Wednesday, May 20, 2020


व्यवसायिकांनी कोरोना नियमांचे पालन न केल्याने दोन दिवसात
नांदेड शहरातील 13 दुकानदारांकडून 65 हजार रुपयांचा दंड वसूल  
नांदेड, दि. 20 :-कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नांदेड जिल्ह्यात कोरोना विषयक नियम लागू केले आहेत. नांदेड वाघाळा शहर महापालिका क्षेत्रात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आज दुसऱ्या दिवशी सहा दुकानदारांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. 19 व 20 मे या दोन दिवसात नांदेड शहरातील 13 दुकानदारांकडून 65 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. व्यवसायिकांनी कोरोना विषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहन नांदेड वाघाळा शहर महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी शहरातील दुकाने सुरु करण्याची सशर्त परवानगी दिली. तर काही दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांनी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी व निश्चित केलेल्या नियम व अटी न पाळणाऱ्या दुकानावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपआयुक्त विलास भोसीकर व सुधिर इंगोले यांच्या पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बुधवार 20 मे रोजी दुसऱ्या दिवशी या पथकाने गुरुकृपा कलेक्शन रविनगर चौक कौठा, अपना ड्रेसेस वजिराबाद, लक्ष्मी कापड श्रीनगर नांदेड, मयुर मेन्स वेअर आनंदनगर नांदेड या दुकानांना परवानगी नसताना दुकाने उघडल्याबद्दल तसेच आर.सी.एफ शॉपर्स मार्ट श्रीनगर नांदेड, महालक्ष्मी ऑईल शोरुम आनंदनगर नांदेड यांनी दुकानामध्ये पाचपेक्षा जास्त लोक जमविल्यामुळे तर बालाजी किराणा ॲन्ड जनरल स्टोअर्स सिडको यांनी निर्धारित वेळेवर दुकाने बंद न केल्याने या सात दुकानांना पथकाच्यावतीने प्रत्येकी 5 हजार रुपये असे कएुण 35 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.
तसेच मंगळवार 19 मे रोजी या पथकाने नांदेड शहरातील सहा व्यवसायिकांनी सुरक्षित अंतर न ठेवणे, दुकाने उघडण्याची परवानगी नसताना दुकाने उघडणे, ठरवून दिलेल्या वेळेत दुकाने बंद न करणे यासाठी प्रत्येकी 5 हजार रुपये याप्रमाणे 30 हजार रुपये दंड वसुल केला आहे. दोन दिवसात एकुण 13 दुकानदारांकडून 65 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.
नांदेड मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त विलास भोसीकर, सुधीर इंगोले यांच्या पथकाने रमेश चवरे, औकार स्वामी, अशोक भांगे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी या कारवाईत भाग घेतला.
00000


कोरोनाचे नवीन चार रुग्ण
64 स्वॅबची तपासणी चालू
नांदेड, दि. 20 :- कोरोना विषाणु संदर्भात बुधवार 20 मे 2020 रोजी सायं. 7 वा. नांदेडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिलेल्या माहिती नुसार बुधवार 20 मे रोजी प्राप्त एकुण 13 अहवालापैकी 4 रुग्ण पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. नांदेड जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 110 वर पोहचली असून उर्वरीत 31 नवीन व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले तर 33 स्वॅब प्रलंबित असून एकुण 64 स्वॅबची तपासणी चालू आहे.  
नवीन 4 पॉझिटिव्ह रुग्ण पुरुष असून त्यांचे वय अनुक्रमे 24, 32, 33, 54 आहे. स्नेहनगर पोलीस कॉलनी, सांगवी नांदेड, तालुका मुखेड, भोकर येथील प्रत्येक एक याप्रमाणे 4 रुग्ण असून त्यांच्यापैकी 2 रुग्ण शासकीय आयुर्वेद महाविद्यालय येथे, एक रुग्ण उपजिल्हा रुग्णालय मुखेड व एक रुग्ण ग्रामीण रुग्णालय भोकर येथे औषधोपचार घेत आहेत. सद्य:स्थितीत त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेणे चालू आहे.  एकुण 110 रुग्णांपैकी 5 रुग्णांचा मृत्यू झाला तर 36 रुग्ण हे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
कोरोनाचे 67 रुग्णांपैकी 10 रुग्ण हे डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथे तर पंजाब भवन कोवीड केअर सेंटर व यात्री निवास कोवीड केअर सेंटर येथे 51 रुग्ण व ग्रामीण रुग्णालय बारड येथील धर्मशाळा कोवीड केअर सेंटरमध्ये 2 रुग्ण, तर शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नांदेड येथे 2 रुग्ण, मुखेड उपजिल्हा रुग्णालय येथे एक रुग्ण, भोकर ग्रामीण रुग्णालय येथे 1 रुग्ण असून या सर्व रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत.
 सर्व जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती बाळगू नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे. तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर “आरोग्य सेतू ॲप” डाऊनलोड करुन घ्यावे जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास सदरील ॲप सतर्क करण्यास मदत करते, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
00000


अनुदानावर मिनि ट्रॅक्टर योजना 153 बचतगट पात्र
ईश्वर चिठ्ठीने (लकी ड्रॉ) बचतगटांची निवड होणार ;
सोडतीचा दिनांक लवकर कळविला जाणार  
नांदेड, दि. 20 :- अनुसूचित जाती व नवबौद्ध  घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना 90 टक्के अनुदानावर  9 ते 18 अश्वशक्तीचे  मिनी ट्रॅक्टर, त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्याच्या योजनेंतर्गत एकूण 153 बचतगट पात्र झाले असून ईश्वर चिठ्ठीने (लकी ड्रॉ) पात्र बचत गटांपैकीच निवड होणार असून सोडतीची वेळ आणि दिनांक यथावकाश लवकर कळविण्यात येणार आहे, असे आवाहन नांदेडचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी केले आहे.
राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे अनुसूचित जाती व नवबौद्ध  घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना 90 टक्के अनुदानावर  9 ते 18 अश्वशक्तीचे  मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्याची योजना कार्यान्वित झाली आहे. शासन निर्णय 8 मार्च 2017 अन्वये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या  स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्यासाठी लाभाचे हस्तांतर रोख स्वरुपात थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
सन 2018-19 या वर्षात ज्या बचत गटांनी मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने मिळविण्यासाठी अर्ज केला  होता. त्या सर्व अर्जांची तपासणी केली असता अर्जात त्रुटी आढळून आल्या असून एकुण 153 बचत गटांनी त्रुटीची पूर्तता केली आहे. पात्र व अपात्र बचतगटांची यादी कार्यालयाच्या सूचना फलकावर दर्शनी ठिकाणी लावण्यात आली आहे. अर्ज केलेल्या सर्व बचत गटांना त्रुटींची पूर्तता करण्यासाठी यापूर्वीच चार वेळा संधी देण्यात आली होती. पहिली संधी 10 जुलै 2019 पर्यंत तर दुसरी 12 डिसेंबर 2019 पर्यंत व तिसरी संधी 30 डिसेंबर 2019 पर्यंत आणि चौथी संधी 14 फेब्रुवारी 2020 पर्यंत देण्यात आली होती.
000000

Tuesday, May 19, 2020


अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेसाठी
ऑनलाईन अर्ज भरण्याचे आवाहन
नांदेड, दि. 19 :- शिकाऊ उमेदवारी योजनेंतर्गत मे 2020 व त्यापुढे होणाऱ्या सर्व अखिल भारतीय परीक्षेचे प्रात्यक्षिक परीक्षा आस्थापनेने घ्यावे, असे सुचित केले आहे.
देशात कोविड 19 मुळे 110 वी अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा झाली नसल्याने ती पुढे होणार आहे. सर्व आस्थापना मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र द्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड अंतर्गत आस्थापनावरील ज्या उमेदवाराचे प्रशिक्षण 15 एप्रिल 2020 पर्यंत पूर्ण झाले आहे. अशा सर्व उमेदवारांची परीक्षा एकत्रित होणार असल्याने आपल्या आस्थापनेतील ज्या उमेदवाराचे प्रशिक्षण 15 एप्रिल 2020 पर्यंत पूर्ण झाले आहे. अशा सर्व उमेदवारांचे ऑनलाईन परीक्षा अर्ज हे www.apprenticeship.gov.in या संकेतस्थळावर भरण्यात यावे. त्या अर्जाची प्रिंट व परीक्षा शुल्क प्रस्तूत आस्थापनेत जमा करण्यात यावे, असे एम. बी. कुलकर्णी, अंशकालीन प्राचार्य, मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र द्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड यांनी कळविले आहे.  
000000



करबला भागात नवीन एक कोरोना रुग्ण
आतापर्यंत 2 हजार 441 अहवाल निगेटिव्ह ;
एकुण 130 स्वॅबची तपासणी चालू    
नांदेड, दि. 19 :- शहरातील करबला भागात एक नवीन पॉझिटिव्ह रुग्ण पुरुष (वय 60 वर्षे) आढळला असून या रुग्णावर यात्री निवास एनआरआय भवन येथे औषधोपचार सुरु आहेत. सद्य:स्थितीत त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेणे चालू आहे.
आतापर्यंत एकुण प्रवासी व प्रत्यक्ष सर्वेक्षणाद्वारे 1 लाख 22 हजार 57 व्यक्तींची तपासणी करण्यात आलेली असून एकुण 2 हजार 730 रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले आहे. त्यापैकी 2 हजार 441 स्वॅब तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आलेला असून एकुण 130 स्वॅबची तपासणी चालू आहे. या घेतलेल्या एकुण स्वॅब पैकी 98 तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत.
आतापर्यंत एकुण 98 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 5 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. तर 30 रुग्ण हे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर 61 रुग्णांपैकी 10 रुग्ण हे डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथे तर पंजाब भवन कोवीड केअर सेंटर व यात्री निवास कोवीड केअर सेंटर येथे 49 रुग्ण आणि बारड ग्रामीण रुग्णालय येथील धर्मशाळेत कोवीड केअर सेंटरमध्ये 2 रुग्णांवर औषधोपचार सुरु असून त्यांची प्रकृती सद्य:स्थितीत स्थिर आहे.
जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती बाळगू नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे. तसेच आपल्या मोबाईलमध्ये “आरोग्य सेतू ॲप” डाऊनलोड करुन घ्यावा, जेणेकरुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास या ॲपद्वारे सतर्क राहण्यास मदत मिळेल, असेही आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
0000

Monday, May 18, 2020


अन्न व्यावसायिकांनी वेळेच्या बंधनासहित
आरोग्याच्यादृष्टिने उपाययोजना कराव्यात ;
अन्न व औषध प्रशासनाचे आवाहन  
नांदेड, दि. 18 :-  अन्न व्यावसायिकांनी त्यांना दिलेल्या निर्धारीत वेळेच्या बंधनासहीत आरोग्याच्या दृष्टीने सर्व उपाययोजना करुन व्यवसाय करावयाचा आहे. अन्यथा साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि भारतीय दंड संहिताचे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असा मानण्यात येईल व त्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त तु. चं. बोराळकर यांनी कळविले आहे.  
नांदेड जिल्हयातील सर्व घाऊक व किरकोळ किराणा आस्थापना कंटेनमेंट झोन वगळता यांच्या व्यावसायाची वेळ दररोज (रविवार वगळून) सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत करण्यात आलेली असुन अन्न व्यावसायिकांनी निर्देशित वेळेमध्ये आपला व्यवसाय करावा, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी निर्गमित केले आहेत.
            अन्न व्यावसायिकांनी व्यवसायाचे ठिकाणी स्वतःचे व कामगारांचे आरोग्य सुरक्षित राहील या दृष्टीने दक्षता घ्यावयाची असुन, चेहऱ्यावर मास्क तसेच हातामध्ये हॅन्डग्लोज व सॅनिटायझरचा योग्य तो वापर करावयाचा आहे. व्यवसायाचे जागेत कामगार, ग्राहक यांच्या संबंधात सुरक्षित अंतर किमान एक मिटरचे राहील याबाबत दक्षता घ्यावयाची असुन, व्यवसायाच्या परिसरात एका वेळी पाच किंवा पाच पेक्षा अधिक व्यक्ती एका ठिकाणी जमणार नाहीत याबाबत स्वतः उपाययोजना करुन, त्याची अंमलबजावणी करावयाची आहे. तसेच ग्राहकांचे (सोशल / फिजीकल डिस्टन्स) बाबतीत योग्य अंतर ठेवायचे असुन, अन्न हातळण्यापुर्वी सॅनिटायझरचा वापर करावयाचा आहे, किंवा हात साबणाने स्वच्छ धुण्याबाबत सुविधा उपलब्ध करुन द्यावयाची आहे. तसेच चेह-यावर मास्क न लावलेल्या ग्राहकांना अन्नपदार्थ विक्री करता येणार नाही, याबाबत त्यांना सुचित करावयाचे आहे. तसेच ग्राहकाकडून खरेदी नंतर पैसांची देवाण-घेवाण आर.बी.आय.च्या सुचनेनुसार ई-वॉलेटस् व स्वाईप मशीनद्वारे करण्यावर भर द्यावा.
अन्न व्यावसायिकांना असेही सुचित  करण्यात येते की,  सार्वजनिक आरोग्याचे दृष्टीने त्यांनी स्वतःची व कामगारांच्या आरोग्याबाबत दक्षता म्हणून स्क्रीनींक टेस्ट करुन घ्यावी तसेच घाऊक किराणा व्यावसायिकांनी खरेदी-विक्रीचा तपशिल व्यवस्थीत जतन करुन ठेवावा व कोणत्याही प्रकारे साठेबाजी व काळाबाजार होणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही आवाहन अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त तु. चं. बोराळकर यांनी केले आहे.  
00000


कोरोना : आतापर्यंत 2 हजार 420 नमुने निगेटिव्ह  
तर 182 अहवाल प्रलंबित ; 97 रुग्ण पॉझिटिव्ह ;  
कोरोना मुक्त एकुण 30 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी
नांदेड, दि. 18 :- कोरोना विषाणु संदर्भात सोमवार 18 मे रोजी सायं 5 वाजेपर्यंत नांदेड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी प्रसिद्धी पत्रकात दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत एकुण प्रवासी व प्रत्यक्ष सर्वेक्षणाद्वारे 1 लाख 19 हजार 611 व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून एकुण 2 हजार 702 रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यापैकी 2 हजार 420 स्वॅब तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आलेला असून एकुण 182 चा अहवाल प्रलंबित आहे. यात घेतलेल्या एकुण स्वॅब पैकी 97 तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यापैकी 30 रुग्णांना कोरोना या आजारापासून मुक्त झाल्यामुळे रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे.
उपचार सुरु असलेल्या 60 रुग्णांपैकी 10 रुग्ण हे डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथे तर पंजाब भवन कोवीड केअर सेंटर व यात्री निवास कोवीड केअर सेंटर येथे 48 रुग्ण आणि बारड ग्रामीण रुग्णालय येथील धर्मशाळेत कोवीड केअर सेंटरमध्ये 2 रुग्णांवर औषधोपचार सुरु असून त्यांची प्रकृती सद्य:स्थितीत स्थिर आहे. औषधोपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे एकुण पॉझिटिव्ह 5 रुग्णांचा मृत्यू झाला असून या रुग्णांना रक्तदाब, मधुमेह या आजाराने बाधित होते. या आजाराने बाधित रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी.
जनतेनी अफवांवर विश्वास न ठेवता मनात कुठल्याही प्रकारची भिती बाळगू नये व अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि नांदेड जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच आपल्या मोबाईलमध्ये “आरोग्य सेतू ॲप” डाऊनलोड करुन घ्यावा, जेणेकरुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास या ॲपद्वारे सतर्क राहण्यास मदत मिळेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
कोरोना विषाणू संसर्गाबाबत नांदेड जिल्ह्यातील माहिती
            • आत्तापर्यंत एकूण संशयित – 2581, • एकूण क्वारंटाईन व्यक्तींची संख्या-2350, • क्वारंटाईन कालावधी पूर्ण – 1009, • अजून निरीक्षणाखाली असलेले – 196, • पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये -59, • घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले -2291, • एकुण नमुने तपासणी- 2702, • एकुण पॉझिटीव्ह रुग्ण- 97, • पैकी निगेटीव्ह – 2302, • नमुने तपासणी अहवाल बाकी- 182, • नाकारण्यात आलेले नमुने - 14
• अनिर्णित अहवाल – 104, • कोरोना बाधित रुग्णांची मृत्यू संख्या – 5, • जिल्ह्यात  बाहेरून आलेले एकूण प्रवासी 1 लाख 19 हजार 611 यांना घरी राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत.
000000

वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...