Sunday, October 10, 2021

 देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी निवडणूक निरिक्षकांशी

सकाळी 10 ते 11 कालावधीत साधता येईल संपर्क 

नांदेड (जिमाका) दि. 10 :- देगलूर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणूकीसाठी आयोगाने नियुक्त केलेले निवडणूक निरिक्षक पंकज (भा.प्र.से), आर. एन. एन. शुक्ला (खर्च), गोपेश अग्रवाल (पोलीस) हे नांदेड जिल्ह्यात दाखल झालेले आहेत. या निवडणूकीसंदर्भात जिल्ह्यातील नागरिकांपैकी कुणाच्या काही हरकती, तक्रारी, गाऱ्हाणी असल्यास निवडणूक निरिक्षक यांच्याशी सकाळी 10 ते 11 यावेळेत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

नांदेड येथील मिनी सह्याद्री व्हीआयपी सुट शासकीय विश्रामगृह नांदेड येथे इच्छुकांना सकाळी 10 ते 11 यावेळेत भेटता येईल. कुणाला आवश्यकता भासल्यास निवडणूक निरिक्षक पंकज (भा.प्र.से) 9022820141, आर.एन.एन. शुक्ला (खर्च) 7498131456, गोपेश अग्रवाल (पोलीस) यांना 7498401148 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल.

00000

Saturday, October 9, 2021

 नांदेड जिल्ह्यात 2 व्यक्ती कोरोना बाधित तर 2 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 9 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 814 अहवालापैकी 2 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 2 तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 336 एवढी झाली असून यातील 87 हजार 670 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 14 रुग्ण उपचार घेत असून 1 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 652 एवढी आहे. आजच्या बाधितामध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 1, किनवट 1 असे एकुण 2 बाधित आढळले.आज जिल्ह्यातील 2 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 1, मनपा अंतर्गत एन.आर.आय.भवन व गृह विलगीकरण  1 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. आज 14  कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 3, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 11 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 40 हजार 110

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 36 हजार 619

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 336

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 670

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 652

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.4 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-6

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-14

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-1

00000

Friday, October 8, 2021

 सुट्टीच्या दिवशी पक्की अनुज्ञप्ती चाचणी सुरु   

नांदेड (जिमाका) दि. 8 :- पक्की अनुज्ञप्ती (Driving License) चाचणीसाठी उशीराने अपॉईंटमेंट मिळत असल्याने प्रतिक्षा कालावधी वाढला आहे. हा कालावधी कमी करुन नागरिकांची गैरसोय कमी करण्याच्या दृष्टीने लॉकडाऊन कालावधीतील प्रलंबित पक्क्या अनुज्ञप्ती चाचण्यांचा नियमन करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयामर्फत 9, 16, 23 30 ऑक्टोबर 2021 शनिवार या सुट्टीच्या दिवशी पक्की अनुज्ञप्ती चाचणीसाठी नांदेड प्रादेशिक परिवहन कार्यालयात शिबीराचे आयोजन करुन एक दिवस आगोदर अपॉईंटमेंट उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यानुसार अर्जदारांनी ऑनलाईन उपलब्ध असलेली अपॉईंटमेंट घ्यावी त्यादिवशी चाचणीसाठी कार्यालयात उपिस्थत रहावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

000000

 स्कुल बसेसाठी मानक कार्यपध्दती जाहीर 

नांदेड (जिमाका) दि. 8 :-  गेल्या दीड वर्षापासून बंद असलेल्या शाळा 4 ऑक्टोबर पासून सुरू झाल्या आहेत. कोरोना प्रतिबंधित नियमांचे पालन करणे शाळांना बंधनकारक असून या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसेसाठी प्रादेशिक परिवहन विभागाने मानक कार्यपद्धती जाहीर केली आहे. 

कोव्हिड -19 च्या अनुषंगाने स्कुल बस ऑपरेटर यांनी परिवहन विभागाने निर्गमित केलेल्या निर्देशांचे पालन करणे बंधनकारक केले आहे.मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 20(1) (X) मधील तरतुदीनुसार लोकसेवा वाहनाच्या प्रत्येक चालकाने स्कुल बसच्या प्रत्येक फेरीनंतर वाहन स्वच्छ व निर्जंतुक करणे अत्यावश्यक आहे. कर्तव्यावर असणाऱ्या वाहन चालकाने मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा. बस जिथे उभ्या राहतात तिथे गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. स्कुल बसच्या चालकाचे लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण झालेले असावेत विद्यार्थ्याच्या वापरासाठी काही अतिरिक्त मास्क जवळ ठेवावे. मास्क परिधान न केलेल्या विद्यार्थ्यांना बसमध्ये प्रवेश न नाकारता त्यांना उक्त मास्क वापरासाठी उपलब्ध करून घ्यावे. बसच्या प्रवेशव्दाराजवळ सॅनिटायझर ठेवावे.विद्यार्थ्यांना प्रवेश देताना हात निर्जंतुक करून घ्यावे बसमध्ये प्रवेश देताना विद्यार्थ्यांचे थॅमल स्कॅनिंग करून घ्यावे. ताप, सर्दी, खोकला इत्यादी आजाराचे लक्षण दिसल्यास विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास प्रतिबंध करावा. अशा विद्यार्थ्यांना त्वरीत पालकांच्या ताब्यात दयावे. बस वाहनामध्ये एका बाकावर एक याप्रमाणे 50 टक्के आसन क्षमतेप्रमाणे वाहतुकीस परवानगी देण्यात आली आहे.स्कुल बसमध्ये चढताना किंवा उतरताना सोशल डिस्टिन्सिंगचे पालन करणे आवश्यक आहे याची दक्षता सहवर्ती चालकाने घ्यावी.शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसच्या खिडक्या उघड्या ठेवाव्यात.तसेच वातानुकूलीत बसेसमध्ये 24 ते 30 डिग्री सेल्सीअस इतके तापमान ठेवावे.बसमध्ये कचरा फेकू नये आणि बस स्वच्छ ठेवण्याच्या सूचना विद्यार्थ्यांना दयाव्यात .स्कुल बसचे निर्जतुकीकरण करणे तसेच त्याचे अभिलेख ठेवण्याची जबाबदारी परवानधारकाची असेल.सुचनाचे पालन न केल्यास परवानधारका विरूध्द मोटार वाहन अधिनियम 1988 केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील तरतुदीनुसार कारवाई स्थानिक प्रशासन कारवाई करेल. केंद्र किंवा राज्य शासनाकडून वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या सुचनाचे पालन करणे आवश्यक असल्याचे निर्देश उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी दिले आहे.

00000

 जिल्ह्यातील 103 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण 

नांदेड (जिमाका) दि. 8 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 103 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. यात 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील व्यक्तींना कोव्हॅक्सीन व कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध करुन दिला आहे. 9 ऑक्टोंबर 2021 रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

मनपा क्षेत्रातील श्री गुरु गोविंद जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, पोर्णिमानगर, सांगवी, करबला, तरोडा, विनायकनगर, अरब गल्ली, खडकपुरा, रेल्वे हॉस्पिटल या 19 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. याचबरोबर श्री गुरु गोबिंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, पोर्णिमानगर, सांगवी, करबला, तरोडा, विनायकनगर, खडकपुरा, अरबगल्ली रेल्वे हॉस्पिटल या 19 केंद्रावर प्रत्येकी 100 डोस कोव्हॅक्सीन लसीचे उपलब्ध करुन दिले आहेत.

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, माहूर, मांडवी, लोहा, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 16 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत. तसेच उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, माहूर, मांडवी, लोहा, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 16 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत. तर ग्रामीण भागात 68 प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस देण्यात आले आहेत. 

वरील सर्व लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोविड-19 लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाईन किंवा लसीकरण केंद्रावर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. 

जिल्ह्यात 7 ऑक्टोंबर 2021 पर्यंत एकुण 15 लाख 73 हजार 486 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. नांदेड जिल्ह्यात 9 ऑक्टोंबर 2021 पर्यत कोविड लसींचा साठा खालीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 13 लाख 47 हजार 30 डोस, कोव्हॅक्सीनचे 3 लाख 45 हजार 120 डोस याप्रमाणे एकुण 16 लाख 92 हजार 150 डोस प्राप्त झाले आहेत. 

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व कार्यक्षेत्रामध्ये कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस 18 ते 44 वयोगटासाठी व 45 वर्षावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस उपलब्ध राहील. यासाठी ऑनलाईन व ऑनस्पॉट नोंदणीची सुविधा उपलब्ध राहिल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले.

00000

 

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात नुकसान झालेल्या पिकांची

कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांच्याकडून पाहणी 

नांदेड (जिमाका) दि. 8 :- अतिवृ्ष्टीमुळे जिल्ह्यात नुकसान झालेल्या पिकाची पाहणी राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी पाहणी केली. मागील काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, विभागीय कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर, जिल्हा कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, उपविभागीय कृषी अधिकारी रविकुमार सुखदेव इतर अधिकारी उपस्थित होते. 

यावेळी मार्गदर्शन करताना एकनाथ डवले म्हणाले की, कृषी विभागाने 3.5 हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांचे नियोजन केले असून यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणात करडई लागवड करावी तसेच खरीप हंगामासाठी उन्हाळी सोयाबीन कार्यक्रम राबवून सोयाबीन बियाणे राखुन ठेवावे. येत्या काही दिवसात पावसाची शक्यता आहे यामुळे 15 ऑक्टोबर पर्यत सोयाबीन पिकाची काढणी करावी व सोयाबीन सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवावे अशा सूचना त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केल्या.

000000  





 पिकविम्यासाठी सोयाबीन पिकाचा समावेश

- जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर 

नांदेड (जिमाका) दि. 8 :- जिल्हयामध्ये 4 लाख 34 हजार 251 हे. क्षेत्रावर सोयाबिन पिकाची पेरणी झाली आहे. जवळपास सर्व शेतकऱ्यांनी सोयाबिनचा पिक विमा काढलेला आहे. अतिवृष्टीमुळे सोयाबिन पिकाचे मोठया प्रमाणावर नुकसान झालेले आहे. विमा कंपनी व कृषि विभाग नुकसानीचे पंचनामे करत आहे. येत्या 3 ते 4 दिवसात पंचनामे पुर्ण करण्यात येणार असून, विमा कंपनी इतर पिकांसोबत सोयाबिन पिकाची देखील नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. 

संभाव्य अवकाळी पावसापासुन पिकाचे नुकसान होणार नाही यादृष्टीने शेतकऱ्यांनी सोयाबिन जर हाती लागले असेल तर अशा काढणीला आलेल्या सोयाबिन पिकाची 15 ऑक्टोबर पुर्वी काढणी करून घ्यावी असे आवाहनही करण्यात आले आहे. काही वृत्तपत्रामध्ये 8 ऑक्टोंबर 2021 रोजी प्रसिध्द झालेल्या बातमीत पिक विमा आगाऊ मिळणेसाठी नांदेड जिल्हयामध्ये सोयाबीनचा उल्लेख केलेला नसल्याचे दिसून आले. यामूळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या व कृषी विभागाच्या वतीने ही वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे.

0000

  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच...