Wednesday, September 6, 2023

विशेष लेख मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या माध्यमातून नव उद्योजिकेची भरारी !

 विशेष लेख                                                                                                   दि. 6 सप्टेंबर, 2023

 

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या माध्यमातून नव उद्योजिकेची भरारी !

राज्याच्या विकासाला चालना मिळावी यासाठी राज्य शासनाच्यावतीने अनेक लोककल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. यात प्रामुख्याने स्वयंरोजगाराच्या निर्मितीसाठी युवकांना व्यापक संधी निर्माण करुन देण्यासाठी भर देण्यात येत आहे. राज्यातील सुक्षिशित बेरोजगार युवक-युवतींना रोजगार उपलब्ध व्हावा व उद्योग उभारणीतून ते स्वावलंबी व्हावेत यासाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने मागील एक वर्षाच्या कालावधीत विविध लोक कल्याणकारी निर्णय घेण्यात आले आहेत. शासनाच्यावतीने सर्वाना रोजगार यामध्ये राज्यात 75 हजार पदांसाठी भरती वेगाने सुरु आहे. तसेच शासन सेवेत पदभरतीसाठी टीसीएस, आयबीपीएसमार्फत परीक्षा, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून 12 हजाराहून अधिक उद्योजकांना कर्ज मंजूर, एक लाखाहून अधिक युवकांच्या हातांना काम, आता असंघटित कामगारांसाठी स्वतंत्र महामंडळ, करोडो कामगारांना दिलासा असे अनेक विविध निर्णय घेवून सर्वांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच या सर्व योजनांचा लाभ तळागाळातील प्रत्यक्ष गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहचावा या उद्देशाने राज्यात शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून शासन सर्वसामान्याच्या दारी पोहोचले आहे. नांदेड येथे या उपक्रमाचे आयोजन 25 जून रोजी करण्यात आले होते. या उपक्रमाच्या माध्यमातून विविध विभागाच्या योजनाचा लाभ पात्र लाभार्थ्यांना देण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रत्यक्षात शासन सामान्य जनतेच्या दारी पोहोचल्याची अनुभुती सर्वाना आली.

 

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त युवक-युवतींना रोजगार उपलब्ध होवून ते आत्मनिर्भर व्हावेत. त्यांचे स्वयंरोजगार प्रकल्प शासनाच्या आर्थिक सहाय्यातून उभारणीसाठी  आर्थिक पाठबळ मिळावे यासाठी महाराष्ट्र शासनाची  मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना अत्यंत लाभदायक आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यात 12 हजारांहून अधिक उद्योजकांना कर्ज मंजूर करण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यातही या योजनेच्या माध्यमातून अनेक नव उद्योजकांनी उद्योग उभारणी वर भर दिला आहे. 

 

याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे मे. रुद्र क्रीयेशन, नांदेड (गृह सजावटीचे उत्पादने)औद्योगिक वसाहत, शिवाजीनगर नांदेड येथील यशस्वी नव उद्योजिका सौ. सुलभा अजय रुद्रावार. सौ. रुद्रावार या मागील दोन वर्षापासून गृह सुशोभीकरणाचे कार्य करीत होत्या. परंतु त्याना अपेक्षित यश मिळत नव्हते. त्यांनी हार न मानता शासनाच्या जिल्हा उद्योग केंद्रामार्फत राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेच्या मदतीने गृह सुशोभिकरणाच्या 50 लाख प्रकल्प किंमतीचा निर्मिती व्यवसाय करुन यश प्राप्त केले. हाच व्यवसाय का निवडला असे त्यांना विचारले असता त्यांनी या व्यवसायात व्यापक संधी असून आता घर सजावटीची प्रत्येकाला आवड आहे. तसेच आता प्रत्येकजण आपले घर सजविण्यास उत्सूक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या दुकानात 200 ते 250 गृहसजावटीचे दर्जेदार साहित्य विक्रीसाठी उपलब्ध आहे. या व्यवसायात सुरवातीला त्यांनी स्वत: चे पैसे गुंतवून व्यवसाय सुरु केला. सुरवातीला ग्राहक एवढे नव्हते परंतु आता चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. सौ. सुलभा रुद्रावार यांच्या क्रीयेशनमध्ये गृह सजावटीचे उत्पादन विक्रीसोबत नवीन उत्पादनाची निर्मिती करण्यात येते. यासाठी त्यांनी 13 ते 14 मशिनरी कोरियातून मागविल्या आहेत. सदर उद्योग घटक हा ग्लास इंचिग, कोरीव दरवाजे, वॉलपेपर, कॅनव्हॉस पेंटीग, वॉल पेंटीग इ. घर व कार्यालये सजविण्यासाठी सर्वाना आवडतील अशा वस्तु, हातमागाच्या हस्तकला, स्थानिक प्रसिध्द उत्पादने तयार करतात. सौ. रुद्रावार यांनी बँक ऑफ बडोदा यांच्याकडून व्यवसायासाठी कर्ज घेतले आहे. या उद्योग घटकासाठी त्यांची वार्षिक उलाढाल 75 लाख असल्याचे त्यांनी सांगितले. या यशस्वी उद्योजिकेने आपल्या उद्योगातून इतर 13 जणांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. सौ. सुलभा रुद्रावार यांनी उद्योग उभारणी यशाचे श्रेय मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेस देवून महाराष्ट्र शासनाचे आभार मानले आहेत.


अलका पाटील

उपसंपादक, 

जिल्हा माहिती कार्यालय,

नांदेड

00000  

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...