Monday, June 20, 2022

नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजनेत

लाभार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 20 :- नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील 384 गावातील निवडण्यात आलेल्या शेतकऱ्यांसाठी वैयक्तीक लाभांचे घटकासाठी अर्ज करणे सुरु आहे. नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत निवडण्यात आलेल्या 384 गावातील शेतकऱ्यांनी नोंदणी करुन योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांनी केले आहे.

 

या योजनेत ठिबक सिंचन, तुषार सिंचन, फळबाग लागवड,  रेशीम उद्योग, मधुमक्षिका पालन, शेडनेट, पॉली हाऊस, बांधावर वृक्ष लागवड इत्यादी बाबींसाठी अर्ज करता येतात.  त्यासाठी 60 ते 80 टक्क्यांपर्यंत विविध घटकांसाठी अनुदान देय आहे. याशिवाय समुदाय आधारीत घटकात प्रकल्पासाठी निवड झालेल्या गावातील कोणत्याही यंत्रणेकडे नोंदणी झालेले शेतकरी / शेतकरी बचत गट / भूमिहिन व्यक्तीचे इच्छुक गट/ महिला / महिला बचत गट  व जिल्हयातील शेतकरी उत्पादक गट कंपन्या व शेतकरी उत्पादक संघ याचा लाभ घेऊ शकतात. त्यामध्ये प्रामुख्याने शेतमालावर आधारीत प्रक्रिया उद्योग, गोदा, कृषि औजारे बँक या बाबींचा लाभ घेता येईल. कारखाना यंत्रे आणि प्रक्रिया प्रकल्पासाठी आवश्यक बांधकाम खर्चाच्या 60 टक्के अनुदान देय आहे.

 

इच्छुक शेतकरी / शेतकरी बचत गट / भूमिहिन व्यक्तीचे इच्छुक गट/ महिला / महिला बचत गट  व जिल्हयातील शेतकरी उत्पादक गट कंपन्या व शेतकरी उत्पादक संघ यांनी प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

00000

 स्वातंत्र्य दिनापूर्वी ७५ शिबिराद्वारे ७ हजार ५०० दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्याचा निर्धार

- जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर
▪️१० ऑगस्ट पर्यंत सर्व तालुक्यात दिव्यांग तपासणीसाठी ७५ विशेष तपासणी शिबीराचे नियोजन
नांदेड (जिमाका) दि. २० :- जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना संगणकिय प्रणालीद्वारे ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र (युडीआयडी) देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने निर्धार व्यक्त केला आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत येत्या १५ ऑगस्ट पर्यंत ७ हजार ५०० दिव्यांग व्यक्तींना ओळखपत्र देण्यासाठी ७५ शिबीराद्वारे विशेष मोहिम हाती घेण्याचे सर्वानुमते निश्चित करण्यात आले. जिल्ह्यातील कोणताही दिव्यांग त्याच्या हक्कापासून वंचित राहू नये याची सर्व यंत्रणेने काळजी घेतली पाहिजे. त्यांच्या हक्काचा लाभ त्यांच्याच पदरी पडावा यासाठी प्रत्येक दिव्यांगांना प्रमाणपत्र आवश्यक असून यासाठी ग्रामपंचायतींनी स्वत:हून पुढाकार घ्यावा, असे आवाहन या बैठकीत डॉ. विपीन इटनकर यांनी केले.
या बैठकीस डॉ. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. पी. टी. जमदाडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संतोष शिरसीकर, डॉ. गुजराथी, शिक्षणाधिकारी सविता बिरगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव केंद्रे आदी उपस्थित होते.
सन १९९५ च्या कायदामध्ये दिव्यांगाच्या असलेल्या मर्यादा आता अधिक व्यापक करण्यात आल्या असून यात २१ दिव्यांग प्रकाराचा समावेश करण्यात आलेला आहे. केंद्र शासनाने दिनांक २८ डिसेंबर २०१६ रोजी दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ समत केला असून यात हा समावेश आहे. यात समाविष्ट असलेल्या सर्व बाबींचा विचार करून त्या-त्या दिव्यांगाबाबत तपासून प्रमाणपत्र देण्याची यंत्रणा जिल्ह्यात उपलब्ध असून याबाबतचे प्रमाणपत्र त्यांना देण्यासाठी जिल्हाभर येत्या १५ ऑगस्ट पर्यंत ७५ दिव्यांग तपासणी शिबिराचे आयोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी दिले.
जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय रुग्णालय, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, शालेय शिक्षण विभाग, जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती यांच्या समन्वयातून प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला या शिबिरात सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्नरत राहण्याच्या सूचना त्यांनी केल्या. शिबिरासाठी त्या-त्या गावातील दिव्यांगांना उपस्थित राहता यावे यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने ५ टक्के सेस निधीतून त्यांच्या जाण्या-येण्याची व्यवस्था करण्याचे जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी स्पष्ट केले. प्रत्येक आवठ्यातील बुधवार व शुक्रवार हे दोन दिवस शिबिराचे आयोजन त्या-त्या तालुक्यांमध्ये सोईच्या ठिकाणी करण्यात येईल. अंगणवाडी सेविका, शिक्षक व संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांच्या योगदानातून ही मोहिम पूर्णत्वास आणण्याचे निश्चित करण्यात आले.
00000



Saturday, June 18, 2022

लेख

दामिनी ॲप शेतकऱ्यासाठी वरदान ! 

सध्या मान्सूनचा कालावधी सुरू असून दरवर्षी मान्सून व मान्सूमपूर्व काळात आकाशात वीजेचा गडगडाट होवून विजा पडण्याचे प्रमाण जास्त असते. विज पडून मोठया प्रमाणात जीवीतहानी होवून अनेक शेतकरी, सामान्य नागरिक याला बळी पडतात. वीज पडून जीवीत हानी होवू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पृथ्वी मंत्रालय, भारत सरकार दिल्ली यांनी दामिनी ॲप तयार केले आहे. दामिनी ॲप वीज पडण्याची पूर्व सूचना देते. शेतकरी व नागरिकांनी वीज पडून होणाऱ्या धोक्यापासून वाचविण्यासाठी या ॲपचा अवश्य वापर करावा. या ॲपच्या माध्यमातून शेतकरी बांधवाना वीज पडण्यापूर्वी पंधरा मिनीट अगोदर हे वीज पडण्याचे संकेत तसेच विजांच्या गडगडाटाबरोबरच त्याचा वेग किती आहे हे सुध्दा ॲपवर कळते. दामिनी ॲपच्या माध्यमातून याचा अंदाज वर्तविला जात असून अशा परिस्थितीत लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. म्हणजे सावध राहून जीवित व वित्तहानी वेळीच टाळता येते.

 

दामिनी ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सर्व नागरिकांना तसेच शासकीय यंत्रणा, शासकीय अधिकारी, कर्मचारी, गाव स्तरावरील सरपंच, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, कृषीसेवक, कोतवाल, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, ग्रामपंचायत डाटा एन्ट्री ऑपरेटर यांना दामिनी ॲप डाऊनलोड करुन त्याचा वापर करणेबाबत प्रवृत्त करावे. तसेच या ॲपचे जीपीएस लोकोशनचे काम करीत असून वीज पडण्याचा 15 मिनीटापूर्वी ॲपमध्ये स्थिती दर्शविण्यात येते. ॲपमध्ये आपले सभोवतालच्या वीज पडत असल्यास ठिकाणापासून सुरक्षित स्थळी जावे. त्यावेळी झाडाचा आश्रय घेऊ नये. ग्रामीण भागातील सर्व नागरिक, शेतकरी, गुराखी, मेंढपाळ यांनी दामिनी ॲप डाऊनलोड करुन घ्यावे. दामिनी ॲपमध्ये प्राप्त होणाऱ्या अर्लटनुसार आवश्यक पूर्वसूचना गावातील सर्व नागरिकांना देवून, होणारी जीवीत व वित्तहानी  टाळावी.

 

मान्सून कालावधीत विशेषत: जून व जुलै या महिन्यात वीज पडून जीवीत हानी होते. जीवीतहानी होवू नये यासाठी नागरिकांनी व विशेषत: शेतकऱ्यांनी वीज पडून होणाऱ्या धोक्यापासून वाचण्यासाठी दामिनी ॲप अवश्य वापरावे.  दामिनी ॲप शेतकऱ्यासाठी वरदान ठरणार आहे.

 

अलका पाटील, माहिती सहाय्यक,

जिल्हा माहिती कार्यालय नांदेड

00000

 आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी

19 जून रोजी शिष्यवृत्ती योजना परीक्षा  

 

नांदेड (जिमाका) दि. 18 :-  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (एनएमएमएस) सन 2021-22 ही घेतली जात आहे. ही परीक्षा रविवार 19 जून 2022 रोजी दोन सत्रात परीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील पुढील परीक्षा केंद्र देण्यात आले आहेत.

 

रविवार सकाळी 10.30 ते दुपारी 3 यावेळेत दोन सत्रात जिल्ह्यातील 13  परीक्षा केंद्रावर ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी नोंदणीकृत विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक, पालकांनी कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच परीक्षेसंबधी काही अडचण आल्यास जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी माधव सलगर, दिलीपकुमार बनसोडे आणि विज्ञान पर्यवेक्षक बाजगीरे माधव यांच्याशी 7745851643, 9011000970, 9421293747  या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी (मा.) प्रशांत दिग्रसकर यांनी केले आहे.

 

आयोजित करण्यात आलेली परीक्षा केंद्र पुढीलप्रमाणे आहेत. नुतन जि.प.प्रा.शाळा भोकर, जनता हायस्‍कूल नायगाव, महात्‍मा ज्‍योतिबा फुले उमवि गोकुंदा किनवट, श्री शिवाजी हायस्‍कूल कंधार, केंब्रिज माध्‍यमिक विद्यालय शिवाजीनगर नांदेड, मानव्‍य विकास उमवि देगलूर, गुजराती हायस्‍कूल वजिराबाद नांदेड, पंचशील विद्यार्जन विद्यालय हदगाव, श्री संत गाडगेबाबा महाराज उमवि लोहा, नुतन हायस्‍कूल, उमरी, मिनाक्षी देशमुख हायस्‍कूल अर्धापुर, महात्‍मा गांधी उमवि मुदखेड, लिटल फॅ्लावर कॉव्‍हेन्‍ट स्‍कूल बिलोली ही परीक्षा केंद्र आहेत.

000000

 शिष्यवृत्ती योजना परीक्षा केंद्र

परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

 

नांदेड (जिमाका), दि. 18 : शिष्‍यवृत्‍ती योजना परीक्षा (एनएमएमएस) सन 2021-22 ही रविवार 19 जून  2022 रोजी जिल्ह्यात 13 परिक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षा केंद्रापासून 100 मीटर परिसरात रविवार 19 जून रोजी सकाळी 8.30 ते सायं 5 वाजेपर्यंतच्‍या कालावधीत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी-कर्मचारी या व्यतिरीक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. या वेळेत परीक्षा केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स,एस.टी.डी,आय.एस.डी, भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे  कलम 144  अन्वये आदेशाद्वारे प्रतिबंध केले आहे.

000000 

 मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या पात्र परिसरात कलम 144  

 

नांदेड (जिमाका) दि. 18 :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून मंगळवार 19 जुलै 2022 पर्यंत घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमित केले आहेत.  

 

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पुर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूरकडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा सोमवार 20 जून 2022  रोजी सकाळी 6 वाजेपासून ते मंगळवार 19 जुलै 2022  रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे. 

 

हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना, भाविकांना लागू राहणार नाही.

00000

Friday, June 17, 2022

 जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 


नांदेड (जिमाका) दि. 17 :- नांदेड जिल्ह्यात शनिवार 18 जून रोजी सकाळी 6 वाजेपासून ते शनिवार 2 जुलै 2022 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात शनिवार 18 जून 2022 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते  शनिवार 2 जुलै 2022 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी,  शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

00000

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...