Monday, February 27, 2017

केळी पीक संरक्षणासाठी कृषि संदेश
नांदेड, दि. 27 :- मुदखेड व अर्धापूर तालुक्यातील केळी  पिकासाठी  किड  व  रोग सर्वेक्षण प्रकल्पांतर्गत केळी पिकावरील किड  व रोगाचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्याआधारे केळी पिक संरक्षणासाठी पुढील प्रमाणे कृषि  संदेश देण्यात आला आहे .
केळीच्या पानावर रोगाचा प्रादुर्भाव आकाराने जास्त असेल तर त्याचा परिणाम प्रकाश संश्लेषण प्रक्रियेवर होत असल्याने जास्तीत जास्त पाने  कार्यरत ठेवण्यासाठी फक्त पानाचा रोगग्रस्त भाग काढुन बागेबाहेर नेऊन नष्ट करावा. पानावरील लहान-लहान तपकिरी ठिपके वाढून एकत्र होतात. मोठा  ठिपका होऊन पानाचा जास्त भाग रोगग्रस्त होतो. त्यासाठी झाडावर प्रोपिकोनेझॉल 0.05 टक्के (0.5मि.ली) मिनरल ऑईल 1 टक्के (10 मि.ली) प्रति लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी,  असे आवाहन नांदेडचे उप विभागीय कृषि अधिकारी डॉ. व्ही. व्ही. भरगंडे यांनी केले आहे.

000000
अल्पसंख्याकांच्या शिष्यवृत्ती अर्जांबाबत
महाविद्यालयांना शिक्षण सहसंचालकांचे आवाहन
नांदेड, दि. 27 – अल्पसंख्याक प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तींबाबत महाविद्यालयाचा माध्यमिक व उच्च माध्यमिक व उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयाचा, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या संस्थांनी युजर आयडी व पासवर्ड प्राप्त झालेले नसल्यास ते लवकरात लवकर  प्राप्त करून घेऊन, शिष्यवृत्ती अर्जांना मंजूरी देण्याची प्रक्रिया पुर्ण करावी, असे आवाहन शिक्षण सहसंचालक उच्च शिक्षण नांदेड विभाग यांनी केले आहे.
याबाबतच्या निवेदनात म्हटले आहे की, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत नांदेड, लातूर, परभणी व हिंगोली जिल्ह्यातील सर्व शासकीय, अशासकीय अनुदानित, विनाअनुदानीत व कायम विनाअनुदानीत कनिष्ठ, वरिष्ठ, डी.एड. बी.एड. , औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसेच व्यावसायिक व अव्यावसायिक महाविद्यालयात सन 2016-17 मध्ये नियमित प्रवेश घेतलेले मुस्लीम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, पारशी, जैन व ज्यू या अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी केंद्र शासन पुरस्कृत शिष्यवृत्ती नवीन व नुतनीकरण शिष्यवृत्ती योजना सन 2016-17 साठी राबविण्यात येत आहे.
तथापि अजूनही बऱ्याच महाविद्यालयातील नवीन व नुतनीकरणाचे ऑनलाईन पद्धतीने भरलेले अर्ज प्राचार्य, मुख्याध्यापक यांच्या लॉगीन आयडीवर प्रलंबित असून सदरील अर्ज पुढील मंजुरीसाठी पाठविण्याची प्रक्रिया करणे गरजेचे आहे. तसेच ज्या महाविद्यालयांना आपल्या महाविद्यालयाचा माध्यमिक व उच्च माध्यमिक व उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयाचा, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या संस्थेचा युजर आयडी व पासवर्ड प्राप्त झालेले नसेल ते लवकरात लवकर शिक्षण सहसंचालक उच्च शिक्षण नांदेड विभाग नांदेड या कार्यालयाकडून प्राप्त करुन घेऊन प्रलंबित ऑनलाईन शिष्यवृत्ती अर्जास मंजुरी देण्यात यावी. जेणेकरुन या शिष्यवृत्ती योजनेपासून अल्पसंख्याक समाजातील एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही, असे उच्च शिक्षण विभागाचे  सहसंचालक डॉ. मोहन खताळ यांनी कळविले आहे.

000000
आरटीओच्या तालुका शिबीर कार्यालयांचे
कामकाज 1 मार्चपासून ऑनलाईन
नांदेड, दि. 27 :- प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने नांदेड जिल्ह्यातील विविध तालुक्यात घेण्यात येणाऱ्या अनुज्ञप्ती, लायसन्स शिबीर कार्यालयातील कामकाज 1 मार्च 2017 पासून ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. नागरिकांनी परिवहन विभागाच्या www.parivahan.gov.in / sarathiservice या संकेतस्थळावर अर्ज ऑनलाईन स्वत: अथवा सी. एस. सी. सेंटरद्वारे करुन संबंधीत शिबिराकरीता अर्ज करावा व आवश्यक कागदपत्र ऑनलाईन पद्धतीने अपलोड करावा. तसेच संबंधीत शुल्काचा भरणा ऑनलाईन पद्धतीने करुन व अपॉईंटमेंट घेऊन मुळ कागदपत्रांसह संबंधीतास दिनांकास शिबिरात उपस्थित रहावे याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000
वाढत्या तपमानामुळे उष्णतेपासून
स्वतःचे संरक्षण करा
आरोग्य विभागाचे आवाहन
            नांदेड दि. 27 :-  वाढत्या उन्हाबरोबरच तपमानात वाढ होऊ लागली आहे. त्याअनुषंगाने आरोग्य विभागाच्यावतीने नागरिकांनी उन्हापासून  स्वतःचे संरक्षण करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
याबाबतच्या निवेदनात म्हटले आहे की, उन्हाळ्यात नांदेड शहरातील तापमान उच्चांक गाठतो. अनेकदा उष्णतेची लाट येते. अशा वेळी नागरिकांनी विशेषतः वृद्ध व्यक्ती, लहान बालके, गरोदर माता व उन्हात काम करणाऱ्या व्यक्तिनी स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे.
उन्हाच्या उष्णतेमुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम टाळण्यास भरपूर थंडगार पाणी पिणे, भरपूर इतर थंड पेय पिणे ( उदा. ताक, आंब्याचे पन्हं, नारळ-पाणी ), अत्यावश्यक असल्याशिवाय उन्हात जायचे टाळणे जात असल्यास टोपी घालावी किंवा डोक्याला दुपट्टा बांधावा. सैल व फिकट रंगाचे सुती कपडे घालणे. थंड जागेत, वातावरणात राहणे. साधारणतः दुपारी 12 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत भर उन्हात काम करायचे टाळणे आवश्यक असल्यास सावलीत काम करावे.
उष्माघाताची लक्षणे पुढील प्रमाणे आहे. अस्वस्थपणा , थकवा , शरीर तापणे , अशक्तपणा , अंगदुखी, डोकेदुखी, मळमळ. उष्माघाताची लक्षणे आढळ्यास नागरिकांनी थंडगार पाण्याने अंघोळ करणे. थंड जागेत, वातावरणात आराम करणे. परीश्रमाची कामे न करणे. भरपूर थंड पाणी / पेय पिणे.  मनपा आरोग्य केंद्रात, दवाखान्यात, वैद्यकीय महाविद्यालयात त्वरित औषधोपचार करवून घेणे. 108 या निशुल्क (टोल फ्री) दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून आकस्मित आरोग्य सेवेचा लाभ घ्या , असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. पी. कदम यांनी केले आहे.

00000
तंत्रज्ज्ञानासोबतच भाषा संवर्धनाची
मनोवृत्तीही विकसीत व्हावी - डॅा. जोशी
मराठी भाषा गौरव दिन संपन्न
जिल्हा ग्रंथालय अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालयाचे आयोजन

नांदेड, दि. 27 :- भाषेसाठी तंत्रज्ज्ञानाचा प्रभावी वापर करून घेता येणे आवश्यक आहे. त्यामुळे तंत्रज्ज्ञानासोबतच भाषा संवर्धनाची मनोवृत्तीही महत्त्वपुर्ण असल्याचे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र संकुलाचे सहयोगी प्राध्यापक डॅा. महेश जोशी यांनी आज येथे केले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय तसेच जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी यशवंत महाविद्यालयाच्या भाषा व संशोधन विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॅा. शंकर विभुते होते. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कार्यक्रम संपन्न झाला.
या प्रसंगी व्यासपीठावर जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाह तथा प्रकाश निर्मलकुमार सुर्यवंशी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे, माहिती अधिकारी निशिकांत तोडकर यांची उपस्थिती होती. या निमित्ताने कुसुमाग्रज यांच्यासह मराठी भाषेतील नावाजलेल्या ग्रंथ प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले.
 ‘संगणक व महाजालावरील मराठी’ या विषयावर मांडणी करताना डॅा. जोशी यांनी भारतातील प्रांतिक भाषांच्या जतनासाठी स्वातंत्र्यपुर्व काळातील जिज्ञासुंचे प्रयत्नाची माहिती दिली. त्यामध्ये विलीयम्स जोन्स या तत्कालीन ब्रिटीश सरन्यायाधीशांचे आणि तंजावूर संस्थानाचे महाराजा सरफोजी राजे यांचे योगदान याविषयी त्यांनी माहिती दिली. ते म्हणाले की , त्या-त्या भाषेतील ज्ञानाचा विस्तार करणे , तिच्यामध्ये संशोधन करणे यातून भाषा संवर्धीत करता येते. साक्षरतेचा  प्रसार  आणि तंत्रज्ज्ञानाच्या वापरामुळे भाषेचा विकास होत गेला. छपाई तंत्रज्ज्ञानाच्या उदयामुळे भाषेबाबतची सहज सुलभता वाढली. याशिवाय दैनंदिन जीवनातील तंत्रज्ज्ञानाच्या वापरामुळेही प्रसार-ग्रहण आणि संशोधन यासाठीची सुलभता वाढली. संगणक आणि तंत्रज्ज्ञानाच्या प्रसारामुळे आता भाषेच्या वापराच्या संकल्पनाही  बदलल्या आहेत. भाषेच्या संवर्धनासाठी, तिच्या जतनासाठी जाणीवपुर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे. केवळ तंत्रज्ज्ञानाच्या वापरातून भाषेचा विकास होणार नाही. तर कला, विज्ञान, शास्त्रीय अशा सर्व आशयांच्या दृष्टीने मराठी भाषेचा वापर होणे आवश्यक आहे. त्यामुळे तंत्रज्ज्ञानाच्या वापराबरोबरच मराठी भाषेच्या विकासासाठी मनोवृत्ती बदलावी लागेल. त्यातही विविध अंगानी समतोल साधावा लागेल. अन्य भाषांना दुय्यम ठरवूनही, कमी लेखूनही चालणार नाही.
डॅा. जोशी म्हणाले की, डिजिटायझेशनमुळे दुर्मिळ ग्रंथाची उपलब्धता वाढली आहे. ग्रंथ प्रकाशनाची संकल्पनाही बदलली आहे. मुक्तद्वार पद्धतीमुळे तुम्हाला अनेक माहिती कोष संपादित करता येतात. माहितीत भर घालता येते. अचूक संदर्भ देता येतात. त्यामुळे आता या माहिती महाजालकांवरही जाणीवपुर्वक आपले योगदान दिले पाहिजे. मराठीचा वापर करत अनेक संदर्भ, माहिती, तपशील अचूक आणि अद्ययावत देण्यासाठी पुढे आले पाहिजे. यातून व्यक्तीच्या आणि समाजाच्या ज्ञानाच्या कक्षांचाही विस्तार होईल, असेही त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात डॅा. विभुते म्हणाले की, मराठी भाषेचे सामर्थ्य मोठे आहे. ते पदोपदी सिद्ध झाले आहे. कुमूमाग्रजांच्या साहित्य संपदेतून तर मराठी भाषेचे सौंदर्य आणि सामर्थ्य अनेकदा अधोरेखीत झाले आहे. तंज्ञज्ज्ञानाचा वापर करतानाच, मराठी भाषा एक संस्कृती घेऊन पुढे जाते. ही संस्कृती समृद्ध करण्याची संधी आहे. त्यामुळे मराठीचा अधिकाधिक वापर करणे आवश्यक आहे.
सुरवातीला कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून अभिवादन करण्यात आले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री. हुसे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रताप सुर्यवंशी यांनी सुत्रसंचलन केले. माहिती अधिकारी श्री. तोडकर यांनी आभार मानले. तत्पुर्वी जिल्हा ग्रंथालयात कुसुमाग्रजांच्या साहित्य संपेदसह विविध ग्रंथ संपदेच्या प्रदर्शनाचेही मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमास विद्यार्थी, रसिक वाचक तसेच जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाचे कर्मचारी आदींची उपस्थिती होती.
0000000




Sunday, February 26, 2017

राज्यपाल चे. विद्यासागर राव यांचे
श्री गुरुगोबिंदसिंघजी विमानतळावर स्वागत
नांदेड, दि. 26 :- महाराष्ट्राचे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांचे आज नांदेड दौऱ्यासाठी श्री गुरुगोबिंदसिंघजी विमानतळ येथे आगमन झाले. विमानतळावर त्यांचे राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय आणि वस्त्रद्योग राज्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी पुष्पगूच्छ देऊन स्वागत केले. जिल्हा प्रशासनाच्यावतीने प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी स्वागत केले.
राज्यपाल महोदयांचे विमानतळ विश्रामगृह येथे आमदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार हेमंत पाटील यांनीही स्वागत केले. नांदेड परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, मनपा आयुक्त समीर उन्हाळे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे, उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनीही स्वागत केले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने माध्यम संकुलाचे संचालक डॅा. दिपक शिंदे यांनी स्वागत केले. 
विमानतळ येथून राज्यपाल महोदय स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या 19 व्या दिक्षांत प्रदान समारंभाकडे रवाना झाले.

0000000
कृषीप्रधान वर्गाच्या क्षमतांचा विकास साधणाऱ्या शिक्षणाची गरज - पवार
कुलपती विद्यासागर राव यांच्या हस्ते शरद पवार यांना डि. लिट. प्रदान
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा 19 वा दिक्षांत समांरभ संपन्न
नांदेड, दि. 26 :- कृषी प्रधान वर्गाच्या क्षमतांचा विकास साधणाऱ्या शिक्षणाची गरज आहे, ज्यामुळे नवीन संसाधन-संपत्ती निर्मितीचे मार्ग उपलब्ध होतील , असे मत ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय कृषीमंत्री तथा खासदार शरद पवार यांनी आज येथे व्यक्त केले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या 19 व्या दिक्षांत प्रदान समारंभात ते प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्यपाल तथा कुलपती चे. विद्यासागर राव होते. विद्यापीठाच्यावतीने श्री. पवार यांना राज्यपाल तथा कुलपती विद्यासागर राव यांच्या हस्ते मानद “डि. लिट.” पदवीने सन्मानित करण्यात आले.
विद्यापीठाच्या  प्रांगणात दिक्षांत प्रदानाचा शानदार समारंभ संपन्न झाला. याप्रसंगी व्यासपीठावर कुलगुरू डॅा. पंडित विद्यासागर, राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय आणि वस्त्रद्योग राज्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर, प्र-कुलगुरू डॅा. गणेशचंद्र शिंदे, कुलसचिव बी. बी. पाटील, विद्यापीठाचे मुख्य परीक्षा नियंत्रक डॅा. रवि सरोदे यांच्यासह व्यवस्थापन परिषद, विद्यापरिषद, अधिसभा तसेच विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता यांची उपस्थिती होती.
समारंभास नांदेडच्या महापौर शैलजा स्वामी, खासदार डॅा. सुनिल गायकवाड, आमदार सर्वश्री अमर राजूरकर, विक्रम काळे, वसंतराव चव्हाण, प्रताप पाटील-चिखलीकर, नागेश पाटील-आष्टीकर, हेमंत पाटील,  प्रदीप नाईक, नांदेड परीक्षेत्राचे पोलीस महानिरिक्षक चिरंजीव प्रसाद, मनपा आयुक्त समीर उन्हाळे, प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे, माजी कुलगुरू डॅा. जनार्दन वाघमारे, माजी मंत्री कमलकिशोर कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती.
दिक्षांत भाषणात बोलताना श्री. पवार यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या उभारणीतील महत्त्वपुर्ण टप्प्यांचा आवर्जून आढावा घेतला. स्वामी रामानंद तीर्थ यांचे मराठवाडा मुक्ती संग्रामातील योगदान आणि त्यांचा शिक्षणविषयक दृष्टीकोन गौरवाने नमुद केला. मराठवाड्याविषयीची आस्था स्पष्ट करून ते म्हणाले की , शेतीवरचं अवलंबित्त्व कमी करण्याचा माझा आग्रह आहे. ज्या ठिकाणी शेतीवरचा वर्ग अन्य क्षेत्रात गेला, तेथे परिस्थिती बदलली. त्यामुळे इंग्लंड, जर्मनी, जपान, अमेरिका, कॅनडा सारखे देश प्रगत दिसताहेत. याऊलट शेतीवर अधिक लोकसंख्या अवलंबून राहिल्याने इंडोनेशिया, श्रीलंका, बांग्लादेश यांच्यासह भारतात बेरोजगार, दारिद्रय पहायला मिळते. शेतीचे तुकडे, निसर्गांवरील अवलंबित्त्व आणि वाढती लोकसंख्या यामुळे शेतीवर अधिक बोजा आहे. तो कमी करण्यासाठी कृषी प्रधान वर्गाला शिक्षण देण्याची गरज आहे. त्या शिक्षित वर्गातून नवीन संसाधन आणि संपत्ती निर्मितीचे मार्ग उपलब्ध करून देण्याची आज गरज आहे. ग्रामीण भागात ज्या शेतकऱ्याच्या घरात शिक्षण वाढले, त्या कुटुंबात सुबत्ता आल्याचा अनुभव आहे. मराठवाडा हा प्रदेश कृषीवरती अवलंबून असणाऱ्या कुटुंबाचा प्रदेश आहे. त्यामुळे इथल्या तरुणांनी शिक्षणाविषयी आग्रही राहायला हवे. शिक्षणच त्यांना तारू शकते. आपल्या देशातील तरुणांची लोकसंख्या ही आपली ताकद आहे. हे ओळखून, त्याला शिक्षणाच्या चांगल्या संधी उपलब्ध करून द्यायला हव्यात. शिक्षणाच्या माध्यमातून होणारी प्रगती स्थायी आणि प्रगल्भ असते हे लक्षात घेतले पाहिजे, असेही ते म्हणाले.  
यावेळी श्री. पवार यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वाटचालीचा आणि विद्यापीठातील विविध नाविन्यपुर्ण उपक्रमांचाही कौतुकाने उल्लेख केला. तसेच पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टकडून विद्यापीठाकडे पन्नास लाखांचा निधी देण्याचे जाहीर केले. या निधीतून महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, सहकार महर्षी शामराव कदम, तसेच पवार यांच्या मातोश्री शारदाबाई पवार यांच्या नावाने पुढील शैक्षणीक वर्षापासून किमान दहा जणांना शिष्यवृत्ती देण्यात यावी. यात किमान आठ विद्यार्थी ग्रामीण भागातील आणि त्यापैकी दोन विद्यार्थींनी असाव्यात, असेही नमूद केले.
तत्पुर्वी राज्यपाल श्री. विद्यासागर राव यांनी कुलपती म्हणून विविध विद्याशाखांतील स्नातकांना पदवी प्रदान केल्याची घोषणा केली. तसेच दिक्षांत समारंभाच्या प्रथेप्रमाणे संदेशही दिला, त्यामध्ये ते म्हणाले की, राष्ट्राच्या उन्नतीसाठी देता येईल, ते योगदान देण्यासाठी सज्ज रहावे. सत्यनिष्ठा आणि देशाप्रती जाणिवा जागृत ठेवून काम केल्यास, स्वतः बरोबराच राष्ट्राची प्रगती साधता येईल. समता, बंधुता आणि एकता या तत्त्वाप्रती  तसेच माता-पित्यांप्रती आदर ठेवण्यातूनच आपल्याला ही प्रगती साधता येईल.
कुलगुरू डॅा. विद्यासागर यांनी आपल्या भाषणात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक, प्रशासकीय, विस्तार कार्यक्रम, क्रीडाविषयक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरींचा आढावा घेतला. त्यामध्ये त्यांनी विद्यापीठाच्या श्रेयांक पद्धतीबरोबरच, ऑनलाईन प्रश्नपत्रिका पोहचविण्याची प्रणाली, श्री गुरुगोबिंदसिंघजी अध्यासन केंद्र, नाविन्यपुर्ण-इन्नोव्हेशनमध्ये पॅालिमर संशोधन प्रकल्पास विदेशातील 28 कंपन्यांनी प्रतिसाद दिल्याचे, संशोधन क्षेत्रात राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानासाठी विद्यापीठास 5 कोटी 57 लाख रुपये अनुदान मिळाल्याच्या बाबींचाही अभिमानाने उल्लेख केला.
सुरवातीला विद्यापीठाच्या प्रांगणातून दिक्षांत मिरवणुकीतून मान्यवरांचे दिक्षांत समारंभाच्या व्यासपीठावर आगमन झाले. एमजीएम महाविद्यालयाच्या चमूने विद्यापीठ गीत सादर केले. कुलपती तथा राज्यपाल श्री. विद्यासागर राव यांच्या हस्ते दिपप्रज्ज्वलन तसेच स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विविध विद्याशाखांतील विषयनिहाय सुवर्ण पदकांचे मानकरी ठरलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. विविध विद्याशाखांच्या अधिष्ठातांनी कुलपती महोदयांना स्नातकांना पदवी प्रदान करण्यासाठी सादर केले. राज्यपाल तथा कुलपती विद्यासागर राव यांच्या हस्ते श्री. पवार यांना ‘डि.लिट.’ ही मानद पदवी आणि मानपत्र प्रदान करण्यात आले. प्रा. केशव देशमुख यांनी मानपत्राचे वाचन केले, तर कलाशाखेचे अधिष्ठाता प्रा. जे. एम. भिसे यांनी कुलपतींना पदवी प्रदान करण्याची विनंती केली. या शानदार दिक्षांत समारंभाचा प्रारंभ आणि समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.

000000

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...