Friday, February 9, 2024

विशेष लेख

 ‘.. संवेदनशील, अथक कार्यशैली हीच प्रेरणा’ – विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव.

मुख्यमंत्री महोदयांच्या कामाचा वेग कित्येकदा अचंबित करण्यासारखा असतो. अहोरात्र ते कामात असतात. इथं अहोरात्र म्हणजे अहोरात्र असंच असतं. निर्णय घ्यायचा आहे, तर त्यामध्ये वेळ दवडणं त्यांना आवडत नाही. ते त्यांना अपेक्षितही नसतं. त्यामुळे गेल्या काही महिन्यातील त्यांच्या वेगवेगळ्या विभागांच्या कामांवर नजर टाकली तर, त्यांचा झपाटा लक्षात येतो. इथं उल्लेखित कामे, प्रकल्प, उपक्रम, ही वाणगीदाखल आहेत. त्यांची यादी मोठी होऊ शकते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्यासाठी रुग्णसेवा ही सर्वोच्च आहे. त्यामुळे आपण अलिकडच्या काळात पाहिलं असेल, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचं काम देखील मुख्यमंत्री महोदयांप्रमाणेच अहोरात्र सुरु असते. या कक्षाद्वारे महाराष्ट्रातल्या काना-कोपऱ्यातल्या गरजू रुग्णांपर्यंत वैद्यकीय उपचारांसाठी मदत पोहचवली जाते. ही मदत आर्थिक असतेच. पण त्याशिवाय दररोज कित्येकांचे वेगवेगळ्या कारणांसाठी मदतीसाठी विनंती, विचारणा सुरु असते. वेगवेगळ्या प्रकारची मदत मागितली जाते. मुख्यमंत्री महोदयांप्रमाणेच तत्पर आणि वेळेत मदत पोहचवणारा कक्ष अशी ओळख तयार झाली आहे. या वैद्यकीय कक्षाच्या व्यतिरिक्तही मुख्यमंत्री महोदय विशेष बाब म्हणूनही सातत्याने मदत करण्यात पुढे असतात. अशी मदत करताना त्यांच्यापुढे वेळ-काळाचं बंधन नसतं. समोरचा मदत मागतो आहे. तो गरजू आहे, याची खात्री झाली की तिथल्या तिथे मदत करतात. रात्री-अपरात्री पर्यंत वैद्यकीय सहायता कक्ष आणि संबंधितांपर्यंत मदत पोहचवण्याचे संदेश जातात. एकदा एका अपघातात दोन्ही हात गमावलेला आणि पायांनीही अधू झालेला तरूण मुलाला घेऊन त्याचे वडील आले होते. त्यांनी आपली करून कहाणी ऐकवणे सुरु असतानाच, त्यांना मदत पोहचवण्याची प्रक्रीया सुरु झाली होती. सगळी मदत केली जाईल, कुटुंबाला हातभार लावला जाईल, असा धीर-दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी त्या तरुणाच्या खांद्यावर हात ठेवला. याच दरम्यान सगळी चक्रे फिरली होती, आणि मदतीचा धनादेशही संबंधित बाप-लेकांच्या हातात सुपूर्द केला गेला होता.

मदतीची अपेक्षा बाळगून येणाऱ्यांचे प्रत्येकाचे समाधान करण्यात ते यशस्वी होतात. प्रत्येकाचे समाधान व्हावे यासाठी तिथल्या तिथे निर्णय घेण्याची. संबंधिताना तडक दूरध्वनी करून, जागेवरच सूचना देण्याची त्यांची पद्धत असते. यामुळे त्यांच्या भेटीची अपेक्षा बाळगून येणाऱ्यांची संख्याही मोठी असते. ते त्यांना जाणीवपूर्वक वेळही देतात. अभ्यागतांची गर्दी हा त्यांच्यासाठी दैनंदिनीचा भाग असतो. त्यामुळेच उशिरा रात्रीपर्यंत त्यांच्याकडे भेटीसाठी गर्दी आणि रांगच असते.

आपत्तीच्या काळातही मुख्यमंत्र्यांची स्वतःहून जाणून घेऊन पुढे राहण्याची आणि प्रत्यक्ष फिल्डवर उतरून नेतृत्व करण्याची भूमिका असते. त्यामुळेच नैसर्गिक किंवा अन्य कुठल्याही आपत्तीत ते आर्थिक सहाय्य आणि मदत-बचावासाठी ते सदैव सतर्क आणि त्याबाबतच्या माहितीने अद्ययावत असतात. अशा वेळी या गोष्टीं ते दुसऱ्यांवर सोपवून बाजूला राहू शकतात. पण तसे होत नाही. ईर्शाळवाडी सारखी दरड कोसळण्याची दुर्घटना असो किंवा अन्य कुठला अपघात, पूर अशा आपत्तीतही ते मदत पुरवण्यापासून त्यातील आपत्तीग्रस्तांच्या पुनर्वसनाच्याबाबतीत आग्रही असतात. या सर्व गोष्टींचा सातत्याने आढावा आणि वेळच्या वेळी या गोष्टी पार पडताहेत की नाही याचा पाठपुरावा करण्यावरही त्यांचा भर असतो.

दिव्यांग आणि दिव्यांगांच्या मदतीसाठी ते दक्ष असतात. स्वतंत्र दिव्यांग विभाग व्हावा यासाठी त्यांची तळमळ होती. दिव्यांगाविषयी आस्थेचे आणि त्यांच्या हितांचे रक्षण व्हावे असे निर्णयही त्यांनी तडकपणे घेतले आहेत.

गरजूंना मदत यासोबतच राष्ट्रभक्तीचे आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्वाचे उपक्रम अशा सर्वच बाबतीत मुख्यमंत्री महोदय संवेदनशील असतात. त्यांचे या सगळ्या गोष्टींवर बारकाईनं लक्ष असतं. या उपक्रमांच्या नियोजन-आयोजनात कुठलीही त्रुटी राहू नये यासाठी ते आग्रही असतात. स्वतः लक्ष घालून अनेक गोष्टींना ते आकार देतात. यातही त्यांची दूरदृष्टी आणि नावीन्याचा ध्यास दिसून येतो. सहभागी कलाकार, ज्येष्ठांचा-तज्ञांच्या मतांचा आदर, त्यांना काय हवं- काय नको हे पाहण्यातही ते मागे राहत नाही. उत्तम, उत्कृष्ट आणि भव्य-दिव्य यासाठी ते सातत्याने पाठपुरावा करत असतात. यातूनच महाराष्ट्रात भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या सर्व उपक्रमात मग तो हर घर तिरंगा असो किंवा पुढे दीर्घकाळ चाललेला ‘मेरी माटी-मेरा देश’ हा उपक्रम. या सगळ्याच्या आयोजनात महाराष्ट्र अव्वल राहीला आहे. यातील काही उपक्रमांत तर विक्रमच रचला गेला आहे. या अमृत कलश उपक्रमाच्या आयोजनात तेही आवर्जून सहभागी झाले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने महाराष्ट्रात विविध उपक्रम आयोजित केले गेले. किल्ले रायगडवर विशेष कार्यक्रम केला गेला. त्यामध्येही हिरीरीने सहभागी झाले. यातील सर्व उपक्रमांत त्यांनी स्वारस्य दाखवून अनेक सूचना केल्या होत्या. त्यामुळेच आपण वर्षभर हा या सोहळ्याच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करू शकलो. यातून प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जाणता राजा या महानाट्याचे प्रयोगांचे आयोजन करण्यात आले. आता आगामी काळात शिवजयंतीच्या निमित्यानेही प्रत्येक जिल्ह्यात विविध उपक्रम आयोजिक करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. यात शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांच्या ठिकाणी स्वच्छता, रंगरंगोटी, सुशोभिकरण करण्यात यावे असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

स्वच्छता हा देखील मुख्यमंत्र्यांच्या आवडीचा आणि आस्थेचा विषय आहे. ते स्वच्छतेचे भोक्ते आहेत. त्यांच्या पुढाकारामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा स्वच्छतेचा विषय प्राधान्यक्रमावर आला आहे. विशेषतः शहरी भागातील स्वच्छतेसाठी त्यांनी डिप क्लिनिंग या संकल्पनेवर भर दिला आहे. सध्या महानगरापर्यंत असलेली ही मोहिम पुढे राज्यभरातील सर्वच शहरात राबवली जाणार आहे. अलिकडेच केंद्र सरकारने महाराष्ट्राचा या नागरी स्वच्छता सर्वेक्षणात महाराष्ट्राला प्रथम क्रमांचा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. यातच या मोहिमेचे यश सिद्ध होते. यापुढे या मोहिमेचा, या संकल्पनेचाही विस्तार केला जाणार आहे. याशिवाय सौंदर्यीकरण, सुशोभिकरण याबाबतही त्यांचा कटाक्ष असतो. शहरात वृक्षराजी आणि ऑक्सिजन पार्क निर्माण व्हावेत. प्रदूषण आणि अस्वच्छता दूर व्हावी यासाठी त्यांचा आग्रह असतो. त्यासाठी ते वारंवार यंत्रणांना सूचना देत असतात. प्रचंड व्यस्तात आणि अनेक कार्यक्रम असतानाही ते प्रसंगी भल्या सकाळी प्रत्यक्ष फिल्डवर उतरून स्वच्छता मोहिमेला प्रोत्साहित करण्यासाठी दौरे करतात हे आपण पाहतोच आहोत.

शेती विषयक आणि अनुषांगिक अनेक गोष्टींबाबत त्यांच्याकडे अद्ययावत माहिती असते. त्यामुळेच त्यांनी अलिकडेच बांबू लागवडीसारख्या अभिनव गोष्टींवर भर दिला आहे. बांबुची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. बांबू लागवडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्पन्नाचा चांगला स्त्रोत निर्माण होणार आहे. यासाठी अलिकडच्या मंत्रिमडळ बैठकीतही ऊती संवर्धित बांबूची लागवड तसेच त्याच्या देखभालीसाठी अनुदानाची तरतूद करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

दहिहंडी हा पारंपरिक उत्सव आता एक महत्वाचा क्रीडा प्रकार आहे. यातील गोपाळांविषयी मुख्यमंत्र्यांना मनापासून आत्मियता आहे. या गोपाळांना दुखापत झाल्यास त्यांना चांगले उपचार मिळावेत, यासाठी विमा संरक्षण आणि मंडळांनाही प्रोत्साहन मिळावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. या दहिहंडीला युनेस्कोच्या सांस्कृतिक वारसा प्रकारात (इनटॅन्जिंबल कल्चरल हेरिटेज) स्थान मिळावे यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्याही मुख्यमंत्र्यांनी सूचना केल्या आहेत. त्यादृष्टीनेही प्रस्ताव तयार करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्याकडून अशा या विविध विषयांचा सातत्याने आढावा सुरु असतो. यातून सकारात्मक आणि चांगले काही घडून यावे अशी त्यांची भूमिका असते. त्यासाठी ते मार्गदर्शन करतात, सातत्याने पाठबळ देत असतात. त्यांचा काम करण्याचा उत्साह आणि झपाटा यामुळे अशा उपक्रमांच्या नियोजन, आयोजनात सहभागी विविध यंत्रणांना, अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही प्रोत्साहन मिळत असते. त्यांच्याकडून प्रेरणा मिळत असते. त्यांची प्रेरणा आणि प्रतिसाद हाच आणखी चांगले काम करण्यासाठी ऊर्जा देत राहतो. हेच त्यांच्या कार्यशैलीचे वैशिष्ट्य आहे.

-         विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव.

 

विशेष लेख

 माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा पर लेख

       :श्री. मंगलप्रभात लोढा,

मंत्री,कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभाग तथा पालकमंत्री मुंबई उपनगर

 

       सर्वसमावेशक नेतृत्व

 

शांत, संयमी, दृढ निश्चयी स्वभाव आणि तळागाळातील जनतेविषयी मनात असलेली संवेदनशीलता जपून, सर्वसमावेशक नेतृत्व असलेले  माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रूपाने महाराष्ट्राला लाभले असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज मला शुभेच्छा देताना खूप आनंद होत आहे.

 नेतृत्व आणि कर्तुत्व कोणाकडून उसने मिळत नाही तर ते स्वतःच निर्माण करावे लागते. नेतृत्व आणि कर्तृत्वाचा उत्तम संगम असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या नेतृत्वाखाली काम करताना अनेक गोष्टी शिकण्यास मिळत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रगतीच्या नव्या उंची गाठत आहे.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर श्री. एकनाथ शिंदे यांनी नेहमीच मार्गक्रमणा  केली आणि पुढेही सुरू ठेवतील. धर्मवीर आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी समाजोपयोगी कामे केली. पदापेक्षा तळागाळातील जनतेसाठी काम करताना त्यांनी नेहमी संवेदनशील जपली आहे.अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून पुढे येऊन एक सामान्य कार्यकर्ता ते राज्याच्या मुख्यमंत्री पदापर्यंत त्यांच्या कारकिर्दीचा आलेख उंचावत गेला आहे आणि त्यांचा हा प्रवास सर्वांसाठी खरोखर प्रेरणादायी आहे.

श्री.एकनाथ शिंदे साहेब यांची आपल्या मतदारसंघात असलेली मजबूत पकड  त्यांच्या लोकप्रियतेची पोचपावती आहे. अगदी अलीकडेच प्रसारित झालेला धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटातून त्यांच्या कारकिर्दीची आपल्याला नव्याने ओळख होते.अगदी चित्रपटाला साजेशी अशी त्यांची संपूर्ण कारकीर्द आहे.

ठाणे  महापालिकेत नगरसेवक ते विधानसभेचे सदस्य या राजकीय कारकीर्दीत त्यांनी मतदारसंघात  तसेच राज्यभरात अनेक जनहिताची कामे केली.  कोपरी - पाचपाखाडी मतदारसंघातून 2004 मध्ये विधानसभा सदस्य म्हणून निवडून आले. जनतेने सातत्याने दाखवलेल्या विश्वासानंतर आणि आपल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे आजपर्यंत त्यानी मागे वळून पाहिले नाही.

कोणत्याही पक्षीय राजकारणापेक्षा वैयक्तिक मंत्री म्हणून त्यांनी केलेले काम महाराष्ट्राची जनता कधीच विसरू शकत नाही. २०१९ मध्ये कोल्हापूर,सातारा आणि सांगली महापुरामध्ये अस्मानी संकट आले असताना. त्या कालावधीत आरोग्यमंत्री म्हणून त्यांनी केलेले काम सर्वांच्या लक्षात राहील, असे आहे. महापुराच्या कालावधीत आरोग्य यंत्रणे सोबत प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन सर्व काम स्वतः पाहिले.  

नगर विकास आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी घेतलेल्या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी देखील केली आहे. राज्याचा विकास व्हायचा असेल तर सर्वांना परवडणारी दळणवळण व्यवस्था, दर्जेदार सुविधा देखील असाव्यात यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून त्यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी  महामार्गाचे नुकतेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.नागपूर ते शिर्डी (कोकेमठाण) या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यामुळे पूर्वी हे अंतर पार करण्यासाठी तेरा तास लागत होते आता पाच तासात हे अंतर पार करणे शक्य होणार आहे.

 

सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून कमी कालावधीत केलेले भूसंपादन, शेतकऱ्यांना त्वरित दिलेल्या भूसंपादनाचा मोबदला, सर्व शासकीय यंत्रणांना सोबत घेऊन या रस्त्याचे विक्रमी वेळेत पूर्ण केलेले काम या महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलेले आहे. कोणत्याही प्रकल्पाची फक्त घोषणा करून उपयोग नसते तर त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होऊन जनतेला त्याचा दैनंदिन जीवनात उपयोग होणं गरजेचे असतं आणि हेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या शांत संयमी मनाने आणि दृढ निश्चय असलेल्या स्वभावाने करून दाखवले आहे.

माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३० जून २०२२ रोजी पदभार घेतल्यापासून राज्याच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करताना एक अत्यंत चांगला अनुभव मिळत आहे. कोरोना सारखे संकट, महापूर, अतिवृष्टी या कालावधीत जनतेला दिलासा देणारे निर्णय, परवडणाऱ्या घरांना चालना, लोकाभिमुख प्रशासन, पायाभूत प्रकल्पांना वेग, दुर्बल घटकांना दिलासा,शासन आपल्या दारी उपक्रम  असे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. यापुढेही अनेक नवीन योजना राबवण्याचा मानस आहे. राज्याला प्रगती कडे नेण्यासाठी अनेक विकास आराखडे त्याचे नियोजन केले जात आहे.

प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्र गावागावात सुरू करणे,आंतरराष्ट्रीय रोजगाराच्या संधी तरूणांना उपलब्ध होण्यासाठी आंतरराष्ट्रीय रोजगार सुविधा केंद्राची स्थापना,राज्यातील पारंपारिक कारागिरांना आणि हस्तकलाकारांना  आर्थिक स्वावलंबन प्राप्त करून देणारी पी.एम.विश्वकर्मा योजनेची अंमलबजावणी, अकरा कलमी नमो उपक्रमातंर्गत नमो महारोजगार  मेळावे,रोजगाराच्या अधिकाधिक संधी निर्माण करून रोजगार क्षम आणि कुशल महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांच्या नेतृत्वाखाली काम करताना अनेक गोष्टी शिकावयास मिळत आहे.

महाराष्ट्राला सुखी, समृद्ध आणि संपन्न राज्य करण्यासाठी आपण करत असलेल्या सर्व प्रयत्नांना यश मिळो,आपली सर्व स्वप्ने साकार होवो, तुम्हाला वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो ...

 

शब्दांकन : संध्या गरवारे, विभागीय संपर्क अधिकारी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय

 विशेष लेख/दादाजी भुसे

 

एक संवेदनशील मनाचे आणि जनतेचं दुःख ते आपलं दु;ख या भावनेने काम करणारे मुख्यमंत्री राज्याला एकनाथ शिंदे यांच्या रुपाने लाभले आहेत. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेबांचा आज वाढदिवस… सर्वप्रथम मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांना निरोगी, सुदृढ आरोग्य लाभो, ही आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो…

महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास हा एकच ध्यास घेऊन केंद्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली शासनाचे काम सुरु आहे. त्यामुळेच केंद्र सरकारच्या ‘अमृत’काळ संकल्पनेवर आधारित आपल्या राज्याचा 2023-24 चा अर्थसंकल्पच हा पंचामृत या संकल्पनेवर मांडण्यात आला. या ‘पंचामृत अर्थसंकल्पा’मध्ये शेती, पायाभूत सुविधा, उद्योग यांच्याशी योजनांवर भर देण्यात आला. यात ‘शाश्वत शेती समृद्ध शेतकरी’, ‘महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा विकास’, ‘भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा’, ‘रोजगारनिर्मिती’, ‘पर्यावरणपूरक विकास’ या पाच प्रमुख मुद्द्यांचा समावेश होता. गेली वर्षभर या पंचामृत अर्थसंकल्पाला पुढे नेण्यासाठी काम सुरु आहे.

मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून ज्येष्ठांसाठी मोफत महिलांनाही  निम्म्या तिकीट दराने एस.टी. बस प्रवास करण्याची सवलत देण्यात आली आहे. यामुळे आता आपल्या ज्येष्ठ नागरिकांना आणि माता-भगिनींना राज्यभर फिरता येऊ लागले आहे. तीर्थाटनासह, प्रियजनांकडे, औषधोपचार आणि काही कारणांसाठी त्यांना आता तिकीट खर्चाची चिंता करावी लागत नाही. यामुळे आपल्या असंख्य भगिनींना शिक्षण-उच्च शिक्षणासाठी प्रवास करणे सोयीचे झाले आहे.

देवावर निस्सिम श्रद्धा असलेल्या आपल्या मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली अयोध्या येथील श्रीराम मंदिर प्रतिष्ठापनेचा सोहळा नेत्रदीपक पद्धतीने साजरा झाला. यानिमित्ताने राज्यातील सर्व तीर्थक्षेत्रांना स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी स्वतंत्र योजना त्यांनी सुरु केली. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या पंढरपुरच्या पायी वारीत दिंड्यांद्वारे सहभागी होणाऱ्या आपल्या वारकरी बांधवांच्या सुरक्षेसाठी देखील विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना त्या –त्या काळात कार्यन्वित केली आहेत. पंढरपूरच्या विकासासाठी देखील प्राधिकरण स्थापण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.  यात विकास आराखडा तयार करून पंढरपूरचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न आहे. वारकऱ्यांसोबतच विठुभक्तांना या तीर्थस्थळी चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, अशी त्यांची भूमिका आहे.

शेतकरी-बळीराजा आपला अन्नदाता. सदैव शेतकऱ्याच्या सोबत, त्याच्या सुख-दुःखात मुख्यमंत्री ठामपणे उभे राहिले आहेत. जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्ती कोसळली तेव्हा मुख्यमंत्री त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहीले आहे. म्हणूनच आपण सततच्या पावसाचा निकष तयार करून, त्यालाही आपत्तीच्या व्याख्येत समाविष्ट केले आहे.  त्यामुळे या नुकसानी शेतकऱ्यांना मदत करणे शक्य झाले. एनडीआरएफच्या निकषाहूनही अधिकची मदत आपण शेतकरी आणि आपत्ती ग्रस्तांना त्यांनी केली आहे. पूर आणि आपत्तीच्या निवारणासाठी प्रत्येक विभागीय पातळीवर राज्य आपत्ती प्रतिसाद दले नियुक्त करण्याचा महत्वाचा निर्णयही घेतला आहे.

शेती आणि सिंचन, कृषी-औद्योगीक क्षेत्रातही आमुलाग्र असे बदल व्हावेत असे निर्णय त्यांनी घेतले आहेत. सिंचनाचा अनुशेष भरून निघेल यावर भर दिला आहे. अगदी सुरवातीच्या टप्प्यातच रखडलेल्या 35 प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. यामुळे आठ लाख हेक्टरच्या क्षेत्राला सिंचनाला लाभ होणार आहे.  जलयुक्त शिवारचा दुसरा टप्पा आपण नव्या दमाने सुरु केला आहे. राज्यातील पाच हजार गावे जलसमृद्ध होणार आहेत. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतील 6 प्रकल्प आणि बळीराजा जलसंजीवनी योजनेतील 24 प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता केवळ एक रुपयांत पीकविमा उपलब्ध करून दिला आहे. २०० कोटी रुपयांच्या तरतुदीसह ‘महाराष्ट्र पौष्टिक तृणधान्य अभियान’ सुरू केले आहे. हिंगोली जिल्ह्यात बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापण्यासाठी निधी दिला आहे.

          मुख्यमंत्री पदाचा कुठलाही बडेजाव न बाळगता थेट जनतेत जाऊन त्यांच्याशी संवाद साधणे, अडचणीत असलेल्याला मदत करणे हा त्यांचा स्वभाव आहे. त्यामुळेच जेव्हा जनतेला थेट त्यांच्या दाराशी शासकीय योजना देणाऱ्या शासन आपल्या दारी सारख्या उपक्रम राबविण्यात आला तर त्यांनी त्यात वैयक्तिक लक्ष घातले. प्रत्येक जिल्ह्यात या उपक्रमाचे आयोजन करतांना जास्तीत जास्त नागरिकांना थेट लाभ मिळवून देण्याचा त्यांचा आग्रह असतो. यामुळेच आतापर्यंत शासन आपल्या दारी उपक्रमांतून करोडो नागरिकांपर्यंत शासकीय योजनांचे लाभ पोहचले आहेत.

राज्याच्या प्रत्येक घटकाला विकास प्रक्रियेत सामावून घेण्याचा ध्यास मुख्यमंत्री महोदयांनी घेतला आहे. याच ध्यासातून मी देखील त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. एक खमकं, खंबीर आणि जनतेच्या भावनांचा आदर करणारं हे एक नेतृत्व आहे...

आपल्या सर्वांचे लाडके एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व आणखी उजळून निघो, या सदिच्छांसह पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसानिमित्त दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देतो!

-दादाजी भुसे

महाराष्ट्र राज्य

 

विशेष लेख

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संवेदनशील व अभ्यासू नेतृत्व

मा.मंत्री अब्दुल सत्तार, अल्पसंख्याक विकास विभाग आणि पणन विभाग

शांत स्वभाव, अभ्यासू नेतृत्व, मितभाषी, संयमी पण कामांमध्ये आक्रमक अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ओळख आहे. ते संवेदनशील लोकप्रतिनिधी आहेत. समाजाच्या उत्कर्षासाठी सतत कार्यरत सर्वांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती आणि प्रत्येक कामाला शेवटापर्यंत घेऊन जाणे हा त्यांचा स्वभाव आहे.

कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना फक्त कर्तृत्व आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी राजकारणात स्वतःचे स्थान पक्के केले. ठाण्याच्या मातीत राजकीय कारकीर्दीची जडणघडण झाली. नगरसेवक ते मुख्यमंत्री असा थक्क करणारा प्रवास एकनाथ शिंदे यांचा आहे. हा प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.राज्यात दीड-दोन वर्ष कोरोनाचे संकट होते. या संकटाच्या काळात शिंदे साहेब अनेकांच्या मदतीसाठी धावून गेले.

महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दीड वर्षांत सरकारने अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले. मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,मा.उपमुख्यमंत्री अजित पवार

हे अत्यंत वेगाने निर्णय प्रक्रिया राबवण्याचे काम करीत आहेत. जी कामे वर्षानुवर्ष निर्णया अभावी रखडली होती. ती या सरकारने अत्यंत कमी वेळेत जलद गतीने पूर्ण केली आहेत. मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या नेतृत्वाखाली सर्वच मंत्री लोककल्याणकारी काम करीत आहेत.

 माझ्यावर अल्पसंख्याक विकास विभाग आणि पणन  विभागाची जबाबदारी दिली आहे.

मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पणन विभागामार्फत राज्यस्तरीय मिलेट महोत्सव आयोजित करण्यात आला.आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष अंतर्गत मिलेट महोत्सवानिमित्त मिलेट खरेदीदार, विक्रेता संमेलन व खरेदी करार आणि राज्यस्तरीय प्रदर्शनाचे आयोजन केले.

            नुकसानग्रस्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 350 रुपये प्रति क्विंटल अनुदान वितरित करण्यात आले.तसेच राज्यातील ११६ बाजार समित्यांमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन उभारण्यात येणार आहे.

     अल्पसंख्याक समाजासाठी मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाची शासन हमीची मर्यादा 8 वर्षांसाठी रुपये 30.00 कोटी वरुन 500.00 कोटी इतकी करण्यात आलेली आहे. अल्पसंख्याक समुदायातील मुलांना परदेशात शिक्षणाची संधी मिळावी व त्यांच्या गुणवत्तेला वाव मिळावा म्हणून शासनाकडून अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी परदेश शिष्यवृत्ती या योजनेची पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमबजावणी करण्यात येत आहे.महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून 15 जिल्ह्यांमध्ये अल्पसंख्याक महिलांचे नवीन 2 हजार 800 बचतगट स्थापन करण्यात येणार आहे असे अनेक जनहिताचे निर्णय शिंदे साहेबांनी घेतले आहे.

               महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी यापुढेही आपले कार्य वाढते राहो याच सदिच्छा. आपणास उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो हीच शुभकामना!

वाढदिवसाच्या मनःपूर्वक अनंत शुभेच्छा.

शब्दांकन: दत्तात्रय कोकरे, विभागीय संपर्क अधिकारी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय

विशेष लेख

 

विधायक कार्याचा कृतिशील आदर्श!

- शंभूराज शिवाजीराव देसाई,

राज्य उत्पादन शुल्क मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री- सातारा व ठाणे जिल्हा

महाराष्ट्राचे लोकप्रिय व लाडके मुख्यमंत्री, सातारा जिल्ह्याचे सुपुत्र, जनहितदक्ष नेतृत्व मा. ना. एकनाथजी शिंदे साहेबांचा आज वाढदिवस! त्यांना वाढदिवसानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो.

राजकीय-सामाजिक जीवनात वावरताना विचार, तत्त्व यांना कृतीची पूरक जोड देणारी जी काही मोजकी नेतेमंडळी आहेत, त्यात आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा अग्र क्रमांक लागतो. म्हणून अवघ्या दीड वर्षांच्या काळात त्यांनी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रातील तळागाळातील जनतेच्या मनात आदराचे स्थान प्राप्त केले आहे. सर्वसामान्यांच्या हितासाठी, जनतेच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी कार्यकर्ता वृत्तीने दिवसाचे सतरा-अठरा तास झोकून देऊन काम करणारे नेतृत्व आज त्यांच्या रूपाने राज्याला लाभले आहे. कोणताही राजकीय अभिनिवेश न बाळगता ते महाराष्ट्रासाठी ज्या तळमळीने, तडफेने कामे करतात त्यास तोड नाही. मंत्रिमंडळातील त्यांचा एक सहकारी म्हणून काम करताना त्यांच्या या काम कार्यशैलीतून आम्हास नेहमीच प्रेरणा मिळत आली आहे. 

आदरणीय शिंदेसाहेब आता जरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम करत असले तरी राज्याच्या विधिमंडळात सहकारी म्हणून २००४ पासून आम्ही एकत्र काम करीत आहोत. सन २००४ मध्ये एकाच वेळी आम्ही दोघेही विधानसभेवर निवडून आलो. सत्ता असो अथवा नसो, मैत्री कशी जपावी, सहकाऱ्यांशी कसा स्नेह ठेवावा, जनतेच्या हितासाठी कसे सक्रिय राहावे, याचा वस्तुपाठ मा. शिंदे साहेबांनी घालून दिला आहे. कोरोना काळात शिंदे साहेब रोज अडीच लाख अन्नाची पाकिटे वाटत होते. सांगली-कोल्हापूरला अतिवृष्टीने झोडपले, तेव्हा पूरग्रस्तांसाठी ७० हजार चादरी घेऊन ते धावले होते. महाडला दरडी कोसळल्या, तेव्हा मुसळधार पावसात, गुडघाभर चिखलात उभे राहून ते कार्यकर्त्यांसह अहोरात्र आपद्ग्रस्तांना मदत करीत होते. मुंब्रा-भिवंडीमध्ये इमारती कोसळल्या, तेव्हा बेघर झालेल्या लोकांची निवास व जेवणखाण्याची त्यांनी व्यवस्था करून दिली. त्यांच्या संवेदनशील कार्यपद्धतीत आता ते मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतरही खंड पडलेला नाही. गेल्या वर्षी पावसाळ्यात रायगडमधील इर्शाळवाडी येथे डोंगर खचून दुर्घटना घडली, तेव्हा मुख्यमंत्री शिंदे साहेब पहाटेच दुर्घटनास्थळी पोहोचले. दुर्घट असा डोंगर चढून घटनास्थळावरील ग्रामस्थांना दिलासा दिला. त्यांच्या या संवेदनशीलतेने मदतकार्य करणाऱ्या पथकांनाही ऊर्जा मिळाली. आपल्या कृतीतून आदर्श घालून देणारे असे नेतृत्व विरळाच! त्यामुळेच दीड वर्षांपूर्वी जेव्हा त्यांच्या नेतृत्वाखाली अभूतपूर्व असा उठाव झाला, तेव्हा अवघा शिवसैनिक त्यांच्या बाजूने एकवटल्याचे महाराष्ट्राने, देशाने आणि जगानेही पाहिले.

शिंदे साहेबांनी दूरदृष्टीने राज्याच्या मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, नगरविकास अशा महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी त्यांनी कार्यक्षमपणे सांभाळली. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गासारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प शिंदे साहेबांच्या अथक प्रयत्नांमुळे आकारास आला. हा महामार्ग आज महाराष्ट्राच्या विकासाची भाग्यरेखा म्हणून ओळखला जातो आहे.

महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेतील एकनाथजी शिंदे साहेब असे एकमेव मुख्यमंत्री आहेत, जे सुरक्षा आणि शिष्टाचार न बाळगता सर्वसामान्यांना भेटतात. त्यांच्याशी संवाद साधतात. आज राज्यातील प्रत्येकाला ते आपला मुख्यमंत्री वाटतात. आपण जनसामान्यांचे मुख्यमंत्री आहोत, ही भावना बाळगून ते सर्वांना भेटत असतात. वैद्यकीय साहाय्यासाठी त्यांच्याकडे दररोज अक्षरशः रीघ लागते. प्रत्येकाला आपापल्या परीने ते नेहमीच मदत करतात. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून त्यांनी राज्याच्या आरोग्य चळवळीत उभ्या केलेल्या कामातून अनेक कुटुंबांना दिलासा मिळाला आहे.

सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आल्यामुळे त्यांना तळागाळातील परिस्थितीची पुरेपूर जाणीव आहे. कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर आर्थिक अनुदान देणे असो किंवा दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, पूर, गारपीट अशा प्रत्येक नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याची भूमिका शिंदे साहेबांनी घेतली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दीड वर्षांत विविध योजनांच्या माध्यमातून बळीराजाला तब्बल ४४ हजार २७८ कोटी रुपयांची मदत राज्य शासनाकडून करण्यात आली आहे. ही आतापर्यंतची विक्रमी मदत आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमध्ये ४४ लाख शेतकऱ्यांना १८ हजार ६७२ कोटी इतका कर्जमाफीचा लाभ देण्यात आला. कृषी विकास होऊन आपल्या शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडावे, यासाठी शिंदे साहेब नेहमीच प्रयत्नशील असतात. शेतीबरोबरच उद्योग क्षेत्राकडेही त्यांचे तितकेच लक्ष असते. अलीकडेच दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेदरम्यान शिंदे साहेबांच्या उपस्थितीत राज्याने ३ लाख ५३ हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले. महाराष्ट्राच्या दृष्टीने हा शिंदे साहेबांचा दावोस दौरा महत्त्वाचा ठरला आहे. या गुंतवणुकीच्या माध्यमातून २ लाख रोजगार निर्मिती होणार आहे.

राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान असलेले शिंदे साहेब हे सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आहेत, याचा आम्हास अभिमान आहे. सातारा जिल्ह्यातील विकासकामांकडे त्यांचे बारकाईने लक्ष असते. सातारा जिल्ह्यातील डोंगरी तालुक्यांचा विकास व्हावा, जिल्ह्यात पर्यटन वाढ व्हावी, यासाठी ते आग्रही असतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याचे पालकमंत्री पद सांभाळत असताना सातारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने अनेक प्रश्न तातडीने मार्गी लागतात, याचे समाधान आहे. सामान्यातल्या सामान्य लोकांना ओळखणारा, त्यांच्या कष्टाची, मनाची, चिंतांची जाण राखणारा मुख्यमंत्री त्यांच्या रूपाने महाराष्ट्राला लाभला आहे. छत्रपती शिवरायांचा आदर्श उराशी बाळगून वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने सामाजिक बांधिलकीने राजकारण-समाजकारण करणाऱ्या आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसानिमित्त पुनश्च मन:पूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो. त्यांना उत्तम आयुरारोग्य लाभो आणि राज्याची, येथील जनतेची सेवा त्यांच्या हातून अखंड घडत राहो, अशी सदिच्छा व्यक्त करतो.

0000

विशेष लेख

 मा.मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त लेख

 

*मंत्री अतुल सावे*

 

संवेदनशील मनाचा नेता 

     राज्याच्या विकासाबाबत दूरदृष्टी, तत्पर निर्णयक्षमता, बदलत्या काळानुसार धोरण राबविणारा संवेदनशील नेता राज्याच्या सर्वोच्च स्थानी बसल्यास राज्याचा चेहरामोहरा बदलण्यास वेळ लागत नाही. राजकारणात सामान्य लोकांना आपला वाटेल असा राजकारणी सापडणे दुरापास्त. सामान्यातील सामान्य माणूस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद साधू शकतो. त्या संवाद साधणाऱ्या प्रत्येकाला हा माणूस आपलाच आहे, अस वाटत हे खरे मुख्यमंत्र्यांचे मोठेपण आहे. सामान्य शेतकरी कुटुंबातून पुढे आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना परिस्थितीची पुरेपूर जाणीव आहे. विशेषत: सामान्य नागरिकांबद्दल आणि त्यांच्या कामांबद्दल ते स्वतः लक्ष घालून तळमळीने सगळी कामे करून घेतात. सामान्य नागरिकाला समोर ठेवूनच राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्धतेने आमचे सरकार काम करीत आहे.   

      मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गृहनिर्माण व इतर मागास बहुजन कल्याण विभागात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी परदेशातील उच्च शिक्षणाच्या शिष्यवृत्ती विद्यार्थी संख्या 10 वरून 75 इतकी वाढ करण्यात आली आहे. उच्चशिक्षण घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू करण्यात आली आहे. इतर मागास व विशेष मागास प्रवर्गासाठी मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत तीन वर्षात दहा लाख घरे बांधण्यासाठी 12 हजार कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. राज्यातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागासवर्ग या प्रवर्गातील मॅट्रिकोत्तर व्यावसायिक शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी 100 विद्यार्थी क्षमतेचे मुलांसाठी एक व मुलींसाठी एक याप्रमाणे 36 जिल्ह्यांच्या ठिकाणी 72 शासकीय वसतिगृहे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याच्या इतिहासात ओबीसी विभागासाठी सर्वोच्य अशी 8252 कोटी रुपयांची विक्रमी तरतुद केली आहे.

        म्हाडाच्या  56 वसाहतीतील सहकारी गृहनिर्माण संस्थांकडील सन १९९८ ते २०१८ या कालावधीतील वाढीव सेवा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.यामुळे तब्बल 384 कोटींचा वाढीव सेवा शुल्क माफ होणार असून या निर्णयामुळे मुंबईतील लाखो रहिवाशांना दिलासा मिळाला आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणांतर्गत (एसआरए) पुनर्वसन करण्यात आलेली घरे यापुढे पाच वर्षांनी विकता येणार आहेत.राज्यातील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणांतर्गत पुनर्वसन करण्यात येणारी घरे यापूर्वी १० वर्षांनंतर विकता येण्याचा नियम होता. हा नियम बदलून ५ वर्ष करण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील रे नगर, कुंभारी येथील असंघटित क्षेत्रातील लाभार्थ्यांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ३० हजार घरकुलाचा प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील १५,०२४ घरांचे लोकार्पण दि.१९ जानेवारी २०२४ रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. हा गृह प्रकल्प देशातील सर्वात मोठा गृहप्रकल्प असून असंघटित क्षेत्रातील 30 हजार कामगारांच्या घरकुलाच स्वप्न यामुळे साकार झाले आहे. राज्यात मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मा.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी यापुढेही अशीच निर्णयाची वाटचाल असणार आहे. एक समृद्ध महाराष्ट्र घडवायचा आहे. 

 

     राज्याच्या हिताचे धडाकेबाज निर्णय आणि कृतीतून कायमच सर्वाच्या आदरस्थानी असलेले लाडके मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब यांचा आज वाढदिवस...। त्यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा...!

 

    ****

विशेष लेख

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संवदेनशील मनाचे कृतीवंत व्यक्त‍िमत्व

-   आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत

राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे.. अत्यंत कर्तबगार.. संवेदनशील मनाने भरलेले व्यक्तीमत्व. कुठलाही मुख्यमंत्री पदाचा बडेजाव न करता.. एक सामान्य कार्यकर्ता. त्यांच्यातील कार्यकर्ता इरशाळवाडी दुर्घटनेच्या वेळी महाराष्ट्राने पाहिला. असे हे महाराष्ट्रातील साडेबारा कोटी जनतेच्या सेवेत समर्पित असलेले व्यक्तीमत्व.. या कृतीवंत नेत्याचा आज वाढदिवस. त्यांना जनतेची सेवा करण्यासाठी तुळजा भवानी भरभरून आयुष्य देवो.. त्यांना सुदृढ, निरोगी शरीर लाभो .. अशी प्रार्थना मी त्यांच्या वाढदिवसा दिवशी व्यक्त करतो.

मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या संवेदनशील मनाचे मला नेहमी दर्शन घडले आहे. जनतेच्या सेवेप्रती कटीबद्ध असलेल्या या नेत्याने मला ईश्वरीय सेवा करण्याचे खाते दिले. रूग्ण कल्याण व त्यांची सेवा करण्याचे काम माझ्या हातून घडत आहे. ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळेच.. खात्याचा कारभार बघत असताना वेळोवेळी मला त्यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले. कुठेही अडचण आली, तर त्यांच्याकडून ती चुटकीसरशी सोडविल्या जाते, याचा प्रत्यय मला बऱ्याच वेळा आला. जनतेच्या आरोग्याप्रती एखादा निर्णय घेणे आवश्यक असल्याचे लक्षात आले, तेव्हा मला त्यांच्याकडून पाठींबा मिळतो. ‘बिनधास्त काम करा.. मी आहे.’ हे त्यांचे शब्द ऐकले की.. काम करण्याची नवीन ऊर्मी येते.

आरोग्य खात्याच्या माध्यमातून मला रूग्णसेवा करण्याची संधी मिळाली आहे. राज्यातील सर्व नागरिकांना विभागांतर्गत असलेल्या सर्व शासकीय रूग्णालयांमध्ये उपचार विनाशुल्क करण्याचा ऐतिहासिक निर्णय आपण घेतला. गरीबांसाठी संजीवनी ठरलेली महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा विस्तार  करण्यात आला. योजनेचे दीड लाखाचे विमा कवच पाच लाख रूपयापर्यंत वाढविण्यात  येत आहे. त्यामुळे पाच लाख रूपयापर्यंतचे उपचार राज्यातील रूग्णांना मिळणार आहे. एवढेच नव्हे, तर या योजनेच्या पॅनलमध्येही रूग्णालयांची संख्या वाढविण्यात  येत आहे.  किडनी, कर्करोग, हृदयरोग अशा दुर्धर आजारांनी बाधीत असणाऱ्या रूग्णांना या योजनेतून उपचाराचा लाभ मिळत आहे. त्यामुळे मृत्यूच्या दाढेतूनही बरेच रूग्ण परत येत आहे.  हे ईश्वरीय कार्यच आहे, हे कार्य माझ्या हातून मुख्यमंत्री शिंदे साहेबांमुळे घडत आहे.

आजार होण्यापूर्वीच निदान झाले पाहिजे, त्यासाठी आरोग्य विभागाने उपाय योजना केल्या पाहिजे, असा नेहमीच त्यांचा अट्टाहास असतो. आजार झाल्यावर उपचार केल्यापेक्षा आजार न होण्यासाठी काळजी घेणे,  आरोग्य सांभाळणे महत्वाचे आहे.  त्यामुळे  आरोग्य खात्याच्या माध्यमातून समाजातील सर्व वयोगटातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय आपण घेतला. सर्वात आधी  घरातील महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यासाठी ‘माता सुरक्षित, तर घर सुरक्षित’ अभियान राबविण्यात आले. यामध्ये राज्यभरातील जवळपास 4 कोटी 39 लाख महिलांची संपूर्ण आरोग्य तपासणी करून गरजेनुसार आवश्यक असलेल्या महिलांवर उपचार करण्यात आले आहेत.

महिलांच्या तपासणीनंतर लहानापासून ते किशोरवयीन मुलांपर्यंत आरोग्य तपासणी ‘जागरूक पालक.. सुदृढ बालक..’ अभियान राबविण्यात आले. या अभियानाच्या माध्यमातून 0 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. भविष्यात होऊ शकणाऱ्या आजारांचा शोध घेवून आवश्यक उपचारही करण्यात आले. या दोन्ही अभियानातून समाजातील मोठ्या वर्गाची आरोग्य तपासणी पूर्ण झाली.

मात्र अजूनही कुटूंबाचा आधारस्तंभ असलेल्या समाजातील महत्वाच्या घटकाची आरोग्य तपासणी राहली असल्याची खंत होतीच.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ‘आजार होण्यापेक्षा न होण्यासाठी काळजी करणारा’ संवेदनशीलपणा आठवला.. आणि 18 वर्षावरील पुरूषांच्या आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘निरोगी आरोग्य तरूणाईचे.. वैभव महाराष्ट्राचे’ अभियान सुरू करण्यात आले. या अभियानातून पुरूषांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. राज्यातील सर्व वयोगटातील नागरिकांची आरोग्य तपासणी पूर्ण झाल्यानंतर खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आजार होण्यापूर्वीच निदान करण्यासाठी काम करण्याचे दिलेले निर्देश प्रत्यक्षात आल्याचे समाधान मिळेल.

मा. मुख्यमंत्री यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे भविष्यातही विभगाच्या माध्यमातून मोठे निर्णय घेण्याचे धाडस करणार आहे. कर्करोगाचे निदान लवकर होण्यासाठी कॅन्सर व्हॅन, कर्करोगावर केमोथेरपी उपचार मिळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात डे केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे. जनतेच्या  मुख्यमंत्री शिंदे साहेबांचे काम म्हणजे.. जे मनात ते कर्तृत्वात.. त्यामुळे त्यांनी जे ठाणलं.. ते प्रत्यक्षात येणारच. ही त्यांची टॅगलाईनच बनली आहे. अशा या मोठ्या मनाच्या.. जनतेच्या सेवेप्रती समर्पित असणाऱ्या करारी व्यक्तीमत्वाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा देतो. त्यांच्याकडून असेच जनतेची सेवा घडत राहण्यासाठी निरोगी, सुदृढ आरोग्य त्यांना लाभो, ही प्रार्थना व्यक्त करतो..

0000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...