Sunday, March 27, 2022

पालकमंत्री अशोक चव्हाण यांचा नांदेड दौरा 

नांदेड (जिमाका) दि. 27 :- राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण हे नांदेड दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.  

सोमवार 28 मार्च 2022 रोजी सकाळी 10 वा. नांदेड शहरातील विविध विकास कामांच्या भूमिपुजन समारंभास उपस्थिती. स्थळ- जिजाऊ सृष्टी, सिडको नांदेड . सकाळी 11 .30 वाजता नांदेड शहरातील विविध विकास कामाच्या भूमिपुजन  समारंभास उपस्थिती. स्थळ- गुरुद्वारा गेट नं. 2 नांदेड . दुपारी 1 वाजता नांदेड शहरातील विविध विकास कामांच्या भुमिपुजन समारंभास उपस्थिती. स्थळ- कालापूल गाडीपुरा नांदेड . सायंकाळी 4 वाजता नांदेड शहरातील विविध विकास कामांच्या भुमिपुजन समारंभास उपस्थिती. स्थळ- पावडेवाडी नाका, नांदेड . सायंकाळी 5.30 वाजता नांदेड शहरातील विविध विकास कामांच्या भुमिपुजन समारंभास उपस्थिती. स्थळ- तरोडा खु. मुळ गाव जवळ त्रिवेणीनगर व ओकारेश्वरनगर, नांदेड . सायंकाळी  7 वाजता नांदेड शहरातील विविध विकास कामांच्या भुमिपुजन समारंभास उपस्थिती. स्थळ- मुजाहिद चौक, देगलूर नाका, नांदेड

मंगळवार 29 मार्च 2022 सकाळी 10 वाजता मुगट ता. मुदखेड येथील विविध विकास कामांचे लोकार्पण /भूमिपूजन समारंभास उपस्थिती. स्थळ- मुगट, ता. मुदखेड . सकाळी 11 .30 वाजता ईजळी, ता. मुदखेड येथील विकास कामाच्या भूमिपूजन समारंभास उपस्थिती. स्थळ- ईजळी ता. मुदखेड . दुपारी 12.30 वाजता शेंबोली, ता. मुदखेड येथील विविध विकास कामांच्या भूमिपुजन समारंभास उपस्थिती. स्थळ- शेंबोली, ता. मुदखेड .

000000 

 

नांदेड जिल्ह्यात 1 व्यक्ती कोरोना बाधित

तर 1 कोरोना बाधित झाला बरा

 

नांदेड (जिमाका) दि. 27 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 655 अहवालापैकी 1 अहवाल कोरोना बाधित आले आहे. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 1 तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 798 एवढी झाली असून यातील 1 लाख 101 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 5 रुग्ण उपचार घेत आहे.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे उमरखेड येथे 1 कोरोना बाधित आढळले आहे.

 

आज नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1 असे एकुण 1 कोरोना बाधितांना औषध उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली.

 

उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 5 असे एकुण 5 व्यक्ती उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 94 हजार 725

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 74 हजार 786

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 2 हजार 798

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 101

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 692

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.37 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-00

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-06

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-5

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-निरंक

 

कोरोना विषाणुची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुन: येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधीनंतर दुसऱ्या लसीचा डोस अवश्य घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

000000

 

 

 

संतुलित जीवनासाठी

वाचन संस्कृती मोलाची

- उपप्रादेशिक परिवहन अधिकारी  अविनाश राऊत

राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा समारोप

नांदेड (जिमाका) दि. 27 :- संतुलित जीवनासाठी वाचन संस्कृतीचे अनन्य साधारण महत्व आहे. व्यक्तीमत्वाचा विकास हा शारिरीक श्रम, योगा, विपश्यना यासह ज्यांनी वाचनाची सवय लावून घेतली आहे ते विद्यार्थी/युवक कोणत्याही क्षेत्रात आपला अपुर्व ठसा उमटविल्याशिवाय राहत नाहीत असे प्रतिपादन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी  अविनाश राऊत यांनी केले.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्यावतीने आयोजित श्रम संस्कार शिबिराचा समारोप प्रसंगी ते बोलत होते.  यावेळी प्राचार्य एम. एस. बिरादार, नेहरू युवा केंद्राच्या  जिल्हा युवा अधिकारी श्रीमती चंद्रा रावळकर,  प्रबंधक श्रीमती यशोदा राठोड, राष्ट्रीय सेवा योजनेचे  कार्यक्रम अधिकारी मोहन कलंबरकर, योगाचार्य रमेश केंद्रे, गट निदेशक श्रीमती इंदिरा रणभिडकर, विकास भोसीकर, रवी वानखेडे यांची उपस्थिती होती.

योगासनाच्या नित्य साधनेतून सामर्थ प्राप्त होते. आत्मविश्वास वाढतो. एकाग्रता वाढते. अनेक योगी, साधुनी यातून सिध्दी प्राप्त करुन दाखविली आहे. युवकांनी यासाठी सातत्यपुर्ण पुढाकार घेतला पाहिजे. आपल्या अभ्यासासमवेत आरोग्याकडेही तेवढ्याच गंभीरतेने पाहणे आवश्यक असल्याचे राऊत यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. युवकांमध्ये ग्रामीण भागाशी एकरुप होवून तांत्रिक श्रमदान करण्याची आवश्यकता आहे. सर्वच विद्यार्थ्यांना तंत्र कुशलता शिकण्याची संधी मिळत नाही. ही संधी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांना मिळते. या ज्ञानाचा गावासाठीही  अधिक उपयोग झाला पाहिजे अशी अपेक्षा प्राचार्य बिरादार यांनी व्यक्त केले.

सहा दिवस चाललेल्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात योगाचार्य रमेश केंद्रे यांनी युवकांना प्राणायम, ध्यान, सुर्य नमस्कार यातून व्यक्तीमत्त्व विकासाचे  धडे दिले.  श्रम संस्कार शिबिर उत्कृष्ट कार्य करण्याऱ्या प्रशिक्षणार्थीचा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी  अविनाश राऊत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मो. सिब्तैन, विवेकानंद पांचाळ, नागेश कानशेटे, कृष्णा कदम, रोशन ऋतूराज, श्रषीकेश पंढरे, विजय खंडागळे यांना विशेष कार्य केल्याबद्दल प्रशिक्षणार्थी वैष्णवी चव्हाण,  रंगारंग कार्यक्रमात उत्कृष्ट गीत गायल्याबद्दल शेख आफरिन हिचा सत्कार करण्यात आला. श्रम संस्कार कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ऊप प्राचार्य सुभाष परघने, श्रीमती प्रबंधक यशोदा राठोड, उमाकांत बिहाऊत, श्रीमती संगीता राठोड,  श्री. सोलेवाड , गजानन मस्के, श्रीमती निकम मॅडम  परिश्रम घेतले.

00000

 

 

Saturday, March 26, 2022

नांदेड जिल्ह्यात आज एकही कोरोना बाधित नाही

तर एक कोरोना बाधित झाला बरा  

नांदेड (जिमाका) दि. 26 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 668 अहवालापैकी एकही अहवाल पॉझिटीव्ह आढळला नाही. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 797 एवढी झाली आहे. यातील 1 लाख 100 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 5 रुग्ण उपचार घेत आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरणातील एका कोरोना बाधिताला औषध उपचारानंतर बरे झाल्याने आज सुट्टी देण्यात आली. 

उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरणात 5 असे एकुण 5 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 94 हजार 70

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 74 हजार 138

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 2 हजार 797

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 100

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 692

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.37 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-1

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-5

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-निरंक 

कोरोना विषाणुची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुन: येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधीनंतर दुसऱ्या लसीचा डोस अवश्य घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

000000

 रस्ता सुरक्षेबाबत मार्गदर्शन शिबीर संपन्न 

नांदेड, (जिमाका) दि. 26 :- प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पोलीस मुख्यालयात “रस्ता सुरक्षा मार्गर्शन” शिबिराचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या शिबिराच्या अध्यक्षस्थानी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपअधिक्षक अश्विनी जगताप या होत्या. 

या शिबिरात पोलीस मुख्यालयातील जवळपास 215 अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. रस्ता सुरक्षा विषयक नियमांचे पालन, वाहन चालतांना घ्यावयाची काळजी, वाहतूक चिन्ह, हाताचे इशारे, हेल्मेट, सिटबेल्टचा वापर आदी विषयांवर सविस्तर मार्गदर्शन सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी संदिप निमसे यांनी केले. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने सुरू केलेल्या या उपक्रमाबद्दल पोलीस उपअधिक्षक अश्विनी जगताप यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पोलीस उपनिरीक्षक श्रीमती पिपर खेडकर यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहा. मोटार वाहन निरीक्षक बालाजी जाधव व सर्वेश पानकर यांनी परिश्रम घेतले.

00000



 

ग्रामीण पाणी पुरवठा योजनांसाठी 

पाण्याचे शाश्वत स्त्रोत निश्चिती महत्वाची

-          पालकमंत्री अशोक चव्हाण 

नांदेड, (जिमाका) दि. 26 :- जिल्ह्यातील अनेक भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. भविष्यातील लोकसंख्या व दरडोई किमान 55 लिटर पाण्याची गरज लक्षात घेता आतापासूनच पाणी प्रश्नांवर गंभीरतेने विचार करण्याची गरज आहे. एकाबाजुला ग्रामीण पाणी पुरवठ्यासाठी शाश्वत जलस्त्रोताची उपलब्धता तर दुसऱ्या बाजुला या पाणी पुरवठा योजनांसाठी त्या-त्या ग्रामपंचायतींना विद्युत देयकांचे करावे लागणारे व्यवस्थापन याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याची अत्यांतिक गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. 

डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त “जल जीवन मिशन” कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील एकुण 15 गावांमध्ये 75 किमी पाईप लाईनच्या प्रातिनिधीक शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार अमर राजूरकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, सहाय्यक जिल्हाधिकारी कार्तिकेएन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले, जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पाटील, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता एम. एस. बोडके आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

या बैठकीत ग्रामीण क्षेत्रासाठी पाणी पुरवठ्याचे नियोजन व ज्या योजना साकारल्या जाणार आहेत, ज्या योजना कार्यरत आहेत अशा सर्वांसाठी जे शाश्वत जलस्त्रोत आवश्यक आहेत त्याबाबत गंभीरतेने विचार करण्यात आला. जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेसाठी कराव्या लागणाऱ्या नियोजनाबद्दल तालुकानिहाय आढावा घेऊन पाण्यचे स्त्रोत निश्चित करण्याच्या सूचना पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिल्या. शाश्वत स्त्रोताची जर असेल तर त्या योजना यशस्वी ठरतील व त्या-त्या भागातील लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा गरजा पूर्ण करतील. तसेच योजना पूर्ण केल्यानंतर त्या सुस्थितीत कार्यरत ठेवण्यासाठी धोरणात्मक निर्णय व ग्रामपंचायत निहाय लागणारा खर्च याचा आढावा घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या. एकाबाजुला आश्वाशित पाणी पुरवठा व दुसऱ्या बाजुला पाणी पुरवठा योजना सक्षम होण्याकरीता प्रत्येक ग्रामपंचायती निहाय पाणीपट्टी वसुलीचे गणित व यातील आर्थिक स्थिती याही बाबी तपासून घेत योजनेचा परीपूर्ण आराखडा करण्याच्या सूचना दिल्या.  यावेळी “जल जीवन मिशन” अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण पाणी पुरवठा योजना सक्षम करण्यासाठी चालू असलेल्या कामांचा आढावा त्यांनी घेतला.

00000



Friday, March 25, 2022

 भगवती व सेवा बाल रुग्णालयास शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक व औद्योगिक भेट 

नांदेड (जिमाका) दि. 25 :- मागील दोन वर्षाच्या कालावधीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय क्षेत्राचे महत्त्व सगळ्यांच्या लक्षात आले आहे.  वेगवेगळ्या आधुनिक वैद्यकीय उपकरणाच्या साह्याने रुग्णाचे योग्य निदान होऊन वेळीच उपचार मिळाल्याने असंख्य प्राण वाचविता आले आहेत. वैद्यकीय उपकरणाची निगडित वैद्यकीय अणुविद्युत पदविका शासकीय तंत्रनिकेतन नांदेड येथे उपलब्ध आहे. राज्यात केवळ तीन शासकीय तंत्रनिकेतनमध्ये हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर या शाखेला प्रतिसाद मिळत आहे. केवळ पुस्तकी ज्ञान न देता प्रत्यक्ष वैद्यकीय उपकरणाचा वापर होताना बघण्यासाठी व हाताळण्यासाठी संस्थेचे प्राचार्य डॉ.गोरक्ष गर्जे, वैद्यकीय विभाग प्रमुख बी. व्ही. यादव यांच्या पुढाकाराने प्रथम व द्वितीय वर्षाच्या  वैद्यकीय अणुविद्युत शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी औद्योगिक भेटीचे आयोजन करण्यात आले होते. 

यात जवळपास 85 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. नांदेड परिसरातील भगवती हॉस्पिटल  येथील अतिदक्षता विभागातील उपकरणांची माहिती व इतर सर्व विभागातील उपकरणांच्या वापराबद्दलची माहिती विद्यार्थ्यांना आपुलकीने डॉक्टर राहुल देशमुख यांनी करून दिली. विविध रोग निदानामध्ये त्यांचा उपयोग कसा करायचा याची देखील माहिती त्यांनी दिली. त्यांच्यासोबतच जिव्हाळा हॉस्पिटलच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील गोरगरीब स्त्रीयांना मदतीचा हात देणाऱ्या तसेच स्त्रियांचे वैद्यकीय प्रश्न सोडविणाऱ्या स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर्स राजश्री रुपेश देशमुख यांनी ऑपरेशन थिएटर मधील विविध उपकरणांची माहिती विद्यार्थी व विद्यार्थीनींना यावेळी करून दिली.  औद्योगिक सहल यशस्वी होण्यासाठी अधिव्याख्याता प्रा. एस. बी. चव्हाण प्रा. एच. डी. खर्जुले ,प्रा. बी. आर. कोळी, शेख अफसर, तृतीय वर्षातील विद्यार्थीनी कु. पल्लवी धुपे, कु. अंजना तेगंपले, शुभांगी वाघमारे यांनी परिश्रम घेतले.

000000





वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...