thursday, July 20, 2017

जिल्ह्यात गत 24 तासात
 सरासरी 8.54 मि. मी. पाऊस
जिल्ह्यात आतापर्यंत 26.99 टक्के पाऊस
           नांदेड, दि. 20 :- जिल्ह्यात गुरुवार 20 जुलै 2017 रोजी  सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 8.54 मिलीमीटर  पावसाची  नोंद  झाली  असून  जिल्‍ह्यात  दिवसभरात एकुण 136.56  मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 257.89 मि.मी. पावसाची  नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 26.99 टक्के एवढा पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात गुरुवार 20 जुलै रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये  तालुका निहाय पुढील प्रमाणे,  कंसात  एकूण  पाऊस : नांदेड- 11.50 (401.80), मुदखेड- 4.00 (317.49), अर्धापूर- 14.00 (252.33), भोकर- 5.50 (285.25), उमरी- 8.00 (231.99), कंधार- 15.17 (275.17), लोहा- 3.17 (234.16), किनवट- 1.71 (296.44), माहूर- 1.00 (279.14), हदगाव- 8.57 (287.32), हिमायतनगर-4.33 (180.47), देगलूर- 5.50 (165.15), बिलोली- 10.80 (236.20), धर्माबाद- 10.00 (237.35), नायगाव- 16.60 (216.66), मुखेड- 16.71 (229.28) आज अखेर  पावसाची सरासरी 257.89 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 4126.20) मिलीमीटर आहे.

00000       

Wednesday, July 19, 2017

पीक विमा नोंदणी, पीक कर्ज वाटप
बँकांनी तातडीने करावे - जिल्हाधिकारी डोंगरे
          नांदेड, दि. 19 :- शेतकऱ्यांसाठी बँकांनी सकारात्मक राहून कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांचे पीक विमा नोंदणी व पीक कर्ज वाटप तातडीने करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले. प्रधानमंत्री कृषि पीक विमा योजना खरीप हंगाम-2017 जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी यांच्या निजी कक्षात आज संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानावरुन जिल्हाधिकारी श्री. डोंगरे बोलत होते.   
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. पी. घुले, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक जयंत वरणकर, नाबार्डचे व्यवस्थापक राजेश धुर्वे, विमा प्रतिनिधी आर. ए. कुदळे, सुरेश साळवे, उपविभागीय कृषि अधिकारी एम. टी. गोंडेस्वार, व्ही. व्ही. भरगंडे, बी. पी. कदम, कृषि उपसंचालक श्रीमती एम. पी. सोनवणे, तसेच विविध बँकांचे अधिकारी, प्रतिनिधी, तालुका कृषि अधिकारी, आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. डोंगरे म्हणाले,  बँकांनी नागरिकांच्या सेवेसाठी काम करत असताना शेतकऱ्यांना बँकसेवेत कोणतीही अडचण येणार नाही याबाबत दक्ष रहावे. बँक कार्यक्षेत्रात शेतकऱ्यांसाठी दिलेल्या उद्दीष्टानुसार पीक कर्ज व पीक विमा उतरविण्याची बँकेची ही जबाबदारी आहे. यात गरजू शेतकरी सुटला नाही पाहिजे याबाबत बँकांनी गांभीर्याने काम करावे. बँकेकडून पीक कर्ज घेतले नाही म्हणून शेतकऱ्यांचा पीक विमा नाकारु नका. बँकांनी खातेदार किंवा बिगर खातेदार हा विचार न करता सर्व शेतकऱ्यांना पीक विमा दिला पाहिजे. बँकांनी पीक विमा ऑफलाईन नोंदणी करताना काळजी घेऊन वेळेत ऑनलाईन माहिती भरुन प्रक्रिया पुर्ण करावी. यामध्ये शेतकऱ्यांचा पीक विमा प्रलंबीत राहणार नाही याची काळजी घ्यावी. शेतकऱ्यांना बँकेचे सर्व सहकार्य राहिले पाहिजे, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी दिले.     
जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी  थकीत असलेल्या कर्जदार शेतकऱ्यांना 10 हजार रुपयाचे तातडीचे कर्ज, सुलभ पीक कर्ज वाटप अभियान व पीक विम्याबाबत बँकनिहाय सविस्तर आढावा घेतला. पीक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2017 आहे. शेतकऱ्यांच्या सोईसाठी कॉमन सर्व्हीस सेंटर (सीएससी), आपले सरकार सेवा केंद्रात, बँकेमार्फत शेतकऱ्यांसाठी गावपातळीवर पीक विमा भरण्याची सुविधा उपलब्ध असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. ऑनलाईन पीक विमा नोंदणी करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणीवरील उपायांबाबत सादरीकरणाद्वारे माहिती देऊन उपयुक्त सुचना देण्यात आल्या. शेतकऱ्यांना बँकेद्वारे पीक कर्ज व पीक विमा उतरविण्यासाठी बँका सकारात्मक राहतील, असे विविध बँकेच्या अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. शेवटी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॉ. मोटे यांनी आभार मानले.

000000

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...