ग्रामीण पाणी पुरवठा योजनांसाठी
पाण्याचे शाश्वत स्त्रोत निश्चिती महत्वाची
- पालकमंत्री अशोक चव्हाण
नांदेड, (जिमाका) दि. 26 :- जिल्ह्यातील अनेक भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. भविष्यातील लोकसंख्या व दरडोई किमान 55 लिटर पाण्याची गरज लक्षात घेता आतापासूनच पाणी प्रश्नांवर गंभीरतेने विचार करण्याची गरज आहे. एकाबाजुला ग्रामीण पाणी पुरवठ्यासाठी शाश्वत जलस्त्रोताची उपलब्धता तर दुसऱ्या बाजुला या पाणी पुरवठा योजनांसाठी त्या-त्या ग्रामपंचायतींना विद्युत देयकांचे करावे लागणारे व्यवस्थापन याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याची अत्यांतिक गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.
डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त “जल जीवन मिशन” कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील एकुण 15 गावांमध्ये 75 किमी पाईप लाईनच्या प्रातिनिधीक शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार अमर राजूरकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, सहाय्यक जिल्हाधिकारी कार्तिकेएन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले, जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पाटील, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता एम. एस. बोडके आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकीत ग्रामीण क्षेत्रासाठी पाणी पुरवठ्याचे नियोजन व ज्या
योजना साकारल्या जाणार आहेत, ज्या योजना कार्यरत आहेत अशा सर्वांसाठी जे शाश्वत
जलस्त्रोत आवश्यक आहेत त्याबाबत गंभीरतेने विचार करण्यात आला. जल जीवन मिशन
अंतर्गत जिल्ह्यातील प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेसाठी कराव्या लागणाऱ्या
नियोजनाबद्दल तालुकानिहाय आढावा घेऊन पाण्यचे स्त्रोत निश्चित करण्याच्या सूचना
पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिल्या. शाश्वत स्त्रोताची जर असेल तर त्या योजना
यशस्वी ठरतील व त्या-त्या भागातील लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा गरजा पूर्ण
करतील. तसेच योजना पूर्ण केल्यानंतर त्या सुस्थितीत कार्यरत ठेवण्यासाठी धोरणात्मक
निर्णय व ग्रामपंचायत निहाय लागणारा खर्च याचा आढावा घेण्याच्या सूचना त्यांनी
केल्या. एकाबाजुला आश्वाशित पाणी पुरवठा व दुसऱ्या बाजुला पाणी पुरवठा योजना सक्षम
होण्याकरीता प्रत्येक ग्रामपंचायती निहाय पाणीपट्टी वसुलीचे गणित व यातील आर्थिक
स्थिती याही बाबी तपासून घेत योजनेचा परीपूर्ण आराखडा करण्याच्या सूचना
दिल्या. यावेळी “जल जीवन मिशन”
अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण पाणी पुरवठा योजना सक्षम करण्यासाठी चालू असलेल्या
कामांचा आढावा त्यांनी घेतला.
00000
No comments:
Post a Comment