Friday, March 25, 2022

 भगवती व सेवा बाल रुग्णालयास शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक व औद्योगिक भेट 

नांदेड (जिमाका) दि. 25 :- मागील दोन वर्षाच्या कालावधीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय क्षेत्राचे महत्त्व सगळ्यांच्या लक्षात आले आहे.  वेगवेगळ्या आधुनिक वैद्यकीय उपकरणाच्या साह्याने रुग्णाचे योग्य निदान होऊन वेळीच उपचार मिळाल्याने असंख्य प्राण वाचविता आले आहेत. वैद्यकीय उपकरणाची निगडित वैद्यकीय अणुविद्युत पदविका शासकीय तंत्रनिकेतन नांदेड येथे उपलब्ध आहे. राज्यात केवळ तीन शासकीय तंत्रनिकेतनमध्ये हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर या शाखेला प्रतिसाद मिळत आहे. केवळ पुस्तकी ज्ञान न देता प्रत्यक्ष वैद्यकीय उपकरणाचा वापर होताना बघण्यासाठी व हाताळण्यासाठी संस्थेचे प्राचार्य डॉ.गोरक्ष गर्जे, वैद्यकीय विभाग प्रमुख बी. व्ही. यादव यांच्या पुढाकाराने प्रथम व द्वितीय वर्षाच्या  वैद्यकीय अणुविद्युत शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी औद्योगिक भेटीचे आयोजन करण्यात आले होते. 

यात जवळपास 85 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. नांदेड परिसरातील भगवती हॉस्पिटल  येथील अतिदक्षता विभागातील उपकरणांची माहिती व इतर सर्व विभागातील उपकरणांच्या वापराबद्दलची माहिती विद्यार्थ्यांना आपुलकीने डॉक्टर राहुल देशमुख यांनी करून दिली. विविध रोग निदानामध्ये त्यांचा उपयोग कसा करायचा याची देखील माहिती त्यांनी दिली. त्यांच्यासोबतच जिव्हाळा हॉस्पिटलच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील गोरगरीब स्त्रीयांना मदतीचा हात देणाऱ्या तसेच स्त्रियांचे वैद्यकीय प्रश्न सोडविणाऱ्या स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर्स राजश्री रुपेश देशमुख यांनी ऑपरेशन थिएटर मधील विविध उपकरणांची माहिती विद्यार्थी व विद्यार्थीनींना यावेळी करून दिली.  औद्योगिक सहल यशस्वी होण्यासाठी अधिव्याख्याता प्रा. एस. बी. चव्हाण प्रा. एच. डी. खर्जुले ,प्रा. बी. आर. कोळी, शेख अफसर, तृतीय वर्षातील विद्यार्थीनी कु. पल्लवी धुपे, कु. अंजना तेगंपले, शुभांगी वाघमारे यांनी परिश्रम घेतले.

000000





No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...