Thursday, September 7, 2023

उकिरडा मुक्त गाव मोहीमेअंतर्गत शेतकरी गटासाठी गांडुळ कल्चर युनिट

                                                          उकिरडा मुक्त गाव मोहीमेअंतर्गत

 शेतकरी गटासाठी गांडुळ कल्चर युनिट

 

नांदेड, (जिमाका) दि. 7 :-  कृषि विभागामार्फत जिल्ह्यामध्ये उकिरडा मुक्त गाव मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत आत्मा अंतर्गत नोंदणीकृत शेतकरी गटामधील शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी 75 टक्के अनुदानावर 199 गांडूळ कल्चर युनिटचे लक्षांक प्राप्त झाले आहे. या योजनेचा शेतकरी गटांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.

 

प्रती गांडुळ कल्चर युनिटला जास्तीत जास्त 75 हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. जिल्ह्यात पुढील प्रमाणे तालुकानिहाय लक्षांक प्राप्त झाले आहे. मुदखेड 45, लोहा 9, देगलूर 18, बिलोली 30, धर्माबाद 34, किनवट 04, हिमायतनगर 28, भोकर - 21 व उमरी 10 याप्रमाणे आहे.  या योजनेच्या अधिक माहितीसाठी संबंधित तालुक्याच्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असेही कृषि विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

0000

मराठवाडा मुक्ती दिनाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी घेतला आढावा

 मराठवाडा मुक्ती दिनाच्या यशस्वी आयोजनासाठी

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी घेतला आढावा

 

नांदेड, (जिमाका) दि. 7 :-  मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवानिमित्त आयोजित उपक्रमात युवकांचा अधिकाधिक सहभाग व्हावा यावर प्राधान्याने भर देणे आवश्यक आहे. हा महोत्सव साजरा करताना सर्व विभागानी आपआपली जबाबदारी ओळखून कार्यक्रमाचे सुयोग्य असे नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी संबंधित विभागाना दिले.

 

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपजिल्हाधिकारी सामान्य संदीप कुलकर्णी, मनपाचे उपायुक्त निलेश सुंकेवार व संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती.

 

मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवानिमित्त प्रत्येक विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती 14 सप्टेंबर पूर्वी विभागप्रमुखांनी जिल्हा प्रशासनास सादर करावी. याचबरोबर 17 सप्टेंबर रोजी होणाऱ्या मुख्य शासकीय ध्वजारोहन समारंभासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने योग्य ते खबरदारी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत त्यांनी दिले. जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना विविध उपक्रमाचे आयोजन करण्याबाबतीही यावेळी सांगण्यात आले. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाने योग्य तो समन्वय ठेवून मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृत महोत्सव चांगल्या प्रकारे साजरा व्हावा यादृष्टीने कार्यवाही करावी, असेही जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले.  

 

 

महानगरपालिकेने शहरातील स्वच्छता व सुशोभीकरण कामावर भर द्यावा. तसेच नाना-नानी पार्क, माता गुजरीजी विसावा उद्यानाची स्वच्छता याकडे विशेष लक्ष द्यावे, असेही जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले. तसेच मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील शासकीय कार्यालयानी कार्यालयाची स्वच्छता व सुशोभीकरण करण्यावर भर द्यावा. तसेच मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रम व त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते होणाऱ्या कार्यक्रमाचे योग्य ते नियोजन करावे, असेही त्यांनी सर्व विभागाना सूचना केल्या.   

00000

 

गोवर्गीय पशुधनाचे खरेदी विक्री बाजार राहणार बंद

 गोवर्गीय पशुधनाचे खरेदी विक्री बाजार राहणार बंद

 

नांदेड, (जिमाका) दि. 7 :-प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, 2009 नुसार नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील गोवर्गीय  पशुधनाचे खरेदी विक्रीसाठीचे बाजार पुढील आदेश होईपर्यत बंद ठेवण्याचे आदेश, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमित केले आहेत.

 

तसेच या सांसर्गिक रोगाची लागण म्हैसवर्ग, शेळी व मेंढयामध्ये होत नसल्याने त्यांचे खरेदी विक्रीचे बाजार नेहमीप्रमाणे सुरू राहतील. जिल्ह्यातील एकूण 16 तालुक्यातील 197 ईपी सेंटरमध्ये गोवर्गीय पशुधन लंपी चर्मरोग या सांसर्गिक रोगाने मोठया प्रमाणात बाधित झाल्याचे आढळून आले आहे. तसेच या रोगाचा प्रसार जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी नांदेड जिल्ह्यात नजीकच्या आंतरराज्य सीमेवरील राज्यामधून होणाऱ्या वाहतुकीमुळे जिल्ह्यात इतर ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गोवर्गीय पशुधनाचे बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने दिले आहेत.

0000

Wednesday, September 6, 2023

विशेष लेख मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या माध्यमातून नव उद्योजिकेची भरारी !

 विशेष लेख                                                                                                   दि. 6 सप्टेंबर, 2023

 

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या माध्यमातून नव उद्योजिकेची भरारी !

राज्याच्या विकासाला चालना मिळावी यासाठी राज्य शासनाच्यावतीने अनेक लोककल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. यात प्रामुख्याने स्वयंरोजगाराच्या निर्मितीसाठी युवकांना व्यापक संधी निर्माण करुन देण्यासाठी भर देण्यात येत आहे. राज्यातील सुक्षिशित बेरोजगार युवक-युवतींना रोजगार उपलब्ध व्हावा व उद्योग उभारणीतून ते स्वावलंबी व्हावेत यासाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने मागील एक वर्षाच्या कालावधीत विविध लोक कल्याणकारी निर्णय घेण्यात आले आहेत. शासनाच्यावतीने ‘सर्वाना रोजगार’ यामध्ये राज्यात 75 हजार पदांसाठी भरती वेगाने सुरु आहे. तसेच शासन सेवेत पदभरतीसाठी टीसीएस, आयबीपीएसमार्फत परीक्षा, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून 12 हजाराहून अधिक उद्योजकांना कर्ज मंजूर, एक लाखाहून अधिक युवकांच्या हातांना काम, आता असंघटित कामगारांसाठी स्वतंत्र महामंडळ, करोडो कामगारांना दिलासा असे अनेक विविध निर्णय घेवून सर्वांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच या सर्व योजनांचा लाभ तळागाळातील प्रत्यक्ष गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहचावा या उद्देशाने राज्यात ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून शासन सर्वसामान्याच्या दारी पोहोचले आहे. नांदेड येथे या उपक्रमाचे आयोजन 25 जून रोजी करण्यात आले होते. या उपक्रमाच्या माध्यमातून विविध विभागाच्या योजनाचा लाभ पात्र लाभार्थ्यांना देण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रत्यक्षात शासन सामान्य जनतेच्या दारी पोहोचल्याची अनुभुती सर्वाना आली.

 

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त युवक-युवतींना रोजगार उपलब्ध होवून ते आत्मनिर्भर व्हावेत. त्यांचे स्वयंरोजगार प्रकल्प शासनाच्या आर्थिक सहाय्यातून उभारणीसाठी  आर्थिक पाठबळ मिळावे यासाठी महाराष्ट्र शासनाची  मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना अत्यंत लाभदायक आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यात 12 हजारांहून अधिक उद्योजकांना कर्ज मंजूर करण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यातही या योजनेच्या माध्यमातून अनेक नव उद्योजकांनी उद्योग उभारणी वर भर दिला आहे. 

 

याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे मे. रुद्र क्रीयेशन, नांदेड (गृह सजावटीचे उत्पादने)औद्योगिक वसाहत, शिवाजीनगर नांदेड येथील यशस्वी नव उद्योजिका सौ. सुलभा अजय रुद्रावार. सौ. रुद्रावार या मागील दोन वर्षापासून गृह सुशोभीकरणाचे कार्य करीत होत्या. परंतु त्याना अपेक्षित यश मिळत नव्हते. त्यांनी हार न मानता शासनाच्या जिल्हा उद्योग केंद्रामार्फत राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेच्या मदतीने गृह सुशोभिकरणाच्या 50 लाख प्रकल्प किंमतीचा निर्मिती व्यवसाय करुन यश प्राप्त केले. हाच व्यवसाय का निवडला असे त्यांना विचारले असता त्यांनी या व्यवसायात व्यापक संधी असून आता घर सजावटीची प्रत्येकाला आवड आहे. तसेच आता प्रत्येकजण आपले घर सजविण्यास उत्सूक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या दुकानात 200 ते 250 गृहसजावटीचे दर्जेदार साहित्य विक्रीसाठी उपलब्ध आहे. या व्यवसायात सुरवातीला त्यांनी स्वत: चे पैसे गुंतवून व्यवसाय सुरु केला. सुरवातीला ग्राहक एवढे नव्हते परंतु आता चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. सौ. सुलभा रुद्रावार यांच्या क्रीयेशनमध्ये गृह सजावटीचे उत्पादन विक्रीसोबत नवीन उत्पादनाची निर्मिती करण्यात येते. यासाठी त्यांनी 13 ते 14 मशिनरी कोरियातून मागविल्या आहेत. सदर उद्योग घटक हा ग्लास इंचिग, कोरीव दरवाजे, वॉलपेपर, कॅनव्हॉस पेंटीग, वॉल पेंटीग इ. घर व कार्यालये सजविण्यासाठी सर्वाना आवडतील अशा वस्तु, हातमागाच्या हस्तकला, स्थानिक प्रसिध्द उत्पादने तयार करतात. सौ. रुद्रावार यांनी बँक ऑफ बडोदा यांच्याकडून व्यवसायासाठी कर्ज घेतले आहे. या उद्योग घटकासाठी त्यांची वार्षिक उलाढाल 75 लाख असल्याचे त्यांनी सांगितले. या यशस्वी उद्योजिकेने आपल्या उद्योगातून इतर 13 जणांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. सौ. सुलभा रुद्रावार यांनी उद्योग उभारणी यशाचे श्रेय मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेस देवून महाराष्ट्र शासनाचे आभार मानले आहेत.


अलका पाटील

उपसंपादक, 

जिल्हा माहिती कार्यालय,

नांदेड

00000  

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत आता प्रति कुटूंबास मिळणार 5 लाखांपर्यंत आरोग्य संरक्षण

 महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत

आता प्रति कुटूंबास मिळणार 5 लाखांपर्यंत आरोग्य संरक्षण

 

सर्वसामान्य माणसांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी शासनाने सर्वसामान्य माणसाच्या हिताचे अनेक धाडसी निर्णय मागील एक वर्षाच्या कालावधीत घेतले आहेत. पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी करण्याचा निर्णय असो,  एसटीमधून प्रवास करणाऱ्या महिलांना प्रवास तिकीट दरात 50 टक्के सवलत, पर्यटनाचा, ई फाईलिंगचा निर्णय असो की अन्य कोणताही,  शासनाने 75 हजार युवक-युवतींना शासकीय नोकऱ्या देण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. विविध कंपन्यांसमवेत चर्चा आणि समन्वय करून आपल्या तरूणांच्या हाताला रोजगार देण्याचे काम कौशल्य विकास विभाग करत असून आतापर्यंत दीड दोन लाख लोकांना रोजगार देण्यात आला आहे.

 

शासनाच्या या लोक कल्याणकारी योजनाचा लाभ सामान्य तळागाळातील पात्र व गरजू लाभार्थ्यांपर्यत पोहोचविण्यासाठी  ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाचे आयोजन राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात करण्यात येत आहे.  नांदेड येथेही या उपक्रमाचे आयोजन 25 जून रोजी भव्य प्रमाणात करण्यात आले होते. या उपक्रमात जिल्ह्यातील अनेक दुर्गम भागातील लाभार्थ्यांना एकाच ठिकाणी, एकाच छताखाली योजनांची माहिती व लाभ मिळाला.  या उपक्रमामुळे अनेक लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ, आरोग्याच्या सुविधा, रोजगाराच्या संधी, विविध आवश्यक प्रमाणपत्राचे वितरण, कृषी विभागाच्या योजनांचा लाभ, महिला व बाल विकास विभागाच्या योजनाचा लाभ, सामाजिक न्याय विभागाच्या योजनाचा लाभांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमात शासनाच्या योजनाचा लाभ मिळालेल्या  लाभार्थ्यांनी शासनाप्रती समाधान व्यक्त केले.  

 

आता राज्य शासनाने सर्व नागरिकांसाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेवून प्रत्येक कुटूंबास 5 लाखांपर्यतचे आरोग्य संरक्षण उपलब्ध करुन दिले आहे. यामुळे नागरिकांना याचा खूप फायदा होणार असून या योजनेच्या माध्यमातून दैनंदिन आयुष्यात सामान्य नागरिकांना विविध आजारावर उपचार करताना आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही. या निर्णयामुळे नागरिकांना आता अनेक गंभीर आजारावर मोफत उपचार घेण्यास मदत होईल. शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील सर्व नागरिकांना आता प्रति कुटूंब 5 लाखांपर्यत आरोग्य संरक्षण मिळणार आहे.

 

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या एकत्रित योजनेत बदल व योजनेचे विस्तारीकरण करण्यात आले आहे. याबाबत 28 जुलै 2023 रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे. या शासन निर्णयानुसार महात्मा फुले जन आरोग्य योजनेत बदल करुन 1 लाख 50 हजार ऐवजी रुपयाऐवजी आता प्रति कुटूंबास 5 लाखांपर्यचे विमा संरक्षण मिळणार आहे. ही योजना राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक कुटूंब व अधिवास प्रमाणपत्रधारक कुटूंबाना लागू करण्यात आली आहे.

 

महात्मा फुले जन आरोग्य योजनेत सध्या मुत्रपिंड शस्त्रक्रियेसाठी उपचार खर्च मर्यादा प्रति रुग्ण 2 लाख 50 हजार रुपयावरून ती आता 4 लाख 50 हजार रूपये एवढी करण्यात आली आहे. सध्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत 996 व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये 1209 उपचार आहेत. यापैकी मागणी नसलेले 181 उपचार वगळण्यात आले असून 328 मागणी असलेल्या नवीन उपचारांचा समावेश करण्यात आला आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत एकूण उपचार संख्येत 147 ने वाढ होवून उपचार संख्या 1 हजार 356 एवढी करण्यात आली आहे. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत उपचार संख्या 360 ने वाढविण्यात येत आहे. 1356 उपचारापैकी 119 उपचार केवळ शासकीय रुग्णालयांसाठी राखीव ठेवले आहेत.

 

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान प्रधानमंत्री जन आरोग्य योजनला या एकत्रित योजनेत अंगीकृत रुग्णालयाची संख्या 1 हजार एवढी आहे. ही योजना याआधीच महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात लागू करुन सीमा लगतच्या महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यात 140 व सीमेलगतच्या कर्नाटक राज्यातील 4 जिल्ह्यात 10 अतिरिक्त रुग्णालय अंगीकृत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या व्यतिरिक्त 200 रुग्णालये अंगीकृत करण्यास मान्यता देण्यात दिली आहे. आता अंगीकृत रुग्णालयाची संख्या 1 हजार 350 होईल. याशिवाय सर्व शासकीय रुग्णालये या योजनेत अंगीकृत करण्यात आले आहेत.

 

स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेच्या तरतुदीमध्ये सुधारणा करुन रस्ते अपघातासाठी उपचारांची संख्या 74 वरुन 184 अशी वाढविण्यात आली आहे. यात उपचाराची खर्च मर्यादा 30 हजारावरुन प्रति रुग्ण प्रति अपघात 1 लक्ष रुपये एवढी करण्यात आली आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजना 2 जुलै 2012 पासून राज्यात राबविण्यात येत आहे, तर आयुष्यमान भारत  प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही केंद्र शासनाची आरोग्य विमा योजना 23 सप्टेंबर 2018 पासून राज्यात लागू करण्यात आली. 26 फेब्रुवारी 2019 च्या शासन निर्णयान्वये आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेशी सांगड घालून दोन्ही योजना राज्यात एकत्रितपणे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सुधारित योजनेची 1 एप्रिल 2020 पासून राज्यात अंमलबजावणी करण्यात आली आहे. या योजनेमुळे अनेक  कुटूंबाना   दिलासा मिळणार असून नागरिकांना आता 5 लाखापर्यंत प्रतिवर्ष आरोग्य संरक्षण मिळणार आहे.   

 

अलका पाटील

उपसंपादक, 

जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड

0000

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 6 ते 17 सप्टेंबर या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन

 मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन अमृत महोत्सवी वर्षानिमित्त

6 ते 17 सप्टेंबर या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन

 

नांदेड, (जिमाका) दि. 6 :- सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाच्यावतीने मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 6 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर 2023 या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

 

सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या अधिनस्त कार्यरत 16 मुला-मुलीचे मागासवर्गीय शासकीय वसतिगृह  व 4 अनु.जाती शासकीय निवासी शाळेमध्ये चित्रकला, निबंध, वक्तृत्व स्पर्धा व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन, 7 सप्टेंबर रोजी वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत मंजूर कामांना भेटी देण्यात येणार आहेत, 8 सप्टेंबर रोजी नांदेड जिल्ह्यातील अनु. जाती व नवबौध्द घटकांच्या व मातंग  समाजाच्या वस्त्यांना भेटी देणे व त्यांना सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती देण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. 9 सप्टेंबर रोजी रमाई आवास योजनेतून घरकूल मंजूर करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना भेटी देणे व मनोगत घेणे कार्यक्रमाचे आयोजन. 10 सप्टेंबर रोजी समान संधी केंद्रामार्फत नशामुक्त भारत अभियान अंतर्गत व्यसनमुक्त व शिष्यवृत्ती योजनांच्या माहिती संदर्भात विशेष अभियान राबविणे. 11 सप्टेंबर रोजी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांमध्ये स्वच्छता अभियान कार्यक्रमाचे आयोजन. 12 सप्टेंबर रोजी तृतीय पंथी व्यक्तीना ओळखपत्र वाटप, जात वैधता प्रमाणपत्रे वाटप, ऊसतोड कामगारांना ओळखपत्र वाटप कार्यक्रम. 13 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल. 14 सप्टेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत मंजूर कामांना भेटी देणे. 15 सप्टेंबर रोजी शासकीय वसतिगृह व निवासी शाळेतील विद्यार्थ्यांशी सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन. 16 सप्टेंबर रोजी ज्येष्ठ नागरीकांचे आरोग्य तपासणी शिबिर व रक्तदान शिबिर व जेष्ठ नागरीकांचा सत्कार कार्यक्रम व  17 सप्टेंबर रोजी  मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मुख्य कार्यक्रम व पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे, असे समाज कल्याण कार्यालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

विशेष लेख बचतगटाच्या माध्यमातून भोकर येथील महिलांनी घेतली भरारी !

 विशेष लेख                                                                                                      दि. 5 सप्टेंबर 2023

 

बचतगटाच्या माध्यमातून भोकर येथील महिलांनी घेतली भरारी !

शासनाच्यावतीने प्रत्येक घटकासाठी विविध योजना राबविण्यावर भर देण्यात येत आहे. शायकीय योजना गरजू लाभार्थ्यांपर्यत पोहोचविण्यासाठी विविध उपक्रमाचे आयोजन केले जात आहे. सध्या राज्यात ‘शासन आपल्या दारी’ हा अभिनव उपक्रम अत्यंत प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. नांदेड येथे ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाचे आयोजन 25 जून रोजी करण्यात आले होते. या उपक्रमाच्या माध्यमातून एकाच ठिकाणी एकाच छताखाली शासनाच्या सर्व विभागामार्फत त्या-त्या विभागाशी संबंधित योजनेचा लाभ  जिल्ह्यातील असंख्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला आहे.

‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमातर्गत देण्यात आलेल्या लाभार्थ्यामध्ये जिल्ह्यातील महिला लाभार्थ्यांचाही लक्षणीय सहभाग आहे. आज घडीला महिलांनी महिला बचत गटाच्या माध्यमातून विविध यशस्वी उद्योगाची उभारणी  केल्याचे आपण पाहत आहोत. उद्योग वाढीपासून ते बाजारपेठ मिळविण्यापर्यत महिला अग्रेसर राहील्या आहेत. यात शासनाच्या सर्व विभागाकडून उद्योग उभारणीसाठी योजनांच्या माध्यमातून महिलांना प्रोत्साहन देण्यात येत आहे.

अशाच प्रकारे भोकर येथील महात्मा फुले नगर मधील दिक्षाभुमी स्वयंसहाय्यता महिला बचत गटाच्या महिलांनी  दिनदयाळ अंत्योदय योजना अंतर्गत तेलाच्या घाण्याचा उद्योग उभारला आहे. तेलघाणा उद्योग उभारणीसाठी सुरुवातीला महिलांनी कर्जाचा प्रस्ताव तयार करुन बॅक ऑफ बडोदा शाखेमार्फत प्रथम कर्ज स्वरुपात 1 लक्ष रुपये कर्ज घेतले. त्या एक लाखांची परतफेड चांगल्या स्वरुपात केल्यामुळे त्यांना बँकेमार्फत द्वितीय कर्ज 3 लक्ष रुपये प्राप्त झाले. तसेच सुक्ष्म लघु अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत 4 लक्ष रुपये कर्ज प्राप्त झाले.

दिक्षाभुमी स्वयंसहाय्यता महिला बचत गटातील महिला मेहनती असून त्यांना काहीतरी नविन करण्याची इच्छा होती. महिलांची इच्छा लक्षात घेवून भोकर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांनी मानव विकास कार्यक्रम विशेष योजनेअंतर्गत दिक्षाभुमी स्वयंसहाय्यता महिला बचत गटाच्या महिलांना लाकडी तेल घाणा या उद्योगासाठी 90 टक्के अनुदान स्वरुपात 5 लक्ष निधी उपलब्ध  करुन दिला. यातून महिलांनी भोकर नगर परिषद दिनदयाळ अंत्योदय राष्ट्रीय नागरी उपजिवीका पहिला लाकडी घाण्याचा उद्योग उभारला. या उद्योगांच्या माध्यमातून महिलांनी उद्योग क्षेत्रात प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकले आहे. दिक्षाभुमी स्वयंसहाय्यता महिला बचत गटामुळे प्रत्येक महिला सदस्यांना काम मिळून त्यांच्या उत्पनात भर पडली असे त्यांनी सांगितले. तसेच बचत गटातील महिलांच्या कुटूंबाला आर्थिक हातभार मिळाला याबाबत या सर्वजणीनी समाधान व्यक्त केले आहे. जिल्ह्यात अशा अनेक महिला बचत गटांनी विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून यशस्वी उद्योगांची उभारणी केली आहे.

अलका पाटील

उपसंपादक, 

जिल्हा माहिती कार्यालय,

नांदेड

00000

 

वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...