Sunday, March 10, 2024

 वृत्त क्र. 226

 

दुसऱ्या दिवशीच्या 'शिवगर्जना' महानाट्याला नांदेडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 

· शिवरायांच्या जीवनातील चित्तथरारक प्रसंगानी वेधले प्रेक्षकांचे लक्ष

· आजचा शेवटचा दिवस ; प्रवेश सर्वांसाठी खुला

· प्रवेश नि शुल्क : प्रथम येणाऱ्यास बैठक व्यवस्थेत प्रथम प्राधान्य

· नागरिकांनी कुटूंबासोबत महानाटयाचा लाभ घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

 

नांदेड, दि. 10 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित शिवगर्जना या महानाट्याचे 9, 10 व 11 मार्च रोजी नांदेडच्या गुरुद्वारा मैदानावर प्रयोग होत आहेत. काल पहिल्या दिवशी या शिवगर्जना महानाटयाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते झाला. आज दुसऱ्या दिवशीच्या महानाट्याच्या प्रयोगाला खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अपर्ण करुन शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. आजच्या प्रयोगाला नांदेडकरांनी भरभरुन प्रतिसाद दिला असून, उद्या होणाऱ्या शेवटच्या प्रयोगालाही नागरिकांनी आपल्या कुटूंबासह उपस्थित राहून या शिवगर्जना महानाटयाचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

 

राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालय व नांदेड जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून 350 व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित शिवगर्जना महानाट्य प्रयोगाचे सादरीकरण होत आहे. या महानाटयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची, नितीची, चरित्राची, विचारांची व कार्यकुशलतेची महती जनसामान्यांना विशेष करुन तरुण पिढीला मार्गदर्शक ठरावी. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली व अलौकिक वारशाला प्रसिद्धी मिळावी या उद्देशाने महाराजांच्या जीवनावर आधारित महानाटयाचे सादरीकरण 9, 10 व 11 असे तीन दिवस गुरुद्वारा मैदान हिंगोली गेट रेल्वे हॉस्पिटल समोर दररोज 6:30 वा. होत आहे.

 

उद्या 11 मार्चचा शेवटचा प्रयोग होणार आहे. हा प्रयोग सर्वासाठी खुला असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. आजच्या शिवगर्जना महानाट्यात कलाकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील रोमहर्षक प्रसंगाचे सादरीकरण केले. यात प्रामुख्याने श्री रायरेश्वर मंदिरात घेतलेली स्वराज्य स्थापनेची शपथ, अफजलखानाचा वध, आग्र्यावरुन सुटका, पुरदंरचा तह, शाईस्तेखानाची फजिती अशा अनेक घटनांवर आधारित प्रसंग हुबेहुब सादरीकरणामुळे प्रेक्षकांच्या समोर ऐतिहासिक क्षण डोळ्यापुढे जशाच तसे उभे राहीले.

 

तसेच या कार्यक्रमाच्या सुरवातीला एका कलावंताने संपूर्ण मैदानावर घोडयावर बसून रपेट मारुन सर्व प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. शिवगर्जना महानाटयाला नांदेड जिल्ह्याच्या अनेक भागातून नागरिकांनी गर्दी केली. जिल्हा प्रशासनातील अनेक अधिकारी, कर्मचारी तसेच शालेय विद्यार्थ्यांची या महानाट्यास उपस्थिती लावली होती. प्रत्येक कुटुंबाने बघावा, असा हा नाट्यप्रयोग उद्या सोमवारी शेवटचा प्रयोग होणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

00000































सुधारित वृत्त क्र. 225

नांदेड विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत

 

नांदेड, दि. 10 : हिंगोली येथील रामलीला मैदानावर आयोजित “शासन आपल्या दारी” या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज नांदेडच्या श्री गुरु गोविंदसिंघजी विमानतळावर दुपारी 2.15 वाजता आगमन झाले. हिंगोली येथील कार्यक्रमासाठी ते आले होते. यावेळी नांदेड विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यात आले.

 

यावेळी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार राजेश पवार, आमदार डॉ. तुषार राठोड, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे आदी मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले.

 

यावेळी नांदेड येथील विमानतळ कक्षात पदाधिकारी यांची त्यांनी भेट घेतली. त्यानंतर हेलिकॉप्टरने ते हिंगोलीकडे रवाना झाले. हिंगोली येथील “शासन आपल्या दारी” कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सायंकाळी 5.15 वा. हेलिकॉप्टरने नांदेडच्या श्री गुरु गोविंदसिंघजी विमानतळावर आगमन झाले. त्यानंतर त्यांचे शासकीय विमानाने सायं. 5.27 वा. मुंबईकडे प्रयाण झाले.

0000

छायाचित्र : पुरूषोत्तम जोशी, नांदेड




























Saturday, March 9, 2024

वृत्त क्र. 224 

छत्रपतींच्या जयघोषात नांदेडच्या गुरुद्वारा मैदानावर

'शिवगर्जना'चा थाटात शुभारंभ

 

·         महानाट्याचा पहिल्या प्रयोगाला हजारोंची भरगच्च उपस्थिती

·         रविवारचा प्रयोग बरोबर सायं 6.30 ला सुरू होणार

·         प्रवेश निशुल्क : प्रथम येणाऱ्याला बैठक व्यवस्थेत प्रथम प्राधान्य

 

नांदेड, दि. 9 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित शिवगर्जना या महानाट्याचा 9 मार्च पासून नांदेडच्या गुरुद्वारा मैदानावर छत्रपतींच्या जयघोषात थाटात शुभारंभ झाला. 250 पेक्षा अधिक कलाकारांचे समर्पित सादरीकरण आणि हजारो रसिक प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद अशी तीन तासांची मैफल मैदानावर रंगली राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालय व नांदेड जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून 350 व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित महानाट्य शिवगर्जनाचा प्रयोग होत आहे.

 

9, 10 व 11 असे तीन दिवस गुरुद्वारा मैदान हिंगोली गेट रेल्वे हॉस्पिटल समोर दररोज 6:30 वाजता महानाट्याच्या प्रयोगाची सुरुवात झाली आहे. उद्या 10 मार्चचा प्रयोगाला बरोबर सायंकाळी 6.30 ला सुरू होणार आहे. प्रत्येक कुटुंबाने या महानाट्याचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. तत्पूर्वी, आ. बालाजी कल्याणकर, आ. राजेश पवार, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, नांदेड-वाघाळा महानगरपालिकेचे आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांच्यासह विविध मान्यवरांनी सायंकाळी 7 वाजता या महानाट्याची सुरुवात केली.

 

छत्रपती शिवाजी महाराजाच्या उदयापूर्वीची महाराष्ट्राची परिस्थिती, परकिय आक्रमणात पोळलेला महाराष्ट्र आणि छत्रपतीचा उदय होतानाची परिस्थिती. त्याकाळातील संस्कृती, लोकनाट्य, लोककला याची गुंफण करीत पुढे छत्रपतीच्या आयुष्यातील चित्तथरारक प्रसंगाचे लक्षवेधी सादरीकरण, ओघवते निवेदन, ध्वनी व प्रकाश व्यवस्था यामुळे रसिकांना हे महानाट्य खिळवून ठेवते. छत्रपती शिवाजी महाराजांची थेट घोड्यावरून मावळ्यांसह मैदानावरची लाईव्ह रपेट, घोड्यावरची चार मजली सेटवरची हृदयाचा ठोका चुकवणारी एन्ट्री, युद्धाचे प्रसंग चित्तथरारक होते. सलग तीन तास कोणताही मध्यांतर न घेता हा प्रयोग रसिकांना आकर्षित करून ठेवते.  प्रत्येक कुटुंबाने बघावा असा हा नाट्यप्रयोग उद्या रविवारी व सोमवारी होणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

00000












Friday, March 8, 2024

वृत्त क्र. 223

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य

प्रा. डॉ. गोविंद काळे व डॉ. श्रीमती निलिमा सरप (लखाडे) यांचा दौरा

 

नांदेड दि. 8 : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद हरिबा काळे व डॉ. श्रीमती निलिमा शंकरराव सरप (लखाडे) हे हे रविवार 10 व 13 मार्च 2024 रोजी नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

 

रविवार 10 मार्च रोजी सायं. 8 वा. नांदेड शासकीय विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम. सोमवार 11 मार्च 2024 रोजी उमरखेड, पुसद, दिग्रस, महागावकडे प्रयाण करतील. बुधवार 13 मार्च रोजी सायं. 5 वा. चंद्रपूर येथून नांदेड येथे आगमन व शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम.

000

वृत्त क्र. 222

 मतदानाच्या टक्केवारीचे सर्व विक्रम तोडणारी ही निवडणूक ठरावी : जिल्हाधिकारी

निवडणूक काळातील प्रचार करणाऱ्या स्वीप कक्षाचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

नांदेड दि. ८ : मतदान करणे, मताधिकार बजावणे, निवडणुकीच्या दिवशी सर्व काम बाजूला सारून मतदान केंद्रावर पोहोचणे राष्ट्रीय कर्तव्य आहे. लोकशाही बळकट करण्याची हक्काची लढाई आहे, हे सामान्यातील सामान्य नागरिकाला समजून सांगणे निवडणूक काळामध्ये स्वीप कक्षाचे काम असून एक कल्पकतेने पार पाडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज येथे केले.

जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज स्वीप (सिस्टिमॅटिक वोटर्स एज्युकेशन अँड इलेक्ट्रॉल पार्टिसिपेशन) उपक्रमासंदर्भात प्रचार प्रसार करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली.

 या बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त महेश कुमार डोईफोडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, नोडल अधिकारी डॉ पंजाब खानसोळे, शिक्षणाधिकारी प्राथमिक डॉ. सविता बिरगे, शिक्षणाधिकारी माध्यमिक माधव सलगर, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक पाचंगे, आनंदी वैद्य, प्रलोभ कुलकर्णी, राजेश कुलकर्णी साईनाथ चिद्रावार, लोककला तज्ञ डॉ.सान्वी जेठवाणी यांच्यासह हजारो फॉलोअर असणारे समाज माध्यमातील सक्रिय सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर उपस्थित होते.

 यावर्षी रांगा नाहीच प्रतीक्षालय असतील

यावर्षी उन्हामध्ये मतदानाला मतदारांना ताटकळत राहावे लागणार नाही. प्रत्येक मतदान केंद्रावर मोठ्या संख्येतील मतदारांना सावली मिळेल व अन्य सुविधा मिळेल अशा पद्धतीचे प्रतीक्षालय उभारल्या जातील, याची माहिती सर्वांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

वेगवेगळ्या स्पर्धांची घोषणा लवकरच

यावेळी तरुण पिढीच्या आवडीनिवडींना लक्षात घेऊन समाज माध्यमांवर प्रचार प्रसार करणाऱ्या विविध स्पर्धांची घोषणा स्वीप कक्षाकडून करण्यात येणार आहे. यामध्ये आकर्षक रील तयार करणे, समाज माध्यमांवरील लक्षवेधी पोस्ट तयार करणे, आकर्षक स्टेटस ठेवणे तसेच युवकांसाठी मोठ्या स्पर्धांची घोषणा जिल्हा प्रशासनामार्फत लवकरच केली जाणार आहे.

 प्रत्येक वस्तीमध्ये शंभर टक्के मतदान

या बैठकीत नागरिकांनी सुद्धा शंभर टक्के मतदानासाठी त्यांच्या काही भन्नाट आयडिया शेअर कराव्यात असे आवाहन करण्यात आले विशेषतः नव मतदार मतदान न करता आपले कर्तव्य बजावता या निवडणुकीत बाजूला राहू नये, याकडे लक्ष वेधण्याच्या आवाहन त्यांनी केले.

पारंपारिक लोककला माध्यमांचाही वापर

या बैठकीमध्ये जिल्ह्यातील पारंपारिक माध्यमांनी, वृत्तपत्रे व समाजसेवी संघटनांनी या कार्यामध्ये प्रशासनाला साथ देण्याचे आवाहन त्यांनी केले. रेडिओ, दूरदर्शन, वृत्तपत्रे, लोककला यांच्यासोबतच अन्य पारंपारिक माध्यमांमार्फत मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

शाळकरी मुलांचे पालकांना आवाहन

विविध स्पर्धांच्या माध्यमातून, पत्र लेखनाच्या माध्यमातून आणि शाळेतील उपक्रमांच्या माध्यमातून लोकशाही प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या आपल्या पालकांना आवाहन करणाऱ्या अनेक उपक्रमाची आखणी ही या बैठकीत करण्यात आली. मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याच्या अहवाल आता मुले आपल्या पालकांना विविध उपक्रमातून करणार आहेत.

0000





केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...