Monday, June 20, 2022

 स्वातंत्र्य दिनापूर्वी ७५ शिबिराद्वारे ७ हजार ५०० दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्याचा निर्धार

- जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर
▪️१० ऑगस्ट पर्यंत सर्व तालुक्यात दिव्यांग तपासणीसाठी ७५ विशेष तपासणी शिबीराचे नियोजन
नांदेड (जिमाका) दि. २० :- जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना संगणकिय प्रणालीद्वारे ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र (युडीआयडी) देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने निर्धार व्यक्त केला आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत येत्या १५ ऑगस्ट पर्यंत ७ हजार ५०० दिव्यांग व्यक्तींना ओळखपत्र देण्यासाठी ७५ शिबीराद्वारे विशेष मोहिम हाती घेण्याचे सर्वानुमते निश्चित करण्यात आले. जिल्ह्यातील कोणताही दिव्यांग त्याच्या हक्कापासून वंचित राहू नये याची सर्व यंत्रणेने काळजी घेतली पाहिजे. त्यांच्या हक्काचा लाभ त्यांच्याच पदरी पडावा यासाठी प्रत्येक दिव्यांगांना प्रमाणपत्र आवश्यक असून यासाठी ग्रामपंचायतींनी स्वत:हून पुढाकार घ्यावा, असे आवाहन या बैठकीत डॉ. विपीन इटनकर यांनी केले.
या बैठकीस डॉ. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. पी. टी. जमदाडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संतोष शिरसीकर, डॉ. गुजराथी, शिक्षणाधिकारी सविता बिरगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव केंद्रे आदी उपस्थित होते.
सन १९९५ च्या कायदामध्ये दिव्यांगाच्या असलेल्या मर्यादा आता अधिक व्यापक करण्यात आल्या असून यात २१ दिव्यांग प्रकाराचा समावेश करण्यात आलेला आहे. केंद्र शासनाने दिनांक २८ डिसेंबर २०१६ रोजी दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ समत केला असून यात हा समावेश आहे. यात समाविष्ट असलेल्या सर्व बाबींचा विचार करून त्या-त्या दिव्यांगाबाबत तपासून प्रमाणपत्र देण्याची यंत्रणा जिल्ह्यात उपलब्ध असून याबाबतचे प्रमाणपत्र त्यांना देण्यासाठी जिल्हाभर येत्या १५ ऑगस्ट पर्यंत ७५ दिव्यांग तपासणी शिबिराचे आयोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी दिले.
जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय रुग्णालय, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, शालेय शिक्षण विभाग, जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती यांच्या समन्वयातून प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला या शिबिरात सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्नरत राहण्याच्या सूचना त्यांनी केल्या. शिबिरासाठी त्या-त्या गावातील दिव्यांगांना उपस्थित राहता यावे यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने ५ टक्के सेस निधीतून त्यांच्या जाण्या-येण्याची व्यवस्था करण्याचे जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी स्पष्ट केले. प्रत्येक आवठ्यातील बुधवार व शुक्रवार हे दोन दिवस शिबिराचे आयोजन त्या-त्या तालुक्यांमध्ये सोईच्या ठिकाणी करण्यात येईल. अंगणवाडी सेविका, शिक्षक व संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांच्या योगदानातून ही मोहिम पूर्णत्वास आणण्याचे निश्चित करण्यात आले.
00000



No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...