Friday, January 27, 2017

शिक्षक मतदार संघ निवडणुकीच्या
मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजा
            नांदेड, दि. 27 :- औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदारांना शुक्रवार 3 फेब्रुवारी 2017 निवडणुकीच्या दिवशी  मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विशेष नैमित्तिक रजा मंजूर  करण्यात आली आहे. रजा ही कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या नैमित्तीक रजेव्यतिरिक्त असणार आहे, असे औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा‍ जिल्हाधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

000
शिक्षक मतदारसंघ निवडणूक मतदानासाठी
संबंधीत गावातील आठवडी बाजार बंद
नांदेड, दि. 27 :- औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी शुक्रवार 3 फेब्रुवारी 2017 रोजी मतदान होत आहे. या दिवशी मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा तसेच मतदान शांततेत पार पडावे या दृष्टीकोनातून नांदेड जिल्ह्यातील ज्या गावात मतदान केंद्र आहेत त्या गावातील आठवडी बाजार मतदानाच्या दिवशी असल्यास त्यागावचे आठवडी बाजार बंद ठेण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी सुरेश काकाणी यांनी काढले आहेत.
पणन संचालक पुणे यांनी दिलेल्या मान्यतेनुसार  मार्केट ॲड फेअर ॲक्टर, 1862 चे कलम 5 अन्वये जिल्हादंडाधिकारी सुरेश काकाणी यांनी औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुक अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील ज्या गावात मतदान केंद्र आहेत आणि त्या गावातील आठवडी बाजार मतदानाच्या दिवशी शुक्रवार 3 फेब्रुवारी रोजी भरत असल्यास त्या गावचे आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश निर्गमीत केले आहेत. अशा गावचे, ठिकाणाचे आठवडी बाजार दुसऱ्या दिवशी शनिवार 4 फेब्रुवारी 2017 रोजी भरविण्यात यावेत, असेही आदेशात म्हटले आहे.   

000
माहूर चेक पॉईंट मंगळवारच्या मध्यरात्री पासून बंद
नांदेड, दि. 27 :- माहूर चेक पॉईंट येथे वापरण्यात येणारी मनुष्यबळ व वाहतुकीचा विचार करता या ठिकाणी चेक पॉईट यापुढे कार्यान्वित ठेवणे अंमलबजावणीच्या दृष्टीने व्यवहार्य नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे माहूर चेक पॉईट मंगळवार 31 जानेवारी 2017 रोजीच्या मध्यरात्री पासून बंद करण्यात येत आहे, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
 माहूर तालुक्यातील वाई (बाजार) येथे मोटार वाहन विभागाचे चेक पॉईंट कार्यरत आहे. या ठिकाणी मोटार वाहन कायदा व त्याअंतर्गत बनविलेल्या नियमातील तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांची तपासणी करुन दंडात्मक कारवाई करण्यात येते व वाहन चालक, मालकाकडून दंड, कर वसुल केला जातो.

000
शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी
3 फेब्रुवारी रोजी दारु दुकाने बंद
नांदेड, दि. 27 :- औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी  शुक्रवार 3 फेब्रुवारी 2017 रोजी मतदान घेण्यात येणार आहे. मतदानाची प्रक्रिया मुक्त व निर्भयपणे शांततेत पार पाडण्यास मदत व्हावी तसेच शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी जिल्ह्यातील दारु दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी नांदेड यांनी निर्गमीत केले आहेत. 
मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये जिल्हाधिकारी नांदेड यांनी  जिल्ह्यातील सर्व सीएल-3, एफएल-2, एफएल-3 (परवाना कक्ष) एफएल-4, एफएल / बिआर-2 व ताडी विक्रीच्या अनुज्ञप्त्या 3 फेब्रुवारी रोजी पूर्ण दिवस बंद ठेवण्याचे आदेशात नमूद केले आहेत. या आदेशाचा भंग केल्यास अनुज्ञप्तीधारका विरुद्ध कायदेशिर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असेही आदेशात म्हटले आहे.

0000000

लेख -

 वेळेत निदान , वेळेत उपचार
यातूनच कुष्ठरोगाची मुक्ती

राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत नांदेड जिल्ह्यातील स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान व विशेष कुष्ठरोग शोध मोहिम 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2017 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. तसेच 6 ते 21 फेब्रुवारी यादरम्यान कुष्ठरोग सर्वेक्षण मोहिम ही राबविण्यात येणार आहे. त्याविषयी या लेखात माहिती...
आपल्याकडे  कुष्ठरोगाची समस्या आजही दिसून येते. खरोखर कुष्ठरोग हा एक किरकोळ आजार आहे. तो मायबाक्टेरीयाम लेप्री या जीवाणुमुळे होतो. कुष्ठरोग हा काही स्पर्शाने होणारा आजार नाही. या रोगाचे निदान व उपचार सर्व सरकारी दवाखान्यात तसेच आरोग्य केंद्रामध्ये मोफत केला जातो. लवकर वेळेत निदान व उपचाराने कुष्ठरोग पुर्ण बरा होतो व पुढे निर्माण होणाऱ्या शारीरिक विकृती पासून बचाव होतो. कुष्ठरोगाच्या तीव्रतेनुसार त्याचा उपचार सहा महिने किंवा बारा महिने इतका आहे.
कुष्ठरोगाची लक्षणे पुढीलप्रमाणे दिसून येतात. त्वचेवर फिक्कट किंवा लालसर रंगाचा एक किंवा एकापेक्षा जास्त चट्टे असतात. हा चट्टा बधीर व कोरडा असतो. चट्टा न खाजणारा, न दुखणारा, न घाम येणारा असतो. शरीरावर, चेहऱ्यावर, भुवयावर गाठी येतात किंवा चेहऱ्याची त्वचा तेलकट दिसते. हाता-पायांना कोरडेपणा, बधीरपणा तसेच अशक्तपणा येतो. रुग्णाला याबाबी आढल्यास जवळच्या शासकीय दवाखान्यात कुष्ठरोगाची तपासणी करून घ्यावी. एमडीटी हे औषध कुष्ठरोगावर चांगले प्रभावशाली ( गुणकारी ) औषध आहे. सर्व सरकारी दवाखाने व आरोग्य केंद्रामध्ये हे औषध मोफत उपलब्ध करुन दिले जाते.
स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानांतर्गत सोमवार 26 जानेवारी 2017 रोजी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीत ग्रामसभा आयोजित केली होती. त्यामध्ये कुष्ठरोग प्रतिज्ञा, कुष्ठरोगाची माहिती व नियमित विचारले जाणारे प्रश्न व उत्तरे याची माहिती देण्यात आली. दळणवळणास कठीण दुर्गम अशा जिल्ह्यात 404 गावामध्ये 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2017 या काळात आरोग्य कर्मचारी, आशा व अंगणवाडी सेविकांमार्फत विशेष जनजागृती मोहिमेतून कुष्ठरोगाविषयी असलेले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 
नांदेड जिल्ह्यामध्ये मागील तीन वर्षात 1 हजार 187 एवढ्या रुग्णांनी एमडीटी हा औषधौपचार घेवून कुष्ठरोग मुक्त झाले आहेत. त्यामुळे कुष्ठरुग्णांना भेदभावाची वागणूक देऊ नका. नागरिकांनी आपण, आपले शेजारी व इतर कोणालाही अशा प्रकारचे चट्टे किंवा डाग असतील तर त्यांनी आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका तसेच आरोग्य कर्मचारी यांच्याशी संपर्क साधून वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी.
जिल्ह्यात मागील तीन वर्षात कुष्ठरोग विकृती दर्जा-2 व नवीन बाल कुष्ठरुग्ण आढळलेल्या- 46 गावात व नांदेड महानगरपालिका क्षेत्रातील- 16 , किनवट व देगलूर नगरपालिका क्षेत्रातील प्रत्येकी तीन व हदगाव नगरपालिाका क्षेत्रातील एक असे एकुण- 69 भागामध्ये व गावामध्ये दि. 6 ते 21 फेब्रवारी 2017 या दरम्यान शहरी भागातील- 300 घरे व गावामधील संपूर्ण घरोघरी जावून ही विशेष कुष्ठरोग सर्वेक्षण मोहिम राबविली जाणार आहे. म्हणून सर्वाना आग्रहाची विनंती आपण आपले शेजारी व इतर कोणालाही अशा प्रकारचे चट्टे किंवा डाग असतील तर त्यांनी तातडीने वैद्यकीय तपासणी करून घ्यावी व उपचारांनी कुष्ठरोग मुक्त व्हावे.
संकलन – काशिनाथ र. आरेवार
जिल्हा माहिती कार्यालय नांदेड

*******

Wednesday, January 25, 2017

जवळगाव जि. प. हास्कुलच्या मिना वाघमारेस
राष्ट्रीय स्तरावरील निबंध स्पर्धेत पारितोषिक 
नांदेड, दि. 26 :- पेट्रोलियम व नैसर्गिक वायु मंत्रालय भारत सरकार यांच्यावतीने पेट्रोलियम संवर्धन संशोधन क्षेत्रातील पेट्रोलियम कंझर्वेशन रिसर्च अशोसिएशनच्यावतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पातळीवरील निबंध स्पर्धेत हिमायतनगर तालुक्यातील जवळगाव येथील जिल्हा परिषद हायस्कुलच्या मिना गणेश वाघमारे हिने राष्ट्रीय स्तरावर मराठी भाषेतील निबंधासाठीचे तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे.
कु. मिना वाघमारे हिच्या यशासाठी आज प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्या हस्ते पारितोषिक देवून गौरविण्यात आले. यावेळी पीसीआरएचे सहसंचालक योगेश जोशी, मिनाचे शिक्षक बाळासाहेब गुंड तसेच आई , वडील गणेश वाघमारे उपस्थित होते. मिना वाघमारे जवळगावच्या जिल्हा परिषद हायस्कुलमध्ये इयत्ता 9 वीच्या वर्गात शिकते. तिने पर्यावरण आणि आरोग्य रक्षणासाठी इंधन वाचवा या विषयावर निबंध सादर केला होता. स्पर्धेत तिला राष्ट्रीय स्तरावरील मराठी भाषेतील निबंधासाठी तिसरा क्रमांक मिळाला आहे. पारितोषिक म्हणून तिने प्रशिस्तीपत्रासह लॅपटॉपचे बक्षिस पटकाविले आहे. या यशासाठी तिचे सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे.  

00000000
राष्ट्र  उभारणीत रचनात्मक योगदानासाठी
तरुणांनी कटीबद्ध रहावे - पालकमंत्री खोतकर
प्रजासत्ताकदिनाचा मुख्य शासकीय ध्वजवंदनाचा दिमाखदार समारंभ

नांदेड, दि. 26 :- राष्ट्र आणि राज्याच्या सकारात्मक आणि रचनात्मक उभारणीसाठी कटीबद्ध व्हावे लागेल असे सांगतानाच त्यासाठी ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि तरुणांची शक्ती यांचा समन्वय साधणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जून खोतकर यांनी आज येथे केले. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 67 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय समारंभात ते शुभेच्छापर संदेशात बोलत होते.

पोलीस कवायत मैदानावर झालेल्या या समारंभात पालकमंत्री खोतकर यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. शानदार संचलन आणि पोलीस दलाच्या जलद कृती दलाच्या थरारक प्रात्यक्षिकांमुळे समारंभ दिमाखदार झाला. समारंभास जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. मंगलाताई गुंडले, महापौर शैलजा स्वामी, आमदार हेमंत पाटील, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आदींची तसेच व्यासपीठावर जिल्हाधिकारी सुरेश काकाणी, विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, महापालिका आयुक्त समीर उन्हाळे, पोलीस अधीक्षक संजय येनपुरे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे यांची उपस्थिती होती.
शुभेच्छापर संदेशात बोलताना पालकमंत्री खोतकर पुढे म्हणाले की, येणाऱ्या काळात, पुढच्या पिढ्यांमध्ये राष्ट्राभिमान द्विगुणीत होईल, यासाठी प्रयत्न करावे लागतील. राष्ट्र आणि राज्याची वाटचाल प्रगतशील आहे. या वाटचालीत तरुण होतकरूंची संख्या बलस्थान आहे. त्यामुळे या तरुण लोकसंख्येचा आपल्याला खुबीने आणि प्रभावशाली उपयोग करावा लागेल. तरुणांच्या शक्तींचा वापर सकारात्मक दृष्टीने करावा लागेल. जुन्या जाणत्यांचा अभ्यास आणि नव तरुणाईचा जोष यांची सांगड घालणे आवश्यक आहे. यासाठी तरुणांनाही आव्हानांना गवसणी घालावी लागेल. नव तंत्रज्ज्ञान आत्मसात करतानाच, राष्ट्राच्या-राज्याच्या विकासासाठी शिक्षण-संशोधनाच्या क्षेत्रांना पादाक्रांत करावे लागेल.
मनन-चिंतन आणि मनगटाच्या बळावर या देशाच्या विकासात भर घालण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी जग ते स्थानिक पातळीवरील परिस्थितीचे भान राखून सकारात्मक आणि रचनात्मक उभारणीसाठी कटीबद्ध व्हावे लागेल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्री खोतकर यांनी यांनी उपस्थित जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी यांच्याशी संवाद साधून त्यांची आस्थेवाईक विचारपूसही केली. तसेच लोकप्रतिनिधी आणि नागरिकांशीही हितगूज केले. उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे आणि पोलीस निरीक्षक शामराव राठोड यांच्या नेतृत्वात  विविध दलांनी शानदार संचलनाने मानवंदनाही दिली. या संचलनात मुदखेडच्या केंद्रीय राखीव पोलीस दल, हिंगोलीतील राज्य राखीव पोलीस दल, नांदेड पोलिसांचे जलद कृती दल (क्युआरटी), सशस्त्र पोलीस पथक, नांदेड पोलीस मुख्यालयाचे पथक तसेच नांदेडचे सशस्त्र महिला व सशस्त्र पोलीसांचे पथक, शहर वाहतूक शाखा, नांदेड, गृह रक्षक दलाचे महिलांचे व पुरूषांचे पथक, नांदेड महापालिकेचे अग्नीशमन दल पथक, यशवंत महाविद्यालयाचे राष्ट्रीच छात्रसेनेचे पथक, महात्मा फुले हायस्कुलचे मुलांचे व मुलींचे स्काऊट गाईड पथक, ग्यानमाता विद्यालय, पोतदार विद्यालय, नागार्जूना हायस्कुल, ऑक्सफोर्ड विद्यालयांच्या या चार शाळांतून आलेले मुला व मुलींचे पथक, पोलीस वाद्यवृंद पथक, जलद कृती दलाच्या बुलेटस्वारांचे पथक, सिमा या श्वानासह असलेले पथक, बॅाम्ब शोधक व नाशक पथक, मार्कस मॅन, न्याय वैधक शाळेचे पथक, वज्र वाहन, अग्नीशमन दलाचे बुलेटस्वारांचे पथक यांनी शानदार संचलन केले. या संचलनात वन विभागाच्या जलद सुटका पथक, सामाजिक वनीकरण विभागाची हरितसेना, तसेच 108 रुग्णवाहिकेचे पथक यांनी चित्ररथाद्वारे सहभाग घेतला.  
यावेळी पालकमंत्री खोतकर यांच्या हस्ते स्काऊट गाईडसाठीचे राष्ट्रपती महोदयांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ स्वप्नील भंगाळे (राजर्षी शाहू विद्यालय, नांदेड), सैलीनी शेख, सागर बोरगावे, पवन पटणे ( सर्व बसवेश्र्वर विद्यालय, फुलवळ, ता. कंधार ), शारदा करेवार ( महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, शेकापूर, ता. कंधार ) यांना प्रदान करण्यात आले. यावेळी नांदेड पोलिस दलाच्यावतीने कराटेचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.  विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी सामूहिक कवायत, डंबेल्स, घुंगर काठी, लेझीम, यांची प्रात्यक्षिके सादर केली. नांदेडच्या जलद कृती दलाच्यावतीनेही अपहरणातील सुटकेवर आधारीत चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
पालकमंत्री खोतकर यांच्या हस्ते वन विभाग, नांदेड तहसीलच्या पुरवठा विभाग, पशूसंवर्धन विभाग तसेच रस्ता सुरक्षा अभियानाच्या अनुषंगाने शहर वाहतूक शाखा आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या प्रदर्शन दालनांचेही उद्घाटन करण्यात आले. समारंभाचे व्यंकटेश चौधरी यांनी सुत्रसंचलन केले. समारंभास नांदेड शहर व परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच नागरीकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000000

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...