Friday, March 25, 2022

 पिकाच्या वाढीसाठी उत्ती, पाने तपासणीची सुविधा उपलब्ध 

·         धनेगाव येथे नवीन उत्ती, पाने तपासणी प्रयोगशाळा सुरु

 

नांदेड (जिमाका) दि. 25 :-  पिकाच्या वाढीच्या अवस्थेमधील विविध अन्नद्रव्याची कमतरता पाने व उत्ती परिक्षणातून समजते. त्यानुसार आवश्यक ते खत दिल्यास उत्पादन खर्चात घट होऊन उत्पादनात वाढ होऊन मालाची प्रत सुधारते. मानव विकास योजनेतून उत्ती व पाने परिक्षण प्रयोगशाळेच्या स्थापनेसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडून 40 लाख रुपये निधी देण्यात आला आहे. जिल्हा अधिक्षक  कृषि अधिकारी नांदेड अंतर्गत मृद सर्वेक्षण व मृद चाचणी प्रयोगशाळा धनेगाव नांदेड येथे नवीन उत्ती व पाने तपासणी प्रयोगशाळा सुरु करण्यात आली आहे. वनस्पती संबंधीत उत्ती व पाने देताना अडचण आल्यास जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी प्रयोगशाळा धनेगाव यांच्याशी भ्रमणध्वनी क्रमांक 8208037806 / 7588428280  /  7744822001 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि कार्यालयाने केले आहे.

 

या  प्रयोगशाळेत वनस्पतीसाठी आवश्यक अशा 11 (नत्र, स्पुरद, पालाश, कॅल्शीअम, मॅग्नेशीअम, गंध, बोरॉन, जस्त, लोह, तांबे व मॅग्नीज) पोशकद्रव्य (Nutrients) यांचे परीक्षण केले जाते. वरील 11 पोषकद्रव्याची तपासणी करण्यासाठी 1100 रुपये शुल्क आकारले जाईल. जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी प्रयोगशाळा धनेगांव, वाघाळेकर पेट्रोल पंपासमोर, नांदेड या पत्यावर उत्ती व पाने नमुना स्विकारण्यात येईल.

 

उत्ती व पाने परीक्षणासाठी नमुना घेण्याची पद्धत पुढीलप्रमाणे आहे.  वनस्पतीच्या शेंडयाकडील भागाची निवड करावी किंवा खालील कुष्टकात निर्देशित केलेली पाने निवडावी. नमुना हा पुर्व-पश्चिम-उत्तर-दक्षिण चारही बाजूचा घ्यावा. सुर्य प्रकाशात असलेल्या पानाचाच नमुना घ्यावा. माती लागलेली, किडग्रस्त व रोगग्रस्त पानाचा नमुना घेऊ नये. वनस्पतीचा नमुना काढल्यानंतर 12 तासाच्या आत नमुना प्रयोगशाळेत आणावा. वनस्पतीचे पान, देठ किवा उत्ती स्वच्छ कागदी किवा कापडी पिशवीमध्ये ठेऊन प्रयोगशाळेत आणावेत.

 

निरनिराळया पिकात उत्ती व पाने विश्लेषणासाठी नमुना घेण्याची पध्दत. पिक निर्देशित उत्ती व पर्ण आणि पानाची संख्या याप्रमाणे आहे. लिंबु पिकासाठी नविन पालवीची पाने व पानाची संख्या 30 आहे. केळी या पिकासाठी निर्देशित उत्ती व पर्ण शेंडयाकडून तिसरे पान पूर्णपणे उघडल्यानंतर मध्यभागाच्या शिरेच्या दोन्ही बाजूसह तीन इंच रुंदीच्या पटया पानाची संख्या 15 आहे. सिताफळ या पिकासाठी शेंडयाकडून पाचवे पान असून पानाची संख्या 30 राहील. द्राक्ष पिकासाठी उत्ती व पर्ण खोडाच्या शेजारच्या फांदीवरील पाचव्या पानाचा देठ, पानाची संख्या 200 राहील. पेरु या पिकासाठी  उत्ती व पर्ण शेंडयाकडील नुकतीच परिपक्व झालेली पानाची तीसरी जोडी,  पानाची संख्या 25 राहील. संत्रा / मोसंबी पिकासाठी उत्ती व पर्ण चार महिने कालावधीचे नुकतेच जुने झालेले पान, पानाची संख्या 30 आहे. आंबा या पिकासाठी निर्देशित उत्ती व पर्ण नविन फांदीच्या मध्य भागाजवळील चार ते सात महिने कालावधीचे पाने व देठ, पानाची संख्या 15 आहे. पपई या पिकासाठी उत्ती व पर्ण शेंडयाकडून सहावे पान व देठ, पानाची संख्या 20 आहे. चिकू या पिकासाठी उत्ती व पर्ण शेंडयाकडून दहावे पान, पानाची संख्या 50 आहे. डाळींब  या पिकासाठी उत्ती व पर्ण शेंडयाकडून आठवे पान, पानाची संख्या 50 आहे. गहू या पिकासाठी उत्ती व पर्ण गहू ओंबीवर येण्यापूर्वीचे पान, पानाची संख्या  50 आहे. ज्वारी या पिकासाठी उत्ती व पर्ण फुलोऱ्याखालील तिसरे पान असून पानाची संख्या 50 आहे. मका या पिकासाठी निर्देशित उत्ती व पर्ण निसवण्यापुर्वीचे कनसाजवळील पान असून पानाची संख्या 15 आहे. व्दिदल पिके निर्देशित उत्ती व पर्ण यात फुलोरा येण्यापुर्वीचे नुकतेच परिपक्व झालेले पान असून पानाची संख्या 200 (हरभरा) आहे. सोयाबीन या पिकासाठी निर्देशित उत्ती व पर्ण सोयाबीन पेरणीनंतर दोन महिन्याचे शेंडयाकडील तिसरे पान असून पानाची संख्या 25 आहे. कापूस पिकासाठी निर्देशित उत्ती व पर्ण शेंडयाकडून चौथ्या पानाचे देठ असून पानाची संख्या 50 आहे. भूईमुग या पिकासाठी निर्देशित उत्ती व पर्ण नुकतेच परिपक्व झालेले पान असून पानाची संख्या 25 आहे. बटाटा या पिकासाठी वाढीच्या टोकाकडील तिसरे व सहावे पान असून पानाची संख्या 20 आहे. टोमॅटो या पिकासाठी वाढीच्या टोकाकडील चौथे पान असून पानाची संख्या 25 आहे. याप्रमाणे निरनिराळ्या पिकात उत्ती व पाने विश्लेषणासाठी नमुना घेण्याची पद्धत आहे, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

0000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...