Friday, June 16, 2023

 मरणोपरांत देहदान जीवनातील सर्वश्रेष्ठ दान 

नांदेड (जिमाका) दि. 16 :- डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाअंतर्गत शरीररचना शास्त्र विभागात असलेले ओमप्रकाश रामचंद्रराव सावंत रा. आंबेकरनगर तरोडा (बु) नांदेड यांनी त्यांच्या वडीलांचा देहदान करण्याचा संकल्प केला. त्यांचे वडील कै. रामचंद्र ग्यानबाराव सावंत यांच्या मरणोपरांत त्यांचा देह 8 जून 2023 रोजी शरीररचनाशास्त्र विभागास सुपुर्द केला.

 

कै. रामचंद्र ग्यानबाराव सावंत यांनी शरीररचनाशास्त्र विभागात 11 जुलै 2012 रोजी मरणोत्तर देहदान संकल्पपत्र स्वेच्छेने सादर केले होते. मरणोपरांत आपला देह विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यास उपयोगी येण्यासाठी कै. रामचंद्र ग्यानबाराव सावंत यांची इच्छा मरणोपरांत त्यांच्या मुलांनी व कुटुंबियानी पूर्ण केली आहे. या कार्यात डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. आर. वाकोडे, शरीररचनाशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. अनुजा देशमुख, डॉ. एम. ए. रहेमान यांनी ओमप्रकाश रामचंद्रराव सावंत यांच्याशी वेळोवेळी संपर्क साधून देहदान संबधी मार्गदर्शन केले.

 

अधिष्ठाता डॉ. एस. आर. वाकोडे यांनी ओमप्रकाश रामचंद्रराव सावंत यांना 13 जून 2023 रोजी देहदान प्रमाणपत्र देऊन आभार व्यक्त केले. यावेळी शरीररचनाशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. अनुजा देशमुख, डॉ. एम. ए. रहेमान व डॉ. विशाल टेकाळे तसेच शरीरविकृतीशास्त्र विभागाचे प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. एम. ए .समीर व डॉ. सुवर्णकार उपस्थित होते. देहदान केलेल्या व्यक्तींचा आदर्श समोर ठेऊन देहदानाच्या चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन अधिष्ठाता डॉ. वाकोडे यांनी केले.

0000

 किनवट जवळील आदिवासी सावरगावने

अनुभवली शासन आपल्या दारीची प्रचिती

 

·    शासन सोबत असल्याची निर्माण झाली भावना

-  आदिवासी ग्रामस्थ सुरज कदम 

 

नांदेड (जिमाका) दि. 16 :- नांदेड जिल्ह्यातील शासन आपल्या दारी या उपक्रमानिमित्त तेलंगणाच्या काठावर असलेल्या किनवट पासून कर्नाटकच्या सीमेवर असलेल्या देगलूर तालुक्यापर्यंत अनेक महसूल मंडळातील गावे शासन आपल्या दारी उपक्रमाची अनुभुती घेत आहेत. आज किनवट तालुक्यातील जलधारा मंडळातील सावरगाव येथे हा उपक्रम पार पडला. सर्व घरे आदिवासी असलेले हे सावरगाव आज तालुक्यातील शासकीय विभागाच्या प्रतिनिधींनी गजबजून गेले. “ज्या निष्ठेने लोककल्याणकारी भूमिका घेऊन शासन शेवटच्या टोकावर असलेल्या माणसाच्या भल्यासाठी योजना राबविते त्याची खरी प्रचिती शासन आपल्या दारी योजनेतून आली” अशी प्रतिक्रिया आदिवासी बांधव सुरज कदम यांनी दिली.

 

किनवट तालुक्यात 9 मंडळे असून प्रत्येक भागात शासन आपल्या दारीचा विश्वासार्ह दुवा पोहचावा यासाठी आम्ही नियोजन केले आहे. यातील 5 मंडळाच्या ठिकाणी प्राथमिक स्तरावरील शासन आपल्या दारीचे उपक्रम पार पडले आहेत. यातून पात्र लाभार्थ्यांचीही निवड झाली आहे. या उपक्रमामुळे प्रशासनालाही एक दिशा मिळाली असून आदिवासी भागातील लाभधारकांच्या चेहऱ्यावरील समाधान हेच या अभिनव उपक्रमाचे मोठे यश असल्याची प्रतिक्रिया किनवट येथील सहाय्यक जिल्हाधिकारी नेहा भोसले यांनी दिली.

 

येथील ग्रामीण भागात पांदण रस्ते, शेतासाठी जाणारे रस्ते, जमीन विषयक फेरफार, निराधार योजना, पीएम किसान योजना याबाबत या भागातील लोकांना अधिक उत्सुकता आहे. याचबरोबर केंद्र शासनासह राज्य शासनाच्या योजना त्या-त्या लाभार्थ्यांपर्यंत पोहचाव्यात यासाठी महसूल, कृषि विभाग, पंचायत समितीमधील संबंधित कर्मचारी तत्पर झाले आहेत.

00000











शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक क्लबफुट दिवस संपन्न

नांदेड (जिमाका) दि. 16 :- डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागातर्फे 14 जून रोजी जागतिक क्लबफुट (जन्मजात वाकडे पाय असलेले व्यंग) दिनानिमित्त बाहयरुग्ण विभागात कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन अधिष्ठाता डॉ.एस.आर.वाकोडे यांच्या हस्ते झाले.

यावेळी क्लबफुट (जन्मजात वाकडे पाय असलेले व्यंग) असलेल्या 350 बालकांवर उपचार करण्यात आलेल्या बालकांना शैक्षणिक साहित्य देवून अधिष्ठाता यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. क्लबफुट आजारामध्ये जन्म:तच बाळाचे पाय वाकडे असतील तर हा एक जन्मदोष असतो. याला क्लब फुट असे देखील म्हणतात. हा दोष असल्याने बाळाचे पाय आत किंवा बाहेरच्या बाजूस वळत नाहीत. काही बाळांमध्ये ही समस्या केवळ एकाच पायात दिसते तर अनेक बाळांमध्ये ही समस्या दोन्ही पायांत दिसू शकते. जर वेळीच हा दोष दूर करण्यासाठी प्रयत्न केले गेले नाही तर मुल मोठे झाल्यावर त्याला खूप समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्याला चालताना सुध्दा समस्या सुध्दा निर्माण होऊ शकते. सर्जरीच्या सहाय्याने हा जन्मदोष दूर करता येऊ शकतो. या आजारासंबंधी समस्या व उपचाराबाबत यावेळी मार्गदर्शन केले.

सन 2014 पासून क्लब फुट असलेल्या बालकांसाठी हा कार्यक्रम अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागातर्फे राबविल्या जात आहे. आतापर्यंत शेकडो बालकांवर या कार्यक्रमांतर्गत उपचार व शस्त्रक्रिया करुन त्यांचे अपंगत्व दूर करण्यात आले आहे. या कार्यक्रमास डॉ.जी.एस. मनुरकर, वैद्यकीय अधिक्षक डॉ.अंबुलगेकर, प्राध्यापक व विभाग प्रमुख, अस्थिरोग विभाग, नियोजन अधिकारी डोळे व क्लबफुटचे प्रतिनिधी मार्टिना मॅडम, अफ्रेड व बालकांचे पालक उपस्थित होते.
00000

Thursday, June 15, 2023

धनगर समाजातील विद्यार्थ्यांनी नामांकित निवासी शाळेत

प्रवेशासाठी 30 जून पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन  

नांदेड (जिमाका) दि. 15 :-  धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षे सन 2023-24  मध्ये शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेत शिक्षण देण्याबाबत योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.  या योजनेअंतर्गत धनगर समाजातील विद्यार्थ्यांच्या शाळेत प्रवेशासाठी इच्छुक पालकांनी 30 जून 2023 पर्यत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयात परिपूर्ण अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त बापू दासरी यांनी केले आहे.

धनगर व त्यांच्या उपजाती समाजातील विद्यार्थ्यांना इयत्ता 1 ली ते 5 वी मध्ये परीपूर्ण अर्ज भरून प्रवेश द्यावा. यासाठी नामांकित शाळेचे नाव पुढीलप्रमाणे आहेत. राजश्री पब्लिक स्कूल, वसरणी, लातूर रोड नांदेड येथे 100 मान्य विद्यार्थी संख्या, शांतिनिकेतन पब्लिक स्कूल, मालेगाव ता. अर्धापूर जि. नांदेड 100 मान्य विद्यार्थी संख्या, लिटील स्टेप इंग्लिश मेडीयम स्कूल, नायगाव (खै,) जि. नांदेड 100 विद्यार्थी संख्या, शंकरराव चव्हाण इं.स्कूल, दत्तनगर, नांदेड 100 विद्यार्थी संख्या या शाळेचा समावेश आहे. या योजनेचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त बापू दासरी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

000000

 मागासवर्गीय विकास महामंडळाच्या

विविध योजनांसाठी संपर्क साधण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 15 :- राज्यातील ओबीसी प्रवर्गातील लोकांच्या आर्थिक उन्नतीसाठी स्वयंरोजगाराला चालना देण्याच्या उद्देशाने शासनाने बहुजन कल्याण विभागांतर्गत इतर मागासवर्गीयांसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत कृषी संलग्न, लघु उद्योग, सेवा उद्योग इत्यादी नवीन व्यवसाय किंवा व्यवसाय वाढीसाठी वित्त पुरवठा योजना राबविण्यात येत आहेत.

इतर मागास वर्गीय प्रवर्गातील इच्छुक व गरजू व्यक्तींनी अधिक माहितीसाठी महामंडळाच्या कार्यालयाचा दूरध्वनी 02462-220865 या क्रमांकावर किंवा www.msobcfdc.org या वेबसाईटला भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ नांदेड यांनी केले आहे.

बीज भांडवल कर्ज योजना

राष्ट्रीयकृत बँकेमार्फत बीज भांडवल कर्ज योजनेअंतर्गत कर्ज उपलब्ध करण्यात येईल. महामंडळाचा सहभाग 20 टक्के, लाभार्थी सहभाग 5 टक्के व बँकेचा सहभाग 75 टक्के राहील. महामंडळाच्या रक्कमेवर द.सा.द.शे. 6 टक्के व्याज दर असून परतफेडीचा कालावधी 5 वर्षे आहे. बँकेच्या रक्कमेवर बँक नियमानुसार व्याज दर आकारण्यात येईल.

थेट कर्ज योजना थेट कर्ज योजना

महामंडळाकडून व्यवसायानुसार महत्तम एक लक्ष रुपयापर्यंत कर्ज देण्यात येते. या योजनेत लाभार्थी सहभाग नाही. अर्जदाराचा सिबिल क्रेडिट स्कोअर किमान 500 इतका असावा. नियमित 2 हजार 85 रुपये 48 समान मासिक हप्त्यांमध्ये मुद्दल परतफेड करणाऱ्या लाभार्थीना व्याज द्यावे लागणार नाही परंतू थकीत झालेल्या हप्त्यांवर दसादशे 4 टक्के व्याजदर आकारण्यात येईल.

वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना

गरजू व कुशल व्यक्तींना व्यवसायाकरिता बँकेमार्फत वैयक्तिक कर्ज देण्यात येते. व्यवसायानुसार कर्ज रक्कम 1 ते 10 लाख रुपयापर्यंत बँकेमार्फत कर्ज देण्यात येते. कर्ज रकमेचे हप्ते नियमित भरल्यास व्याजाची रक्कम महत्तम 12 टक्क्यांच्या मर्यादित व्याज परतावा रक्कम अनुदान स्वरुपात बँक प्रामाणिकरणानुसार लाभार्थीच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. लाभार्थीने ऑनलाईन वेबपोर्टलवर उद्योग सुरु असल्याचे किमान दोन फोटो अपलोड करावे.

गट कर्ज व्याज परतावा योजना

महामंडळाच्या निकषानुसार विहित केलेल्या निकषांनुसार वार्षिक उत्पन्न मर्यादेतील उमेदवारांच्या बचतगट, भागीदारी संस्था, सहकारी संस्था, कंपनी अशा शासन प्रमाणिकरण प्राप्त संस्था बँकेतर्फे स्वयंरोजगार, उद्योग उभारणीसाठी कर्ज दिले जाईल. त्या कर्ज रक्कमेवरील व्याज परतावा हा बँक प्रमाणिकरणानुसार महामंडळकडून अदा करण्याची ही योजना आहे. 

शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना

उच्च शिक्षणासाठी राज्य, देशाअंतर्गत व आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याकरीता इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थी / विद्यार्थींनींना बँकेमार्फत उपलब्ध होणाऱ्या शैक्षणिक कर्ज रक्कमेवरील व्याजाचा परतावा करणे. अभ्यासक्रमासाठी 10 लक्ष रुपये व परदेशी अभ्यासक्रमासाठी 20 लक्ष रुपये इतके महत्तम कर्ज अदा करण्यात येईल. विद्यार्थ्यांचे वय 17 ते 30 वर्षे असावे व तो इमाव  प्रवर्गातील महाराष्ट्राचा रहिवाशी असावा, असे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ नांदेडचे जिल्हा व्यवस्थापक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.  

00000

 शासकीय कार्यालयात येताना विना हेल्मेट

दुचाकी वाहन चालविल्यास होणार कारवाई

 

नांदेड (जिमाका) दि. 15 :-

शासकीय कार्यालयात कामानिमित्त येणारे बहुतांशी नागरिक तसेच कार्यालयातील कर्मचारी / अधिकारी हे विना हेल्मेट दुचाकी वाहन चालवित असल्याचे  निदर्शनास आले आहे. वाहन चालविताना हेल्मेट वापर करणे हे रस्ता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे आहे. शासकीय कार्यालयात येताना विना हेल्मेट दुचाकी वाहन चालविल्यास मोटार वाहन कायद्यानुसार  कारवाई करण्यात येईल, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.


बहुतांशी दुचाकी वाहनांच्या अपघातांमध्ये जखमी होणारे अथवा मृत पावणारे वाहनस्वार हे हेल्मेटशिवाय प्रवास करणारे असतात.. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने हेल्मेट वापरण्यासंबंधी प्रबोधनात्मक जनजागृती व अंमलबजावणी संबंधी व्यापक मोहिम राबविण्यात येत आहे. विना हेल्मेट दुचाकी वाहन चालविताना आढळून आलेल्या नागरिक / कर्मचारी / अधिकारी यांचेवर मोटार वाहन कायद्यातर्गंत मोटार वाहन अधिनियम 1988 मधील कलम 194 डी मधील तरतुदीनुसार हेल्मेट वापरासंबंधी तरतुदींचा भंग करणाऱ्या अथवा त्यास संमती  देणाऱ्या व्यक्तीस दंडाची तरतुद आहे. शासकीय कार्यालयामध्ये कामानिमित्त येणाऱ्या  नागरिक / कर्मचारी / अधिकारी यांनी दुचाकी वाहन चालवितांना स्वत:च्या सुरक्षिततेच्या आणि मोटार वाहन कायद्यानुसार होणारी कारवाई टाळण्यासाठी हेल्मेटचा वापर करावा, असेही प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

0000

 पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या

हलक्या व जड वाहनांना पथकरातून सूट

 

नांदेड (जिमाका) दि. 15 :-आषाढी एकादशी निमित्त 3 जुलै 2023 पर्यत पंढरपूरला जाणाऱ्या व येणाऱ्या वारकऱ्यांच्या हलक्या व जड वाहनांना पथकरातून सूट देण्यात येणार आहे. यासाठी विहित नमुन्यात सवलत प्रवेशपत्र जारी करण्यात येणार आहेत. हे सवलत प्रवेशपत्र ज्या वारकऱ्यांच्या हलक्या व जड वाहनांना पाहिजे असतील त्या वाहन मालकांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयात परवाना विभागात संपर्क करावा, असे आवाहन सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

0000

वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...